शिक्षण पुनर्रचनेची त्वरेने गरज

प्राध्यापकांचा विषयातील क्षेत्राशी संबंध न उरता प्राध्यापैकी हेच स्वयंपोषक क्षेत्र बनले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राजीव साने

जीवनशिक्षण, व्यवसायशिक्षण, पांडित्यशिक्षण, नवज्ञाननिर्मिती आणि प्रमाणपत्र महामंडळ या अगदी भिन्न कार्याचा अनाठायी गुंता सोडवून घ्यावा लागेल.

वरील पाच भिन्न कार्यासाठी सक्षम आणि अपव्यय नसलेली शिक्षण पुनर्रचना हा विषय आता तातडीचा बनलेला आहे. विशेषत: उच्चशिक्षणात मिळालेली पदवी, नोकरीतल्या पदाचे नाव आणि प्रत्यक्ष कामाचे स्वरूप; यांत कसलाच संबंध नसण्याचे प्रमाण फारच वाढलेले आहे.

प्राध्यापकांचा विषयातील क्षेत्राशी संबंध न उरता प्राध्यापैकी हेच स्वयंपोषक क्षेत्र बनले आहे. अकेडेमिक्स नावाचा आखाडा ही एक जणू व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी पण प्रत्यक्ष माणसांना भरपूर पगार देऊन (आणि बिगरकायम असलेल्यांना कमी पगार देऊन) चालवली जात आहे. संशोधन ही गोष्ट अकेडेमिक अचिव्हमेंट दाखवण्यासाठी केली जाते तेव्हा ती कित्येकदा खाजवून खरूज काढल्यासारखी केली जाते. उद्धृतांच्या आढाव्यांत तुरळकपणे स्वत:चे (?) म्हणणे पेरले जाते. वित्तीय तरतूद वाढवली की क्षेत्र सुधारते ही अंधश्रद्धा आहे.

या शतकात जीवनाच्या सर्वक्षेत्रात जे बदल होऊ घातलेले आहेत ते लक्षात घेता, आयुष्याचे, शिक्षण-व्यवसाय-निवृती असे कालखंड न राहता, या तीनही गोष्टी (होय निवृतीसुद्धा) नेहमीच चालू राहणाऱ्या बनतील. जाणिवेतून स्वयंनियंत्रण व निरपेक्ष साक्षीभाव यासारखे तात्त्विक प्रश्न ‘व्यावहारिक’ बनतील. स्वत:ला समजून घेणे, बदलणे किंवा बदलू देणे यासाठी लागणारी मानसिक लवचीकता हा सर्वात मोलाचा असेट असणार आहे. आपली जग चालवण्याची क्षमता अपार वाढली असली तरी अर्थपूर्ण जीवन म्हणजे काय, या प्रश्नाचे आकलन फारच तोकडे पडत आहे. हरारी यांच्या ‘होमोडेउस’ या पुस्तकातील शेवटचा विभाग ‘सेपियन्स लूज कंट्रोल’ वाचलात, तर येऊ घातलेल्या संकटांची आणि संधींचीही कल्पना येऊन, ‘त्वरेने’ का म्हणतोय तेही कळेल.

माहिती, ज्ञान, आकलन, समज, अंतर्दृष्टी, वृती, संवादशक्ती, कौशल्य, मतधारणा, चिकित्सकता, सर्जनशीलता, रसिकता, समग्रता या अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मुळात स्पष्ट असायला हवे. आणि या सगळ्यातले- कोणत्या बाबतीतले? काय? कोणाला लागते? किंवा नसले तरी चालते? हे ठरवायला हवे. तसेच वरील पाच विभागांची कार्येस्वतंत्रपणे ठरवून मग त्यांची संस्थात्मक गुंफण कशी? याचा विचार करावा लागेल.

