अमरेंद्र धनेश्वर
‘‘संदेसा कैसे भेजूँ सैंया जो विदेसा
कागा रुठे, भँवरा रुठे, रुठ बैठे पथकवा
अरज करत सबनकी
कहते वे तकत बाँट हम हमरे प्रीतमकी’’
ज्येष्ठ संगीतकार पं. शंकर अभ्यंकर यांना ८८ वर्षे (१९ मे ) पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त..

रागदारी संगीतात विशिष्ट विषयांभोवताली रचना आणि रचनाकार घुटमळत असतात. सासू आणि नणंदांना खलनायिकेची भूमिका कायमच वठवावी लागते. आपल्या प्रियकरापर्यंत अथवा पतीपर्यंत जाऊन त्याच्या मिठीत विसावण्यापासून प्रेमिकेला अथवा नायिकेला रोखण्यात आसुरी आनंद मानणे हा यांचा प्रमुख उद्योग असतो. नायिकेच्या नाजूक पावलांभोवती अलगदपणे बांधलेल्या नूपुरांच्या नादामुळे या सासूची आणि नणंदेची झोप मोडते. आणि त्या नायिकेच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. त्यातून ‘झनझन झनझन पायल बाजे.. जागे मोरी सास ननदिया और बैरनिया जेठनिया’सारखी रचना फैयाझ खान खाँसाहेबांसारख्या रंगील्या गवयाला स्फुरते.
या सासू आणि नणंदांचा अतिरेक झाला की पारंपरिक संगीतकार कृष्ण किंवा क्वचित शिव या परमेश्वराच्या कथित अवतारांकडे वळतो. असहाय गोपींवर रंगाची पिचकारी अडवून त्यांना सतावणे आणि हैराण करणे हा भगवान श्रीकृष्णाचा प्रमुख व्यवसाय असावा असे कृष्णलीलेवर आधारित शेकडो बंदिशी ऐकून वाटते. ‘सोहिनी’ रागातील ‘रंग ना डारो श्यामजी’सारखी बंदिश रचण्याचा मोह कुमार गंधर्वासारख्या सर्जनशील गवयालाही टाळता आला नाही. ‘पंचवदन पिनाक धरशिव बृषभवाहन भूतनाथ’ असे शिवाचे वर्णन करणाऱ्या रचनाही रागदारी संगीत विपुल प्रमाणात आहेत. रामावरच्या अनेक रचना तर थेट तुलसी रामायणातून आलेल्या आहेत. अत्यंत नादमधुर शब्दरचना या बंदिशीमधल्या गेयतत्त्वाला अधोरेखित करतात. आणि हे सर्व झाले की उरते गुरुभक्ती. तिला तर या क्षेत्रात अंतच नाही. हजारो रचना आल्या गुरूबद्दलची भक्ती, निष्ठा अथवा अंधभक्ती व्यक्त करणाऱ्या आजही लिहिल्या, रचल्या आणि गायल्या जात आहेत.
अशा वातावरणात वेगळा विषय घेऊन किंवा वेगळय़ा अनुभवाशी निगडित अशी रचना दृष्टीपथास आली किंवा ऐकायला मिळाली की उन्हाच्या तप्त झळा सोसल्यानंतर वाऱ्याची हळुवार झुळूक अंगावर घेतल्याचा आनंद मिळणे स्वाभाविक आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि रचनाकार पं. शंकर अभ्यंकर यांच्या अनेक रचनांनी कलाकारांना आणि श्रोत्यांना असा अपूर्व आनंद दिला आहे. अभ्यंकरांच्या वयाला १९ मे रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीत कलेला वाहिलेले आहे. गायक, गुरू, सतारवादक आणि रचनाकार म्हणून तर ते सर्वाना परिचित आहेतच. या व्यतिरिक्त ते संगीतासारख्या प्रयोगसिद्ध आणि प्रयोगशरण कलेचे एक मार्मिक ‘क्रॉनिकलर’ आहेत. १९३० च्या दशकापासून आत्तापर्यंतच्या संगीताचा प्रवास त्यांनी त्यात सहभागी होत पाहिलेला आहे. आणि आपल्या चाणाक्ष नजरेने अनेक ऐतिहासिक क्षण टिपलेले आहे. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि समृद्ध बनले आहे.
