|| प्रदीप रावत

समुद्राच्या तळाशी विशिष्ट अनुक्रमाने साचत गेलेले गाळाचे थर उत्क्रांतीची घडामोड सांगतात. प्लवकांचे थर, चक्राकार शिंपले निर्माण करणारे प्रोटोझॉन, स्यूडोक्युबस वेमा नावाचे सागरी जीव, ट्रायलोब या आणि अशा अनेकांमुळे शास्त्रज्ञांना उत्क्रांतीची नोंदवही काही प्रमाणात तरी वाचता आली आणि ती प्रक्रिया समजून घेता आली.

एखाद्या वंशावळीमध्ये उद्भवत जाणारे बदल हे उत्क्रांतीचे मोठे लक्षण! हे बदल भलते सावकाश, अगदी कासवाच्या गतीने घडतात. हे पुराव्याने सिद्ध करता येते. पण ही संथ गती घडामोड उद्भवण्याची प्रक्रिया त्या त्या परिस्थितीमधल्या नाना घटकांवर विसंबलेली असते. ही घडामोड नीटसपणे बघायला मिळाली पाहिजे. त्याकरिता सर्वात अगोदर गरज भासते ती कोणती? तर काळानुसार सुस्थितीत साचत गेलेल्या गाळांच्या थरांची. हे थर जलदगतीने साचणे आणि स्थिरावणे निकडीचे असते. प्रत्येक कालखंडाचा प्रातिनिधिक भराव जाडजूड असेल तर काळाच्या ओघात होणारे बदल सहजगत्या आणि स्पष्टपणे नजरेला पडतात. पण एवढेच पुरेसे नाही. त्या संबंधित खडकातले काही थर नष्ट झालेले नसावेत. विशेषकरून, मधल्या भागातले थर नष्ट पावलेले किंवा विस्कटून विस्थापित झालेले नसावेत. असे विस्कटलेले थर असले तर उत्क्रांती बदलांचा सुरळीतपणा लोप पावतो आणि दिसेनासा होतो. त्यामुळे संक्रमणाचे चित्र विपर्यस्त होते. तेच चित्र सलग कूर्मगती दिसण्याऐवजी अचानक उडी मारल्यागत भासायला लागते.

अशी अनुकूल स्थिती आढळते समुद्राच्या खोल तळाशी. सागरात प्लवक (प्लॅन्कटॉन) नावाचे तरंगते जीव असतात. या प्लवकांच्या थरांमुळे उत्क्रांतीने होणाऱ्या संक्रमणाचे अखंड मालिकेसारखे दर्शन घडते. हे प्लवक आकाराने अगदी लहान, जातीने बहुविध आणि अब्जावधींच्या संख्येने आढळतात. त्यांच्यापैकी अनेकांच्या शरीरांत कठीण घटक असतात. हे प्लवक मृत झाले की त्यांचे पार्थिव सागराचा तळ गाठते. सागराच्या तळाशी त्यांची रास आणि राशींचे थर साचत राहतात. अशा रीतीने विशिष्ट अनुक्रमाने घडत गेलेल्या थरांचे नमुने घेणे सुलभ जाते. खांबाच्या आकाराची नळी सागराच्या खोल तळापाशी खुपसतात आणि त्या नळीद्वारे साचलेल्या गाळाचा खांबासारखा नमुना वर ओढून घेतला जातो. त्या नमुन्याचे तळापासून वरवर सरकत गेलेल्या पृष्ठभागांचे वाचन केले जाते. त्याच्या आधाराने कालनिश्चिती केली जाते.

