पूजा पिल्लै

प्रेमकथेइतकेच पाककृतींना महत्त्व देणाऱ्या या पुस्तकातून दिसणारी भारताची प्रतिमा, आज लादल्या गेलेल्या प्रतिमेपेक्षा सर्वसमावेशक आहे..

भारतातच, पण एका वेगळय़ा काळात घडलेली आंतरधर्मीय प्रेमकथा.. ही प्रेमकथा आपल्याला आजच्या काळात एक धडा देते- लग्न करण्यासाठी प्रेम पुरेसे आहे. कुटुंबीय या नात्यात अडथळा ठरले नाहीतच; पण त्यांनी साधा विरोधही केला नाही, उलट मोकळय़ा मनाने या नात्याचे स्वागत केले. ‘यात काय नवे,’ असे वाटत असेल, तर ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात आंतरधर्मीय प्रेमसंबंधांना ‘लव्ह जिहाद’चे लेबल चिकटवले गेले आहे, त्याकडे एकदा धावती नजर टाका. ज्या वेगाने देशातील विविध राज्यांनी आंतरधर्मीय विवाह अशक्यप्राय करून ठेवणारे कायदे संमत केले आहेत, त्याचा विचार करा. आणि मग सीमा चिश्तींच्या ‘सुमित्रा अ‍ॅण्ड अनीस : टेल्स अँड रेसिपीज फ्रॉम अ खिचडी फॅमिली’च्या केंद्रस्थानी असलेल्या सुमित्रा व अनीस यांच्या प्रेमविवाहाची कल्पना करून पाहा.

हा असा विवाह आहे जिथे धर्म आणि संस्कृती वेगळी असूनही एक स्त्री आणि एक पुरुष आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. अर्थात ही कथा किंवा ज्या देशात ती घडते तो भारत यापैकी कोणीही कधीच एवढे मोकळेढाकळे नव्हते. कदाचित सुमित्रा आणि अनीस यांनी जेव्हा निकाहच्या शपथा घेतल्या त्याच वेळी देशाच्या अन्य एखाद्या कोपऱ्यात त्यांच्यासारख्या आणि त्यांच्याचएवढय़ा भिन्न पार्श्वभूमीच्या जोडप्याला एकत्र येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असेल. कदाचित कुटुंब आणि समाजाच्या दहशतीमुळे त्यांना त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे धाडसही झाले नसेल. पण नेमके हेच सुमित्रा आणि अनीसच्या कथेचे वेगळेपण आहे. समाजात निषिद्ध असूनही बंधने झुगारून त्यांचे एकत्र येणे एक प्रेमकथा म्हणून नक्कीच आश्वासक ठरते. आज मात्र याच्या नेमके विरुद्ध चित्र दिसते. भिन्न धर्मात जन्मलेले दोन प्रेमी जीव अशा प्रकारे एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली आहे आणि कोणी असा प्रयत्न केलाच तर त्याचे भीषण परिणाम भोगावे लागण्याच्या भीतीचीही त्यात भर पडली आहे. 

चिश्ती या अनुभवी पत्रकार. आपल्या पालकांच्या नात्याविषयीची काही गुपिते उघड करणारे हे त्यांचे पुस्तक. स्वत:च्याच आई-वडिलांविषयी लिहिण्यामागचा उद्देश ‘मनोगता’मध्ये स्पष्ट करताना चिश्ती म्हणतात, ‘ते हयात असताना सार्वजनिकरीत्या याविषयी कधीही थेट बोलू शकले नसते, पण आज याविषयी बोलणे महत्त्वाचे ठरते, कारण त्यांनी जे अनुभवले, ते आज निव्वळ कपोलकल्पित वाटावे, असे वातावरण भारतात कधी काळी खरोखर अस्तित्वात होते. सुमित्रा आणि अनीसचे स्वयंपाकघर, घर, आयुष्य आणि त्यांचे आदर्श यात भारत सामावलेला दिसतो. कदाचित तो भारत या संकल्पनेचा जो कोलाज आहे त्याचा एखादा भाग असेल, काही वेळा तो कुरूपही असेल, पण तो भारताचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.’

 पुस्तकाचे पहिले तीन भाग सुमित्रा आणि अनीसची प्रेमकथा कशी घडली, हे सांगताना दोघांच्या सामाजिक पार्श्वभूमीचाही चिकित्सक आढावा घेतात. सुमित्रा यांचा जन्म कर्नाटकच्या हासन जिल्ह्यतील अरसिकेरे गावात १९३३ साली झाला. त्यांची आई शैव आणि वडील वैष्णव होते. त्या काळच्या कानडी मुलखात वैष्णव-शैव (स्मार्त) विवाहदेखील ‘अब्रह्मण्यम्’ मानला जाई. शिक्षण घेऊन करिअर करायचे हे सुमित्रा यांचे बालपणापासूनचे स्वप्न होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मोठय़ा भावाने- प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते डी. शंकर सिंह यांनी सुमित्रा यांचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला. त्यामुळे चित्रपट क्षेत्राभोवतीचे वलय त्यांनी जवळून पाहिले होते. मात्र तरीही सुमित्राचे करिअरवरचे लक्ष विचलित झाले नाही. कालांतराने त्या दिल्लीतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड’मध्ये रुजू झाल्या आणि तिथेच त्यांना त्यांच्या जीवनाचा साथीदार भेटला. 

