प्रतापभानु मेहता

शाळा-महाविद्यालयांतील काही दशकांपूर्वीची इतिहासाची पाठय़पुस्तके, शिक्षक, तेव्हाच्या चर्चा यांची मजाच वाटते आता. पण यापुढल्या चर्चा कशा असतील? अस्मितावर्धनाच्या काळात ‘इतिहासाच्या अभ्यासा’चं भवितव्य काय असेल?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

इतिहासावरून आज रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद सुरू आहेत हे खरे, पण हा लेख त्यापैकी एखाद्या वादाबद्दल नाही. वाचकांनी जरा आठवून पाहावे की शाळेत आपण इतिहास कसा शिकलो. स्वत:च्या भूतकाळाशी अगदी प्रामाणिक राहून विचार करा : अनेकांचा आवडता विषय असेल इतिहास! पुस्तकातल्या त्या इतिहासामधून काही नैतिक किंवा राजकीय अर्थ काढायचा आहे, त्यातून आजच्या हालचालींसाठी एक कथानक रचायचे आहे किंवा कुणाचा द्वेष करण्यासाठी इतिहास उपयोगी पाडवून घ्यायचा आहे, अशी काही सक्ती त्या काळात कुणाहीवर नव्हती.

थोडक्यात, इतिहासाच्या शाळा-महाविद्यालयीन अभ्यासाचा वापर ‘आपण आणि ते’ या प्रकारे होत नसे. बाजू घेणारे नव्हतेच असे नव्हे, पण अकबर आणि महाराणा प्रताप या दोघांची बाजू एकाच व्यक्तीने घेणे तेव्हा शक्य होते. औरंगजेब धर्माधच, हे साऱ्यांना मान्य होते पण त्या धर्माधतेचा उल्लेख मी जिथे वाढलो त्या जयपूर- जोधपूर या शहरांत तरी, आवाज न चढवता होत असे. केवळ या दोन शहरांतल्याच नव्हे तर अन्यही कैक जणांनी औरंगजेबाच्या राज्यात विविध पदे भूषवली, त्यांच्यापर्यंत ती धर्माधता पोहोचली असती तर आज मानसिंह आणि जसवंतसिंह ही नावे अभिमानाने घेता आली असती का?

युद्धाची तात्कालिक कारणे, तहाची कलमे वगैरे शिकवली जात. पण वर्गात म्हणा किंवा वर्गाबाहेरही कधीमधी, पुस्तकी इतिहासातल्या कुठल्या-कुठल्या घटनांमागच्या हेतूंविषयी नैतिक प्रश्नांची चर्चा व्हायची. अर्थात काही शे वर्षांपूर्वीचा हेतू नेमका काय होता हे या काळात समजणे कठीणच.. विचार करा ना- ‘बाबरी मशीद’ नामक ढांच्याचे उद्ध्वस्तीकरण राजकीय हेतूसाठी झाले की धार्मिक हेतूसाठी, याचे तरी उत्तर एकच एक असेल का? आणि अशा उत्तरावर त्या कृतीचा नैतिक दर्जा आपण ठरवणार का? स्वत:ची सत्ता दाखवून देण्यासाठीच हे सारे केले गेले, हे तर उघड आहे. पण अशी सत्ता दाखवून देणे गरजेचे का ठरावे? आमचे एक शिक्षक होते इतिहासाचे, ते फारच परखड. ‘धन आणि खजिन्यासाठी मंदिरांची लूट झाली- मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली’ हे त्यांना खपतच नसे.. म्हणजे त्यांनाही ते नैतिकदृष्टय़ा चुकीचेच वाटत असे, पण ते का? तर म्हणे, ‘परधर्माच्या पवित्र स्थळांची नासाडी केवळ पैसाअडका हवा यासारख्या क्षुद्र कारणासाठी करणे हेच तुमच्या हिणकसपणाचे लक्षण ठरते’ .. एवढय़ावरच न थांबता हे शिक्षक म्हणत, ‘‘हां, जर तुम्हाला खरोखरच इतका जाज्वल्य धर्माभिमान आहे की दुसऱ्याचा धर्म चुकीचाच वाटतो आहे, तर एक वेळ करा नुकसान.. हे वागणे चुकीचे आहेच, पण ती फालतू कारणासाठी केलेली चूक नाही ठरत!’’ या असल्या प्रकारच्या चर्चा तेव्हा सहज होऊ शकत कारण त्यामागे तेव्हा कोणताच अस्मितावाद नव्हता आणि म्हणून हिंसेची किंवा अभिव्यक्तीवरल्या बंधनांची भीतीही नव्हती. शिवाय, गतकाळाविषयी चौकसपणे प्रश्न पडणे ठीक पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे नाही, त्याची घाई तर चालणारच नाही, याची समज तेव्हा होती.

