अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबा –

 शरीराने दधीची होते

 बुद्धीने ज्ञानेश्वर होते.

 कार्याने अगस्त्य होते.

 विचाराने वेदान्ती होते.

 आचाराने कर्मयोगी होते.

 आणि सर्वतोपरी स्थितप्रज्ञ.

      – मु. द. छापेकर

(विनोबांच्या निर्वाणानंतर स्व. शिवाजीराव भावे यांना आलेल्या पत्रातून).

संतविचारांच्या उपासनेप्रमाणेच भारतीय संस्कृतीची आणि जगातील प्रमुख धर्माची ‘उपासना’ हा विनोबांच्या विचारसृष्टीचा विशेष आहे. उपासना मुद्दाम शब्द वापरला कारण एरवी अभ्यास म्हटले जाते. कुराण म्हणताना विनोबांच्या डोळय़ातून अश्रू वाहत असत असे सांगतात. अभ्यासकांच्या बाबतीत असे क्वचितच घडेल.

त्यांनी कुराण, बायबल, धम्मपद या प्रमुख धर्मग्रंथांचे सार काढले. समणसुत्त ही जैन धर्माची शिकवण एकवटणारा ‘समणसुत्त’ हा ग्रंथ त्यांनी मोठय़ा प्रयत्नाने सिद्ध केला. क्लिष्ट आध्यात्मिक संकल्पनांची खुबीने उकल केली.

एवढे सगळे करून झाल्यावर ‘अद्यापही खरी धर्मस्थापना व्हायची आहे’ असा निर्वाळा देऊन ते मोकळे झाले. कारण विज्ञानाच्या अधिष्ठानाशिवाय धर्माचे संपूर्ण आकलन होणार नाही, असे त्यांचे मत होते. आत्मज्ञान आणि विज्ञान यांचे परस्परावलंबन ही नव्या युगाची गरज आहे, याबद्दल ते नि:शंक होते. आणखी एक, नव्याने धर्म स्थापना करण्याची जबाबदारी महिलांनी घ्यावी असेही त्यांनी घोषित केले. आजवरचा धर्मविचार पुरुषकेंद्री दिसतो. स्त्रियांनी वैराग्याची कास धरली तर त्यांच्यातून सहजच शंकराचार्याचा उदय होईल, ही त्यांची क्रांतिकारक भूमिका होती. या हेतूने त्यांनी देशभरात सहा आश्रमांची स्थापना केली.

या सर्व पैलूंविषयी तपशीलवार जाणून घ्यायचे आहेच. तूर्तास फक्त प्रस्तावना. विनोबांची विचार- पद्धती समजून घेण्यासाठी ती आवश्यक आहे म्हणून.

ब्रह्मविद्येची उपासना करणारा तो ब्राह्मण अशी व्याख्या केली तर विनोबा पक्के ब्राह्मण होते. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, भागवत, स्मृतिग्रंथ, शंकरादि आचार्य, यांचा उपदेश त्यांनी आचरणात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांचा सारांश सर्वासाठी खुला केला. यासाठी सूत्र, वृत्ती, भाष्य आदि माध्यमांची त्यांनी यशस्वी हाताळणी केली.

त्यांनी हिंदूधर्माची व्याख्या केली. त्या व्याख्येप्रमाणे ते जगले. सामान्य हिंदूंचा  नामस्मरणावर मोठा भर असतो. विनोबाही त्याला अपवाद नव्हते. गांधीजींनी संपूर्णपणे जीवनाधार मानलेल्या राम नामाच्या वैचारिक अंगाला त्यांनी आणखी पुढे नेले. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर ‘राम-हरि’ या नामस्मरणावर त्यांचा श्वासोच्छ्वास चाले. आदि शंकराचार्याप्रमाणेच ‘गेयं गीता नामसहस्रं’ अशी त्यांची वृत्ती होती.

विष्णुसहस्रनामावर त्यांनी लिहिलेच तथापि जगातील सर्व धर्मातील चिंतन नामस्मरणासाठी कसे अनुकूल आहे हे त्यांनी यानिमित्ताने सांगितले.

तुम्हीही ‘राम-हरि’चे नामस्मरण करत जा असा उपदेश त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना केला. ते कसे करायचे याचे प्रात्यक्षिकही दिले. ऋषी, मुनी, शास्त्रकार, स्मृतिकार, योगी या परंपरेला विनोबांच्या विचार पद्धतीमधे मोठे स्थान दिसते. शिवाय तसे त्यांचे आयुष्यही होते.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideology of acharya vinoba bhave zws
First published on: 14-01-2022 at 01:00 IST