|| रवींद्र माधव साठे

राष्ट्र म्हणजेच नेशन स्टेट ही संकल्पना आपण भारतीयांना दिली, तोपर्यंत भारत हा एक देश म्हणून अस्तित्वातच नव्हता, हे ब्रिटिशांचे म्हणणे अगदी विष्णूपुराणापासूनचे आधार घेऊन खोडून काढता येते.

इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. त्यांचे आक्रमण हे केवळ राजकीय नव्हते तर सर्वंकष सांस्कृतिक होते. त्यामुळे येथील समाजाच्या विचारविश्वावर व भावविश्वावर या आक्रमणाचा खोल परिणाम झाला. त्यातून येथील समाजाची एक भूमिका निर्माण झाली. परिणामत: राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रीयता, सामाजिक एकात्मता या मूल्यांबाबतही पाश्चात्त्य संकल्पनांच्या संदर्भचौकटीत विचार करण्याची विशिष्ट मानसिकता तयार झाली. इंग्रजांचे या देशात आगमन झाले आणि या संकल्पनांचा आधुनिक परिभाषेतील अवलंब सुरू झाला. या संकल्पनांचा भारतभूमीत विकसित झालेल्या सांस्कृतिक सत्त्वाशी संबंध नव्हता तरीही या संकल्पना आम्ही उचलल्या.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावातून आम्ही दोन संकल्पना प्रामुख्याने स्वीकारल्या. एक म्हणजे प्रादेशिकतेच्या आधारावरील इहवादी राष्ट्र-राज्य कल्पना (सेक्युलर नेशन स्टेट) व दुसरी म्हणजे या राष्ट्र-राज्य संकल्पनेला आधार देणारी या ठिकाणच्या संमिश्र संस्कृतीची कल्पना.

ब्रिटिश विद्वानांनी भारतीय राष्ट्रवादाविषयी जाणीवपूर्वक भ्रामक स्थिती उत्पन्न केली. पाश्चात्त्य चष्मा व तेथील राजकीय संरचना यांच्या आधारे भारतीय राष्ट्रवादाचे मूल्यांकन केले. त्यांच्या मतानुसार भारतात राष्ट्रवादाचा विचार व राष्ट्रीय भावना कधीही नव्हती. ब्रिटिश शासनाने या संकल्पनांची भारतीयांना देणगी दिली असा त्यांनी दावा व प्रचार केला.

जॉन मेलकाम, माऊन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन, जॉन ब्राईट, जेम्स टाड आदी ब्रिटिश इतिहासकार या प्रचारात अग्रणी होते. या सर्वांनी भारत हे राष्ट्र नसून तो अनेक राष्ट्रांचा समूह असल्याचा सिद्धांत मांडला. तर डब्लू. हण्टर या विद्वानाने भारत हे उदयास येणारे एक राष्ट्र आहे (नेशन इन द मेकिंग) असा आक्रमक प्रचार केला. या प्रचाराने आपल्याकडील काही विद्वान मंडळीही प्रभावित झाली. पं. नेहरूही यांस अपवाद नव्हते. 

आपल्याकडील काही लोक आजही असे मानतात की या देशात कधी राष्ट्रजीवनच नव्हते व इंग्रजांनी हा देश जिंकून घेतल्यावरच या देशात राष्ट्रजीवन निर्माण झाले. वस्तुत: भारतात हजारो वर्षांपासून एक राष्ट्रजीवन अस्तित्वात आहे. देशाच्या पुरातन साहित्यात याला आधारभूत अशी अनेक उदाहरणे सापडतात. उदाहरण द्यायचे झाले तर ‘विष्णुपुराणा’तील श्लोकाचे देता येईल.

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।

वर्ष तद् भारतं नाम भारती यत्र संतति: ।।

अतिप्राचीन काळी रचलेल्या या श्लोकावरून असा अर्थ होतो की समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या संपूर्ण भूखंडास ‘भारत’ आणि तेथील प्रजेला ‘भारती’ असे संबोधले जात असे. भारताच्या राष्ट्रीयतेबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण बाब नेहमी दृष्टीस पडते. संपूर्ण भारतवासी इकडील नद्या, पर्वत, वृक्ष यांना पवित्र मानतात, त्यांच्या प्रति श्रद्धा ठेवतात, पूजा करतात. येथील देवालये, कुंभमेळे, तीर्थक्षेत्रे ही एकात्म राष्ट्रीयतेची प्रतीके आहेत. इकडील नद्यांना प्राचीन काळापासून पवित्र मानले आहे. गंगा, सिंधू, नर्मदा नदीतीरांवर आपल्या महर्षींनी अनेक स्तोत्रे रचली आहेत. सकाळी स्नान करताना सर्व प्रमुख नद्यांचे स्मरण करण्याची प्रथा होती हे दर्शविणारा पुढील श्लोक.

गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती ।

नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्र्निंध कुरु।।

(स्नान करतेवेळी माझ्या स्नानाच्या जलात या सर्व नद्यांचे जल मिसळून माझे शरीर पवित्र होऊ दे.)

हा श्लोक दक्षिणेतील कावेरीपासून ते उत्तरेतील गंगेपर्यंतचे एक संपूर्ण राष्ट्राचे चित्र प्रस्तुत करतो.

