विश्वांभर धर्मा गायकवाड

जग २५६६ वी बौद्ध पौर्णिमा साजरी करत असताना बुद्धाचे विचार आजही मार्गदर्शक ठरताहेत. प्रस्तुत लेखात  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्मविषयक विचारांचा आढावा  घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मातरापाठीमागची अपेक्षा अशी होती की, सापेक्ष इहवादी, धर्मनिरपेक्ष व कर्मकांडविरोधी असलेल्या बौद्ध धर्माच्या अनुसरणामधून दलितांना चिकटलेले पिढीजात गौणत्व नष्ट होईल व आधुनिक दृष्टीने जगाकडे पाहणे त्यांना शक्य होईल. ते अशा धर्माच्या शोधात होते की जो धर्म असूनही ईश्वरवादी असणार नाही, आध्यात्मिक असूनही विज्ञाननिष्ठ असेल. त्याचा पाया ज्ञानाचा असेल. धर्म त्यांना तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायचा होता आणि बौद्ध धर्म या सर्व बाबतीत इतर धर्मापेक्षा अधिक स्वीकार्य वाटला.  इहलौकिक जीवनाला व मानवी मूल्यांना मध्यवर्गी महत्त्व देणारा एक अनीश्वरवादी व गतिशील धर्म म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची निवड केलेली होती. त्यांच्या जन्मभराच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे.

balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

बौद्ध धम्म हा जनवादी आहे. कारण त्यानेच प्रथम दलित-शोषित जनसामान्यांसाठी आपली कवाडे खुली केली. म्हणून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे धम्माचे मध्यवर्ती सूत्र आहे. तो केवळ ‘जगात दु:ख आहे.’ सांगून थांबत नाही तर ‘दु:खालाही कारण असतं’ आणि त्या कारणांचे निराकरण करून दु:खाचे निरसन करणे शक्य असते, हा आशावाद तो माणसाला देतो. मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला तो वेसण घालत नाही. निवडस्वातंत्र्य व निवडीचे निकष तो पुरवितो. जे तर्काला व बुद्धीला पटेल तेच घ्यायचे आणि  नाही ते सोडून द्यायचे असं बजावतो. बाबासाहेबांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारण्याचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी नवदीक्षितांना मार्गदर्शन करण्यासाठीच लिहिला आहे. बाबासाहेबांनी धर्माचे तीन निकष ठेवूनच बौद्ध धम्म अंगीकारला. (१) तर्कावर टिकेल तेच ग्राह्य (२) लोककल्याण म्हणजेच बहुजन हित व बहुजन सुख (३) धर्माचा सर्वच भाग सारखा महत्त्वाचा नसतो. त्यात काही निश्चित स्वरूपाचा असतो तर बराचसा भाग अनिश्चित स्वरूपाचा असतो. म्हणून अनिश्चित भाग परिस्थितीनुरूप नव्या अन्वयार्थाने बदलला पाहिजे. जसे – ‘बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्यांपैकी मधली दोन आर्यसत्ये वगळून ‘जगात दु:ख आहे’ आणि ‘दु:खाचे निरसन करणे शक्य आहे’ ही दोनच आर्यसत्ये आंबेडकरांनी मान्य केलेली होती. मधली दोन आर्यसत्ये तृष्णा हे दु:खाचे कारण असून ती मानवी जीवनाला दु:खमय करते अशा आशयाची आहेत. ही आर्यसत्ये बुद्धाच्या जीवनविषयक दृष्टिकोनाला निराशाजनक करून टाकतात. कारण दु:ख निवारणाची संभाव्यताच त्यातून नाहीशी होते. माणसाला दु:खापुढे अगतिक करणारी ही दोन आर्यसत्ये वगळून आंबेडकरांनी बुद्धाच्या संदेशाला आशावादी वळण लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे.  प्रश्नाची सोडवणूक युद्धाने होत नसते तर मैत्रीनेच ती शक्य होते, हे बुद्धाला प्राप्त झालेले तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी स्वीकारले. गेल ऑमवेट या विदुषीने ‘बुद्धिजम इन इंडिया’ या ग्रंथात बाबासाहेबांच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या टीकेचा आढावा घेतलेला आहे. त्यात त्यांनी रावसाहेब कसबेंच्या प्रतिक्रियेचीही नोंद घेतलेली आहे. रावसाहेब कसबे असे म्हणतात की, ‘‘मार्क्‍सवाद्यांना जर एखादा धर्म घ्यावयाचा वाटलाच तर बौद्ध धर्माखेरीज दुसरा पर्याय त्यांना असणार नाही आणि बौद्ध धम्माला जर एखादा राजकीय विचार स्वीकारावा वाटलाच तर त्यांना मार्क्‍सवादाखेरीज पर्याय असणार नाही.’’ कारण बुद्धाचा मार्ग मार्क्‍सच्या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असं सांगणारे बाबासाहेब मार्क्‍सची साध्ये बुद्धाच्या मार्गानी जेव्हा जनतेच्या पदरात पडतील तेव्हाच हे श्रेष्ठत्व सिद्ध होईल हेही आवर्जून नमूद करतात. शोषित वंचिताला आर्थिक न्याय मिळवून देऊन समताधिष्ठित समाजाची निर्मिती करणे ही मार्क्‍सचे साध्ये होती, ती बुद्धाच्या मार्गाने प्रत्यक्षात आणण्याचा बाबासाहेबांचा प्रयत्न होता.

