विनोबांनी एक ‘स्मृती’ तयार केली. ती अवघ्या पाच श्लोकांची आहे. तिला त्यांनी नाव दिले ‘विनुस्मृति’. धर्मग्रंथांमधे सार आणि भाष्य असे दोन प्रकारचे ग्रंथ असतात. हे पाच श्लोक पहिल्या प्रकारात येतात. आदिशंकराचार्य ते संत माधवदेव असा या स्मृतीचा पैस आहे.

 यातील पाचव्या आणि शेवटच्या श्लोकात ‘स्नेहसाधनम्’ हा शब्द आहे. या एका शब्दात विनोबांनी संपूर्ण ख्रिश्चन धर्माची शिकवण सांगितली आहे. ख्रिस्ताचे चरित्र आणि त्याची शिकवण याबद्दल अपार आदर असला तरी आरंभी विनोबांचे या धर्माविषयी वेगळे मत होते. त्यांना धर्मातर मान्य नव्हते. सक्तीने झालेली धर्मातरे तर त्यांना पटणे शक्यच नव्हते. परिणामी भारतात झालेली धर्मातरे सत्तेच्या जोरावर झाली आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्याविषयी अप्रीती होती, असे विनोबांना वाटे. इंग्रज आणि ख्रिस्ती धर्म या दोहोंविषयी त्यांच्या मनात त्यामुळे अढी असावी. पुढे हे चित्र बदलत गेले. येशू आणि त्यांचा धर्म यांच्याविषयी अढी ते परमोच्च आदर असा त्यांचा वैचारिक प्रवास आढळतो.

भगवान येशूंचे ‘मी मानवपुत्र आहे,’ हे वचन विनोबांना आदरणीय वाटले. त्यातून येशू सर्व मानवांचे प्रतिनिधी आहेत, हा बोध त्यांनी घेतला.  ख्रिस्ताच्या शिकवणीत विनोबांनी ‘सर्मन ऑन दी माउंट’ला प्राधान्य देणे अगदी स्वाभाविक होते. त्यातील उपदेशाचे वर्णन करताना विनोबा म्हणतात, ‘‘येशूंनी दिलेला उपदेश ‘सरमन ऑन द माउंट’ (गिरी प्रवचने) मध्ये आहे. मानव सेवेचे प्रतिपादन त्याहून चांगल्या तऱ्हेने करणारा दुसरा ग्रंथ मी पाहिला नाही. आजकाल जो उठतो तो भक्तीबद्दल बोलतो. परंतु मनुष्य जी भक्ती करेल ती मानवसेवेच्या रूपाने प्रकट झाली पाहिजे, हा एक सशक्त विचार येशूंनी पुढे ठेवला. भक्तीला मानवसेवेचे रूप देण्याचे श्रेय येशूंचे आहे. मानव सेवाशास्त्राच्या दृष्टीने ‘सरमन ऑन द माउंट’ला मी पहिले स्थान देईन’’ ( सर्व धर्म प्रभूचे पाय).  ख्रिस्ताचा  स्वभाव, पांथिक आग्रहाला त्यांनी दिलेला नकार, त्यांचे ब्रह्मचर्य आदी गोष्टीही विनोबांनी आदरणीय आणि अनुकरणीय मानल्या.  गांधीजींनी केलेले कार्य ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार होत, असे त्यांनी नि:शंकपणे सांगितले. एवढेच नव्हे तर मलबारच्या ख्रिस्ती मंडळींनी, भूदानाचे कार्य हे ख्रिस्ताचे कार्य आहे, असे म्हटल्याची नोंदही ते करतात. विनोबांनी ‘स्नेहसाधनम्’चा उल्लेख पहिल्यांदा १९७१ मध्ये केला. तत्पूर्वीही त्यांचे कार्य स्नेहाधिष्ठितच होते. तथापि १९७० नंतर स्नेह आणि गुणदर्शन ही दोनच तत्त्वे स्वीकारली. आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर त्यांनी ‘स्नेह-साधना’ सर्वोच्च मानली.  ‘घराला दरवाजे असताना खिडकीमधून अथवा भिंतीमधून का शिरायचे?,’ असा सवाल ते करत. दोष म्हणजे भिंती किंवा खिडक्या आणि दार म्हणजे गुण. स्वत:सह इतरांचे फक्त गुण पाहायचे व सांगायचे आणि केवळ स्नेहाचाच वर्षांव करायचा, हे साध्य एरवीही खूप कठीण काम आहे. तथापि विनोबांनी मौन राहून ते साधले.

– अतुल सुलाखे

  jayjagat24 @gmail.com