इतिहासाचा माझा वैयक्तिक अभ्यास शाळा-महाविद्यालयीन वयातही वाढत गेला, याला एक ‘तात्कालिक कारण’ घडले. आम्हाला समाजसेवा हा विषय होता. मी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके वाचून दाखवण्याचे काम घेतले. त्या वेळी नवीन असणाऱ्या कॅसेट-टेपरेकॉर्डरच्या साह्याने हे काम होत असे. वेळ काढून घरीच पुस्तके वाचून एकेक ध्वनिफीत मी तयार करी व ती त्या मुलांकडे जाई. त्याच संस्थेसाठी मी सुट्टीतही हे काम करू लागलो आणि वरच्या वर्गाच्या मुलांसाठीही पुस्तके वाचू लागलो. हिंदीही वाचली, इंग्रजीही वाचली. तेव्हा मला जाणवले की, उत्तरेकडल्या राज्यांमधली इतिहासाची पाठय़पुस्तके कोणत्याच इयत्तेत चोल व राष्ट्रकूट राजांचा इतिहास विस्ताराने मांडत नाहीत. दुसरे असे की, तेव्हाच्या पाठय़पुस्तकांमध्ये सर्वच प्रकारच्या इतिहासकारांच्या म्हणण्याची गोळाबेरीज मांडली जात असे. म्हणजे जदुनाथ सरकार, इरफान हबीब, आर. सी. मजुमदार आणि रोमिला थापर यांना इतिहासकार म्हणून पडलेले प्रश्न एकमेकांपेक्षा निराळे असतील, त्यांची उत्तरे तर निरनिराळी दिसतातच, पण त्या साऱ्यांच्या म्हणण्याचे सार पाठय़पुस्तके देत. पुढे महाविद्यालयीन पातळीवरील पाठय़पुस्तकेच लिहिणारे एक व्ही. डी. महाजन म्हणून होते, त्यांच्या पुस्तकातही अशीच मांडणी दिसायची, म्हणजे उदाहरणार्थ गझनीच्या महंमदाने इतकी आगेकूच कशी काय केली हे सांगताना या पुस्तकात ‘पायदळाऐवजी घोडदळावर भर’ हेही कारण असायचे आणि पुढे सैन्याच्या या वेगाबरोबरच त्यांच्या शिस्तीचाही उल्लेख ‘इस्लामच्या धार्मिक बंधनामुळे दारू आदी व्यसनांपासून दूर राहणारे सैन्य’ असा असायचा. याद्याच असायच्या त्या. वस्तुनिष्ठ उत्तरांसाठी सोयीच्या. पण आता वाटते की, केवढे महत्त्वाचे होते हे सर्वंकष असणे.. त्यानेच तर विचारांनाही एक व्यापकता दिली.

अवघ्या काही दशकांपूर्वीची ती पाठय़पुस्तके आता ‘इतिहासजमा’ होतात की काय अशी स्थिती आहे, कारण आता ‘इतिहास’ हा साधा विषय राहिलेला नाही. इतिहासकारांपैकी काही ‘जुन्या खोडां’वर नेहरूवादी- डावे असे शिक्के मारून त्यांना बाजूला सारले जात आहे. विद्यापीठीय इतिहास-अभ्यासाच्या बाहेरसुद्धा हल्ली गांभीर्याने इतिहासलेखन होते आहे. याचा दोष विद्यापीठीय शिस्तीलाच द्यावा लागेल, कारण भारतीय इतिहास-अभ्यासाच्या पद्धतीची मजल या विद्यापीठीय अभ्यासपद्धतींमुळे मर्यादित झाली. बौद्धिक किंवा विचारपरंपरांचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास किंवा अगदी राज्यशास्त्रीय इतिहास अशा विविधांगी अभ्यासांचे गांभीर्य आणि त्यांची व्याप्ती या विद्यापीठीय कंपूंनी जाणलीच नाही म्हणून त्यांच्याकडून जी चूक (अभ्यासपद्धतीच्या मर्यादांवर अवधानच दिले नाही, अशा ‘अनवधानाने’) घडली, तिलाच आता ‘मुद्दाम हिंदूंकडे दुर्लक्ष केले’ – ‘हिंदूंची प्राचीन वैज्ञानिक प्रगती यांना दिसलीच नाही’ अशी लेबले लावून या विद्यापीठांना कंपू ठरवले जाते आहे. पण निर्भर्त्सना करायचीच, तर फक्त विद्यापीठांचीच का? जागोजागची इतिहास संशोधन मंडळे, कित्येक ठिकाणचे अभिलेख यांनाही विविधांगी अभ्यासाची संधी होती, तीही का दवडली गेली? एकंदर इतिहास-अभ्यासाचे क्षितिजच मर्यादित राहिले, हे खरे नाही काय?

