अ‍ॅड. सुनील दिघे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बट्र्राड रसेलची १५० वी जयंती येत्या १८ मे रोजी साजरी होईल. आजही प्रश्न पडतो तो, एकटय़ा नव्वद वर्षांच्या बट्र्राड रसेलने जिवाच्या आकांताने क्युबावर होणारे रशिया-अमेरिका संभाव्य महायुद्ध कसे थोपवले असेल? अमेरिकेकडून क्युबावर १५ ते २८ ऑक्टोबर १९६२ दरम्यान ‘कोणत्याही क्षणी’ मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ घातला होता. हाच ‘क्युबन मिसाइल क्रायसिस’. त्याचे कारण अमेरिकी गुप्तचर विभागाला खात्रीलायक माहिती मिळाली होती की रशियाने क्युबाच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात क्षेपणास्त्रे तसेच अण्वस्त्रे पाठवलेली होती आणि त्यामुळे अमेरिकेवर हल्ला होण्याची शक्यता होती. अमेरिकेने अत्यंत वेगाने क्युबाला सर्व बाजूंनी घेरून ‘रशियन अण्वस्त्रांना’ नष्ट करण्यासाठी कंबर कसली होती. तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेचे सावट जगावर पडले होते.

 ज्या देशाने व समाजाने महायुद्ध पाहिले आहे, त्यांनाच अशा अण्वस्त्रयुद्धाची टांगती तलवार कशी थांबवावी हे माहीत असते. १८७२ मध्ये जन्मलेल्या, दोन्ही महायुद्धे जाणतेपणी पाहिलेल्या बट्र्राड रसेल यांनी हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.  क्युबा ही युद्धभूमी ठरेल, याची कुणकुण जुलै १९६२ पासूनच जगाला होती. रसेल यांनी ३ सप्टेंबर १९६२ रोजी यासंदर्भात शांततेचे पहिले आवाहन केले.  रसेल हे काही डावे नव्हते, पण ‘क्युबातले सरकार डावे आहे, कम्युनिस्ट आहे म्हणून काही अमेरिकेची त्या देशावरील कारवाई उचित ठरणार नाही’ असे त्यांनी ठणकावले आणि ‘प्राप्त परिस्थितीत, अमेरिकेने क्युबावर हल्ला न करण्याचे, तसेच रशियाने क्युबाला अण्वस्त्रे – क्षेपणास्त्रे न पुरवण्याचे बंधन मान्य करावे’ अशी स्पष्ट मागणी केली. अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि रशियाचे त्यावेळचे अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांना या युद्धापासून परावृत्त करण्यासाठी या ‘प्रक्षोभक’ चार महिन्यांच्या काळात शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी नुसते संभाव्य युद्ध टाळले नाही तर क्युबालासुद्धा वाचवले आणि अमेरिका व रशिया यांना अण्वस्त्र युद्धापासून लांब ठेवले. 

महायुद्धांत होरपळलेल्या विचारी जनतेने रसेल यांना पाठिंबा दिला. यासाठी त्याने सर्व संबंधित नेत्यांना तारा (टेलिग्राम) पाठवल्या. त्यांचा आशय वृत्तपत्रे तसेच नभोवाणीवरून जाहीर झाला.  रसेल आज असते, तारांपेक्षा ईमेल आणि समाजमाध्यमांचे वेगवान माध्यम त्यांच्याकडे असते, तर? युक्रेनयुद्ध ज्या प्रकारे ७० दिवसांनंतरही धुमसत राहिले आहे, ते रसेल यांनी थांबवले असते का? मुळात अमेरिका, युरोपीय देशांनी ‘नाटो’-विस्ताराचे गाजर युक्रेनला दाखवले. यावर रशियाच्या पुतिन यांनी ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?’ अशी भूमिका घेतली व युक्रेनमध्ये रशियन फौजांची ‘मोहीम’ सुरू केली.

क्युबामधील ‘मिसाइल क्रायसिस’ टाळण्यासाठी जो काही समाज होता तो आज नाही. आजचा समाज संभाव्य महायुद्धाचे धोके कोठेही पाहत नाही, त्यांना त्याची जाणीवच नाही. अफगाणिस्तानात  अमेरिकेने बिनबोभाट त्यांचे सैनिक अनेक वर्षे राखले आणि काढता पाय घेतला.  आज अफगाणिस्तानची काय अवस्था आहे, तिथल्या लोकांना काही मदत मिळते की नाही याचा कोणी विचार करत नाही. ‘विश्वबंधुत्वाची शिकवण जगाला देणाऱ्या’ भारतातसुद्धा याचे काही पडसाद उमटत नाहीत.

जग या संभाव्य धोक्यांना सामोरे जात आहे, जगाच्या ‘शांतताप्रेमी’ स्वरूपालाच आव्हान दिले जाते आहे. याचे भान कोणालाही नाही, ही खरी धोकादायक स्थिती आहे. आज असे ‘रसेल’ नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे.

snl_dighe@yahoo.co.in

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cuba ukraine russell absence cuba russia us possible world war missiles missile ysh
First published on: 14-05-2022 at 00:06 IST