वर उल्लेखलेल्या बंदिशीत ते म्हणतात प्रियकराला संदेश कसा पाठवू? कावळा रुसला आहे, भुंगाही रुसलेला आहे. त्या पांथस्थाबरोबर निरोप पाठवायचा, तोही रुसलेलाच आहे. या सर्वाच्या विनवण्या नायिकेने केल्या तर ते म्हणतात आम्ही आमच्याच प्रियकराशी वाट पाहत डोळे लावून बसलो आहोत. हे वेगळेपण मनाला चटकन स्पर्शून जाते. ‘छायानट’ रागात अभ्यंकरांची ‘संदेसवा पियासे मोरा कहियो जा’ अशी रचना आहे. वीणा सहस्रबुद्धे तसेच आशा खाडिलकर यांच्या गळय़ातून ती अनेकदा ऐकली आहे. या बंदिशीत नायिका लयीशी लडिवाळपणे खेळत भ्रमराबद्दल त्यालाच उद्देशून कृतज्ञता व्यक्त करते.
पर्यावरणाविषयीची जागरूकता हादेखील रागदारी संगीताच्या परिघातील एक विषय होऊ शकतो हे शंकर अभ्यंकर यांनी दाखवून दिले आहे. ‘शामकल्याण’ रागातल्या त्यांच्या एका रचनेबद्दल ते म्हणतात,
‘सूरज चंदा अगन समीर ये सब हमरे प्राण
पंचमहाभूत यही है जीवन जब करत कोप तब लेत प्राण!’
त्सुनामी किंवा कोविड-१९ सारखी महाभयंकर संकटे मानवजातीवर कोसळली की संगीतकार यापासून अलिप्त कसा राहू शकेल? त्याच्या निर्मितीतून यातून होणाऱ्या वेदना आणि संवेदना प्रकट झाल्याशिवाय राहणार नाहीत.

lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

‘दुख दरींद्र दूर करो, सुख देवो सबनको’ अशी याचना आर्ततेने परमेश्वराकडे करणाऱ्या १८ व्या शतकातल्या फिरोज खान ऊर्फ ‘अदारंग’ या ख्याल गायकीच्या एका प्रवर्तकाला अभ्यंकर मनापासून मानतात आणि कुमार गंधर्व हे तर गायक आणि रचनाकार म्हणून त्यांच्या दृष्टीने आदर्शच. त्यांचे आणि कुमारांचे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध होते. कुमारांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सृजनशीलतेचा गहिरा संस्कार त्यांच्यावर झाला. ‘देसकार’ रागात कुमारांनी ‘चिडियाँ चूँचूँहानी, मंगल धरा बनी है लुभायी’ अशी चीज बांधली होती. ती द्रुत त्रिमालातली. अभ्यंकरांनी द्रुत एकतालात बांधलेल्या ‘कुहूँ कुहूँ कूक कर रही कोय लिया’ या चीजेत ‘चिडियाँ’चे प्रतिबिंब दिसते. ‘पूरिया कल्याण’ रागातली त्यांची ‘पीहिरवा आजा आजा रे’ ही चीज पुष्कळ गाजली. ती त्यांची पहिली रचना. एकदा छबिलदास सभागृहात शोभा गुर्टू ती गायल्या. त्यांना रचनाकार कोण हे माहीत नव्हते. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रसाद सावकारांनी शोभाताईंना हे सांगितल्यावर त्या आश्चर्यचकित झाल्या. अभ्यंकरांच्या बंदिशी आवर्जून गाणाऱ्यांमध्ये आणि शिकवणाऱ्यांमध्ये यशवंतबुवा जोशी, राजा काळे, अश्विनी भिडे, आरती अंकलीकर, अर्चना कान्हेरे इत्यादी गायक कलाकारांचा समावेश होतो. अभ्यंकरांच्या दृष्टीने कृतकृत्य वाटण्याचा क्षण कोणता? असे विचारल्यावर ते म्हणतात की देवासला कुमारांनी अभ्यंकरांच्या बंदिशींचा खास कार्यक्रम घडवून आणला आणि त्या वेळी अभ्यंकरांच्या रचनांचे विवेचन आणि रसग्रहण स्वत:हून केले.