जीवनशिक्षणानंतरच व्यवसायशिक्षण  

‘जे सर्वानाच कळायला हवे ते शिकण्याची संधी पदव्युत्तर पातळीला! याउलट जे तज्ज्ञांनाच लागेल ते मात्र सर्वाना सक्तीचे!’- हा पहिला मोठा घोटाळा आहे. संवादशक्ती, तर्क, आरोग्य (मानसिकसुद्धा), कायदा, मूल्यविचार, श्रमविभागणी-विनिमय व सत्तासंबंध या गोष्टीत अनभिज्ञ राहून कोणालाच चालत नाही. पण हे विषय विशेषज्ञांना पदवी किंवा पदव्युत्तर पातळीला नेमले जातात. गणित हे जितके लागते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त शिकवले जाते. गणितामुळे विचारशक्ती वाढू शकतेसुद्धा. पण त्याच्या धसक्याने ती घटत जातीय असेच जास्त करून होताना दिसते. भाषा आणि भाषांमधले साहित्य हे वेगळे विषय आहेत, हे लक्षातच घेतले जात नाही. पाठांमधील आशय लक्षात राहणे आणि भाषा वापरता येणे या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. नम्रता ढळू न देता पण स्पष्टपणे, ठामपणे कसे बोलावे हे सर्वानाच जमले पाहिजे. संवादशक्ती वाढत नाहीये. कार्यसंस्कृती सुधारत नाहीये. वचन देताना झेपेल इतकेच द्यायचे पण पाळताना कसून पाळायचे हे जास्त चांगले असते. पण गोड बोलून नंतर टांग मारणे याचे प्रमाण किती भयानक आहे!

कायदेपंडित होण्याची गरज फार थोडय़ा लोकांना असते. पण कोणते काम कोणत्या ऑफिसात न्यावे एवढे तरी कळलेच पाहिजे. आपण पत्र दिलं की पोच घेतली पाहिजे. त्यासाठी मुळात लेखी देणे या गोष्टीची भीती काढून टाकली पाहिजे. नोंद नीट न ठेवणे याने भारताचे किती नुकसान झाले आहे हे सर्वश्रुत आहे. आता नोंदी करणे सोपेही झाले आहे. जीवनशिक्षण या सदरात इतरही बऱ्याच गोष्टी येतात.

व्यवसाय शिक्षणाबाबत महत्त्वाचे सत्य असे, की काम करणे ही गोष्ट प्रत्यक्ष करूनच शिकता येते. कंपन्या (दुरुस्तीसाठी) आमचा ‘इंजिनीअर’ पाठवतो असे म्हणतात. जो येतो तो इंजिनीअर नक्कीच नसतो. पण तेच बरे असते. कारण त्याला काम येत असते! पदवी कसलीही असली (किंवा नसली) तरीही माणूस काम करत करतच शिकतो. कोणाही नेमणूकदाराला नव्या माणसाला ट्रेन करण्याचा खर्च उचलावाच लागतो. या मुळातच चालू असणाऱ्या प्रक्रियेला क्लासरूम टीचिंगची जोड नेमकी कुठे हवी आहे, हे हेरून क्लासरूम-टीचिंग उपलब्ध करता आले, तर बराच अपव्यय वाचेल. हस्तकौशल्ये, शेती, संगीत, पाककौशल्ये, विक्रेता-कौशल्ये अशा अनेक क्षेत्रांनी, शिकाऊ कामगार घेत घेत शिक्षण देता येते, हे सिद्धच केलेले आहे.

कामगार संघटना चालवताना काही अतिशय मोलाचे अनुभव मला आले. जेव्हा कामगार त्याची अडचण घेऊन युनियन-ऑफिसवर येतो, तेव्हा त्याची अडचण ही स्वरूपत:च आंतरशाखीय असल्याने, युनियनमधील संवादात त्याला, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र यांतलेही शिकायला मिळत असे. कामगार पदवीधर नसतो. पण शिकण्याचा क्षण आला की शिक्षण होतेच. जेव्हा प्रसंगच असा असतो की माणूस शिकायला तयार असेल, तेव्हाच कोणी जाणकार भेटणे, हा योग जुळून यावा लागतो. इतकेच नव्हे तर उद्योगांतील अडचणींबाबतचे संशोधन व्यवस्थापनापेक्षाही युनियन जास्त नेमकेपणाने करू शकत असे. देशाटन, पंडितमत्री, सभेत संचार वगैरे करून चातुर्य येत असेलही कदाचित. पण शहाणेाणा ही गोष्ट बाक्या प्रसंगात वा नंतर केलेले आत्मचिंतन याच मार्गाने मिळू शकते. जगाची एकूण कल्पना यावी यासाठी आपण विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल वगैरे शिकवतो. भूगोलाचा बराच भाग निव्वळ माहिती स्वरूपाचा असतो. ग्रहणे किंवा भरती-ओहोटी हे विषय विज्ञानात येतातच. इतिहासाचा उपयोग अस्मिताबाजीसाठी न करता मानवाने घ्यावयाचे धडे यासाठी करायचा तर ‘थोर पुरुषांची चरित्रे’ नव्हेत तर अँथ्रोपोलॉजिकल-हिस्टरी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर अशी शिकवावी लागेल.

