डॉ. जयदेव पंचवाघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तदाबाचं मापन, ग्रंथींचा अभ्यास, रुग्णालयाचं व्यवस्थापन असे नाना ध्यास असलेले डॉ. कुशिंग मेंदूशल्यचिकित्सक म्हणूनही मोठेच..

‘उत्कृष्ट डॉक्टरचं हे कर्तव्य आहे की त्याने किंवा तिने रोगग्रस्त व्यक्तीच्या बिघडलेल्या अवयवाच्या पुढे जाऊन विचार करायला हवा. रोगग्रस्त अवयव असलेली एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून हा विचार असायला हवा.. एवढंच नव्हे, तर आजूबाजूच्या विशिष्ट समाजात आणि वातावरणात राहणारा एक घटक म्हणून तिचा हा विचार व्हायला हवा.’

(तर आणि तरच, एक व्यक्ती म्हणून, किंबहुना त्या परिस्थितीत राहणारी व्यक्ती म्हणून तिच्यावर उपचार केले जातील..) – हार्वे विल्यम्स कुशिंग

१५ एप्रिल १९३१. स्थळ- बॉस्टनमधल्या पीटर बेन्ट ब्रिगहॅम हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. हार्वे कुशिंग यांचं ऑपरेशन थिएटर. डॉ. गिल्बर्ट होरॅक्स शस्त्रक्रिया सुरू करत होते. रुग्णाचं डोकं जंतुनाशक द्रावणानं स्वच्छ करून शस्त्रक्रियेसाठी निर्जंतुक केलेल्या कापडांनी आच्छादलं जात होतं. १९३१ साली या शस्त्रक्रियेची फिल्म बनवली जात होती! याला कारणही तसंच महत्त्वाचं!

ही डॉ. हार्वे कुिशग यांची दोन हजारावी ब्रेन टय़ूमर शस्त्रक्रिया होती. ऐतिहासिक क्षण होता. जगभरातून त्या काळचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी एकत्र जमले होते. डॉ. कुशिंग शस्त्रक्रियेसाठी येताच वातावरण आणखी भारावून गेलं. या माणसाच्या मेंदू व मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतील योगदानामुळे आजही त्यांना चेतासंस्थेच्या शस्त्रक्रियेचे जनक असं संबोधलं जातं. आजही अमेरिकन न्यूरोसर्जरी संस्थेच्या मुख्य मुद्रेवर त्यांचेच छायाचित्र आहे. हार्वे कुशिंग हे फक्त सर्जनच नव्हते तर चेतासंस्थेच्या अनेक विकारांचा प्रथम शोध लावणारे संशोधक शास्त्रज्ञ होते, अमेरिका आणि संपूर्ण जगातच मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया विभाग संस्थापित होण्यास कारणीभूत ठरलेले ‘जनक’ होते, पुलित्झर पुरस्कारप्राप्त प्रतिभावंत साहित्यिक- लेखक होते आणि एक उत्कृष्ट चित्रकार होते..

व्यक्तिमत्त्वाला एवढे अद्भुत पैलू असलेली व्यक्ती जगाच्या इतिहासात क्वचितच जन्माला येते. आणि म्हणूनच ही ऐतिहासिक फिल्म बनवली गेली. ती यूटय़ूबवर उपलब्ध आहे (Harvey Cushing 2000th Brain Tumor).  असं सांगितलं जातं की, हार्वे कुशिंग ब्रेन टय़ूमर शस्त्रक्रिया करायला लागण्याआधी या शस्त्रक्रियांत १०० पैकी ८० रुग्ण दगावायचे आणि ते शस्त्रक्रिया करू लागल्यावर १०० पैकी ८० जण जगू लागले. 

बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलमधल्या विल्यम हालस्टेड या युगप्रवर्तक सर्जनचा कुशिंग शिष्य होता. १८९६ मध्ये त्यानं तिथे काम सुरू केलं. त्याच्याआधी होऊन गेलेल्या आणि बहुसंख्य समकालीन शल्यविद्यातज्ज्ञांच्या तुलनेने हालस्टेड त्याच्या शस्त्रक्रियांमध्ये सरस होता. तो अत्यंत काळजीपूर्वक आणि फार रक्तस्राव होऊ न देता विच्छेदन (डिसेक्शन) करायचा. अवयवांच्या सूक्ष्म रचनेच्या तपशिलांकडे डोळय़ात तेल घालून त्याचं लक्ष असायचं. सभोवतालच्या अवयवांना, रक्तवाहिन्यांना, नसांना धक्का न लावता नाजूकपणे फक्त रोगग्रस्त भाग काढण्यात त्याचा हातखंडा होता. शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून त्या काळातील सर्वोत्कृष्ट पद्धती त्याने वापरात आणल्या होत्या. शस्त्रक्रियेच्या विज्ञानाचा तो आद्य आचार्यच होता. हे ज्ञान नवीन, तरुण विद्यार्थ्यांना देण्याची त्याची पद्धत शिस्तबद्ध आणि परिणामकारक होती. शस्त्रक्रियाशास्त्र खऱ्या अर्थानं आत्मसात करण्याची तळमळ असेल, तर ते शिकण्यासाठी या विद्यार्थ्यांनी रुग्णालयात पूर्णवेळ राहावं असा त्याचा आग्रह होता आणि त्यातूनच आजवर चालत आलेली ‘निवासी’ विद्यार्थ्यांची पद्धत (रेसिडेन्सी सिस्टीम) उदयाला आली.

हालस्टेडच्या या सर्व गोष्टी कुशिंगने तरुणपणातच आत्मसात केल्या. शरीरातील अनेक अवयवांवरील शस्त्रक्रियांना हालस्टेडचं नाव आहे. असं असलं तरी मेंदू या अवयवावरील शस्त्रक्रिया यशस्वी होणं सोपं नाही, किंबहुना अशक्य अशी ही गोष्ट आहे असं सुरुवातीच्या काळात तो मानत होता. सीटी स्कॅन, एमआरआय तर सोडाच, पण चांगल्या दर्जाचे एक्स रे आणि जंतुसंसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविकंसुद्धा (अँटिबायोटिक्स) त्या काळात उपलब्ध नव्हती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

हार्वे कुिशग चेताशल्य विज्ञानावर त्याचं लक्ष व ऊर्जा केंद्रित करू लागला तेव्हा सुरुवातीला हालस्टेडला तो निष्फळ आणि चुकीच्या मार्गावर आहे असं प्रामाणिकपणे वाटत होतं. त्यांनी चांगल्या हेतूने कुिशगला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण कुशिंगची असामान्य बुद्धिमत्ता आणि शस्त्रक्रिया करण्याच्या अद्वितीय क्षमतेवर विश्वास असणारी एक व्यक्ती जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये होती. तिचं नाव डॉ. विल्यम ऑस्लर. त्या काळातला योगायोगच असा जुळून आला होता की वैद्यकशास्त्रातील युगप्रवर्तक कार्य करण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती एका ठिकाणी या रुग्णालयात काम करत होत्या. इंटर्नल मेडिसिन किंवा औषधविज्ञानशास्त्रातील ऑस्लर हा दादा माणूस होता. आधुनिक रोगनिदानशास्त्र व औषधविज्ञानशास्त्राचा त्याला जनक मानतात.

या विल्यम ऑस्लरला तरुण कुशिंगच्या कामाची ठिणगी दिसली होती. कुशिंग इतर सर्जनपेक्षा वेगळा आहे हे त्यानं हेरलं होतं. कुशिंग फक्त एक चांगला सर्जनच नव्हता तर  उत्कृष्ट रोगनिदान क्षमता असलेला ‘फिजिशियन’ होता.

वैद्यकीय शास्त्रात नवीन प्रयोग करायला न घाबरणारा एक शास्त्रज्ञ होता. त्याच वेळी त्यातील अगणित शक्यतांचा मर्यादांशी समतोल ठेवण्याचा त्याच्यात विवेक होता. रुग्णाला केंद्रभागी ठेवून आजारांचा विचार करण्याची त्याच्यात क्षमता होती. आणि म्हणूनच विल्यम हालस्टेड या सर्जनने नाही तर विल्यम ऑस्लर या फिजिशियनने कुिशगचे न्यूरोसर्जरी ही स्वतंत्र शाखा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला उचलून धरले. एवढेच नव्हे तर त्याला अनेक प्रकारांनी मदत करून त्याची उमेद वेळोवेळी वाढवली. सहकाऱ्यांची उमेद खच्ची करून त्यांना नाउमेद करण्याचे प्रकार १७६० दिसतील, पण ऑस्लर आणि कुशिंग यांच्यामधलं रसायन हे काही तरी वेगळंच जमलं होतं.

