हे तिन्ही बदलतेही असतात पण त्यांना काही स्थिर गाभेही असतात.व्यक्तीला तिच्या प्रवासात तिन्हींमध्ये अनुसंधान राखायची कसरत करावी लागते.

येथे ‘-धर्म’ हे उत्तरपद ‘स्वभाव’ या अर्थाने आलेले आहे. व्यक्तीच्या स्वभावाचा काही भाग जरी, तिचा जीनोम, हार्मोन्स, मेंदू-रसायने व इतर ‘लाभलेल्या’ कारणांनी ठरत असला, तरी त्या मर्यादेत का होईना पण तो बदलत नेता येतो किंवा नकळत बदलत जातोदेखील. मनुष्यप्राण्याचा उत्क्रांतिजन्य स्वभाव सेपियन हा असला तरी इतिहासक्रमात जी सभ्यता व संस्कृतींची कमाई केली तिची भर पडत मनुष्यस्वभावही विकसित होत गेलेला आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

मनुष्याच्या इतिहासात युगधर्म बदलत गेलेले आहेत. सुरुवातीला सहजोर्मी आणि आव्हाने आपल्याला घडवत होती. नंतर मिथके/आन्हिके आणि टोळीनिष्ठा यांच्या माध्यमातून आपण बनलो. कृषिउदयानंतर पवित्र वाङ्मये (स्क्रिप्चर्स) आणि शास्त्रार्थ (स्कोलॅस्टिक्स) यांनी मध्ययुगाला निवाडे पुरवले. औद्योगिक क्रांतीने सिद्धांत (थिअरी) व उपयोजने (अप्लिकेशन्स) यांना मध्यवर्ती स्थान दिले. विज्ञानाच्या उदयानंतर तर्क आणि निरीक्षणे यांद्वारे खुलासे देता येण्यावर व भाकिते करता येण्यावर भर आला. व्यक्तीच्या उदयानंतर आत्मनिष्ठा आणि निवडींचे आपोआप- संतुलन ही जोडी प्रभावी ठरली. आता नोंदक्रिया (डेटा) आणि रीतिराचके (अल्गोरिदम्स) आपल्यावर हावी होतील की काय अशी चिंता आहे. (पाहा ‘होमो डेउस’ : युवाल नोआह हरारी)

‘स्व’: उद्भव आणि बनतेपण

जन्मापासूनच भाग्यवशता व्यक्तीला घेरून असते. व्यक्तीचे सामाजिकीकरण कुटुंब, शिक्षक, मित्र वगैरे निकटसंबंधात घडत असते. शारीरिक जन्म होतो तेव्हाच ‘स्व’चा जन्म होत नाही. इतरांना ‘स्व’ असतात, याचे अनुभव घेत घेत स्वत:चा ‘स्व’ निर्माण होतो. या ‘अस्तित्वात येण्याच्या’ प्रक्रियेला आँटोजेनेसिस असे म्हणतात. आपल्याला अगदी सुरुवातीचा कालखंड स्मरणातच नसतो. कारण या काळात, आतून येणाऱ्या ऊर्मी आणि बाहेरून येणारे प्रत्यय या दोहोंना आपण देत असलेले प्रतिसाद उत्स्फूर्त असतात. प्रतिसादांच्या सवयींचे भांडवल जमा होऊ लागते. या सुरुवातीच्या काळात निर्णय ‘होत’ असतात पण मुद्दाम ‘घ्यावे’ लागत नसतात. कारण पेच पडतच नसतात. पेच पडून तो कोणत्यातरी बाजूनी सोडवायला जेव्हा मन:शक्ती लागते, तेव्हा सहेतुकता ही गोष्ट उद्भवते. सहेतुकतेमुळे आपले विषयीत्व (सबजेक्टहुड) जाणिवेच्या धारकस्थानी (बिहोल्डर-सेन्स) उभे राहू लागते. एकीकडे इतरेजन आपल्याशी जे वागत असतात त्यात त्यांची सहेतुकताही आपल्याला जाणवू लागलेली असते. ते ‘काहीतरी’ नसून ‘कोणीतरी’ आहेत, म्हणजेच त्यांना त्यांचे ‘स्व’ आहेत, याची ओळख होत असते. मनाच्या हंग पार्लमेंटमध्ये कािस्टग व्होट टाकणारा (!) आपल्याच मानसिक अस्तित्वाचा एक भाग ‘स्व’ म्हणून जन्माला येतो. निर्णय हे जेव्हा सहेतुक संकल्प (विल) बनतात तेव्हा संकल्पकर्ता निर्माण होतो.

