स्वानुभवातून कोविडबोध

अस्थिरोगतज्ज्ञ असल्याने करोना रुग्णांवर उपचार करण्याशी माझा फारसा संबंध नाही.

|| डॉ चंद्रशेखर साठये
कोविडच्या महासाथीइतकीच त्यावरच्या उपचारांचीही चर्चा होत राहील. या दीड वर्षांच्या काळात काही डॉक्टरांनी आणि रुग्णालयांनी जे काही केले, ते खरोखरच गरजेचे होते का, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या डॉक्टरांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करणारा लेख.

अस्थिरोगतज्ज्ञ असल्याने करोना रुग्णांवर उपचार करण्याशी माझा फारसा संबंध नाही. पण करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या विनंतीनुसार मी अलिबागमध्ये पहिले कोविड केअर सेंटर उभारले आणि चालवले. त्यामुळे कोविडबाधित व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक स्थितीचा अभ्यास करता आला. त्यापैकी काहींना काहीच त्रास होत नव्हता, काही जण मृत्यूच्या दारात जाऊन परत आले होते, तर काही जण बरे होता होता अचानक मरण पावले होते. गंभीर आजारी होणाऱ्या तसेच मृत्युमुखी पडणाऱ्या काहींना इतर दुर्धर आजार होते, तर काहींना कोणतेच आजार नव्हते. काही अतिवयस्कर, दुर्धर आजारी लोक फारसा त्रास न होता बरे झाले होते. अजिबात घरातून बाहेर न पडणाऱ्यांनाही कोविड गाठत होता. पीपीई कीट वापरूनही डॉक्टर्स कोविड संसर्गित होत होते, दुर्दैवाने बळीही पडत होते. आणि काही जण कोणतेही संरक्षण न वापरता, कोविड रुग्णाच्या संपर्कात येऊनही ठणठणीत राहात होते. या सगळ्याचा निष्कर्ष असा होता, की कोविडच्या बाबतीत आपल्याला अजून तरी फारसे काहीच कळलेले नाही.

कोविडचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाल्यावर सर्वोत्कृष्ट रुग्णालयांत भरती होऊन, तथाकथित प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित औषधे घेऊनही करोनाने झालेले मृत्यू मी बघितले. तेव्हा घरात थांबणे, मुखपट्टी, सॅनिटायझर, अंतर राखणे, पीपीई, करोनाविरोधी विविध औषधे, लसीकरण या सगळ्या गोष्टींचा खरंच काही उपयोग आहे का, यावर मी विचार करू लागलो.

ऑगस्ट २०२० मध्ये मला करोनाचा संसर्ग झाला. फुप्फुसामध्ये ४० टक्के संसर्ग, न्यूमोनिया होऊनही, मी फारशी औषधे न घेता बरा होऊन दोन आठवड्यांत कामाला लागलो. गिर्यारोहण, व्यायाम सुरू केला. यामुळे कोविड आजारात औषधांची फारशी आवश्यकता नाही, किंबहुना फार औषधे घेतल्यास बरे व्हायला, शक्ती परत यायला फार वेळ लागतो, या माझ्या विश्वासाला बळ मिळाले.

कोविड आजारात टाळेबंदी, विलगीकरण, मुखपट्टी, रेमडेसिविर, हीपॅरिनसारखी औषधे, लसीकरण या गोष्टींचा फारसा उपयोग नाही, हे मी वेळोवेळी बोलून दाखवले, त्याबद्दल लिहिले. यावरून अनेक डॉक्टरांशी माझे वेळोवेळी वाद झाले. पण हे केवळ माझेच मत नाही. विविध ठिकाणच्या सरकारांनी त्यांच्या देशात प्रवेशासाठी लस आवश्यक केल्यामुळे ती घ्यावी लागेल, प्रत्यक्षात कोविडपासून संरक्षण मिळवण्यासाठी ती किती उपयोगी आहे, याबाबत अनेक शंका आहेत असे जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना वाटते.

