scorecardresearch

महाराष्ट्राच्या बदनामीचे षड्यंत्र

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात ‘वर्षवेध २०२१’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात ‘वर्षवेध २०२१’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनमोकळेपणाने भाष्य केले.  त्या मुलाखतीचा सारांश-

मी पुन्हा येईन यावर अनेकांचा विश्वास नव्हता. सलग तिसऱ्या वर्षी लोकसत्ताच्या वर्धापन दिन समारंभाला आलो आहे. मी पुन्हा येईन असे सांगून न येण्यापेक्षा हे बरे. शस्त्रक्रियेनंतर आता माझी तब्येत सुधारत आहे. हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले असे म्हणता येईल. जिद्द, हिंमत व आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही. आता लवकरच विधिमंडळ अधिवेशन आहे. मी त्यात उपस्थित राहीन आणि अधिवेशनानंतर मंत्रालयात जाणे सुरू करणार आहे.

गेल्या काही काळात देशात केंद्र-राज्य संघर्षांचे चित्र काही राज्यांत दिसत आहे. केंद्रात सत्ता आहे म्हणजे विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांना बदनाम करायचे हे सत्तापिपासूपणाचे व पातळी सोडलेले राजकारण असून ते देशासाठी हानीकारक आहे. तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी सत्ता दिली आहे. विरोधी पक्षांवर चिखलफेक करायची, त्यांना बदनाम करायचे आणि वाट्टेल ते आरोप करायचे आणि म्हणायचे बघा आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात राहणारे आहेत. हा गलिच्छ प्रकार असून सुदृढ लोकशाहीसाठी हानीकारक आहे. आपल्याकडे लोकशाही आहे हे विसरू नका. प्रामाणिकपणे लोकांसमोर जा. त्यांनी सत्ता दिली तर राज्य करा. पण आता सगळे मलाच हवे, मते नाही मिळाली तरी सत्तेचा दुरुपयोग करून मी सत्ता मिळवीनच असा प्रकार सुरू आहे. तो आधी देशाच्या राजकारणात नव्हता. त्यांनी हे देशाचे राजकारण नासवून टाकले आहे. विकृत करून टाकले आहे. त्यातूनच देशात राज्य आणि केंद्र संघर्ष सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा आहे. केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळय़ांनी निषेध करायला हवा.

गेल्या रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आले होते. ‘भाजप नको’ यापेक्षा ‘देश कसा हवा’ या भूमिकेतून चर्चा झाली. गेल्या ७५ वर्षांत काहीच झाले नाही हे सांगितले जाते. यापेक्षा ७५ वर्षांत देश म्हणून आपण काय केले, काय चुकले व काय व्हायला हवे याचा विचार झाला पाहिजे. कोणी कोणाला बांधील असू नये. पण माझा देश कसा चालावा, राजकारण कसे असावे यासाठी राष्ट्रीय पातळीवर आघाडी होऊ शकते. देश आणि राज्याच्या हिताचे जे आहे ते मी करणार. महाराष्ट्रात जे केले ते देशातही करू. सगळे एकत्र आले तर नक्कीच करू.

भाजपशी वैचारिक पातळीवर युती झाली होती. पण आता पातळीच घसरली आहे. भाजपचा विचारही बदलला. ते आता जे काही करत आहेत, त्यात सुधारणा शक्य आहे का? सत्ताप्राप्ती हे शिवसेनेचे स्वप्न कधीच नव्हते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच शिवसेनेचा विचार होता. पण काम करताना लक्षात आले की लोकांची कामे करण्यासाठी महापालिकेत असले पाहिजे. त्यानंतर कळाले की महापालिकेतील बऱ्याच गोष्टी राज्य सरकारच्या हातात असल्याने राज्यातील सत्तेत असले पाहिजे. केवळ राज्यात असून चालणार नाही तर केंद्रातही स्थान असले पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे, की पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आम्ही ज्या हेतूने युती केली होती तो हेतू बाजूला पडला आहे. वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता मिळाली पाहिजे यासाठी हिंदूुत्वाचा वापर होत आहे, ते गैर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपबरोबर ‘तुम्ही देश चालवा, आम्ही महाराष्ट्र बघतो’ हे सूत्र ठेवले होते. त्यातून  महाराष्ट्राबाहेरील राज्यांतील काही शिवसैनिकांवर आमच्याकडूनही अन्याय झाला. त्यांना निवडणुका लढवता आल्या नाहीत. तरीदेखील ते शिवसेनेसोबत आहेत. आता इतर राज्यांतल्या शिवसैनिकांना लढण्यासाठी मोकळी वाट करून द्यायला पाहिजे. कारण केंद्रात स्वबळावर सत्ता आल्यावर आता राज्यातही आम्हीच असायला हवे, महापालिकाही आमच्याकडेच हवी, गल्लीही यांनाच पाहिजे असे भाजपचे सुरू झाले आहे. मग आम्ही काय धुणीभांडी करायची का? बाळासाहेबांनी यासाठी शिवसेना स्थापन केलेली नाही. सामान्य मराठी माणसाला ताठ मानेने उभे राहता यावे यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर केंद्रीय यंत्रणांना दुसरे राज्य दिसत नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड झाला. आपल्याकडे चिमूटभर सापडले तर गहजब केला जातो. महाराष्ट्रात सगळीकडे गांजाची शेती होते आहे, असे चित्र उभे करायचे. महाराष्ट्र जणू काही देशातला सगळय़ात सडका भाग आहे अशा पद्धतीने छापे मारायचे व महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षड्यंत्र आहे. ‘महाराष्ट्र आधार या भारताचा’ असे म्हटले जाते. मग या महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग करण्याऐवजी महाराष्ट्र हा भ्रष्ट आहे, घाण आहे असे वातावरण तयार केले जात आहे. त्यासाठी छाप्यांमागून छापे टाकले जात आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. पण दिवस बदलतात हे लक्षात ठेवा. ते लवकर बदलतील अशी वेळ आणू नका. संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचे सोने करायचे की माती करायची, हे ज्याचे त्याने बघायचे असते. देशात ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. स्वबळावर मिळालेल्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात. त्यामुळेच स्वबळावरील सरकारपेक्षा गेल्या काही दशकांचा अनुभव पाहता देशात आघाडीची सरकारे असताना जास्त प्रगती झाली असे वाटू लागले आहे. करोनानंतर आता विकृतीची लाट आली आहे. ती आता रोखावी लागेल.