अर्थात, आज ‘हाच तो दडवलेला इतिहास’ म्हणून जी काही आदळआपट सुरू आहे तिने हे इतिहास-अभ्यासाचे क्षितिज विस्तारेल वा इतिहासाच्या अभ्यासपद्धती पुढे जातील, सखोल होतील, याची शक्यता कमीच. कारण ‘दडवलेला इतिहास’ म्हणून जे काही बाहेर काढले जाते आहे ते  इतिहासाभ्यासाच्या पद्धती न वापरता केलेले स्मरण आहे. स्मृती, स्मरण आणि इतिहास यांतील फरक सांगताना पिएर नोरा म्हणतात की, ज्याविषयी ममत्व वा अभिमान आहे, त्याच्या उजळणुकीसाठी  हाती असणारी सारी तथ्ये वापरणे हा स्मृतिलेखनाचा प्रकार ठरतो, तर इतिहासलेखन परस्परविरोधी प्रश्नांना भिडून मग विश्लेषण करणारे, वण्र्यविषयाकडे टीकात्मकरीत्या पाहणारे असते. स्मृतिलेखन हे वाचक अथवा भोक्त्याचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठीच केले जाते, कारण अस्मिता-जागृती हेच स्मृतिलेखनाचे साध्य असते. अशा स्मृतिलेखनामुळे एखाद्या समाजाच्या चतु:सीमांचे आरेखनच जणू होत असते. स्मृतिलेखन हे एक प्रकारे बोधकथेसारखे सुगम, सुलभ असते. अभ्यासान्ती मांडला गेलेला इतिहास कधीही बोधकथेसारखा नसून, त्यामधील ज्ञानाला भिडण्याची जबाबदारी वाचक अथवा अन्य अभ्यासकांवर येते.

महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, औरंगजेब.. इतकेच कशाला, छत्रपती शिवाजी महाराजदेखील.. यांच्याबद्दल हल्लीच्या काळात जेव्हा केव्हा चर्चा होते, तेव्हा ती ‘इतिहासकारांच्या अभ्यासाचे आधार’ वगैरेंविषयीची नसतेच (वास्तविक इतिहासाच्या अभ्यासाविषयी अशी चर्चा आवश्यक असते), पण जी काही चर्चा होते ते स्मृतींवर आणि स्मृतिलेखनावरच आधारित असते, त्यामुळे तसल्या चर्चेचा उपयोग हा ‘म्हणजे तुम्ही औरंगजेबाच्या बाजूचे!!’ अशा चीत्कारांतून शत्रू-शोध घेण्याइतपतच प्रामुख्याने असतो. दुसरा उपयोग म्हणजे ‘आपले’- आपल्या बाजूचे- कोण, हे पडताळणे. ‘कोणता इतिहास खरा?’ यासारखे वाद यापूर्वी कधी झालेच नाहीत असे नव्हे, पण ते वाद किमान इतिहासाच्याच बद्दलचे होते, ते स्मृतींबद्दलचे नव्हते. अर्थात, हेही लक्षात ठेवू की स्मृतिलेखन आणि त्याआधारे होणाऱ्या चर्चादेखील उपकारक ठरत आल्या आहेतच. पण यापुढे अशा चर्चाना हिंसक वळण मिळण्याची शक्यता आहे, हेही नमूद करून ठेवले पाहिजे. 

@pbmehta

Story img Loader