या गाभ्यामधल्या कुठल्याही एका प्रकाराचा (सैल ढोबळ वापराने ‘जाती प्रकारां’चा) मागोवा घेत गेले, की ते बरेचदा उत्क्रांत झालेले दिसतील. चित्र क्र.१ पाहा. त्यातले रेखाचित्र छोटय़ा एकपेशीय प्रोटोझोआनाचे आहे. हे प्रोटोझोआन चक्राकार शिंपले निर्माण करतात. त्यांचे जसजसे वय वाढते तसतसे त्यांच्यामधील कप्प्यांची संख्या वाढते. न्यूझीलंडजवळच्या सागरतळातून २०० मीटर लांबीच्या उभ्या गाभ्याचा खांबवजा उभा काप घेऊन हे नमुने गोळा केले गेले. साधारण ८० लाख वर्षांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगू शकेल एवढा तो काप होता. या आलेखाचित्रात केवळ एका गुणधर्मात झालेला बदल रेखाटला आहे. तो म्हणजे नमुन्यात येणाऱ्या ‘शिंपल्यांच्या शेवटच्या चक्रात आढळणारे कप्पे’! या कप्प्यांची संख्या हाच अध्ययनाचा विषय आहे. काळाच्या ओघात त्याच्यामध्ये झालेला बदल मंदगतीने घडलेला आणि पुरेसा सुरळीत आढळतो. आरंभीच्या काळात शिंपल्याच्या शेवटच्या चक्रात ४.८ कप्पे होते. काळ लोटत गेला आणि अखेरच्या टप्प्यात कप्प्यांची संख्या ३.३ इतकी घसरलेली आढळते. म्हणजे आरंभीच्या तुलनेने अखेरच्या कालखंडात कप्प्यांच्या संख्येत ३० टक्के घट झालेली सप्रमाण दिसते.

असे गुणात्मक बदल हळूहळू होत जीवांचे स्वरूप बदलत जाते हे नक्की. परंतु उत्क्रांती नेहमीच सुरळीतपणे आणि एका स्थिर वेगाने घडेल असे नाही. उदा. रेडिओलरन या वर्गामध्ये स्यूडोक्युबस वेमा नावाचे सागरी सूक्ष्मजीव असतात. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अश्मीभूत गाळाचे नमुने पाहिले. हा गाळ अवघ्या दोन लाख वर्षांचे प्रतिनिधित्व करीत होता. त्यांच्या छातीचा लंबवर्तुळाकृती तळ मोजला. त्यामध्ये जवळपास ५० टक्के वाढ झालेली दिसली. परंतु या अवघ्या काळात काहीच बदल न झालेले असे कालखंडदेखील आढळले. त्याच बरोबरीने झपाटय़ाने बदल घडलेले कालखंडही आढळले. बदल घडायला उद्युक्त करणारे, जोम देणारे पर्यावरणदेखील बदलत असते. उदा. हवामानात चढ-उतार होतात. समुद्राचा खारटपणा कमी-जास्त होतो. त्यामुळे झालेले बदल पिढय़ान् पिढय़ा तगण्याच्या शक्यता आणि शक्तीमध्येच ‘ओहोटी-भरती’ येत जात राहते!

अधिक जटिल जीवजातींच्या उत्क्रांतीचा मागोवा घेतानादेखील असा अनुभव येतो. पीटर शेल्डन या वेल्श शास्त्रज्ञाने डब्लिनजवळच्या ठिसूळ प्राचीन खडकात सापडणारे जीवाश्म गोळा करून तपासले. ते ‘कीटक-कोळी’ या संधिपाद वर्गातले ट्रायलोब प्रकारचे होते. (ट्रायलोब म्हणजे तीन पाळय़ा मिळून घडलेले शरीर ऊर्फ त्रिपालक). त्याला अशा त्रिपालकांचे आठ वेगवेगळे वंश आढळले. काळाच्या ओघात त्यातल्या प्रत्येक वंशावळीत बदल अवतरले होते. अंतिमत: त्यांच्या शेपटीतल्या बरगडय़ांची नक्तसंख्या बदलत वाढत गेली होती. पण त्याच कालखंडामध्ये असले तरी वेगवेगळय़ा जातींमध्ये झालेल्या बदलांचा काही परस्परसंबंध नव्हता. काही वेळा तर बदल परस्परविरोधी आढळत होते.