कोविड लशीच्या सुरक्षिततेविषयी, परिणामकारकतेविषयी पुरेसा अभ्यास झालेला नसल्याने मी बराच काळ ती घेतली नाही आणि घरच्यांनाही ती घेण्याविषयी सांगितले नाही. मला स्वत:ला कोविड झाला असतानाही मी विषाणूरोधक औषधे (रेमडेसिविर) वा रक्त पातळ करण्याची औषधे (हीपॅरिन) घेतली नाहीत.

एप्रिल २०२१ मध्ये पुण्यात राहणाऱ्या माझ्या बहिणीच्या घरी सगळे कोव्हिडबाधित झाले. आजूबाजूच्या कोविड पेशंट्सप्रमाणे आम्हीही रुग्णालयात भरती व्हावे का, असा तिचा प्रश्न होता. पण बाकीचे लोक होताहेत किंवा खर्चाचा प्रश्न नाही म्हणून रुग्णालयात जाण्यात काहीच अर्थ नव्हता. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नाही, उलट प्रचलित प्रोटोकॉलनुसार दिल्या गेलेल्या औषधांमुळे तुमची तब्येत बिघडण्याचीच शक्यता जास्त आहे, असे मी त्यांना सांगितले. सुदैवाने त्यांनी सगळ्यांनी घरी थांबून माझ्याकडूनच व्हिडीओ कॉलवरून उपचार घेतले. दहा दिवसांत सर्वजण ठणठणीत झाले.

जुलै २०२१च्या दुसऱ्या आठवड्यात माझी ७८ वर्षांची आई कोव्हिड पॉझिटिव्ह आली. तिचा ताप आठ दिवस राहिला. चौथ्या दिवशी तिच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ८९-९० टक्क्यांवर आले. तिला दोन दिवस ऑक्सिजन दिला. तिला रेमडेसिविर द्यावे असे तिचे म्हणणे होते, पण मी तिला तापाची गोळी आणि स्टेरॉइडचा वाफारा दिला. तापाच्या गोळ्या, स्टेरॉइड वाफारा आणि तीन दिवस अ‍ॅण्टिबायोटिक्स गोळ्या यावर ती १२ दिवसांत खडखडीत बरी झाली. तिला कोणतेही इंजेक्शन द्यावे लागले नाही. याच काळात माझा मुलगाही पॉझिटिव्ह झाला. दोन दिवस त्याचा ताप १०४ पर्यंत होता. पण त्यालाही तापाच्या गोळीव्यतिरिक्त कोणतेही औषध द्यावे लागले नाही. चौथ्या दिवशी तो बरा झाला. माझे वडील ८१ वर्षांचे आहेत, त्यांना तीव्र मधुमेह आणि इतरही बरेच आजार आहेत. ते या काळात पुण्यात माझ्या बहिणीकडे होते. त्यांना बरे वाटत नव्हते, त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० वर आले होते. तेव्हा त्यांना ऑक्सिजन लावून अ‍ॅम्ब्युलन्समधून रात्री तीन वाजता अलिबागला आणले गेले. त्यांना लगेचच स्टेरॉइड आणि अ‍ॅण्टिबायोटिक इंजेक्शन दिले आणि ऑक्सिजन सुरू केला. त्यांच्या तब्येतीत बरेच चढउतार झाले. एक दिवस त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ७८ टक्क्यांपर्यंत खाली गेले. मग त्यांना १० दिवस ऑक्सिजन द्यावा लागला. काही दिवस शिरेतून सलाइनवाटे अन्नपाणी द्यावे लागले. ते बिछान्याला खिळून होते. पण आम्ही त्यांना कोणतेही विषाणूरोधक (उदा. रेमडेसिविर) औषध वा रक्त पातळ करण्याचे औषध (उदा. हीपॅरिन) दिले नाही. त्यांना बरे व्हायला जवळजवळ २० दिवस लागले.