अनीस यांचा जन्म १९४० साली उत्तर प्रदेशातील देवरिया गावात झाला. ते दिल्लीला आले ते ‘भारतीय कृषी अनुसंधान संस्थे’त स्टॅटिस्टिशियन म्हणून. लहानपणापासून त्यांना पत्रकारितेचे आकर्षण होते. दिल्लीत येण्याआधी, उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिकताना त्यांना साहित्य, काव्य, क्रीडा, संस्कृती आणि जागतिक घडामोडींविषयी आवड निर्माण झाली. राजधानीतील साहित्य आणि पत्रकारितेच्या वर्तुळात आपले स्थान निर्माण व्हावे यासाठी ते प्रयत्न करत होते. सुमित्रा आणि अनीस दोघेही त्या वेळच्या एका बऱ्यापैकी वाचकप्रिय असणाऱ्या साप्ताहिकासाठी लेखन करत आणि हेच त्यांच्या भेटीचे निमित्त ठरले. त्यांच्या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर विवाहात झाले. लग्न तर निर्विघ्नपणे पार पडले खरे, पण संसार करताना कळू लागले की, भारत  बदलू लागला होता.

सीमा चिश्ती लिहितात.. ‘सुमित्रा आणि अनीसच्या लक्षात येऊ लागले होते की, आपण विवाहबद्ध झालो तेव्हा आलेले अडथळे हे केवळ सामान्य आक्षेप ठरावेत, एवढे क्षुल्लक होते. आणीबाणी असो वा बाबरी मशीद पाडल्यानंतरचा काळ, भारत वेगाने बदलू लागला होता.’ अशा काळात सुमित्रा आणि अनीसचे स्वयंपाकघर एक ठेवा जपत होते- दोन भिन्न धर्मातील, भिन्न कुटुंबांतील आणि भिन्न प्रदेशांतील समृद्ध खाद्यसंस्कृतीचे ते एकत्रित गुपित होते. त्याला भारताचा गंध होता, उत्तरेतली कढी आणि दाल-पालक असायची पण तीन प्रकारचे दाक्षिणात्य रसमदेखील असायचे आणि शामी कबाबच्या शेजारी आरामात विराजमान झालेले कानडी पद्धतीचे फ्राइड मटण! यातून सुमित्रा आणि अनीसच्या पुस्तकाचा चौथा भाग उलगडतो.

पाककृतींचे पुस्तक

सुमित्रा यांनी पाककृतींचे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न तीनदा केला. त्यातला तिसरा प्रयत्न जो या पुस्तकाच्या पुढल्या पानांमध्ये समाविष्ट आहे, त्यामागची प्रेरणा त्यांची मुलगी म्हणजे पुस्तकाची लेखिका सीमा असल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. स्वयंपाकाची आवड नसणाऱ्या आपल्या या मुलीला कधी आपल्या आईच्या हातचा एखादा आवडता पदार्थ खाण्याची इच्छा झाली, तर तो पदार्थ तिला पुस्तकात पाहून करता यावा, हा त्यामागचा उद्देश होता. दोन संस्कृतींचा संगम जो एके काळी साजरा केला जात होता, त्याची आठवण करून देण्याचे काम चिश्ती यांनी केले आहे. अशा प्रकारच्या पुस्तकात काही प्रमाणात सेपिया टोनमधले स्मरणरंजन अपरिहार्यच आहे. पण चिश्ती यांच्या मते बदलत गेलेल्या राजकीय स्थितीचे संदर्भ जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक वाचणे महत्त्वाचे आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत वीर सिंघवी यांनी खाद्यसंस्कृतीविषयीची काही मिथके (उदाहरणार्थ खिचडी हिंदु आहे आणि बिर्याणी मुस्लीम) खोडून काढली आहेत.

सुमित्रा आणि अनीसच्या या कथेतून भारताची एक प्रतिमा अधोरेखित होते, जी आज आपल्यावर लादल्या गेलेल्या प्रतिमेपेक्षा बरीच सर्वसमावेशक आहे. प्रेमकथेइतकेच पाककृतींना महत्त्व देणारे हे पुस्तक जणू, १९५० च्या दशकाअखेर फुललेल्या एका प्रेमकथेचीही पाककृतीच सांगणारे आहे.. अर्थात ही पाककृती आज बनवून पाहणे अशक्यप्राय, असेही कुणाला वाटेल!