प्रदीप आपटेू pradeepapte1687@gmail.com

गार्सिया द ओर्ता हा युनानी, पर्शियन आणि मुख्यत: भारतीय उपखंडातील वैद्यकीय परंपरांचा अभ्यासक. त्याच्या ग्रंथात तो तेव्हाच्या वैद्यकांबद्दल काय म्हणतो?

पणजीमध्ये एक छोटे पण रेखीव सार्वजनिक उद्यान आहे. त्याचे नाव आहे ‘गार्सिआ द ओर्ता’ उद्यान. कोण हा गार्सिया द ओर्ता? स्पेनमधून पळून पोर्तुगालमधल्या कास्तेलो द व्हिद या गावात येऊन राहिलेल्या सधन ज्यू कुटुंबातला थोरला मुलगा. परिस्थिती आगीतून फुफाटय़ात अशीच होती. पाच वर्षांनंतर पोर्तुगालचा राजा मॅन्युएलने सगळ्यांना सामूहिकपणे बाप्तिस्मा देण्याचा ‘फतवा’ काढला. अशा धर्मातरित किरिस्तावांना नवख्रिस्ती (क्रिस्ताओस नोवोस) किंवा डुक्कर (मरानोस) असे संबोधले जायचे. सगळे मारून मुटकून ख्रिस्ती झालेले. ख्रिस्ती झाले तरी त्यांच्याबद्दलचा संशय आणि आकस धगधगताच असायचा. सालामान्का आणि अल-काला द एनारेससारख्या विद्यापीठांमध्ये गार्सियाने कला, तत्त्वज्ञान आणि वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. कालांतराने लिस्बन विद्यापीठात दाखल झाला. तेथे त्याची प्राध्यापक म्हणून नेमणूक तर झालीच, पण विद्यापीठ नियामक मंडळामध्येदेखील त्याची नियुक्ती झाली.

त्याचदरम्यान मार्टिन आफोन्सो दसोसा हा त्याचा विश्वासू दोस्त आणि पाठीराखा बनला होता. या मार्टिन अफोन्सोची अगोदर हिंदी महासागर भागाचा कप्तान म्हणून आणि नंतर पोर्तुगीज आशियाचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. त्याचा वैद्यकीय काळजीवाहक म्हणून गार्सिया गोव्यात दाखल झाला. हे स्थलांतर दुहेरी हेतूने घडले होते. पोर्तुगालात जे मूळचे ज्यू त्याची छळणूक चौकशी करून हाल करण्याचे धोरणात्मक खूळ पसरत चालले होते. गोव्यामध्ये विश्वासू मालक अधिकारी आणि त्याच्या वैद्यकीय सेवेचे कवच यामुळे तो पोर्तुगालातून सटकला, परंतु त्याला येथील औषधी वानसे (वनस्पती) आणि वैद्यकशास्त्र याबद्दलदेखील मोठे औत्सुक्य आणि कुतूहल होते. त्याचा वापर कसा कधी केला जातो हे त्याला जाणून घ्यायचे होतेच. १५३४ साली सप्टेंबरमध्ये तो अफोन्सोबरोबर गोव्यात आला. त्याच्याबरोबरीने पश्चिम किनाऱ्यावर सिलोन ते काठियावाड या भागात अनेक मोहिमांत भाग घेतला, परंतु १५३८ अखेरीस अफोन्सोला पोर्तुगालला परत जावे लागले.

