जिरेनियम शेती

कधीकाळी नागवेली, नंतर हळद आणि पुढे द्राक्ष-बेदाणा अशी ओळख झालेल्या सांगली जिल्ह्याच्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू असतात.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

दिगंबर शिंदे

कधीकाळी नागवेली, नंतर हळद आणि पुढे द्राक्ष-बेदाणा अशी ओळख झालेल्या सांगली जिल्ह्याच्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू असतात. प्रयोगातून यश आले की ते पीक रुढ होते, मग त्याची परंपरा तयार होते. या मालिकेतच आता इथले शेतकरी जिरेनियम शेतीकडे वळू लागले आहेत. सौंदर्य प्रसाधनामध्ये या सुगंधी, औषधी वनस्पतीचे तेल वापरले जाते. सांगलीतले शेतकरी केवळ या पीक उत्पादनावर समाधानी न राहता त्याच्यापासून तेल काढण्याची कला त्यांनी अवगत करत ते आता त्याचे उत्पादन करून सौंदर्य उत्पादकांना थेट विक्री करत आहेत.

एकेकाळी पाकिस्तानामध्ये नागवेलीची पाने निर्यात करण्यासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध होताच, पण जागतिक पातळीवर हळदीच्या उत्पादनात व विक्रीमध्ये आजही अव्वल असलेल्या जिल्ह्याने द्राक्ष शेतीमध्येही विविध प्रयोग करीत बेदाण्याचे भौगोलिक नामांकन मिळवले. मात्र बदलत्या हवामानामुळे जशी नागवेलीची शेती कमी होत गेली तशी द्राक्ष शेतीलाही उतरती कळा लागली आहे. आता येथील कष्टाळू शेतकरी सुगंधी, औषधी वनस्पती असलेल्या जिरेनियम शेतीकडे वळू लागला आहे. केवळ पीक उत्पादनावर तो समाधानी न राहता तेल काढण्याची कला अवगत करून स्वत: तेल उत्पादन करून सौंदर्य उत्पादकांना थेट विक्री करण्याच्या तयारीत आहे. अत्तराची शेती शाश्वत उत्पादनाची सध्या तरी हमी देत असल्याने क्षेत्र वाढत आहे.

अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधन उद्योगाच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे. केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (लखनौ) यांच्या अहवालानुसार देशांतर्गत सौंदर्य प्रसाधन उद्योगाची सुगंधी तेलाची गरज सुमारे २५० टनांची आहे. त्यापैकी अवघे दहा टन तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे भविष्यात जिरेनियम तेलाची मागणी वाढती राहणार आहे.

बाजारपेठेची गरज ओळखून कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणीचे शेतकरी रावसाहेब गलांडे यांनी जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात ३ एकर क्षेत्रावर या वनस्पतीची लागवड केली आहे. तसेच तालुक्यातील अलकूड, थबडेवाडी, डोर्ली, वाळेखिंडी आणि मिरज तालुक्यातील एरंडोली या ठिकाणी आठ एकर क्षेत्रावर कराराने जिरेनियमची लागवड केली आहे. याशिवाय अन्य काही शेतकऱ्यांनी तासगाव तालुक्यातील कुमठे परिसरातही या वनस्पतीची लागवड केली आहे.

जिरेनियम ही वेगवेगळय़ा हवामानात वाढणारी बहुवार्षिक, झुडुपवर्गीय सुगंधी वनस्पती आहे. हलक्या ते मध्यम जमिनीत या वनस्पतीची लागवड करण्यात येते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत जिरेनियमची वाढ चांगली होते. त्याचबरोबर तेलाचा उताराही चांगला मिळतो.जिरेनियमची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी जमिनीत एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत (कंपोस्ट खत) टाकणे फायदेशीर ठरते. तसेच प्रती एकर ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २६ किलो पोटॅश म्युरेट, १५ किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि १० किलो झिंक सल्फेट खतांची मात्रा द्यावी. जिरेनियमचे आयुष्य तीन वर्षांचे आहे. त्यामुळे दरवर्षी वरीलप्रमाणे खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. हळद,ऊस आणि सिमला मिरची प्रमाणे सरी पाडून वरूंब्यावर रोप लावण करून मिल्चग पेपरचा वापर केला तर तणाचा जास्त त्रास होत नाही. तसेच सुगंधित वनस्पती असल्याने किडीचा अजिबात त्रास होत नाही. आणि जनावरेही याला तोंड लावत नाहीत. यामुळे संरक्षणासाठी स्वतंत्र खर्च करावा लागत नाही.