अभ्यंकर मूळचे सातारचे. त्यांचे वडील कृष्णाजी हे शाळामास्तर होते. अत्यंत संगीतप्रेमी अशा या पित्याला आपला मुलगा आणि मुलगी यांनी गाणे शिकावे असे मनापासून वाटे. त्या नादात त्यांनी मुलांना मिरजेला अब्दुल करीम खान खाँसाहेबांकडे नेले. इतक्या लहान मुलांना कसे शिकवणार असा प्रश्न खाँसाहेबांना साहजिकच पडला. त्यांनी मायाळूपणे या कुटुंबाची दोन दिवस राहण्याखाण्याची सोय केली आणि तिथे दिवसरात्र चालणारे गाणे पोटभर ऐका असे सांगितले. काही दिवस ते गजाननबुवा जोशींकडे शिकले. पुढे काही दिवसांनी वडील लहानग्या शंकरला घेऊन मुंबईत दादरला नारायणराव व्यासांकडे पोचले. नारायणराव त्यावेळचे प्रसिद्ध गवई होते. त्यांच्या ‘राधेकृष्ण बोल मुखसे’, ‘सखी मोरी कमझुम’ वगैरे तबकडय़ा धो धो खपत होत्या आणि सर्वत्र सतत वाजत होत्या. नारायणरावांकडे गुरुगृही राहून आणि शागीर्दी करून ते १४ वर्षे गायन शिकले.
नारायणरावांचे बंधू शंकरराव व्यास यांच्याकडे ते सतारही शिकले. त्यांनी सतारवादनात पं. रविशंकर आणि उस्ताद विलायत खान खाँसाहेब यांच्या शैलीचे अध्ययन करून त्यातले बारकावे आत्मसात केले. मुंबई आकाशवाणीवरून अनेकदा त्यांनी वाजवलेला ‘बसंत’ ऐकवला जातो. त्यावर रविशंकरांची छाप दिसून येते. नारायणराव व्यासांनी त्यांना कुणाचेही गाणे/बजावणे ऐकण्याची पूर्ण मोकळीक दिली होती. त्याचा फायदा असा झाला की १९५० च्या दशकात मुंबईत ठिकठिकाणी आणि विशेषत: ‘देवधर्स स्कूल’मध्ये होणाऱ्या संगीत मैफलींमधून संगीत रसाचे त्यांनी आकंठ प्राशन केले. बडे गुलाम अली, अमीर खान खाँसाहेब, ओंकारनाथ, केशरबाई, वामनराव पाध्ये, लताफत हुसेन, अझमत हुसेन असे अनेक कलाकार यांनी जवळून पाहिले आणि ऐकले. कुमार गंधर्वाना ऐकण्यापूर्वी ते बडे गुलाम यांचे भक्त होते. अर्थात त्यांनी सर्वाच्या शैलीचा अभ्यास केला असला तरी अन्य कुणाचे शिष्यत्व मात्र पत्करले नाही. कारण त्यांनी नारायणराव व्यासांना तसे वचन दिले होते. यातून त्यांच्या सचोटीची कल्पना येते. ‘‘रविशंकरांचा मोठेपणा असा की त्यांनी माझं बंदिशींचं पुस्तक मागवून घेतलं आणि माझ्या रचना बारकाईने पाहिल्या,’’ अभ्यंकर सांगतात.