या काळात माझ्या १५ वर्षांच्या मुलीलाही सर्दी, डोकेदुखीचा त्रास झाला. पण तिने कोविड चाचणी करून घेण्यास नकार दिला. आम्ही तिला सर्दीची तसेच डोकेदुखीची औषधे दिली. ती आठ दिवसांत बरी झाली. मला किंवा माझ्या आई-वडिलांना, मुलांना कोविड झाला असताना माझी पत्नीदेखील घरातच होती. तिने सर्वांची शुश्रूषा केली. आम्ही घरात मुखपट्टी वापरली नाही वा घरात विलगीकरणही केले नाही. पण तिला कोणताही त्रास झाला नाही. तिने तिच्या कामाच्या ठिकाणी सुट्टी घेतली. कामावर परत जाण्याआधी प्रत्येक वेळा तिची नियमानुसार कोव्हिड चाचणी करण्यात आली. प्रत्येक वेळी ती निगेटिव्ह आली.

कोव्हिड झाल्यावर उगाच घाबरून जाऊन जी काम करतात का याबद्दल नेमके माहीत नाही, अशी कोणती तरी प्रायोगिक औषधे वा उपचार घेण्यात काहीच अर्थ नाही. बहुतांश कोविडग्रस्त व्यक्ती कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतात हे कायम लक्षात ठेवावे. कोविड लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही गंभीर स्वरूपाचा संसर्ग होऊन, चांगल्या रुग्णालयांत भरती होऊन, तथाकथित प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित औषधे घेऊनही काही लोकांचे करोनाने मृत्यू झालेले आहेत. काही प्रमाणात यात आनुवंशिकतेने आलेल्या प्रतिकारशक्तीचा भाग असावा. त्याबद्दल अजून आपल्याला फारसे कळलेले नाही.

लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे, नवनवे, प्रायोगिक तसेच आक्रमक औषधोपचार केल्यामुळे म्युकरमायकोसिस वा इतर दुष्परिणाम दिसून आले. काही प्रमाणात औषधोपचारांच्या दुष्परिणामांनीही मृत्यू झालेले आहेत. तेव्हा सुरक्षित उपचार पद्धतीचाच कोविड उपचारात अवलंब करावा.

कोविड उपचारांत सर्वात महत्त्वाचे म्हणजे दक्षता. कोव्हिडमध्ये ताप, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, धाप लागणे या गोष्टींकडे वारंवार लक्ष द्यावे लागते. धाप लागली वा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर अशा व्यक्तीला ऑक्सिजन द्यावा लागू शकतो. यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागते. ते फारच कमी झाल्यासही हॉस्पिटलमध्ये भरती करून शिरेवाटे अन्नपाणी द्यायला लागू शकते.

कोविड आजारात अनेकविध औषधे प्रायोगिक तत्त्वांवर वापरली गेली. यातली बहुतांश औषधे निरुपयोगी-किंबहुना घातक आहेत असे अभ्यासांती ठरले. त्यातल्या त्यात नक्की काम करणाऱ्या गोष्टी म्हणजे १. -ताप, अंगदुखीसाठी- तापाचे औषध- पॅरासिटेमॉल; २. – रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास ऑक्सिजन व श्वसनास आधार; ३. – रोगप्रतिकारशक्तीच्या अयोग्य प्रतिसादाकरिता डेक्सामिथासोन हे स्टेरॉइड वा ब्युडेकॉर्ट स्टेरॉइड वाफारा; ४. – जिवाणूंचा उपसंसर्ग झाल्यास किंवा होऊ नये यासाठी अ‍ॅण्टिबायोटिक्स. हे सर्व उपचार फारसे खर्चीक नव्हते किंवा यांचे फारसे दुष्परिणामही नव्हते. ऑक्सिजन आणि श्वसनास आधार हे उपचार सोडल्यास बाकीचे उपचार बाह्य रुग्ण स्वरूपात घेता येतात, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची काही आवश्यकता नाही,असे स्वानुभवान्ती बनलेले मत आहे.

shekhar1971@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection orthopedic covid care center physical mental condition of individuals akp

ताज्या बातम्या