पांडित्य ही प्रेस्टीज-गुड असल्याने महाग असायला हवी. पांडित्य म्हणजे ज्ञानाचा इतिहास सांगता येणे. विज्ञानाच्या ठळक इतिहासातसुद्धा, अगदी साध्या साध्या तथ्यांबाबतसुद्धा भलतेच गरसमज वर्षांनुवर्षे तसेच ठेवले जात आहेत. उदाहरणार्थ ‘मानवाला गुरुत्वाकर्षण ‘असते’ याची जाणीव प्रथमच न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडून झाली!’ खरेतर वजन हे बल नेहमीच थेट जाणवणारे होते. वजनापेक्षा वस्तुमान वेगळे असते ही गोष्ट समजण्याची गरज होती. अरिस्टॉटलने गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत फार पूर्वीच मांडलेले होते. ते चुकले होते. गॅलिलिओने प्रयोग करून त्यांचे खंडन केले व त्या निमित्ताने प्रयोग या पद्धतीचाही शोध लावला! गॅलिलिओच्याही अगोदर केप्लरने ग्रहांच्या कक्षा कसा असतील याचे एक गणिती प्रारूप सिद्ध केलेले होते. न्यूटनला जे महत्त्वाचे प्रश्न पडले ते प्रश्न गॅलिलिओ व केप्लर नसते तर पडलेच नसते! फक्त पृथ्वीच ओढते असे नसून, कोणतीही दोन वस्तुमाने एकमेकांना ओढतात, हे न्यूटनचे एक महत्त्वाचे योगदान होते. त्याने, बल किती असेल याचे गणिती सूत्र मांडले. विशेष म्हणजे ज्या वस्तुमानाने जडत्वबल निर्माण होते त्याच वस्तुमानाने गुरुत्वबलही निर्माण होते, हेही त्याने सिद्ध केले. तरीही ‘आयुका’त नारळीकरसुद्धा सफरचंदांचे झाड लावतात!

निरंतर शिक्षणासाठी मानसिक लवचीकता

मॅट्रिक होऊन बेंबटय़ा पोस्टात चिकटला आणि तेथेच रिटायर झाला ही कथा केव्हाच आऊटडेटेड झालेली आहे. अमुकच क्षेत्रात मी काम करणार असे स्वप्न पाहणेही व्यर्थ ठरेल, इतक्या वेगाने व्यवसायबदल होत जाणार आहेत. स्वत:चे पुनर्नूतनीकरण करण्याची (रीइन्व्हेंटिंग वनसेल्फ) गरज लागत राहणार आहे. बुद्ध्यांकापेक्षा भावनिक संतुलन महत्त्वाचे ठरणार आहे. कारण वेगाने बदलते सामाजिक संबंध व्यक्तीला झेपावे लागतील. पूर्णवेळ व्यवसाय म्हणजे वर्कोहोलिझम आणि ‘दमलेल्या बाबाची कहाणी’! पार्टटायमायझेशन ही पद्धती अनेक अंगांनी आवश्यक ठरणार आहे. चालू व्यवसायापेक्षा, अगदी वेगळ्या गोष्टी शिकण्यातून नव्या क्षमता व रसपूर्णता मिळवणे, यासाठी दिवसातला वेळ राखून ठेवायला लागेल. त्याचबरोबर शिक्षक-समुपदेशक म्हणून काम करणे हेही सर्वानाच दिवसातला काही काळ करावे लागेल (किंबहुना करायला मिळेल).

परीक्षांचे मानकीकरण, प्रयोगशाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुरू-शिष्य-सूचक-मंडळ ही तीनच कार्येशिक्षणखात्याकडे राहावीत. शिकाऊ-कार्मिक-वृती (स्टायपेंड) यात अनुदान देण्याला वाव राहील. खरेतर शिक्षण-पुनर्रचना ही गोष्ट सरकारला जास्त परवडणीयही असणार आहे. परीक्षेत कोणावरही ‘अन्याय’ होऊ नये या नादात, खरोखर विषय कळला आहे की परीक्षा-कलाच फक्त जमली आहे? हे न तपासले जाण्याची जी ‘वस्तुनिष्ठ’ पद्धती रुळली आहे, तिच्यात काय बदल करता येतील यावर पुढील लेखांकात एक मुक्तचिंतन!

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Need for urgent education restructuring

ताज्या बातम्या