आपण मनात डोकावून पाहिले तर ‘स्व’ असा सुटा विषय (डिस्क्रीट ऑबजेक्ट) आढळत नाही! मग हा ‘स्व’ म्हणजे असतो तरी काय? असा प्रश्न साहजिकच पडतो. डॅन डेनेट या जडवादाकडे झुकलेल्या परंतु आंतरमानसिकता (इंटरसबजेक्टिव्हिटी) समजणाऱ्या तत्त्वज्ञाने ‘स्व’ म्हणजे काय? यासाठी सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ज्याप्रमाणे वस्तूचा गुरुत्वमध्य हा वेगळा तुकडा म्हणून काढता येत नाही पण नक्कीच अस्तित्वात असतो, त्याप्रमाणे ‘स्व’ हा आपल्या संकल्प-चरित्राचा गुरुत्वमध्य असतो, असे डेनेट म्हणतो.

मी जे जे वागतो ते सगळेच माझे मलाही पटलेले नसते. पटलेल्या संकल्पांशी मी तादात्म्य मानतो व न पटलेले संकल्प हे माझे निरुपाय मानतो. इतकेच नव्हे तर चुका मान्य करून मी माझ्यात ‘घटनादुरस्त्या’ही करतो. म्हणजेच नवेपण असते तशी सलगतादेखील असते. धूमकेतूमध्ये अग्रभागी एक मोठा तुकडा असतो पण त्याहून लहान तुकडे त्याच्या मागे ओढले जात असतात. धूमकेतूला निमुळते शेपूट असते पण ते वाढत जात नाही. ‘स्व’ला मात्र वाढत जाणारे चरित्र-शेपूट असते! ज्या स्व-स्मृती तादात्म्य मानण्याजोग्या नसतात त्या भावनिकदृष्टय़ा पुसट होतात म्हणजे त्यांना फारसे ‘गुरुत्वाकर्षण’ उरत नाही. तरीही जी गोष्ट ‘मला’ शोभत नाही ती करताना माझी मलाच लाज वाटते किंवा अवघडलेपण येते. किती विसंगती ओढत राहता येतील याची क्षमता वेगवेगळी असते. भरपूर विसंगती असूनही त्या ‘विसंगती’च न वाटू देणे याला आपण ‘बनचुका/ चॅप्टर’ माणूस म्हणतो.

त्यातल्या त्यात जो गाभ्याचा स्वभाव असतो त्याला पिंडधर्म असे म्हटले जाते. संस्कार आणि स्वयंनिर्धार यांनी तो काहीसा मॉडीफाय होतो. पण उलटपक्षी त्याचवेळी तो, संस्कारक्षमता आणि निर्धारशक्ती, यांच्यावर मर्यादाही घालत राहतो. ‘‘तू निर्धार कर की आपण भ्यायचे नाही!’’ असे आपण भित्र्या माणसावर ठसवतो. तो ‘कमी भित्रा’ होतोही, पण त्याचा कल भित्रेपणाकडेच राहतो. या चिवटपणाला पिंडधर्म म्हणायचे. निरनिराळे पिंडधर्म कसे एकत्र नांदवून घ्यायचे हा नेहमीच एक खरा आणि महत्त्वाचा ठरणारा ‘सामाजिक प्रश्न’ असतो. पिंडधर्माच्या विपरीत वागावे लागले तर माणूस फक्त दु:खीच होत नाही तर कोलमडतोसुध्दा. नव्‍‌र्हस ब्रेकडाऊन!

जनुकनियत, हार्मोनल आणि मेंदूरासायनिक वैशिष्टय़े आपले सगळेच जगणे नियत करत नसली तरी मर्यादा नक्कीच घालतात. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना : हे वचन रुचिर्भिन्ना:, नीतिर्भिन्ना:, शक्तिर्भिन्ना: असे अनेक अंगांनी खरे असते. प्रत्येक व्यक्ती अनन्य असते आणि तिची अनन्यता सामावून घेणारा समाज असायला हवा, असे मानणे म्हणजेच लिबरलिझम होय. अर्थात, हे सामावून घेणे परवडलेदेखील पाहिजे! प्रगती आणि समृद्धी या गोष्टी का आवश्यक आहेत हे येथे लक्षात येईल.

मनुष्यधर्म: शाश्वत मूल्यांचे काय?

