आज ज्ञानवापी, उद्या आणखी काही, असं किती काळ? ‘र्सव खल्विदं ब्रह्म:’ हा आपला खरा धर्म घेऊन आपण पुढे जाणार की नाही?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजा देसाई

मध्ययुगीन परकीय मुस्लीम राजवटींनी मागे ठेवलेला एक दुर्दैवी वारसा म्हणजे अनेक मंदिर-मशिदींचे वाद. ज्ञानवापी (ज्ञान-विहीर) हा त्यापैकीच एक. १९९१ चा कायदा व न्यायिक प्रकिया, इतिहासाविषयी मतमतांतरे, राजकीय रणकंदने इत्यादी होत राहतीलच. पण हिंदु-मुस्लीम समाजात अशा संबंधातही संवादाचा संपूर्ण अभाव ही सर्वात वाईट गोष्ट. त्यामुळे असे सर्व वाद केवळ मतं हाच ईश्वर असलेल्या धर्मी-निधर्मी राजकारणाच्या हातात जातात. समाजाचं धर्म व सामाजिक सौहार्द या अंगानं प्रबोधन होत नाही.

आज देशाचं राजकीय, सामाजिक आकाश कमालीच्या वैर-द्वेषभावनेनं काळोखून गेलं आहे. कोणत्याही सांस्कृतिक समूहाला आपापल्या धर्म-परंपरेनुसार जीवन व्यतीत करण्याचं स्वातंत्र्य असणं हा भारतीय संस्कृतीचा एक पायाभूत विचार आहे आणि राष्ट्रीय ऐक्याचाही. परंपरेने येणारं सांस्कृतिक वेगळेपण म्हणजे राष्ट्रविरोध मानला जाता कामा नये. आपापल्या परंपरांना (त्या कालबाह्य़ झाल्या तरीही) बराच काळ चिकटून राहाणं हा मानवी स्वभाव आहे. त्याला प्रत्येक वेळी राष्ट्रविरोध मानणं हे अन्यायाचं आहे. ही भारताची जीवनदृष्टी नाही.  

मात्र त्याचबरोबर मुस्लिमांनीही अनेक गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. १५०० वर्षांपूर्वीच्या अरब समाजस्थितीतील सांस्कृतिक प्रथा म्हणजेच धर्म व म्हणून त्या सोडता येणार नाहीत, ही मानसिकता त्यांचंच गंभीर नुकसान करत आहे. धार्मिक बाबींमुळे ते जगात अनेक ठिकाणी स्वत:ला संघर्षग्रस्त ठेवत आहेत याचं भान त्यांना आहे का? तिहेरी तलाक, बहुपत्निकत्व, ‘इसिस’सारख्या संघटनांकडून केली जाणारी हिंसक कृत्ये यांचा इस्लामच्या प्रतिमेवर काय परिणाम होत आहे?

असो. मध्ययुगीन मुस्लीम राजवटीचे परिणाम व रक्तरंजित फाळणी यामुळे अलगतावादाच्या भीतीपोटी बहुविधता नाकारणाऱ्या एकजिनसी राष्ट्रवादाचं व बाहुबली धर्माचं आकर्षण वाटणं हे मानवी स्वभावाला धरून असू शकतं, पण ते धर्म आणि राष्ट्र दोन्हींसाठी धोक्याचंच ठरेल. काही दिवसापूर्वीच सरसंघचालकांनी (बहुधा प्रथमच) ‘हिंदुराष्ट्र’ घोषणेला स्वामी विवेकानंद व योगी अरिवद यांचीही नावं जोडली. ते एकजिनसी सांस्कृतिक राष्ट्रवादाविषयी काय म्हणतात?