विल्यम ऑस्लर दगावल्यावर कुशिंगने त्याच्या आयुष्यावर तीनखंडी पुस्तक लिहिलं. ही एका सर्जनने अद्वितीय फिजिशियनला दिलेली मानवंदना होती. या पुस्तकाची साहित्यिक गुणवत्ता इतकी उच्च दर्जाची होती की त्या पुस्तकाबदल कुशिंगला साहित्यासाठी दिला जाणारा पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका फिजिशियनने एखाद्या नवीन गोष्टी करू पाहणाऱ्या सर्जनला गुरुत्व व मित्रत्व इतक्या सढळ हातानं दिल्याचं दुसरं उदाहरण माझ्या पाहण्यात नाही.

ऑस्लर आणि कुशिंग या दोघांनाही एकमेकांबद्दल अत्यंत आदर होता. कुशिंग ऑस्लरला गुरुस्थानी मानायचा. आणि तो ऑस्लरचा ‘ब्लू आइड बॉय’ होता. त्याचं हे वेगळेपण त्याने लिहून ठेवलेल्या आणि लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या वाक्यात प्रतिबिंबित झालं आहे. ‘रुग्णाचा एक व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे..’ असं तर तो म्हणतोच, पण ती व्यक्ती ज्या परिस्थितीत राहते, जो व्यवसाय करते, ज्या प्रकारच्या कुटुंबाचा ती हिस्सा आहे, त्या पार्श्वभूमीवर तिचा आणि आजाराचा विचार केला पाहिजे असंही तो सांगतो. शस्त्रक्रिया विज्ञान काळानुरूप बदलेल, परंतु हा विचार कालातीत आहे. मात्र असं म्हणणारा कुशिंग फक्त उच्च विचारसरणीच्या आणि आरामखुर्चीतल्या तत्त्वज्ञानाच्या कल्पनाविश्वात रममाण होताना दिसत नाही. म्हणूनच अंत:स्रावी ग्रंथींवर संशोधन करताना त्या आजाराने दगावलेल्या व्यक्तीचं शवविच्छेदन करून अभ्यासासाठी त्या ग्रंथी काढून आणायला त्याच्या हाताखाली शिक्षणासाठी नुकत्याच भरती झालेल्या डॉक्टर विद्यार्थ्यांला तो पाठवतो. आणि त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध अगदी त्यांच्या नकळत त्या ग्रंथी अभ्यासासाठी मिळवतो, त्यांचा अभ्यास करून नवीन शोध लावतो.. वरकरणी विरोधाभासी अशा अनेक कंगोऱ्यांनी बनलेलं हे व्यक्तिमत्त्व होतं. आज आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण रक्तदाब मोजण्याचं पहिलं यंत्र हार्वे कुशिंगने प्रथम अमेरिकेत आणलं. एका सर्जनने! त्याआधी रक्तदाब योग्य पद्धतीने मोजला जातच नव्हता. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तदाब आणि नाडीचे ठोके नियमित अंतराने मोजले पाहिजेत आणि फक्त मेंदूच्याच नव्हे तर शरीरावरील सर्वच शस्त्रक्रिया यशस्वी होण्यात त्याचा अत्यंत मोलाचा सहभाग असेल हे १९०० ते १९१० च्या दशकात अमेरिकेत सर्वप्रथम सांगणारा हा डॉक्टर!

मेंदूतील दाब वाढल्यावर त्याचे रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छ्वास, जठर आणि पोटातील इतर अवयव, अंत:स्रावी ग्रंथी यांच्यावर होणारे परिणाम त्यानं सर्वप्रथम निदर्शनाला आणले. पियुषिका ग्रंथींच्या गाठींवर (पिच्युटरी टय़ूमर) त्याचं अनमोल संशोधन होतं. या ग्रंथीच्या कार्यासंबंधी आणि तिच्या अनेक आजारांविषयी सर्वप्रथम प्रकाश टाकण्याचं श्रेय कुिशगला जातं. हार्वे विल्यम्स कुशिंग या व्यक्तीच्या योगदानांच्या खांद्यावर आजची न्यूरोसर्जरी उभी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही! यापैकी अंत:स्रावी ग्रंथींवरच्या संशोधनाचा आणि पिटय़ुटरी टय़ूमरमध्ये दिसणाऱ्या लक्षणांचा आणि पिटय़ुटरी (पियुषिका) ग्रंथीच्या शस्त्रक्रियांचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. त्याचा मागोवा पुढच्या आठवडय़ात घेऊ.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain tumor harvey cushing pioneer in neurosurgery zws
First published on: 28-03-2022 at 03:37 IST