scorecardresearch

धर्मनिरपेक्ष ‘भारतीय’ हेच उत्तर

भारतीयता  आणि सामाजिक-आर्थिक शोषणासाठी निर्माण झालेले चातुर्वण्र्य या परस्परविरोधी गोष्टी आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

यशवंत मनोहर

भारतीयत्वात विवेकबुद्धीला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि लोकशाहीवरही विश्वास आहेच. देशासाठी चातुर्वण्र्याचे अवशेष विसरून भारतीय म्हणून जगण्यास प्रारंभ केला तर संविधानातील सर्वसमभावी ‘माणूसराष्ट्र’ जन्माला येऊ शकते..

सर्वाचे समान ऐहिक हितसंबंध प्रस्थापित करणारा सद्विवेक म्हणजे भारतीयत्व! भारतीयत्व ही सकलांच्या मानवी प्रतिष्ठेची उन्नयनशील प्रयोगशाळा आहे आणि ती सर्वच संकुचित आणि परद्वेषी धारणांच्या पूर्ण विरोधातच आहे. भारतीयता वैश्विक आहे आणि ती कोणत्याही वर्णात, धर्मात वा वर्गातही बसत नाही. सर्वमानवसमभावी माणुसकी हाच तिचा ध्यास आहे आणि कोणालाही दुय्यम मानण्याच्या ती सर्वथा विरोधात आहे. ही भारतीयता म्हणजे इ.पू. सात हजार वर्षांपासून भारतीय संविधानापर्यंत समृद्ध, सर्वोपकारक आणि अन्वर्थक होत आलेला मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आहे. या अर्थाने मी भारतीय आहे आणि म्हणूनच मी वैश्विकही आहे असे कोणीही भारतीय म्हणू शकतो. हा सतत सीमोल्लंघनस्वभावी मनाचाच मुद्दा आहे आणि तो पूर्ण विज्ञानशीलच आहे.

भारतीयता  आणि सामाजिक-आर्थिक शोषणासाठी निर्माण झालेले चातुर्वण्र्य या परस्परविरोधी गोष्टी आहेत. भारतीयता ही मूल्यव्यवस्था आहे आणि चातुर्वण्र्य ही अपमूल्यव्यवस्था आहे. त्या पूर्णत: परस्परविरोधीच आहेत. आजवरचा भारताचा इतिहास या दोन छावण्यांच्या संघर्षांचाच इतिहास आहे. चातुर्वण्र्य परंपरेत सभ्यतेला, समतेला, सलोख्याला, सौहार्दाला किंवा स्वातंत्र्याला स्वातंत्र्य नाही. या परंपरेत विषमतेला, तुच्छतेला, भेदभावाला, उतरंडीला आणि पारतंत्र्याला मात्र पूर्ण स्वातंत्र्य आहे.

चातुर्वण्र्य म्हणजे चिरंतनाचा परवाना मिळालेले विषमतासत्ताक आणि शोषणसत्ताक! ही ब्राह्मण वर्णाच्या वर्चस्वासाठीच निर्माण केलेली रचना आहे. कर्मविपाकाची खोटी तरतूद तिच्यामागे आहे. या रचनेला आदर्श मानणारे ती टिकविण्यासाठी आजही आटापिटा करतात. इसवी सनाच्या हजार वर्षांआधी वेदांमध्ये निर्माण केलेली वर्णव्यवस्था येथील मूळ गणसमूहांवर लादली जाऊ लागली. चातुर्वण्र्याच्या संस्कृतीला अनादी म्हणजे आरंभरहित म्हटले जाते. पण हे अनादीत्व इ.पू. हजार वर्षांपासूनच सुरू झाले. चातुर्वण्र्यसंस्कृतीचा आरंभ स्पष्ट आहे म्हणून तो अनादीही ठरत नाही आणि सनातनही ठरत नाही. ही रचना माणसांनीच निर्माण केली, पण कोणी शंका घेऊ नये म्हणून तिला अपौरुषेय म्हटले गेले. चातुर्वण्र्याने प्रथम समाजाच्या चार फाळण्या केल्या. जातींच्या रूपाने या चार फाळण्यांच्या लक्षावधी फाळण्या आणि पोटजातींच्या रूपाने या फाळण्यांच्याही असंख्य फाळण्या झाल्या. एकसंधतेच्या शत्रू म्हणून त्या आजही काम करतात.

वेदांपूर्वी किमान साडेसहा हजार वर्षे इथे मेहरगड, मेलुहा आणि सिंधू या संस्कृती होत्या. मूल्यदृष्टय़ा त्यांना श्रमणसंस्कृती म्हटले जाई. ही संस्कृती इहवादी, अनेक गणांची, समतावादी आणि मातृप्राधान्य जपणारी संस्कृती होती. भरत, शिव, ऋती असे अनेक गण या संस्कृतीत होते. सर्वाच्या सहमतीने त्यांचा कारभार चालत असे. हे गणतंत्र वा प्रजातंत्रच आपल्या संविधानातील लोकशाहीचा मूलाधार आहे.