पण गार्सिया मात्र धूर्तपणे परत गेला नाही. गोव्यातच राहिला. त्याचा वैद्यकीय व्यवसाय तेजीत होताच. जोडीने तो ओळखीपाळखीच्या व्यापाऱ्यांबरोबर व्यापारी उद्योगही थोडाबहुत करून धनवान होत होता. दुसरीकडे अहमदनगरच्या निजामाशी त्याने संधान बांधले. निजामाचा अधिकृत वैद्यकीय सल्लागार बनला. त्यानिमित्ताने तेथले अनेक वैद्य आणि तबीब (पर्शियन आणि अरबी वैद्य) त्याचे परिचित सुहृद बनले. त्यांच्याकडून तो अनेक वनस्पती, त्यातला कोणता भाग औषधी उपयोगांचा, त्यांचे उपायी गुणावगुण, त्यांच्या मात्रा याची माहिती घेत राहिला. ही माहिती बरोबरीच्या वैद्य, तबिबांची रोग आणि रोगी हाताळण्याची शैली, ‘निदान ते उपचार’ यामधल्या रीती तो बरोबरीने निरखत शिकत राहिला. नवीन गव्हर्नर जनरल आले गेले. गासिआ द ओर्ताची ख्याती, प्राप्ती आणि ज्ञानार्जन जारीच राहिले. पोर्तुगालच्या साम्राज्याची केलेली त्याची सेवा आणि निष्ठा म्हणून त्याला पोर्तुगाल सरकारने खास पारितोषिक दिले! हे पारितोषिक म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात आलेली सात छोटी बेटे; त्यातले एक इनामदारीने आंदण दिले. या बेटांनाच आज आपण मुंबई म्हणून ओळखतो! ज्यू असल्याबद्दलच्या छळणुकी ससेमिऱ्यामुळे त्याच्या बहिणी, त्याच्या मुली यांना परागंदा होण्याची वेळ आलीच. पण स्वत: गार्सिया मात्र त्या छळापासून जिवंतपणी बचावला! बहुधा उच्च राजपदस्थांच्या मैत्रीकृपेमुळे! पण गार्सिया इतिहासात नोंदला गेला तो भारतीय आशियाई औषधी निदान आणि रोगनिवारण पद्धतीचा एक उत्सुक अध्ययनकर्ता म्हणून! त्या औत्सुक्याने नोंदलेल्या ज्ञानाचा त्याने प्रश्नोत्तर संवादरूपी ग्रंथ केला. गार्सिया आणि नव्यानेच गोव्यात दाखल झालेला एक नवखा डॉक्टर रुआनो यांच्यामध्ये झालेला काल्पनिक संवाद, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. (‘जुन्या काळी पोर्तुगीजमध्ये रस्त्यातील कुणाही सामान्य माणसाला रुआनो म्हटले जात असे,’- हे मार्कहॅमची तळटीप सांगते.) गार्सिया जवळपास ३७ वर्षे भारतात वैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करत होता. त्याचा जनसंपर्क फार वैविध्यपूर्ण होता. हिंदुस्तानातील माळवा, गुजरात, बंगाल, बालेघाट, मलबार या भागांतले राजे, राजकीय सरंजामदार, व्यापारी निरनिराळ्या व्यवसायातील मातब्बर लोक त्याच्या संपर्कात होते. तो मोठा चौकस आणि गुणग्राहक विद्यार्थी होता. वेगवेगळ्या दरबारांतील तबीबहकिमांशी, वैद्यांशी त्याने खुबीने दोस्ती केली होती.

मध्ययुगात युरोपातील वैद्यकशास्त्र निराळ्या संमिश्र धाटणीने घडले होते. हिप्पोक्रेटस, गेलन आणि इब्नसिना (युरोपीयांचा अविसेना!) यांच्या ग्रंथावरून वाचन करून शिक्षण घेतले जाई. या सगळ्याची व्यवहारी गोळाबेरीज म्हणून ‘रोग-भावांचे’ निदान धातुरसांच्या धर्तीने केले जायचे. रक्त/ कफ/ पित्त (लाल आणि पिवळे काळे पित्त) हे ते धातुरस! त्यांच्यामधले प्रमाण बिघडले म्हणून व्याधी तयार होते ही मूळ चिकित्सा करण्याची धारणा. बिघडलेला समतोल साधायला बस्तरी, मलशुद्धी, रेचक, वांत्या करायला लावणे, रक्तस्राव असे उपाय असायचे. त्याला चेव देणारी किंवा शमविणारी औषधी आणि वनस्पतीजन्य रस यांची चाटणे बनविली जायची. गोव्यात आणि मलबारमध्ये आल्यावर त्याच्या अनुभवाला निराळ्या रोगराई, व्याधी येऊ लागल्या. त्यांवर केले जाणारे उपचार, औषधे ही अगदी अपरिचित आणि निराळी होती. नगरच्या निजामाप्रमाणेच अन्य आसपासच्या दरबारी वैद्य, तबीब (पर्शियन आणि अरबी वैद्य) युनानी (ग्रीक) वैद्य यांच्याशी त्याने संपर्क राखला होता. तो ठिकठिकाणहून औषधे वनस्पती आणि अन्य वस्तू संबंधित व्यापाऱ्यांकडून मागवून घेत असे. त्यातल्या काही पोर्तुगालमध्ये विक्री करून धाडत असे. त्याला फारसी, अरेबिक भाषा, त्यांमध्ये भाषांतरित झालेले अन्य भूभागांमधले वैद्यकग्रंथ यांचा चांगला परिचय होता. अरबी, ग्रीक आणि हिंदू तिन्ही परंपरांबद्दल त्याच्या ग्रंथात काही ना काही निरीक्षणे वा मतप्रदर्शन आहे. ताप उतरविणे, काबूत आणणे याबाबत मलबारींचे उपाय कसे निराळे आणि प्रभावी असतात याची चर्चा आहे. हिंदू (जेंटू) वैद्यांबदल तो म्हणतो ‘त्यांचे शारीरशास्त्र, अवयवांची जागा यांबद्दलचे ज्ञान फार तोकडे.. परंतु स्थानिक रोग/ आजार/ व्याधी यांबद्दलचे त्यांचे उपाय मोठे नामी आणि प्रभावी असतात. पोर्तुगीजांना हिंदुस्तानात आल्यावर जे आजार हमखास छळतात त्याचा बंदोबस्त यांच्याकरवी फार उत्तम आणि भरवशाने होतो.. ते रूढी, पूर्वानुभव यांवर अधिक भरवसा ठेवतात.’ परंतु वाढत्या ज्वराला काबूत ठेवण्याबाबत हिंदू वैद्यांची उपचार-रीत ग्रीकांपेक्षा फार प्रभावी आणि वरचढ आहे असा त्याचा अभिप्राय आहे. तो म्हणतो ‘जेव्हा आमच्या सौम्य उपायांचा परिणाम दिसत नाही तेव्हा रुग्णाला त्यांच्या किंवा मलबारीच्या औषधोपचारासाठी (आम्ही) धाडून देतो.’ त्याच्या संवादरूपी ग्रंथात त्याचे निरनिराळ्या उपचारपद्धती, त्यांची त्याला उमगलेली वैशिष्टय़े, बलस्थाने आणि वैगुण्ये यांविषयीचे मतप्रदर्शन आहे. विशेष म्हणजे ग्रीक वैद्यकीय शिकवण- त्यातले दोष, त्यातला कर्मठपणा, अनुभवाने वाढ किंवा बदल न करण्याची वृत्ती- यावरही जाता जाता ताशेरे ओढलेले आढळतात.