महाराष्ट्रात आम्ही आघाडी सरकार आणले. तरी स्वबळावर सत्ता आणणे हे प्रत्येक पक्षप्रमुखाचे स्वप्न असलेच पाहिजे. नसेल तर तो नालायक आहे त्या पदासाठी. पण आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात कुणालाही स्वबळावर सत्ता मिळेल अशी परिस्थिती नाही. मग किमान समान कार्यक्रम घेऊन पुढे चला. स्वबळ फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर प्रत्येक गावात माझ्या पक्षाची शाखा असली पाहिजे. प्रत्येक वस्तीत शिवसेना असली पाहिजे. शिवसेनेशिवाय राजकारण पुढे सरकता कामा नये, एवढी ताकद असलीच पाहिजे ही माझी भूमिका आहे. माझे आजोबा सांगायचे, की टीका जरूर करा. पण त्यातून ज्याच्यावर टीका करत आहात त्याच्यामध्ये शहाणपण यायला हवे. नुसतेच ओरबाडू नका. ते संतुलन येणे महत्त्वाचे असते. आघाडी सरकार जे संतुलन साधायचे ते साधत आहे. ती तारेवरची कसरत आहे.

शिवरायांच्या मराठीसाठी हात का पसरावेत?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर का होईना, केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा असून छत्रपतींच्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची पात्रता आहे का? हा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारपुढे हात का पसरावे लागावेत, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला.

आम्ही फुले वाहणार

मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलता येत नाही. त्यांचा काळ वेगळा होता. त्यांनी दगडातून मूर्ती घडवावी अशी शिवसेना घडवली. आता आम्ही तसेच घण घातले तर मूर्ती फुटेल. आमचे काम त्या मूर्तीवर फुले वाहण्याचे आहे. मी तेच काम करत आहे.

शिवसेना व ठाकरेंची पुढची पिढी..

आमच्यावर कुणी राजकारण लादलेले नाही. घरातच राजकारणाचे वारे होते. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याही आधी आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असे म्हणतात. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती तेव्हा मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारदेखील नाही. तुला जनतेने स्वीकारले तर तू तुझ्या वाटेने पुढे जा. आता आदित्य त्याच्या वाटेने पुढे जातो आहे. लोकांना पटले तर ते त्याला स्वीकारतील. पक्ष एक आहे, विचार एक आहे. तो त्याच्या मार्गाने पुढे जातो आहे. शिवसेनेचा आवाज तोच आहे, त्यातला खणखणीतपणा तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. माझ्यावर टीका झाली की याला बाळासाहेबांसारखे बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असे मला वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकले हे बरेच झाले. आदित्यमुळे ‘ग्लोबल वॉर्मिग’चा विषय राज्याच्या पर्यवरणाच्या ऐरणीवर आला असेल, पण शिवसैनिक मुळात गरम रक्ताचा असल्याने शिवसेनेमुळे ‘नॅशनल वार्मिग’ होत आहे, हे नक्की.

  • मुख्य प्रयोजक :

वल्र्ड वेब सोल्युशन्स

  • सहप्रायोजक :

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,  सिडको, 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रुणवाल ग्रुप, रावेतकर ग्रुप,

  • बँकिंग पार्टनर : टीजेएसबी सहकारी बँक लि.,

’पॉवर्ड बाय पार्टनर :  पर्यटन संचलनालय, महाराष्ट्र, वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. ली.,  िपपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे, दोस्ती रिअल्टी,  अंजुमन इस्लाम, मुंबई, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लि.,

  • एज्युकेशन पार्टनर : सूर्यदत्त

ग्रुप ऑफ इस्न्टिटय़ूट

’सहाय्य : जमीन प्रा. लि.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conspiracy defame maharashtra politics cm udhav thakrey publication of annual issue loksatta anniversary ysh

ताज्या बातम्या