यातल्या भरत या गणावरून त्या वेळी या भूमीला भारत हे नाव मिळाले. ही सर्व घटिते वेदांपेक्षाही वयस्करच आहेत. विश्व कितीही जुने असले तरी माणसाच्या विश्वाचा आरंभ तो विचार करू लागला तेव्हापासूनच झाला. विज्ञानाने याही घटिताचा काळ सांगितल्याने तेही अनादी वगैरे ठरत नाही. अनादी हे कवच चिकित्सातीत ठरण्यासाठी असते पण आदिसांख्य, लोकायत, बुद्ध या मार्गाने फुले-शाहू-आंबेडकरांपर्यंत आणि संविधानापर्यंत भारतीय ही संस्कृती चिकित्सेचीच राहिली आहे. चिकित्सा ही निर्दोषीकरणाचीच प्रक्रिया असते.

उच्चारसमस्येमुळे सिंधू या शब्दाला तुर्कानी इ.स. नवव्या शतकात हिंदू म्हटले, पण या बदलाने ‘सिंधू’ या शब्दातील मूल्याशय ‘हिंदू’ या शब्दातून वजा होत नाही. या मार्गे आलेल्या हिंदू या शब्दात श्रमणसंस्कृतीच नांदत होती. राजारामशास्त्री भागवत यांच्यासह अनेक संशोधकांनी हिंदू हा शब्द दहाव्या शतकात आल्याचे सांगितले आहे. ‘हिंदू हे नावसुद्धा परकीय आहे. मुस्लिमांनी आपली वेगळी ओळख दर्शविण्याच्या उद्देशाने स्थानिकांना हे नाव दिले. मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या कोणत्याही साहित्यकृतीत ते आढळत नाही,’ असे ‘जातीचे निर्मूलन’ या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. याचा अर्थ असा की हिंदू हा शब्द वेदांच्या नंतर साधारणत: दोन हजार वर्षांनी आणि मनुस्मृतीनंतर सुमारे हजार वर्षांनी निर्माण झाला आहे. इ.पू. सहा-सात हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या भारतीयत्वाला आणि सम्राट अशोकाच्या आणि बृहद्रथाच्या काळातील बौद्धमय भारताला शह देण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने आणि पुढे शंकराचार्यानी हिंदू हा शब्द चातुर्वण्र्याला जुंपला. इथे हिंदू (सिंधू) या शब्दातील मूळ आशय खोडून काढण्यासाठी हिंदू शब्दाचाच दुरुपयोग केला गेला. हा गणतंत्रवादी, इहवादी आणि समतावादी सुंदर भारतीयत्वाचाच अवमान होता. अपौरुषेयता आणि पावित्र्य या तर्कहीन युक्त्यांच्या मदतीने चातुर्वण्र्य चिरंतन करण्याचा उद्योग केला गेला.

चातुर्वण्र्य ही अतार्किक आणि मानवत्वाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारीच संकल्पना आहे. भारतीयत्वात विवेकबुद्धीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. किंबहुना या सद्विवेकालाच जीवन माना असे भारतीयत्वाचे कळकळीचे सांगणे आहे. वर्ण, जाती हे मनांच्या फाळणीकरणाचेच तंत्र आहे. भावनिक आणि वैचारिक एकसंधता आणि एकध्येयता हीच राष्ट्रबांधणीची सूत्रे आहेत. विरोधी हितसंबंधांचे आणि दंगलींचे राष्ट्र होत नाही. मालकसेवक संबंधाचे, परस्पर शत्रुत्वाचे आणि परस्परांना पाण्यात पाहणाऱ्या गटांचे राष्ट्र होत नाही. राष्ट्र निर्माण होण्यासाठी सौहार्दाचा पाया असावा लागतो. माणूसमयता आणि राष्ट्र या दोन्ही संकल्पना अविभाज्यच असतात.