सर्वात नजरेत भरावा असा तपशील वनस्पतीविषयक आहे. किती तरी वनस्पती त्याला बिलकूल माहीत नव्हत्या. आयुर्वेद औषधींमध्ये आले या वनस्पतीचे महत्त्व सर्वज्ञात आहे. पण त्याच कुळातली गलांगल ऊर्फ कोळांजन याचेही वर्णन येते. आंबा हे त्याचे लाडके फळ होते. वेगवेगळ्या भागांतील आंब्यांचा आणि त्याच्या विशेष प्रकारांचा त्यात उल्लेख आढळतो. भांग आणि अफू या दोन्ही वनस्पतीविशेषांवर तर स्वतंत्र संवाद आहे. कारण या दोन्ही वस्तूंचा गाजावाजा आणि वापर होता. त्याचे सेवन किती प्रमाणात होते? किती करावे? त्याचे परिणाम काय होतात? याबद्दल तेव्हाही बरेच उलटसुलट प्रवाद असावेत. त्याची छाया या संवादात दिसते. ‘साप चावणे’ आणि त्यावरील उतारा हा त्या काळातील नित्याचा चिंताविषय होता. त्यावर उतारा समजल्या जाणाऱ्या ‘पाव द कोब्रास’वर एक स्वतंत्र प्रकरण आहे. सापाशी लढणारे मुंगूस आपले पाय आणि नखे कोण्या झाडावर चोळून घासतात या समजुतीचे वर्णन या प्रकरणात आहे. गार्सियाला अनेक वनस्पतींची निरनिराळ्या प्रदेशांत किंवा भागांत काय नावे आहेत याची खूप माहिती असे. उदाहरणार्थ मिरीबद्दलचे प्रकरण. त्या वेळी आता वापरली जाते तशी वनस्पती वर्णनाची आणि वर्गीकरणाची पद्धती नव्हती. त्यामुळे गार्सियाच्या वर्णनात तत्कालीन समज, गैरसमज आणि खऱ्याखोटय़ा साधम्र्याचे ठसे दिसतात. नवीन वर्गीकरणाची बव्हंशी खातरजमा केलेली अशी आवृत्ती १९१३ साली सर क्लेमेंटस् मार्कहॅम यांनी अनुवादित आणि संपादित करून प्रकाशित केली आहे. 

निरनिराळ्या वैद्यकीय परंपरांचे प्रत्यक्ष अनुभवाने परिशीलन करून, त्यांचा निघण्टुकोश करणारा गार्सिया हा अग्रणी युरोपीय वैद्यक. पण तरी, तो मरण पावल्यावर त्याचे पुरलेले शरीर काढून जाळले गेले.. कारण, ‘तो ज्यू होता’ हे लपविलेले सत्य उघडकीला आले! आणि ‘ज्यूंना जिवंत जाळले पाहिजे’ ही चौकशी- छळवादामधली निरपवाद शिक्षा होती. तशी मरणोत्तर का होईना त्यालाही झाली! त्याचे पुस्तक बराच काळ कुलूपबंद काळोखात राहिले! सुदैवाने हे खूळ नंतर निवळले आणि मुंबई बेटातल्या एका बेटाच्या विद्वान वैद्य-इनामदाराला पुन्हा उजळा मिळाला.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.