‘इतिहासकाळात टोकाच्या एकजिनसीपणाची दृष्टी ठेवून धर्म वाढवला वा परंपरा लादल्या, त्या भूमीत धर्म एक असूनही आज अनेक राष्ट्रे दिसतात’ हे स्वामीजींचे शब्द विचार करायला लावणारे आहेत. रूढार्थाने भारताला राजकीय ऐक्य असं अलीकडेपर्यंत नव्हतं असंच म्हटलं जातं. मग कुणी केलं एवढय़ा मोठय़ा काळात हिंदु धर्माचं रक्षण?  आणि तरीही (फाळणीनंतर का होईना पण) प्रचंड विविधतेने नटलेला भारत नावाचा प्रचंड मोठा भूभाग एक राष्ट्र म्हणून जगात आज ताठ मानेने उभा का आहे? याचं उत्तर आहे स्वामीजींच्या दोन शब्दांत : ‘भारताच्या आध्यात्मिकतेत!’ ‘र्सव खल्विदं ब्रह्म:’ सारं व्यक्त अस्तित्व हे एकाच अविनाशी तत्त्वाची अभिव्यक्ती आहे व म्हणून सर्वाप्रति बंधुभाव, एकात्मभाव हाच भारताचा धर्म.

स्वामीजी म्हणतात- ‘हिंदु माणूस अध्यात्मप्रवण (संपूर्ण सृष्टीचं एकत्व स्वीकारणारा) आहे म्हणून भारत आजही टिकून आहे. तलवारी आणि बंदुका यांनी सज्ज होऊन आलेले धर्म आमच्या जीवनकेंद्राला धक्का लावू शकले नाहीत. योगी अरविंद काय म्हणतात पहा: ‘वेदोत्तर युगात ग्रीस, रोमप्रमाणेच भारतातही बुद्धीचा मोठा पराक्रम झाला, पण भारताची शोधक बुद्धी आध्यात्मिक प्रेरणेने माणसाच्या अंतर्जीवनातील रहस्यशोधाकडे अधिक ओढली गेली. आत्मिक अनुभव ही स्वच्छ तार्किक बुद्धीहून श्रेष्ठ वस्तू आहे. आत्मिक अनुभवाचा प्रकाश अधिक विश्वसनीय मार्गदर्शक आहे. म्हणून भारतीय संस्कृतीचा पाया हा नेहमीच त्याची आध्यात्मिक सत्ये हाच राहिला आहे. लौकिक विचार-आचार त्या अंतिम साध्याकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. मूर्तिभंजकता, विरोध या संकल्पनाही भारताला शिवल्या नाहीत. वेदान्ताला अविनाशी आत्म्याच्या  विचाराचा  व बंधुभावाचा बळकट पाया आहे. भारताला अंतिम स्वप्न पडले ते पृथ्वीवरील मानवी जीवनात उच्चतम व्यापकता, आध्यात्मिकता भरण्याचे व त्याचसाठी भारतीय सभ्यता जन्मली आहे, टिकली आहे. भारताला सर्व राष्ट्रांहून अधिक दुर्दैव जरूर भोगावं लागलं. पण तरीही भारत, त्याची संस्कृती-सभ्यता, त्याचा मौलिक जीवनविचार टिकून का आहेत ? त्याचं उत्तर स्पष्ट आहे: आत्मशक्तीच्या चिरंतन सत्याच्या प्रभावामुळे आणि साधनेमुळे!  आपल्यात दोष भरपूर आहेत. कोणत्याही संस्कृतीत आदर्श आणि व्यवहार यात प्रंचड दरी राहातेच, पण इतर संस्कृतींना दोष-शिव्याशाप देऊन उन्मतपणाने व असहिष्णुतेने इतर संस्कृतींना धिक्कारार्ह म्हटल्याने आपली प्रगती होणार नाही, हे नीट लक्षात घेऊ या.’

संस्कृती आणि राष्ट्रं उभी राहायला शेकडो वर्ष का लागतात व ती कोणत्या आधारावर उभी राहू शकतात हे जाणण्यासाठी अरिवदांच्या वरील मांडणीचा सखोल विचार करणं आजच्या भारतासाठी विशेष गरजेचं आहे.  अरिवद म्हणतात- ‘युरोप आणि भारत यांतील साम्याला मर्यादा आहेत. युरोपातील लोक राष्ट्रे आहेत, त्यांची सामूहिक व्यक्तिता एकमेकांपासून भिन्न आहे. ख्रिस्ती धर्मामुळे निर्माण झालेली त्यांच्यातील आध्यात्मिक एकता, युरोपीय सभ्यतेतून आलेली एकता ही भारताच्या प्राचीन आध्यात्मिक- सांस्कृतिक एकतेइतकी पूर्ण व सत्य नव्हती. युरोपीय जीवनाचा पाया राजकीय व आर्थिक जीवन हा होता. त्यातील राष्ट्रे सतत लढत राहिली. (आता परिस्थिती बदलत आहे.) भारतातील लोक एका आध्यात्मिक- सांस्कृतिक राष्ट्राचे उपराष्ट्रभूत भाग होते. अनेक भेदांसहित भारत आज टिकून आहे याचे कारण त्याचे आध्यात्मिक वैशिष्टय़ हेच होय. जगाच्या इतिहासात जिथे केवळ राजकीय बाह्य सांस्कृतिक एकता लादली गेली तिथे राष्ट्रीय ऐक्याला पोषक सांस्कृतिक एकता निर्माण झाली नाही. उलट भारतातील असंख्य परकीय आक्रमणं मात्र भारताचा सांस्कृतिक ऐक्याचा आत्मा नष्ट  करू शकली नाहीत. आता आधुनिक काळानुसार शक्य तेवढं लोकसमूहांचं स्वतंत्र जीवन नाहीसं होता कामा नये हे भारताचं सूत्र राहिलं व म्हणून भारतीय मन कडक केंद्रीय सत्ता नाकारत राहिलं.’  सत्तेचं केंद्रीकरण झालं तेव्हा तेव्हा भारताचं सामाजिक-सांस्कृतिक वातावरण तणावग्रस्त झाल्याचं ताजा इतिहास व वर्तमान दाखवतं.   

‘बाबरी’ने देशाच्या राजकारणाची केलेली गंभीर उलथापालथ लक्षात ठेवून भारताच्या वरील जीवनदृष्टीच्या आधारे आपण कोणत्याही मंदिर-मशीद वादाकडे कसं पाहू शकतो? संवादासाठी सर्वप्रथम संघर्षग्रस्त समूहांच्या मानसिकता नीट समजावून घेतल्या पाहिजेत व नंतर कोणालाही शिव्याशाप न देता त्यांना त्यातून हळुवारपणे बाहेर काढलं पाहिजे. (मुस्लीम मानसिकतेविषयी मी काही सांगू शकत नाही, पण) हिंदुच्या मानसिकतेचा प्रमुख आधार मध्ययुगीन मुस्लीम आक्रमकांनी त्यांच्या धर्मभावनेवर तीव्र आघात करणारी मंदिर तोडफोडीसहित केलेली अनेक कृत्ये हा दिसतो. अकराव्या शतकापासून त्या त्या राजवटीतील घटनांचा इतिहास अधिकृतपणे लिहिणारे अबू नस्र उतबी, निझामी, बरानी, मिन्हाज सिराज, अल्बेरूनी, फरिश्ता, मीर ख्वांद, निमातुल्ला, अबदुल्ला यांसारखे मुस्लीम बखरकार तसेच फिरूज व महम्मद तुघलक, तैमूरलेन इत्यादींच्या आत्मचरित्रांतून अशा घटनांच्या स्पष्ट नोंदी आहेत. अशा असंख्य मंदिरांत सर्वज्ञात सोमनाथबरोबरच वाराणसी, मथुरा, पुरी, उज्जैनी, चिदम्बरम येथील मंदिरांचाही समावेश आहे. मूर्तीचे तुकडे करून जाणीवपूर्वक मशिदींच्या पायऱ्यांत घातल्याचेही स्पष्ट उल्लेख त्यात आहेत! वास्तविक या घटनांचा संबंध भारतीय मुसलमानांशी नाही. मात्र धार्मिक भावनेपोटी हे सारं केवळ स्वीकारण्याचीसुद्धा भारतीय मुस्लीम मानसिकता नाही, अशी तीव्र हिंदु भावना आहे, त्याचा गंभीर परिणाम हिंदु मानसिकतेवर होतो. जगाचा इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे.