चातुर्वण्र्याच्या विद्रूप आविष्काराला संस्कृती म्हणता येत नाही. मालकसेवक संबंधांना पवित्र आणि आदर्श मानणारे लोक सुसंस्कृत ठरूच शकत नाहीत. परकेपणाच्या, विद्वेषाच्या आणि दुष्टाव्याच्या भिंतींची संस्कृती होत नसते. सलोख्याच्या चिंध्यांना आणि माणसांच्या फाळण्या करणाऱ्या कारस्थानांना संस्कृती म्हणता येत नाही. माणसालाही आणि स्वत:लाही सतत अन्वर्थक आणि वर्धिष्णू करीत चालतो त्या सर्वहितमय मूल्यकोशालाच संस्कृती म्हणता येते. माणसाबरोबर स्वत:चे आणि स्वत:बरोबर माणसाचेही सतत निर्दोषीकरण करते त्या प्रक्रियेलाच संस्कृती म्हणता येते. मूठभरांच्या हितसंबंधासाठी इतर सर्वाना सेवक करून वेठीस धरण्याला संस्कृती म्हणता येत नाही. ती विकृती होते. मूठभरांच्या एकगठ्ठा वर्चस्वासाठी अख्खे जीवनच एका ठिकाणी गोठवण्याचा हा अमानवी प्रकार असतो. हा प्रकार स्वत:ला संस्कृती म्हणवून घेण्याची पात्रताच गमावून बसलेला असतो. अशा सर्व फाळण्यांच्या वास्तवात समाज, देश वा राष्ट्रही निर्माण होत नाही. मानवी प्रतिष्ठेचे म्हणजे मानवाधिकारांचे नियोजनपूर्वक दिवाळे काढणाऱ्या यंत्रणेला संस्कृती ही पदवी शोभत नाही. अशी पदवी देणे हे असत्याला सत्य, अनिष्टाला इष्ट, असभ्यतेला सभ्यता आणि द्वेषाला प्रेम म्हणण्यासारखे होईल पण हे होते त्या काळाला तमोयुगच म्हटले जाते.

श्रमणसंस्कृतीत वर्ण नव्हते. गण होते. ते लोकशाहीनिष्ठ होते. इथे आर्थिक सामाजिक शोषण नव्हते. सर्वसहमती हे गणचारित्र्य होते. हे गणजीवन जगणाऱ्या लोकांना बुद्ध ‘अरिय’ म्हणजे आर्य म्हणतो. हे लोक बुद्धाला श्रेष्ठ वाटत होते. या आर्यसंकल्पनेच्या विरोधात जाऊन वैदिकांनी चातुर्वण्र्य अपरिवर्तनीय मानणाऱ्यांना ‘आर्य’ म्हटले. इ.पू. तीन हजारांनंतर या दोन आर्यत्वांचा संघर्ष सुरू झाला. इहवाद आणि सहभाव हे एक आर्यत्व होते, तर दुसरे आर्यत्व चातुर्वण्र्य आणि मालकसेवकभाव हे होते. बाबासाहेबांनीही या दोन आर्यत्वांची नोंद घेतलेली आहे.

कोणता आदर्श जगाला सांगायचा? परस्पर शत्रूभावाचा, माणुसकीच्या विद्रूपीकरणाचा की सर्वाना सममूल्यता देणाऱ्या इहवादी भारतीयत्वाचा? यातला माणुसकीच्या विद्रूपीकरणाचा आदर्श भारतीयांना मान्य होणे शक्य नाही आणि सर्वसमभावी, धर्मनिरपेक्ष भारतीयता हा आदर्श चातुर्वण्र्याच्या लाभार्थ्यांना मान्य होणे शक्य नाही, अशी स्थिती आहे.

मालक-दास संबंधातून कोणतेही राष्ट्र संभवत नाही. मानवतेवरचे महाअरिष्ट मात्र संभवते. कारण मालकसेवक हा संबंध न्यायाची, सहिष्णुतेची, लोकशाहीची आणि सलोख्याची निर्मितीच बंद करून टाकतो. न स्त्री (न आदिवासी, न भटकेविमुक्त, न ओबीसी, न मुस्लीम, न जैन, न शीख, न बौद्ध) स्वातंत्र्यम् अर्हति ही शोषणयंत्रणेचीच रचना असते. ही सर्वव्यापी विद्रूपताच असते. चातुर्वण्र्याची परंपरा या विद्रूपतेलाच आपला आदर्श मानते. म्हणून त्यातील उच्चवर्णीय लोक श्रमणसंस्कृतीच्या गणशाहीला आणि १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याला त्यांचे पारतंत्र्य मानतात. धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि विज्ञाननिष्ठ मानवतावाद यांच्यामुळे त्यांच्या धुळीस मिळालेल्या उच्चत्वाची पुनर्निर्मिती करण्यासाठी ते संविधानसंस्कृतीला शत्रू मानतात.

या संघर्षांत इ.पू. सहा-सात हजार वर्षांपासून भारतीय गणतंत्राने आजवरही ‘लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून’ हा सर्वसहमतीचा विवेकी वसा कधी सोडला नाही. या ‘भारतीय’ला आजवर विरोध करणाऱ्या लोकांनीही आता तरी केवळ भारतीय म्हणून जगण्यास प्रारंभ केला तर भारतीय संविधानातील सर्वसमभावी ‘माणूसराष्ट्र’ जन्माला येऊ शकते. म्हणून मी या धर्मनिरपेक्ष ‘भारतीय’ संकल्पनेलाच सलोखा कसा असावा, तो कसा निर्माण करावा या प्रश्नांचे महाउत्तरही मानतो आणि सर्व समस्यांवरचे महाऔषधही मानतो. लेखक मराठीतील कवी व समीक्षक आहेत

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian constitution secular indian republic of india zws

ताज्या बातम्या