एकेका युगात उत्पादन आणि विनिमयाच्या पद्धती, राज्यसंस्थेची कार्ये आणि संस्कृतीमध्ये मूल्यांना असलेली अधिमान्यता (लेजिटिमसी) या गोष्टी खास त्या त्या युगाच्या वैशिष्टय़पूर्ण अशा असतात. सामाजिक रचनेत व्यक्तीला काही एक भूमिकासंच (रोल-सेट) निभवावा लागतो. तुमचे व्यक्तित्व आणि तुमच्या वाटय़ाला येणारा भूमिकासंच या दोहोंत कितपत जुळवणूक साधता येते यावर तुम्ही जितपत असाल तेवढे सुखी / दु:खी असता. अर्थात, हे जसेच्या तसे न स्वीकारता भूमिकासंचात बदल घडवून आणण्याची धडपडही एकीकडे चालू राहतेच. या धडपडीतून माणसे युगधर्माला आव्हानित करणारे विद्रोह आणि पोटात पुढच्या युगाची बीजरूप पायाभरणीदेखील करत असतात. उभयदिशांनी निर्णायक अशी द्वंद्वात्मकता ही सतत लक्षात ठेवावी अशी गोष्ट आहे. द्वंद्वात्मकता सुटली की एकांगी आकलने होऊन विचार खुंटतो. याबाबतीत नेहमीच सावध राहिले पाहिजे.

जरी निर्णायक वास्तव हे सद्ययुगाचेच असले आणि युगधर्माची समर्थने प्रभावी असली, तरी सार्वकालिक सत्यांचा आणि मूल्यांचा शोध चालूच राहतो. हा शोध त्या त्या युगाचेही चिकित्सक मूल्यमापन करत असतो. कारण मनुष्याच्या जाणिवेत स्वत:ला ओलांडून स्वत:कडे बघता येण्याची विशेष क्षमता असते. त्यामुळेच आपली चिंतनशक्ती आपल्या वास्तवस्थितीवर पुरती अवलंबून नसते. मूल्यमापनात्मक अभिप्राय देणे आणि ते देताना मूल्यमापनाचे निकषही बनवणे याबाबतीत काही चिंतनशील लोक त्यांच्या काळाच्या पुढे असतात. चिंतनांचा इतिहास हा वास्तवाच्या इतिहासापासून (काहीसा) स्वतंत्र असतो.

म्हणूनच चालू युगधर्माचे चिकित्सक मूल्यमापन करता येते. जेव्हा अमुक युगापेक्षा तमुक युग चांगले, असे अभिप्राय आपण देतो, तेव्हा युगनिरपेक्ष अशा शाश्वत मानवी मूल्यांची उद्घोषणा करत असतो. या शाश्वत मानवी मूल्यांचा आशय चिंतनाच्या इतिहासात बदलतही जातो. जरी शाश्वत मानवी मूल्यांचे पुनर्थाकन होत राहिले किंवा फेरमांडण्या होत राहिल्या, तरी त्यांना एक स्थिर गाभा आहे आणि आपण तो अधिकाधिक शुद्ध करून घेतो आहोत, अशी श्रद्धा असते. या श्रद्धेमुळेच, ‘काहीही चालते’ या छापाचा बेजबाबदार सापेक्षतावाद आपण स्वीकारत नाही.

पण ही नुसतीच श्रद्धा नाही. कारण मानवी-हित कशात आहे यावर वाद असले तरी त्यातील मतांच्या व्हेक्टर्स एकमेकींना कॅन्सल-आउट करत नाहीयेत. स्वातंत्र्यवाद, समतावाद, सर्वोदयवाद, अंत्योदयवाद, दु:खनिरासवाद, सुखवर्धनवाद, सहभागवाद, अवैरवाद, अिहसावाद, विवेकवाद, तपासणीयतावाद हे सारे जरी एकमेकांशी भांडत असले, तरी हे भांडण ‘भर कशावर द्यायचा?’ असे असते. मानवांनी बिनधास्त एकमेकांना मारून टाकावे असे कोणीच म्हणत नसते. सहमती नसली तरी एकूण दिशेबाबत जवळीक नक्कीच आढळते. म्हणूनच आपण मनुष्यधर्म हा शब्द अर्थपूर्णरीत्या वापरू शकतो.

पिंडधर्म, युगधर्म आणि मनुष्यधर्म हे ‘स्वभाव’ असले, तरी त्यांत आपण कसे आहोत? हा तथ्यार्थ आणि त्याबरोबरच आपण कसे असायला हवे? हा विध्यर्थ; ही दोन्ही अंगे समाविष्ट असतात. कारण हे स्वभाव माणसाचे आहेत आणि माणूस हा घडविणारा व बनत जाणारा प्राणी आहे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com