५३७ साली बांधलेल्या इस्तंबुलच्या हागिया सोफिया या ईस्टर्न आर्थोडॉक्स चर्चची ९०० वर्षांनी १४५३ मध्ये ऑटोमन सुलतानी राजवट आल्यावर मशीद बनविण्यात आली. १९३५ मध्ये तुर्कस्तानातील सेक्युलर गणराज्याने (केमाल पाशा) त्या मशिदीचं रूपांतर वस्तुसंग्रहालयात केलं. पण ८० वर्षांनी एर्डागॉन यांच्या मवाळ इस्लामी राजवटीनं २०२० साली पुन्हा त्याची मशीद बनवली. ११ व्या शतकाअखेर जेरुसलेम केवळ मुसलमानी राजवटीच्या ताब्यात गेल्यामुळे  संपूर्ण ख्रिश्चन युरोपमध्ये हाहाकार उडाला. त्यानंतरच्या दोनएकशे वर्षांत त्यासाठी नऊ धर्मयुद्धं झाली. १२०४ साली चौथ्या धर्मयुद्धावेळी पश्चिम युरोपच्या रोमन कॅथॉलिक सैन्यानं इस्तंबुलवरच (राजा – प्रजा ईस्टर्न आर्थोडॉक्स ख्रिश्चन असलेल्या बायझंटाइन साम्राज्याची राजधानी) हल्ला करून लुटालूट व कत्तली केल्या. २००४ साली पोप जॉन पॉल म्हणाले, ‘स्वधर्मीयांच्याच या कृत्याबद्दल आज ८०० वर्षांनीही धिक्काराच्या भावनेनं आम्ही दु:खी आहोत!’ अशी असते माणसाच्या  धर्मभावनेची तीव्रता. मानवी मनाचं हे वास्तव नाकारून आपल्यालाही पुढे जाता येईल का?

 सुप्रसिद्ध संस्कृती अभ्यासक विल डय़ूरंट म्हणतात ‘..निथग, सेव्ह ब्रेड, इज सो प्रेशियस टू मॅनकाइंड अ‍ॅज इट्स रिलिजियस बिलिफ्स.. देअरफोर हिज डीपेस्ट हेट्रेड ग्रीट्स दोज हू चॅलेंज  हिज लाइव्हलीहूड अ‍ॅण्ड क्रीड.’ १९६० साली दिल्ली येथील आपल्या भाषणात इतिहास व संस्कृतीचे दुसरे एक भाष्यकार अ‍ॅरनॉल्ड टॉयन्बी म्हणाले, ‘औरंगजेबाने भारतीयांच्या मानखंडनेच्या हेतूने बांधलेल्या मथुरा येथील दोन व वाराणसीची एक अशा मशिदी माझ्या डोळय़ासमोर येतात व त्यांना हात न लावल्याबद्दल भारत कौतुकास पात्र आहे. त्या मशिदी भारताच्या अवहेलनेपेक्षा औरंगजेबच्याच बदनामीची स्मारकं बनून राहतात!’

असो. पुढे काय? ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ हा खरा धर्म-मार्ग. दोन्ही समूहांनी आपापल्या खांद्यावरची इतिहासाची ओझी उतरवून खाली ठेवावीत. हे अशक्य नाही! साक्षीपुरावे, कोर्टबाजी नको, पक्षपाती राजकारणही नको. संवाद करू या, हळूहळू मानसिकता बदलून वाद विरून जातील. एकत्वाचा खरा धर्म दृढ होईल. त्यातूनच होणाऱ्या अंत:करणाच्या विकासातच धर्म दडलेला आहे.

rajadesai13@yahoo.com   

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi gyan sagar religion medieval foreign muslim dynasties temple mosques argument ysh
First published on: 26-05-2022 at 00:02 IST