अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

विनोबांच्या विचारविश्वाला संत विचारांचा स्पर्श झाला आणि त्याचे रूप पालटले. वयाच्या १३व्या वर्षी त्यांच्या हाती ज्ञानेश्वरी आली आणि त्यांचा वैचारिक प्रवास वेगळय़ा रीतीने सुरू झाला.

loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
Ramdas Tadas
पेट्रोलपंप, शेती अन् फार्महाऊस… रामदास तडस यांची संपत्ती किती? जाणून घ्या…
issues of society
शब्द शिमगोत्सव
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

व्रतस्थता आणि अध्ययनशीलता रूक्ष भासणाऱ्या विनोबांनी ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरीचा सहवास काही सोडला नाही. गृहत्याग करून ते काशीक्षेत्री रवाना झाले. घर सोडले तरी ज्ञानेश्वरी जवळ होती. अगदी झोपतानासुद्धा असे. इतका त्यांना माउलींचा लळा होता.

‘माझ्यातील पत्थराला पाझर फोडला तो ज्ञानदेवांनी. ते काम आचार्य शंकर करू शकले नाहीत किंवा गांधीजीही.’ अशा आशयाचे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत.

धर्मसंस्थापक म्हणून ज्ञानेश्वर, प्रेमाची पराकाष्ठा म्हणून नामदेव, संपूर्ण परिवार भगवद्भक्त म्हणून सोयरा, चोखा, बंका, शांतिब्रह्म म्हणून एकनाथ (या एकनाथांची परंपरा त्यांनी तुकाराम, रामदास, न्या. रानडे आणि गांधीजी अशी जोडली होती), आईच्या स्थानी म्हणून तुकोबा आणि सगळे प्रापंचिक पाश तोडायला मदत झाली म्हणून रामदास, असा संत विचारांचा सहवास विनोबांना लाभला.

महाराष्ट्राचा मध्यमपदलोपी समास म्हणजे ‘ग्यानबा-तुकाराम’. महाराष्ट्राची ‘सरस्वती’ म्हणजे इंद्रायणी. धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी तर प्रेषित वा धर्मसंस्थापक म्हणजे ज्ञानदेव, अशी त्यांची भूमिका होती.

महाराष्ट्रातील संत पंचकांच्या वाङ्मयाचे ‘भजने’ या शीर्षकाखाली त्यांनी संपादन केले. त्यांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या. महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात विनोबांचे हे योगदान अनन्य साधारण आहे. यासाठी ज्ञानदेवांची भजने चिंतनिकेसह आणि एकनाथांच्या भजनांना असणारा प्रस्तावना खंड ही उदाहरणे जरूर पाहावीत.

श्रीमद्भगवद्गीतेमधे आलेल्या ‘तत्त्वदर्शी’ या कठीण शब्दासाठी त्यांनी ‘संत’ हा सोपा आणि नेमका शब्द वापरला आहे.

नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि

निवाडा देखिला संतीं या दोहींचा अशापरी

( गीताई – अ. २ श्लो. १६ )

असत् आणि सत् यांची पारख करणारा तो संत. ही व्याख्या त्यांना रामदासांकडून मिळाली.

त्यांचे संतांचे प्रेम कुठवर होते तर ‘माझी आई म्हणजे तुकाराम आणि वडील म्हणजे रामदास’ असे ते म्हणत. कारण काय तर दोघे अनुक्रमे ४२ आणि ७२ वर्षे जगले. संतप्रेमाची ही चरम सीमा झाली.

आपले कार्य वारीशी जोडले जावे असे त्यांना वाटे. काही काळ तसे घडले. आज वारीमध्ये गीताई प्रसाराचे कार्य होते. विनोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ऐन दिवाळीत सण सोडून पवनारवासी हरिनाम सप्ताह साजरा करतात. ब्रह्मविद्या मंदिरातील भगिनी संत साहित्याची उपासना करतात.

विनोबांचे तमाम साहित्य अपार प्रासादिक आणि सोपे भासते कारण ते संत वाङ्मयाला शरण आहे. त्यांच्या सर्वोच्च रचनांपैकी एक म्हणजे पंढरपूरला ते प्रथम गेले तेव्हा त्यांनी केलेले भाषण होय. ‘पांडुरंगाच्या चरणी’ या नावाने ते पुस्तिका रूपातही आहे. भक्तिभावाची कमाल असणारी ती वाणी आहे.

विनोबांनी देशपातळीवरील संतांचीही उपासना केली. त्यातून त्यांचे वैचारिक अधिष्ठान उंच आणि सखोल झाले.