एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय चित्रच बदलले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली. मंत्रीपदे वाचतात का याची मंत्र्यांना धास्ती. मंत्र्यांच्या सचिवांना आपले काय, याची वेगळीच भीती. भाजप नेत्यांची आशा पल्लवित झालेली. या साऱ्या घडामोडी घडत असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळेच वातावरण. कारण विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले तर दुसरे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. हंडोरे यांना पहिल्या पसंतीच्या २९ मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना २२ मतेच मिळाली. यावरून सात मते फुटल्याचे सिद्ध झाले. हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसला आणखी वेगळीच भीती. हंडोरे यांच्या पराभवामुळे दलित समाजात नाराजी उमटू शकते. शिंदे यांच्या बंडाचीच चर्चा सुरू झाली. परिणामी हंडोरे यांचा पराभव दुर्लक्षित राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीतील फटाका वाजतो की फुसका निघतो ?

दिवाळीतील फटाका एवढय़ा उशिरा कसा फुटेल? पण औरंगाबादमध्ये त्याची भलती चर्चा सुरू आहे. बंडखोर आमदारांवरही आता आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सुरू झाले आहेत. जो निधी मिळाला तो कोणी वापरला, कोण त्याचे ठेकेदार होते याची माहिती घ्या असं म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोरांविषयी संशय निर्माण केला. हा बंडखोर आमदार ‘मध्य’वर्ती नसला तरी त्यांच्या घरातील कंत्राटदार आता उघडे पडण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसैनिकही आता खरं खोटं कसं ठरवायचं याचीही गणिते मांडत आहेत. वैजापूरच्या आमदारांनी म्हणे विधान परिषदेच्या मतदानात घोळ घातला. त्यांनी ‘सरला बेट’ येथे मंदिरात जाऊन शपथ घेऊन खरं काय ते सांगावे अशी मागणी मेळव्यात करण्यात आली. पण हे सारे व्यवहार दिवाळीपासून सुरू होते. त्या फटाक्याची वात आता पेटली आहे. तो फटाका वाजतो की फुसका निघतो याची चर्चा गावागावांतील चावडीवर रंगू लागली आहे.

यड्रावकर सांगा कोणाचे?

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांत गावोगावी धुमशान सुरू आहे. शिंदे गटाला पाठिंबा दिलेले शिरोळचे आमदार, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तर शिवसेनेने रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिल्याने सामना रंगला. यावेळी जयसिंगपूरकर आणि शिवसैनिकांत वेगळाच विषय चर्चिला जात होता. यड्रावकर हे मूळचे राष्ट्रवादीचे; पण त्यांनी निवडणूक लढवली अपक्ष उमेदवार म्हणून. निवडून आल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला. तेव्हापासून ते शिवसेनेच्या छावणीतले म्हणून ओळखले जात होते. आजच्या शक्तिप्रदर्शनावेळी यड्रावकर समर्थकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती नजरेत भरणारी होती. त्यामुळे यड्रावकर हे अपक्ष, शिवसेनेचे, शिंदे गटाचे की राष्ट्रवादीचे? असा प्रश्न चर्चिला जात होता.

भुसे मैत्रीला जागले 

शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीमुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या गेल्या. बंडखोर गटात दाखल होणाऱ्या सेना आमदारांचा रतीब घालावा, अशा पध्दतीचा पवित्रा राहिला. त्यामुळे बंडखोर शिंदे गट दिवसागणिक शक्तिशाली होत असताना उध्दव ठाकरे यांच्यावरील अढळ निष्ठा किती आमदार सिद्ध करतात आणि एकनाथ शिंदेंची तरफदारी करण्यासाठी किती आमदार उतावीळ होतात, याची सर्वदूर उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या भूमिकेकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. अन्य बरेच सवंगडी शिंदे गोटात गेले तरी मातोश्रीशी एकनिष्ठ आणि ठाकरेंच्या खास मर्जीतले समजले जाणारे भुसे हे प्रारंभी ठाकरेंचीच पाठराखण करीत असल्याचे चित्र होते. शिंदे आणि भुसे या दोघा गुरुबंधूंमधील दोस्तानाही सर्वश्रुत असल्याने भुसेंचा अंतिम निर्णय नेमका काय असेल, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. अखेर भुसे हे  मैत्रीला जागले आणि शिंदे यांच्या गोटात गेले.

काय ते शिक्ष्याण..

जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन मुले अद्याप रूळण्यापूर्वीच जिल्हा प्राथमिक शिक्षक  सहकारी बँंकेची निवडणूक सुरू आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये याची तयारी सुरू होतीच, पण आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण सुरू असल्याने विद्यादानापेक्षा बँकेचे काय  होणार याचीच चिंता गुरुजनांना लागली आहे. दोन्ही  पॅनेलचे उमेदवार असले तरी त्याचे पाठीराखे, समर्थक, नेते निवडणुकीच्या प्रचारात गुंतले असल्याने सध्या तरी बहुसंख्य गुरुजींना शिकवण्यासाठी फुरसतच मिळेनाशी झाली आहे. एकदा का गुलाल कुणाचा हे निश्चित झाले की, मग एकसुरी पंधरा ऑगस्टच्या तयारीला लागायला मोकळे. तोवर गणेशोत्सव येणार असल्याने पहिल्या सत्रात  विद्यार्थ्यांच्या शिकवण्याचे काय असे कोणी विचारलेच तर गुरुजींना जनगणना, मतदार नोंदणी याची कामे लावली जातात त्यावेळी का विचारले जात  नाही असा प्रश्न गुरुजींच्या ओठी आला तर पालकच निरुत्तर होणार. असो, कुणी का निवडून येईना, सध्या मात्र काय ती शाळा, काय ते शिक्ष्याण आणि काय ती पोरं आणि काय तो मास्तर असे पालक वर्ग म्हणत आहे.

नियतीच्या शोधात मंत्री

प्रत्येक वक्त्याच्या भाषणात काही खास शब्द पेरलेले असतात. ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बोलण्यात नियतीह्ण हा आवडीचा शब्द वारंवार येतो. सोमवारी गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादक पुरस्कार समारंभ ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाला. राज्यातील वेगवान घडामोडींमुळे मंत्र्यांचे तन कोल्हापुरात पण मन मुंबईत अशी अवस्था होती. त्यात मंत्र्यांच्या खातेबदलाची बातमी चर्चेत होती. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी भाषणे आवरती घेतली. मुश्रीफ यांनी भाषणात राज्यातील घडामोडीचा उल्लेख केला.  नियतीच्या मनात होते म्हणून उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांनी एकत्रित येऊन राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार आकाराला आणले. नियतीच्या मनात पुढे काय आहे कोणास ठाऊक ,ह्णअसा प्रश्न उपस्थित करून ते मुंबईला रवाना झाले. अर्थात, बाकीचे शंभरभर पुरस्कार प्रदान करण्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर टाकत आहे ,असे सांगण्यास ते विसरले नाहीत. इकडे मंत्रीपदाच्या खात्यांची जबाबदारी वाढलेले सतेज पाटील यांना हसून प्रतिसाद देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

(सहभाग : सुहास सरदेशमुख  प्रल्हाद बोरसे, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे )

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi congress eknath shinde political political instability construction ministerial post ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST