प्रदीप आपटे pradeepapte1687@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फादर स्टीफन्सचे मराठीवर प्रभुत्व, पण १६५४ पर्यंत क्रिस्तपुराणाच्या पहिल्या तीन आवृत्त्या निघाल्या त्या रोमन लिपीतच. त्याहीनंतरचा अवस्वरु (अध्याय) असा की, पोर्तुगीजांना भारतीय भाषाच नकोशा होऊन हे पुराण पार दिसेनासेच झाले..

देवाने विश्वाची उत्पत्ती कशी केली इथपासून ‘हव्वाने सर्पाच्या सांगण्याला बळी पडून मनाई केलेले फळ खाण्याचे पाप केले आणि ते पाप त्यांची सगळी मनुष्यसंताने कशी भोगत आहेत’ इथून जुन्या कराराचा आरंभ होतो. तेथून पुढील कथा मिसरातून इस्राएलच्या संतानांनी कसे निर्गमन केले. त्यांना मोशेने कसे तारले आणि दुधामधांच्या प्रदेशात वसविले. येहोवाच्या दहा आज्ञा दिल्या. इस्राएलच्या मूळ १२ टोळ्यांत कसे रागलोभ अवतरले. त्यांच्यामध्ये वैर माजलेल्या घटना घडल्या इत्यादी कथा जुन्या करारामध्ये आहेत. ज्यांच्या कानी आणि मेंदूत हिंदुस्तानातील पुराणकथांचे गारूड वसले आहे त्यांना जुन्या करारातील कथा सिनाई वाळवंटाप्रमाणेच रखरखीत भासतील. पण क्रिस्ती परंपरेचा तोच तेवढा वारसा आहे. तो किती पिंजत वाढवून स्पष्ट करून सांगावा तेवढा थोडा! तेच तर जेसुईटाचे प्रशिक्षितपण! पण आवरते तर घ्यायला हवे! मग संक्षेपाने सांगायची पाळी येते. संक्षेपाने सांगावे तर एक श्रोता विचारतो जन्मापासून ३० वर्षांपर्यंत जेसूने काय केले हे सविस्तर का सांगत नाही? मग थोडक्यात सांगण्याचे समर्थन करताना स्टीफन म्हणतो गंगेची प्रचीती घ्यायला गंगाजळाची एक घागर पुरे की! ‘‘आमां हे पुरे येतुकेचि। जैसी प्रचिती घ्यावेआ गंगोदकाची। येकिची घागर पाहांता तेयाची। पुरे होईल’’ खेरीज ‘आपली’ पुराणे जेंतियांच्या (म्हणजे अश्रद्ध हिंदूंच्या) प्रमाणे पाल्हाळिक नसतात असेही तो बजावितो! ‘तेणे अप्रमित कथाग्रंथु। जी पाल्हाळ पुराणे। दीर्घ पुस्तके अनंत स्मृती: जेंतियासारखी बहुती’. पण आपले पुराण रटाळ लांबते आहे याची त्याला जाणीव होते! मग तो म्हणतो ‘‘ऐसे उपमा बहुती। स्वामी निरोपी लोकांप्रती। तेआ सांगता समस्ती। विस्तारेल कथा’’

त्याच्या लिखाणात परिचित शब्द प्रतिमा आणि संकेतांचे धागे विणण्याची कामगत कधी कधी प्रकर्षांने येते. सीरिआमधील प्रदेशाऐवजी हिंदुस्तानी निसर्गवर्णनाचा तो सहजी आधार घेतो. वानगीदाखल नगराच्या कौतुकी वर्णनामध्ये येणारा फुलोरा बघा- ‘जाइ जुई मालती सेवंती । चंपक परिमळाचे वोसंडती। तेथे रुणझुणकार पडती। भ्रमरांचे।’, ‘केदक बनीचा परिमळ। घेऊनी जाये मळेया निळु । भेदेनासाग्री सकळु। उपमेलागी’ किंवा मरियेच्या हास्याचे वर्णन करताना तो ते ‘भानुमती कमळागत’ असे म्हणतो.

मराठी भाषेचे गुणवर्णन करताना तो लिहितो जसे फुलात फूल मोगऱ्याचे, सुवासामधे कस्तुरी किंवा पक्षांमध्ये मोर आणि वृक्षांमध्ये कल्पतरू तशी भाषांमध्ये मराठी भाषा ‘जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी। की परिमळामाजी कस्तुरी। तैसी भाषांमध्ये साजिरी। मराठिया’ ‘पखियांमाजी मयोरू। वृखियांमध्ये कल्पतरू। भाषांमधे मान थोरू। मराठियां’

ईश्वराची उपासना भक्ती चिंतन का करावे याबद्दल त्याने केलेले वर्णन आणि युक्तिवाद पाहा. ते जणू ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे’ किंवा ‘नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आता जवळी ग्रासावया’च्या धर्तीवर आहे.‘‘आयुष्य केवढे जरि होय। तरि सरलेया उरे काय । स्वप्नासारखे सरोनी जाय। संसारसुख’’ किंवा,  ‘‘तुमचा जिवी वसताए। हृदयमंदिरी लिहिली आहे। देवें आपला करु पाए। लिहिली जिव्हारी’’ गोव्यातील क्रिस्तवासी झालेल्या ब्राह्मणांशी तो मुख्यत: बोलत असावा. त्यांच्याशी तद्रूपपण साधण्याच्या भरात त्याने सीरिआतल्या जॉनला शेंडी बहाल करून टाकली आहे! जॉन मंदिरात धावत धावत येतो. त्याला धाप लागून बोलता येत नाही, असे सांगताना त्याची धावताना शेंडी हलत होती असे अनघपणे लिहितो- ‘योआवों धांवे दवडादवडी । लकलका हालते शेंडी। धापें शब्दु न ये तोंडी। मंदिरी प्रवेशिला’

स्टीफनला येशुस्तुती लिहिणे तुलनेने सोपे होते. विष्णुस्तुतीचा विष्णुदास त्याच वळणाने तो क्रिस्तस्तुतीचा क्रिस्तदास झाला. काही ठिकाणी पारंपरिक वचने क्रिस्तस्तुतीत चपखल उतरतात. उदाहरणार्थ क्रिस्ताच्या अमर कुडीचे वर्णन करताना ‘नैनं छिन्दन्ती शस्त्राणि’चे ठसे येतात जसेच्या तसे! ‘नां अग्निचेनी जळिजे। नां उदकाचेनि भिजविजे। नां वायुचेनि सोसिजे। ऐसिही कुडी उत्तमी’. येशूकरिता वापरलेली विशेषणात्मक नामेदेखील  ‘विश्वतारक’, ‘मोक्षपदाचा दाता’ ‘सर्वकृपेचा वर्षांव’,‘स्वामी’, ‘अनाथनाथ’, ‘कृपासागर’ ‘सर्वकृपावर्षांवु’ ‘विश्वाची दीप्ती’ ‘विश्वतेज’  ‘दातार’ ‘परमगतीचा राजा’ ‘महावीर’ अशी निदान ४५ नावे आढळतात.

हिंदू धार्मिक आध्यामिक विषयातले सांकेतिक शब्द, उपमा, रूपके क्रिस्तपुराणात येतात. ‘आनंदाचि गुढी’ ‘तथास्तु’ ‘पंगुगिरि वर’ ‘तस्करास चांदणे न आवडणे’, ‘माकडा-मदिरा’ ‘मुळारंभ’ ,  त्रिलोक’ ‘पंचरस’, ‘भवसागर’,  ‘षड्रिपु’.

त्याची प्रसंग किंवा अवस्था वर्णन करण्याची हातोटी लक्षणीय आहे. वानगीदाखल दुष्काळ वर्णनातील ओवी : ‘जळें सुकली पोखरणी। आटले सरुवरोचे पाणी। भाग पाडली धरणी। उन्हाळे करोनी’, ‘दुष्काळ देसिंचे प्रबळ। क्षुधे पिडले लेकुरुंबाळ। चालता न चलवे बळ। चरणचालिचें’’

असेच सहज कौशल्य येरशालेमच्या विनाशाचे किंवा नरकाचे रेखाटनात आढळते. मध्ययुगीन मराठी साहित्यात कथन-वर्णनस्वामी म्हणजे महाभारत मुक्तेश्वर. त्याची सावली स्टीफनच्या शैलीवर अनेकदा आढळते. जेसु पुनरुत्थान होऊन उठला. आपल्या शिष्यांना भेटला. त्यांना धीर दिला. शंकाखोर थॉमसला पुनरुत्थानाबद्दल संशय होता. तो त्याने त्याला सतत भेटून फिटविला. त्याने सर्वाचे सांत्वन केले! आपला हात उंचावून सांत्वनपर आशीर्वाद दिला आणि महाकाय मेघाने त्याला उचलून घेतले मग तो अदृश्य झाला. त्याचे स्वर्गारोहण ऊर्फ वैकुंठगमन झाले! हे प्रसंग येशुश्रद्धावानांसाठी फार मोलाचे! त्या प्रसंगांमध्ये स्टीफनचे वर्णनकौशल्य निराळे उठून दिसते.

परंतु जुदा- क्रिस्ती धर्मपरंपरामधले काही संकेतविधी उपचार इतके निराळे आहेत की त्याला हिंदू परंपरेतला दुवा सापडणे मोठे मुश्कील! बाप्तिस्मा म्हणजे ना बारसे ना मुंज! त्यामुळे काही शब्द तसेच रेटून वापरले आहेत! बहुधा वारंवार वापर करून कालांतराने अंगवळणी होतील या आशेने! उदा. सालव्हादोर, प्रोफेत, र्सकसीजिव तेम्पल, सेपुलक्र, सिनगोग, पात्रिआर्क इ. इ. त्याचप्रमाणे कॅथॉलिक धर्मपंथीयांनी स्वत:हून अनेक तोतया गोष्टी प्रचाराला सोयीच्या म्हणून क्रिस्तचरित्रात घुसडल्या आहेत. त्यांना अपॉक्रिफल म्हणतात. अर्थातच स्टीफनने त्याही कर्तव्यबुद्धीने वापरल्या हे सांगायला नको! स्टीफनचे मराठी भाषेवर पुरेसे निर्विवाद प्रभुत्व होते. त्याने मराठी भाषेच्या स्तुतीपर ओव्याही याच ग्रंथात लिहिल्या आहेत. मूळ हिंदूंना भावतील अशी प्रतीके, देवांची नावे (उदा. यम, यमपुरी, वैकुंठ) त्यात सर्रास होती. हे ईश्वरी इच्छेविरोधी अधर्मी पाप करण्याचे धाडस त्याच्या हातून झाले. ते उघड लक्षात आले का किंवा कसे याची अधिकृत नोंद नाही. पण छळचौकशी यंत्रणेत ते कुणाच्या तरी ध्यानी आले असावे! अखेरीस त्याचे हे सारे सायास व्यर्थ झाले. १६१६ ते १६५४ पर्यंत याच्या तीन आवृत्ती निघाल्या- अर्थात रोमन लिपीत-  पण त्यानंतर हे पुराण मूक झाले. कारण १६८४ साली देशी भाषांनाच बंदी घालणारा पोर्तुगीज हुकूम जारी झाला!

येशू हा देवपुत्र! पण त्यावर विश्वास कोण ठेवणार? चमत्काराखेरीज नमस्कार कुठला? येशूने केलेले चमत्कार त्याच्या देवपुत्र असण्याचे पुरावे म्हणूनच मिरविलेले असतात. हे चमत्कार नव्या करारामध्ये वर्णिलेले आहेत. अनेकांचे आजार बरे करणे, आंधळ्याला दिसू लागणे, पांगळ्याला चालते करणे इत्यादी नेहमीचे परिचित चमत्कार! खेरीज विधवेचा मरण पावलेला एकुलता एक मुलगा पुन्हा जिवंत करणे! परंतु येशूच्या एका चमत्काराची कथा सांगून स्टीफन जरा पेचात सापडला! ती कथा थोडक्यात अशी: एका विवाहप्रसंगी वरपक्षाला पाहुण्यांना आगतस्वागत म्हणून द्यायची  वाइन अपुरी पडली. कमी पडल्याने बेअदबी होणार, ऐनवेळी वाइन कोठून आणणार? येशूने त्यांची अब्रू राखली एका रांजणभर पाण्याचे त्याने चमत्काराने वाइनमध्ये रूपांतर केले! जे जुदा- क्रिस्ती द्राक्षसंस्कृतीतले त्यांना वाइन हे आनंदोत्सवी पेय. क्रिस्ती लोकांना तर ती येशूचे रक्त म्हणून श्रद्धेने घ्यायची. पण ‘द्राक्षा’ऐवजी रुद्राक्ष संस्कारात वाढलेल्या नवक्रिस्ती गळी ही कथा काही सहजी उतरेना. त्यांनी या मद्यपीपणाबद्दल मोठे उत्साही काहूर उठविले! द्राक्षमद्याच्या वार्तेने त्यांनापण सुख वाटले! ‘मधुरेचे आश्चर्य आईकुनु। उठला एक क्रिस्तावों जनु । म्हणे हे अश्चर्ये स्वामियांचे पेले। आईकुन आम सुख जाहले’

मग त्यांचे सांत्वनी समाधान करता करता स्टीफनगुरुजींची मोठी पंचाईत होऊन तारांबळ झाली. मग त्यांनी ‘तिथल्या थंड हवेत वाइन पिणे कसे योग्य आणि आरोग्यकारी, सौख्यकारी इथपासून ते प्रमाणात घेण्याचे तीर्थ म्हणून कसे योग्य इत्यादी बचाव केला. खेरीज येथील मद्य व मद्यपींची निंदा करून जी सारवासारव केली ती मुळातूनच वाचावी! स्टीफनच्या चमत्कार-वर्णनाइतक्याच जास्त ओव्या त्याकरिता खर्ची पडल्या! आमेन!  

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father stephens command on marathi language zws
First published on: 15-10-2021 at 01:31 IST