scorecardresearch

देश ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणारच

वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा झळाळता ठसा उमटवणाऱ्या तरुणाईच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘तरुण तेजांकित’ या लोकसत्ताच्या कार्यक्रमाचे या वर्षीचे प्रमुख पाहुणे होते, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा केली.

धर्मेद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा झळाळता ठसा उमटवणाऱ्या तरुणाईच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘तरुण तेजांकित’ या लोकसत्ताच्या कार्यक्रमाचे या वर्षीचे प्रमुख पाहुणे होते, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून शिक्षणाच्या क्षेत्रातील स्थानिक मुद्दय़ांपासून ते जागतिक पातळीपर्यंतच्या संभाव्य वाटचालीच्या दिशा उलगडत गेल्या.  

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रीय मंत्री असूनही वादग्रस्त नाही असे माझ्याबद्दल सांगण्यात आले. मी खूप कमी बोलतो त्यामुळे आपोआपच वादविवादांपासून दूर राहतो. लोकशाहीत देशासाठी काम करण्याची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट असते. पंतप्रधानांचा विश्वास संपादन करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात निवडली जाते आणि तो विश्वास कायम राहील असे काम करत राहिल्यानेच गेल्या आठ वर्षांपासून मंत्रिमंडळात आहे.

डॉ. काकोडकरांचे मार्गदर्शन

जगात आता तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यातून ऊर्जा प्रारूप बदलत आहे. सौरऊर्जा, जैविक ऊर्जा, हायड्रोजन ऊर्जा ही नवीन ऊर्जासाधने पारंपरिक ऊर्जासाधनांना पर्याय देण्याचा प्रयत्न  करत आहेत. मला अजूनही आठवते की पेट्रोलियम मंत्री झाल्यानंतर मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना भेटीचे निमंत्रण दिले व एका विद्यार्थ्यांसारखा त्यांच्याकडून हायड्रोजन ऊर्जा हा विषय समजून घेतला. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे मला हायड्रोजन ऊर्जेचे स्वरूप, त्या तंत्रज्ञानाची सद्य:स्थिती व संशोधनातील प्रगती व त्याचे भविष्यातील महत्त्व हे सारे समजावून सांगितले. आज आठ वर्षांनंतर आपण हायड्रोजन ऊर्जेच्या संशोधनात बराच मोठा टप्पा गाठला आहे.

बाजारपेठेतून आत्मनिर्भरता

जागतिक परिस्थिती व भारतातील संशोधनाचे स्वरूप पाहता तो दिवस दूर नाही की भारत ऊर्जाक्षेत्रातील एक नवे प्रारूप जगाला भेट म्हणून देईल. स्थानिक बाजारपेठ असली की संशोधनाला अधिक वाव मिळतो आणि त्याला व्यावसायिक यश मिळणेही सोपे जाते. भारताची ऊर्जेची देशांतर्गत बाजारपेठच खूप मोठी आहे. त्यामुळे नवीन संशोधनातून भारत लवकरच ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा विश्वास वाटतो.

ब्रेन ड्रेन ते ब्रेन बँक!

भारतातून उच्चशिक्षित तरुण-तरुणी परदेशात जातात यावरून ब्रेन ड्रेनची चर्चा सुरू असते. पण ज्ञानाची आयात-निर्यात ही जगात सुरूच असते हे आपण लक्षात घ्यायला हवे. प्राचीन काळापासून भारत हा जगाला ज्ञानाची निर्यात करत आला आहे. भारताच्या गुणसूत्रांतच ज्ञान निर्यात आहे. स्थलांतरामुळेही एका ठिकाणचे ज्ञान-कौशल्य दुसरीकडे जाते. पारशी भारतात, मुंबईत आले आणि येताना त्यांचे ज्ञान व कौशल्य घेऊन आले. त्याचा भारताच्या प्रगतीत मोठा लाभ झाला. भारत अशा रितीने एक सर्वसमावेशक राष्ट्र आहे. त्यामुळे आपण सध्या ज्याला ब्रेन ड्रेन म्हणतो त्याचा वेगळा विचार करून ती देशासाठी ब्रेन बँक कशी होईल याचे नियोजन करावे लागेल व ते आम्ही करणार आहोत. देशातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा वाढत आहेत. राजकीय स्थैर्यामुळे आणि गुंतवणुकीस अनुकूल धोरणांमुळे भारताची प्रतिष्ठा जगात वाढत आहे. आता युक्रेन व रशिया संघर्षांत मंदसौरचा गहू जागतिक पातळीवर जात असून त्याची मागणी वाढली आहे.