पण प्लवकांसारखा साध्या शरीराचा जीव असो किंवा त्रिपालकासारखा अधिक जटिल जीव; त्यातले नैसर्गिक निवड म्हणावी असे वेचके बदल कोणत्या स्वरूपातील दबावांमुळे घडले याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. जीवाश्मांच्या बदलातील ‘दस्तऐवजी नोंदी’चा इतिहास तयार करणे तुलनेने सोपे! परंतु उत्क्रांती बदल असेच का घडले याची कारणमीमांसा महामुश्कील आहे. त्या कारणांबद्दलची माहिती किंवा पुरावे असे काही हाती लागत नाही. खात्रीलायकपणे सांगता येते ते एवढेच, की उद्युक्त करणारी, पोषक ठरणारी कारणे कोणतीही असोत, उत्क्रांती घडली. तिचा वेग, दिशा अनिश्चित आढळतो. ती कधी कधी वेगाने घडली पण ती बऱ्याचदा अतिमंदपणे घडली.

वंशावळींना फाटे फुटून नवीन शाखा उपजणे, वंशावळीच्या अंतर्गत गुणात्मक बदल उदयाला येणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी जारी असतात. अगदी साध्या प्लवकांच्या मध्ये या दोन्हींचे पुरावे उपलब्ध आहेत. उदा. एक पूर्वज प्लवक जात दोन वंशजांमध्ये विभक्त झालेली दिसते. त्यांचे आकार आणि माप वेगवेगळे आढळतात. आणखी एक लक्षात घेण्याजोगा विशेष पैलू आहे. कोणत्याही ऐतिहासिक कथेला बदलता काळ असतो, तसेच निराळे ठिकाणही असते! ( उदा. कथेत सांगतात तसे ‘कोणे एके काळी’ एक ‘गाव’ होते). युक्रिडियम मातुयामै या जातीचे पूर्वज जिथे होते त्या जागेच्या उत्तर दिशेकडे एक शाखा उत्क्रांत झाली. कालांतराने या उत्तरेकडे उदय पावलेल्या वंशजांनी मूळ पूर्वजांच्या परिसरात घुसखोरी केली. एकाच जातीची ‘लोकसंख्या’ भौगोलिक कारणामुळे भौगोलिकदृष्टया विभक्त होते. त्यांची बदलांची वाटचाल निराळय़ा धाटणीने होते. त्यातून जातींचे उद्भवन आकाराला येते. मूळ पूर्वज लोकसंख्येला निरनिराळय़ा काळात निरनिराळय़ा जागेत फाटे येत बदल घडत राहतो. उत्क्रांती विज्ञानात ( आणि अर्थात पर्यायाने जनुकशास्त्रातही) ही वेगळी संशोधनशाखा बनली आहे.

जीवाश्मांमध्ये अगदी धिमे धिमे घडलेली आणि झपाटय़ाने अल्पकालीन उद्रेक झाल्यागत घडणारी (ऊर्फ विरामी समतोलाची) अशी दोन्ही प्रकारची शेकडो उदाहरणे सापडतात. खेरीज, ही उदाहरणे एकमेकांपासून अगदी वेगवेगळय़ा जातीची आणि भिन्न ठेवणीची असतात. एवढेच नव्हे तर काळाच्या ओघात फार काही बदल न घडलेल्या जातीदेखील आहेत. उदा. मोल्युस्कसारखे मृदूकायींचे जीव, उंदीर, घुशींसारखे कृदन्त ऊर्फ ‘कुरतडकर’ जीव. सगळय़ा जीवजाती उत्क्रांत झाल्याच पाहिजेत असा उत्क्रांती-विज्ञानाचा मुळीच दावा नाही. काहीतरी संकल्पचित्र उराशी धरून जगाची आखणी झाली आहे. सर्वजाती स्वतंत्र, अकस्मातपणे आणि अपरिवर्तनीयपणे बेतलेल्या आहेत, या धारणेला दुजोरा देणारा कोणताही पुरावा जीवाश्मांच्या नोंदवहीत सापडत नाही. उलटपक्षी सजीवांच्या जाती उत्क्रांतीक्रमाने उदयाला आल्या. त्या उत्क्रांत होत त्यांना वेळोवेळी दिशादिशांना सरमिसळ फाटे फुटले, हे या नोंदवहीत अगदी सहजी नजरेस भरते.

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

  pradiprawat55@gmail.com