एक क्रोनिकलर म्हणून मी शंकररावांचे महत्त्व मानतो. अशासाठी की गायन किंवा वादन हे मौखिक कला आहे. आणि संगीताच्या मौखिक इतिहासालाही अपार महत्त्व आहे. शंकर अभ्यंकर हे अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहेत. उदाहरणार्थ ‘बैजू बावरा’ चित्रपटासाठी बैजूच्या पात्राला कुणाचा उसना आवाज असावा असा प्रश्न नौशादजींना पडला होता. तानसेनाच्या भूमिकेसाठी अमीर खान खाँसाहेबांचा आवाज हा निर्णय पक्का होता. अमीर खान यांनीच नौशाद यांना सांगितले हो की डी. व्ही. पलुस्करांशिवाय अन्य कुणीच असू शकत नाही. पलुस्करांच्या आवाजाची चाचणी नारायणराव व्यास यांच्या दिवाणखान्यात झाली. त्यांनी ‘मारवा’ रागातली ‘म्हारु कवन काज कवन देस गईलो’ ही चीज सुरू केली आणि झटक्यात तार सप्तकातल्या कोमल रिषभ स्वराला ते भिडले. अमीर खान तात्काळ नौशादना म्हणाले, ‘‘ये है बैजूकी आवाज.’’ अमीर खान यांच्या गुणग्राहकतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी सुरेश हळदणकरांना दिलेली दिलखुलास दाद! ‘देवधर्स स्कूल’मध्ये हळदणकर ‘शंकरा’ आणि ‘हमीर’मधले नाटय़गीत जमून गायले. दोन्ही चढे राग आणि हळदणकर तेव्हा तारुण्याच्या ऐन जोशात होते. त्यांच्यानंतर अमीर खान गाणार होते. ‘‘आज मैं नही गाऊँगा. क्या इस आदमीने गला पाया है. मै कल गाऊँगा.’’
केशरबाई केरकर, ओंकारनाथ ठाकूर यांच्या किंवा अन्य कलाकारांच्या स्वभावातल्या चमत्कृतीबद्दलचे त्यांचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत. रविशंकर आणि विलायत खान यांचे वर्चस्व सतारवादनाच्या क्षेत्रात असताना हलीम जाफर खान खाँसाहेबांनी आपली छाप कशी पाडली याचे वर्णन करताना ते म्हणतात की चित्रपट संगीतात शंकर जयकिशन, सी.रामचंद्र, नौशाद आणि एस. डी. बर्मन यांचा बोलबाला असताना अचानक ‘सी.आय.डी.’, ‘तुमसा नही देखा’ आणि ‘नया दौर’मधल्या हिट गाण्यांचे संगीत देऊन यशस्वी ठरलेल्या ओ. पी. नय्यर यांच्यासारखे हे कर्तृत्व!
अभ्यंकरांचे औपचरिक शिक्षण फारसे झाले नाही. पण आपल्या सुविद्य पत्नी डॉ. कमल अभ्यंकर यांच्या सहवासात त्यांनी स्वत:ला घडवले आहे. संवेदनाक्षम मन आणि तीक्ष्ण निरीक्षण शक्ती या गुणांमुळे त्यांची विचारशक्ती परिपक्व बनली आहे. पोलंडच्या दौऱ्यावर असताना त्यांचा मुलगा रवि याने त्यांना हिटलरच्या काळातल्या ऑसव्हिट्झच्या छळछावण्या दाखवल्या. त्या पाहून त्यांना असा प्रामाणिक प्रश्न पडला की माणसे पूजाअर्चा करतात, ईश्वराची आराधना करतात. पण जगात खरेच देव आहे का? आणि असला तर अशा वेळी तो कुठे असतो? मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत रशियात तिसरी क्रांती घडवून हुकूमशाहीचा अंत केला त्यानंतर लगेचच रशियाला जाण्याची त्यांना संधी मिळाली. तिथल्या अभावग्रस्ततेवर विदारक भाष्य करणारी एक गोष्ट त्यांनी रचली होती. ती अशी. एका दुकानाबाहेर पाटी होती एका रुबलमध्ये बीअर आणि स्वातंत्र्य. गिऱ्हाईकाने एक रुबल दिला आणि तो बीअरची प्रतीक्षा करत थांबला. दुकानदार म्हणाला की गोर्बाचेव्हने दिलेल्या स्वातंत्र्याचे ५० कोपेक्स आणि बीअरचे ५०. पण बीअर उपलब्धच नाही. त्यामुळे हे ५० कोपेक्स घे परत आणि रस्ता सुधर!
हिंदूस्थानी संगीताचा आणि एकूण आयुष्याचा विस्तृत पट संवेदनशील आणि तीक्ष्ण नजरेने न्याहाळणारा हा विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा कलाकार!
amardhan@gmail.com