आता राहिला प्रश्न उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलांनी परदेशी जाण्याचा. तर खरे पाहता दरवर्षी चार कोटी लोक उच्चशिक्षण घेतात व त्यापैकी दहा लाख मुले परदेशी शिकायला जातात. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण व त्यापैकी परदेशी जाणारे असा विचार केला तर ते प्रमाण किती कमी आहे हे लक्षात येईल. पुढील दहा वर्षांत उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण आपल्याला १० कोटींवर न्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला देशात उच्च शिक्षणाच्या चांगल्या सुविधा निर्माण कराव्या लागतील याबाबत दुमत नाही. त्याचबरोबर आणखी एक बदल करावा लागेल. तो म्हणजे सध्या आपले शिक्षण पदवीकेंद्रित झाले असून ते आपल्याला रोजगारकेंद्रित करावे लागेल. आज प्रत्येक उच्चशिक्षण संस्था ही प्लेसमेंट म्हणजेच त्यांच्याकडील किती पदवीधर मुलांना लगेचच नोकरी मिळाली यावर बोलत असते. नोकरी निर्माण करणारे पदवीधर आपण कधी तयार करणार, हा खरा प्रश्न आहे. उद्योजक तयार होतील अशा आयसीटीसारख्या विविध क्षेत्रातील संस्था उभ्या राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला समाजाची मानसिकता बदलावी लागेल. एखादा दहावी उत्तीर्ण तरुण चांगला व्यावसायिक-उद्योजक असेल व लाखो रुपये कमवत असेल तरी पदवीधर मुली व त्यांचे पालक असे स्थळ स्वीकारत नाहीत हे वास्तव आहे. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

उच्चशिक्षण शुल्क व्यवस्थेचा विचार

उच्चशिक्षणातील पद्धतीबरोबरच कधी ना कधी आपल्याला त्यातील शुल्क व्यवस्थेचाही विचार करावा लागणार आहे. दिल्ली विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ आहे. राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नोकरशहा आणि त्याचबरोबर सामान्य माणसाचा, एखाद्या शेतकऱ्याचा मुलगाही या विद्यापीठात शिक्षण घेऊ  शकतो. विशेष म्हणजे या सर्वाना त्यासाठी एकच म्हणजे समान शुल्क आकारले जाते. यात एक गुंतागुंत आहे. अतिश्रीमंत आणि सर्वसामान्य किंवा गरिबांना एकच शुल्क आकारून कसे चालेल हा विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारी खर्चाने कोणाला शिकवायचे आणि कोणी आपल्या उच्च शिक्षणाचा पूर्ण भार उचलायचा याचा विचार झाला पाहिजे. याचा अर्थ लगेचच आम्ही शुल्क नियमन करायला निघालो आहोत असा नव्हे. पण आपल्याला समाज म्हणून हा विचार करावा लागेल हा मुद्दा आहे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी सरकारी खर्चाने शिक्षण घेऊ नये ही संकल्पना आहे. गॅस अनुदानाबाबत आपण हा प्रयोग यशस्वी केला आहे. लाखो श्रीमंतांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान स्वेच्छेने सोडले. तोच विचार उच्च शिक्षणात करता येईल.

कोणाच्याही दयेवर नाही

आज भारत हा जगातील एक महत्त्वाचा देश झाला आहे. भारत आता कोणाच्या दयेवर जगत नाही. राजकीय स्थैर्य, धोरणसातत्य आणि बाजारपेठ म्हणून देशाची खरेदी क्षमता ही जगातील इतर राष्ट्रांना व मोठय़ा गुंतवणूकदारांना खुणावत आहे. या परिस्थितीचा देशाला लाभ व्हावा यासाठी आम्ही काम करत आहोत.

नाणारबाबत मनपरिवर्तन

मी पेट्रोलियममंत्री असताना नाणार येथे सौदी व संयुक्त अरब अमिरातीच्या सहकार्याने व आपल्या तेल कंपन्यांच्या भागीदारीत पेट्रोलियम पदार्थासाठी एक विशाल तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार झाला. ६० दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प होता. त्याबाबत सामंजस्य करार झाला. पण त्यावेळी सत्तेतील आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत प्रकल्पाला विरोध केला. त्यातून तो प्रकल्प बारगळला. महाराष्ट्रासह देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्प उभारणीचा बहुमोल वेळ वाया गेला. पण आता महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचे या तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत मनपरिवर्तन झाल्याचे संकेत मिळत आहेत. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने शिवसेनेच्या या मनपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे. या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे जवळपास तीन लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पुढील काही वर्षांंत येऊ  शकतात. तेलशुद्धीकरण प्रकल्पातील थेट रोजगाराबरोबर प्रकल्प उभारणीच्या आनुषंगिक गोष्टींमधून  हजारो लोकांना रोजगार मिळेल. शिवाय प्रकल्प सुरू  झाल्यावर त्याच्याशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील व त्यातही मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठय़ा प्रकल्पामुळे ऊ र्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल.

