scorecardresearch

साम्ययोग : साम्य-शक्तीचे जागरण

आजवर स्त्रियांकडून कुटुंबाने आणि समाजाने जी अपेक्षा केली तशी यापुढे करता येणार नाही हे विनोबांनी आवर्जून सांगितले.

– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

श्रीदुर्गा-सप्तशती या ग्रंथातील दोन वचने फार प्रसिद्ध आहेत. या चराचर सृष्टीमध्ये ‘शक्ती रूपा’ने राहणाऱ्या देवीला नमस्कार असो हे पहिले. तर दुसरे वचन खुद्द देवीचेच आहे. या जगातील सर्व स्त्रिया माझीच रूपे आहेत.

गीतेतील सप्तशक्तींचे विनोबांनी केलेले विवेचन आपण पाहात आहोत. त्याच्याशी अनुकूल अशीच ही दोन वचने आहेत.

गीतेने कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा सात शक्ती स्त्री रूपात पाहिल्या. याचे कारण स्त्रियांमध्ये या शक्तींचे धारण करण्याची विशेष क्षमता असते. याखेरीज या शक्ती समाजाच्या निकोप वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या शक्ती नसतील तर मानवी समाजाचे, समग्र विकासाच्या दिशेने एक पाऊलही पडणार नाही. इथेच एक नेहमीचा पेच उभा राहतो.

स्त्रियांमध्ये विशेष क्षमता आहे या नावाखाली आपण त्यांच्यावर आणखी एक ओझे टाकणार का? खुद्द विनोबांनीच या प्रश्नाचे, दोन- तीन पातळय़ांवर, उत्तर दिले आहे. आई आणि घरातील स्त्रिया, गांधीजी आणि काँग्रेसमधील स्त्रिया, यांच्याशी आलेला संपर्क आणि स्वतंत्र चिंतन यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांची विनोबांना विशेष जाणीव होती.

आजवर स्त्रियांकडून कुटुंबाने आणि समाजाने जी अपेक्षा केली तशी यापुढे करता येणार नाही हे विनोबांनी आवर्जून सांगितले. परंतु तो काही त्यांचा विशेष नव्हे. स्त्रियांनी अहिंसाधिष्ठित समाज रचनेचा आग्रह धरावा. आत्मज्ञानाची कास धरत स्वतंत्र धर्मस्थापना करावी. अशी त्यांची वेगळी भूमिका आहे.

याबाबतीत विनोबा पारंपरिक बंधने मोडायला सांगतात पण अडाणी बंडखोरी सुचवत नाहीत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर स्त्रियांनी ‘पतनाच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरू नये.’

अत्याचार झुगारून द्यायचे, हिंसेला नकार द्यायचा आणि आत्मज्ञानाची कास धरत नवधर्माची म्हणजेच पर्यायाने नवीन समाजाची निर्मिती करायची, असा हा विचार आहे. तो प्रत्यक्षात आणायचा तर सप्तशक्तींचा वेगळय़ा मार्गाने आविष्कार होणे गरजेचे आहे.

स्त्रियांमध्ये या शक्तींचा विकास करण्याची क्षमता असेल तर सर्व समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारायला हवे. इथे गांधीजींच्या धीट भूमिकेचे स्मरण होते. ‘सर्व निर्णय भगिनी वर्गाने घ्यावेत आणि त्यांनी मागितला तरच बंधू वर्गाने सहभाग द्यावा.’ ही रचना सप्तशक्तींच्या वर्तमानातील आविष्कारालाही लागू आहे.

साम्ययोगाच्या दृष्टीने तर हा विचार अधिकच महत्त्वाचा आहे. या दर्शनाचा प्रवास व्यक्ती, कुटुंब आणि समाज असा होत ‘नर नारी बाळे अवघा नारायण,’ या भूमिकेवर येऊन थांबतो. या सर्व टप्प्यांवर स्त्रियांना आजपावेतो दुय्यम वागणूक मिळाली हे सत्य आहे. दहीहंडीच्या शेवटच्या थरासारखी त्यांची स्थिती असते. ओझे घ्यायचे आणि वर उपेक्षाही सहन करायची. विनोबा यातील कोणताच टप्पा नाकारत नाहीत किंवा गृहीतही धरत नाहीत. स्त्रियांना सर्व टप्प्यांवर समान अधिकार मिळावा यासाठी ते आग्रही भूमिका घेतात.

व्यवहार आणि अध्यात्म या उभय पातळय़ांवर सर्वाचा समान विकास झाला पाहिजे. अंतिमत: आत्मज्ञानाची कास धरत सर्वाना साम्यावस्थेप्रत जाता आले पाहिजे, अशी ही भूमिका आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave thoughts on women empowerment zws

ताज्या बातम्या