वर्तमान संदर्भात बाबासाहेबांचा धम्मविषयक विचार आणि त्यांच्या अनुयायांचा व्यवहार पाहता बरीच संभ्रमावस्था दिसून येते. धर्माच्या आधारे जातीपातींना छेदून जाणारे शोषित-वंचितांचे संघटन बांधणे थांबले आहे, बौद्ध अनुयायी कर्मकांडात, प्रतीक व पवित्रस्थान यात अडकले आहेत. लोकांत कडव्या बौद्ध जाणिवा निर्माण झाल्या आहेत. धम्माच्या चळवळीशी राजकीय चळवळीने फारकत घेतलेली आहे. कारण असं दिसतं की, जरी आपण राजकीय क्षेत्रात एकत्र काम करू शकत नसलो तरी किमान धार्मिक क्षेत्रात तरी एकत्र राहू. बुद्धविहाराशेजारीच सभागृह असावं व तिथे प्रबोधनाचे कार्य व्हावे असे दिसत नाही. बौद्ध समुदायाची ओळख इतर धर्म समुदायासारखी दिसून येत आहे. धम्माचरणाचं रूपांतर धर्माचरणात होऊन बाबासाहेबांनी ओढलेली धम्म व धर्म यातील सीमारेषाच फार पुसट झाली आहे. विपश्यनेचे प्रस्थ वाढले आहे. पुस्तक किंवा ग्रंथविक्रीऐवजी बौद्ध गीतांची गरज वाढली आहे. जागतिकीकरणातून आलेली नवीन अरिष्टे व त्या जोडीला जातीय छळ व अत्याचार वाढताना धम्मावर अधिक वेळ खर्च होत आहे. प्रत्यक्षात धम्म चळवळीने ब्राह्मणवादाला जेवढे धारेवर धरले तेवढे भांडवलशाहीची चिकित्सा झाली नाही किंवा होत नाही. तसेच धर्म हा आजच्या मानवी जीवनाचा एकमेव नियंत्रक घटक आता सर्वस्वी राहिलेला नाही. त्यामुळे आमूलाग्र सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या क्रांतीसाठी केवळ धम्म चळवळीवर भिस्त ठेवून भागणार नाही, याची जाणीव बाबासाहेबांना होती म्हणून त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन रिपब्लिकन पक्षाची रूपरेषा मनाशी आखली होती. हा ठरलेला पण राहून गेलेला बाबासाहेबांचा उद्देश आंबेडकर अनुयायांना कळो व तशी वाटचाल घडो एवढीच  अपेक्षा!   

vishwambar10@gmail.com