‘लोकसत्ता’शी ऋणानुबंध

२०१४ मध्ये मी केंद्रीय पेट्रोलियममंत्री झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच माझ्या एका स्नेह्यंचा मुंबईतून दूरध्वनी आला. ‘लोकसत्ता’मध्ये बरीच वर्षे खनिज तेल व त्याच्याशी निगडित अर्थकारण व जागतिक राजकारणावर लिहिले असून त्यातील संपादकीय तुम्हाला अनुवाद करून पाठवतो ते जरू र वाचा असे त्यांनी सांगितले. ते अनुवादित लेख मला काही दिवसांत मिळाले आणि ते वाचल्याबरोबर मी संपादक गिरीश कुबेर यांच्यांशी संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सुरू  झालेला संवाद आजही कायम आहे. खनिज तेलाचे अर्थकारण व राजकारण याचे परिणाम आपल्याला देश म्हणून कायमच भोगावे लागतात. सध्या युक्रेन व रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षांलाही या जागतिक ऊर्जा संघर्षांशी किनार असून भू—राजकीय समीकरणे त्यातून तयार होतात हे आपल्याला ठाऊक आहे.

‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी होणारा ‘तरुण तेजांकित पुरस्कार’ हा सोहळा हा खरोखरच समाजातल्या तरुण फळीला प्रोत्साहन  देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणारा आहे. १०३ हून अधिक वर्षे तरुण असणाऱ्या आमच्या ‘सारस्वत बँके’साठी ‘लोकसत्ता’ या अग्रगण्य समूहाद्वारे आयोजित अशा प्रेरणादायी पुरस्कार सोहळय़ात सहभागी होणं ही अभिमानास्पद बाब आहे. 

– गौतम ए. ठाकूर, सारस्वत बँक

‘शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय’, या ओळी खऱ्या अर्थाने ‘तरुण तेजांकित’ या पुरस्कार सोहळय़ामुळे सार्थ ठरतात.  विविध क्षेत्रांत अफाट काम करणारे चाळिशीच्या आतील  अनेक तरुण देशभरात मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांच्या कर्तृत्वसिद्धीला तरुण वयातच शाबासकीची थाप देण्याचे महत्त्वाचे कार्य ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून होत आहे याचे मला विशेष कौतुक वाटते. तरुण व्यक्तींना या उपक्रमाच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी मिळाली आणि याचा मी एक भाग होते याचा निश्चितच मला आनंद आहे.

– उषा काकडे, अध्यक्षा, ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून राज्याच्या ग्रामीण भागात उद्याच्या समृद्ध भारताचे बीज रुजवणाऱ्या कल्पक तरुणांना समाजासमोर आणून बुद्धिसंपन्न महाराष्ट्र अजूनही जागृत आहे याची जाणीव जागृत करणारा हा ज्ञानयज्ञ आहे. समाजमाध्यमांच्या या जंजाळात अडकलेल्या तरुणांना प्रेरणा देणारा हा सोहळा आहे. त्यातून नावीन्याचा शोधही सुरू आहे. साऱ्याच तेजांकित गंधर्वाना मनापासून सलाम.

– संजय भुस्कुटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा खूपच चांगला उपक्रम आहे. या उपक्रमातून ‘लोकसत्ता’शी संलग्न होता आले याचा आनंद आहे. समाजासाठी काही तरी चांगले घडवण्यात या उपक्रमाचा खूप मोठा हातभार आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या पुढील पर्वासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. 

– प्रिया रातांबे, सिडको

‘लोकसत्ता’च्या पुढाकाराने होणारा ‘तरुण तेजांकित’ हा अतिशय चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाशी जोडल्याने आम्हालाही वेगळय़ा स्तरावर पोहोचता आले. या उपक्रमाचे सादरीकरण आणि व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. भविष्यात अशाच अनेक उपक्रमांसाठी ‘लोकसत्ता’ला मन:पूर्वक शुभेच्छा. 

– कौशल ओहोळ, एमकेसीएल

मी पहिल्यांदाच ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या पुरस्कार सोहळय़ात सहभागी झालो. यानिमित्ताने मला या सर्व तरुणांचे काम जवळून पाहता आले.  ही मंडळी किती प्रचंड काम करतायत व कुठच्या कुठे पोहोचली आहेत,  ते मला कळले. मी ‘लोकसत्ता’चे खरंच खूप आभार मानतो, की त्यांनी मला या सोहळय़ासाठी बोलावले. या तरुणांचे काम किती मोठे आहे याची कल्पनाही मी करू शकत नाही.  एवढे मोठे यश त्यांनी एवढय़ा लहान वयात साध्य केले आहे. या हरहुन्नरी तरुणांना शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’ने घेतलेले कष्ट आणि त्यातून वेगवेगळय़ा क्षेत्रांतून अचूकपणे निवडलेले पुरस्कर्ते हे ‘लोकसत्ता’चे यश आहे.

– नीलेश मयेकर, व्यवसायप्रमुख, झी मराठी

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Country become self sufficient energy different areas authoritarianism education field ysh

ताज्या बातम्या