Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

‘बुकरायण’ हे या पानावरलं (बुकबातमीपेक्षा) वाचकप्रिय सदर, ते ‘बुकर पारितोषिका’च्या स्पर्धेसाठी लघुयादीत उरलेल्या सहा ललित पुस्तकांची ( म्हणजे बहुतेकदा कादंबऱ्यांचीच) सटीक ओळख दरवर्षी करून देतं. पण ‘बुकर’ पारितोषिकांचे जे दोन निरनिराळे प्रकार आहेत, त्यांपैकी दुसरं – ‘बुकर इंटरनॅशनल’ हे पारितोषिक आणि त्यासाठीची स्पर्धासुद्धा अनेकदा दुर्लक्षित राहाते. या ‘बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकासाठी मूळ इंग्रजी नसलेल्या, अनुवादित पुस्तकांचा विचार होतो आणि यंदा त्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे गीतांजली श्री या लेखिकेच्या  ‘रेत-समाधि’ या मूळ हिंदी कादंबरीचा इंग्रजी अनुवाद- ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ – पहिल्या फेरीची चाळणी पार करून, ‘बुकर इंटरनॅशनल’च्या लघुयादीत आला आहे! हिंदीतून इंग्रजीत अनेक कादंबऱ्या आजवर अनुवादित झाल्या, पण ‘बुकर इंटरनॅशनल’साठी विचार होणारी पहिली लेखिका ठरण्याचा मान गीतांजली श्री यांनी मिळवला आहे. हे पारितोषित ५० हजार ब्रिटिश पौंडांचं असतं, त्यापैकी २५ हजार पौंड मूळ लेखकाला मिळतात, हे लक्षात घेतल्यास  गीतांजली श्री  आणि अनुवाद करणाऱ्या  डेझी रॉकवेल यांना हे पारितोषिक मिळेल का, याबद्दलची उत्कंठा २६ मे रोजी होणाऱ्या सोहळय़ापर्यंत अनाठायी ठरत नाही. महत्त्वाचं म्हणजे लघुयादीत समावेशामुळे अन्य भाषकांचं ही लक्ष हिंदीतल्या ‘रेत-समाधि’कडे जाईल. ज्यांना हिंदी वाचता येत नसेल, ते ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ वाचतील!

या कादंबरीची गोष्ट भारतात, पाकिस्तानात आणि वाघा-अटारी सीमेवरही घडते. चंद्रप्रभा देवी ही ८० वर्षांची स्त्री दिल्लीच्या घरी पतिनिधनानंतर अंथरुणाला खिळलेली, पण एक दिवस तिची जीवनेच्छा जागृत होऊन ती हिंडूफिरू लागते, ‘स्त्री आणि पुरुष यांच्या सीमेवर’ असलेल्या एका हिजडय़ाला भेटते आणि मग, मुलीसह पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेते- त्यासाठी पासपोर्ट, व्हिसाचे सोपस्कार पार पाडते. वाघा सीमेवरलं ते संचलन पाहाताना तिला सआदत हसन मण्टो, कृष्णा सोबती यांच्यापासून सारे ‘सरहदी’ लेखक भेटतात.. कल्पिताला वास्तवामध्ये कालवून घेणाऱ्या या कादंबरीची गोष्ट त्या वृद्धेच्या मृत्यूबरोबर संपते, पण कादंबरी तिथेच संपत नाही. ही वृद्धा मूळची चंदा. मूळची मुस्लीम. तिचा बालविवाह घरच्यांच्या मर्जीनेच झाला, पण फाळणीनंतर कुटुंबातली ती एकटीच भारतात उरली. कुणा पुरुषानं तिच्याशी रीतसर विवाह केला आणि चंद्रप्रभा देवी झाली. तिला पाकिस्तानातच मरायचं आहे, तेसुद्धा कुणाच्यातरी गोळीबारात, तेही पाठीवरच पडून. ते तसंच होऊन गोष्ट संपणं, हा केवळ एक उपचार उरतो, तोवर चंदाच्या मनातल्या खळबळीवर वाचक स्वार झालेले असतात.. ती हुरहूर आता वाचकांचीही असते!

समकालीन, आजच्या वगैरे परिस्थितीवर भाष्यबिष्य करण्याच्या फंदात अजिबात न पडता ‘गोष्ट सांगा राव’ ही अपेक्षा पाळणारी ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ पारितोषिकप्राप्त जर ठरली, तर ती काहीजणांना झोंबेलही. मग कदाचित, ‘मुद्दामच पाश्चात्त्यांसाठी असं लिहिलं’ वगैरे बालिश प्रहारही होतील.. पण हिंदी समीक्षकांनी ‘रेत-समाधि’ला आधीच गौरवलं आहे. गीतांजली श्री यांच्या याआधीच्या पाचपैकी दोन कादंबऱ्या इंग्रजीत आल्या आहेत, शिवाय भारतीयता आणि डावेपणा यांच्यातला दुभंग प्रेमचंदांच्या साहित्यात कसा  दिसतो, हे सांगणारा प्रबंध त्यांनी इंग्रजीत (गीतांजली पाण्डेय या नावानं) लिहिला, तोही ग्रंथरूप झाला आहे.