जिरेनियमची लागवड साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर करण्यात येते. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत जिरेनियम लागवडीसाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत बुरशी व करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जिरेनियमची सरी पध्दतीने लागवड योग्य ठरते. दोन सऱ्यांमधील अंतर तीन फूट असावे, तर रोपांमधील अंतर सव्वा फूट असावे.

लागवडीनंतर प्रत्येकी १२ दिवसांनी प्रती एकर ८ किलो अमोनिअम सल्फेट, १२:६१:० चार किलो व पोटॅशियम मेट २०० ग्रॅम ठिबक सिंचनाद्वारे प्रवाही पद्धतीने द्यावे. जिरेनियम वाढीसाठी मर्यादित पाणी आवश्यक असल्याने ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. तेलाचा उताराही चांगला मिळतो.
लागवडीनंतर चार महिन्यांनी जिरेनियमची चांगली वाढ होते. त्या वेळी झाडाची पहिली छाटणी करावी. त्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांनी छाटणी करावी. या छाटणीतून मिळणाऱ्या पानांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. वर्षांतील चार छाटण्यांमधून प्रती एकर साधारण ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते.
गलांडे यांनी आपल्या शेतातच तेल उत्पादन घेण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. या प्रकल्पामध्ये ऊध्र्वपतन पध्दतीने जिरेनियमच्या पानांपासून तेल काढण्यात येते. एक टन जिरेनियमच्या पानांपासून सुमारे १००० ते १२०० मिलिलिटर सुगंधी तेल मिळते. प्राथमिक अवस्थेतील या तेलाचा वापर प्रामुख्याने अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, सुवासिक साबण तयार करण्यासाठी होतो. सौदर्य प्रसाधन कंपन्या ११ हजार ५०० रुपये प्रती किलो (१ हजार २२० मिलिमीटर) दराने हे तेल खरेदी करतात. तेल काढल्यानंतर उरलेल्या पानांच्या चोथ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते,अथवा चोथ्याचा वापर उदबत्ती तयार करण्यासाठी देखील होतो.

जिरेनियमची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक या पिकाचा तांत्रिक अभ्यास करावा. पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. माती परीक्षण, आपल्या परिसरातील हवामान, पावसाचे प्रमाण याचा अभ्यास करावा. शुद्ध रोपांची निवड, खतांच्या योग्य प्रमाणातील मात्रा, योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पारंपरिक निष्काळजीपणा टाळून व्यावसायिक पध्दतीने उत्पादन घेतल्यास जिरेनियमपासून चांगले उत्पन्न मिळू शकते.
जिरेनियम हे कमीतकमी जोखमीचे पीक आहे. जनावरे विशेषत: हरीण, रानडुक्कर, शेळय़ा, मेंढया, मोर या पिकाकडे फिरकत नाहीत. नैसर्गिक आपत्तीत जिरेनियमचे फारसे नुकसान होत नाही. काळजीपूर्वक उत्पन्न घेतल्यास जिरेनियमपासून चांगला फायदा होतो.

एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन ते चार वर्षे उत्पन्न देते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यात तीन फुटापर्यंत रोपांची वाढ होऊन त्याला फुले येऊ लागली की ते छाटणीसाठी तयार होतात. छाटणी करत असताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून रोप फुटवा लगेच धरेल. पहिला तोडा चार महिन्यानंतर निघतो. त्यानंतरचे तोडे अडीच ते तीन महिन्यांमध्ये तयार होतात. वर्षांला सर्वसाधारणपणे चार तोडे होऊ शकतात.गलांडे यांनी केवळ जिरेनियम लागवड करून न थांबता त्यांनी जिरेनियमची रोप निर्मितीही सुरू केली आहे. एका रोपाची किंमत पाच रुपये असून एक एकर लागवडीसाठी आठ हजार रोपांची गरज भासते. मागणीनुसार रोप निर्मिती ते स्वत: करतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांचा माल घेऊन तेल उत्पादनही करतात. यासाठी तेल प्रकल्प स्वत: उभारला आहे.

जिरेनियम तेलाचा उपयोग
सुगंधित जिरेनियम तेल हे उच्च दर्जाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक असल्याने या उद्योगांमध्ये जिरेनियम तेलाचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. थोडक्यात तेलापासून अनेक सुगंधित पदार्थ जसे की टॅल्कम पावडर, शाम्पू, अगरबत्ती, साबण, फेस वॉश क्रीम अशा वस्तू बनवल्या जातात. जिरेनियमचा पारंपरिक आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. जसे की रक्तस्त्राव, जखमा, अल्सर आणि त्वचा विकार यांच्या उपचारासाठी वापर केला जातो.
digambar.shinde@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Geranium farming farmers direct sales to producers production central medicine amy

Next Story
काँग्रेसचे हुश..
फोटो गॅलरी