भारताच्या प्राचीन साहित्यामध्ये राष्ट्रीय जीवनाची साक्ष देणारी यांसारखी अनेक उदाहरणे सापडतात. प्रो. व्ही.व्ही. जॉन हे एक शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत. ते राजस्थान विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्यही होते. ब्रिटिशांनी या देशात राष्ट्रीयतेचा उदय घडविला ही कल्पना पूर्णत: चुकीची आहे असे त्यांनी तार्किकदृष्ट्या मांडले. ब्रिटिशांना जर श्रेयच द्यायचे झाले तर त्यांनी राज्यकर्ते म्हणून आल्यानंतर इथे आणलेल्या प्रशासकीय एकतेबद्दल देता येईल, असे ते म्हणत. आपले राष्ट्रीय जीवन हे फार पुरातन आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारत प्रारंभापासून नेहमी एकच राहिला आहे.

‘बार्हस्पत्य शास्त्रा’त एक श्लोक आहे.

हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम् ।

तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।

(हिमालयापासून हिंदू महासागरापर्यंत पसरलेल्या देवनिर्मित देशाला ‘हिंदुस्थान’  म्हणतात.)

मातृभूमीबद्द्ल भावनिक ओढ हा राष्ट्रीयतेचा एक मूलभूत घटक. प्राचीन काळापासून आपल्या देशात ऋषी-मुनींना याचा साक्षात्कार झाला होता. ‘अथर्ववेदा’तील वैदिक ऋचेत त्याचे प्रमाण सापडते.

भद्रमिच्छन्त ऋषय: स्वर्विद: तपोदीक्षामुदासेदुरग्रे। ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मे देवा उपसन्नमन्तु।।

(लोककल्याणाच्या इच्छेने प्राचीन काळी ऋषींनी दीक्षापूर्वक तपश्चर्या केली. त्यातून राष्ट्र, बल आणि तेज निर्माण झाले. म्हणून या राष्ट्रदेवतेची आपण उपासना करू या. – अथर्ववेद)

आद्य शंकराचार्य केरळमध्ये जन्माला आले. परंतु त्यांनी भारतात चार दिशांना रामेश्वर, द्वारका, बद्रिनाथ, जगन्नाथपुरी ही चार पीठे स्थापन केली. दक्षिणेत जन्म घेऊन काश्मीरपासून आसामपर्यंत त्यांनी प्रवास केला कारण ते संपूर्ण देश एक मानत होते त्याचे हे द्योतक आहे. गुरू नानक देव पंजाबमधील, परंतु त्यांनीही देशास एक मानले. बाबरने जेव्हा या देशावर आक्रमण केले व अत्याचार केले तेव्हा त्यांनी बाबरविरुद्ध ईश्वरापुढे पुढील शब्दांत खंत व्यक्त केली,

‘‘खुरासान खसमान किया हिंदुस्थान डराएआ, आपे दोष ना देई कर्ता’’ (राग आसा, महल्ला-१, पृष्ठ ३६०). त्यांनी यात संपूर्ण हिंदुस्थानचा उल्लेख केला, पंजाबचा नव्हे. महाराष्ट्रातील संत नामदेव पंजाबमध्येही पोहोचले होते.

गुरू अर्जुनदेव, गुरू तेगबहादूर, गुरू गोविंद सिंह या सर्वांनी भारत एक राष्ट्र समजून विचार केला होता. अमृत सरोवर आणि दरबार साहेब यांच्या निर्माणानंतर गुरू अर्जुन म्हणाले होते की, ‘‘ईश्वराच्या कृपेमुळे हे कार्य पूर्ण झाले आहे. जो कोणी या अमृत सरोवरात स्नान करेल त्यांस हिंदुस्थानातील ६८ तीर्थस्थानांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल.’’ दरबार साहबमध्येसुद्धा त्यांनी चारही बाजूंस दरवाजे उघडे ठेवले होते. कारण त्यांची अशी इच्छा होती की चारही दिशांनी लोकांनी हरि मंदिरात यावे. गुरू गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. त्या वेळेस ‘पंज प्यारे’ आले ते लाहोर, मेरठ (हस्तीनापूर), जगन्नाथपुरी, द्वारका आणि कर्नाटकमधील बिदरमधून, कारण त्यांच्यासमोरही संपूर्ण भारत देश होता. श्रीमान शंकरदेव, माधवदेव आसाममध्ये झाले, परंतु त्यांच्या समोरही अखंड भारताचे चित्र होते. शंकरदेव लिहितात-

कोटि-कोटि जन्म अन्तरे जहार, आसे महापुण्य राशि । ही तू कदाचित मनुष्य होवय, कदाचित प्राणी भारतवरिले आसी ।

(कोटी-कोटी जन्मांनंतर ज्यांनी महापुण्य मिळवले आहे तोच प्राणी मनुष्य म्हणून भारतवर्षात जन्म घेत असतो.)

माधवदेव म्हणतात, धन्य-धन्य कलिकाल। धन्य तर तनु भाल । धन्य जन्म भारतवरिषे। (कलियुग धन्य आहे. त्यात मनुष्याचा जन्म धन्य आहे आणि त्यांत भारतवर्षात जन्म होणे हे सर्वाधिक धन्य आहे.)

अनेकदा काही लोक या देशातली भाषा, उपासना पद्धती, राहणी वगैरे बाबतीतली विविधता पाहून आजही असे म्हणतात की, भारतात अनेक राष्ट्रे आहेत, परंतु अगदी सामान्य बुद्धीचा माणूसही याची अनुभूती घेऊ शकतो की भाषा अनेक असल्या तरीही त्यांच्यातले भाव एक आहेत, त्यांचा आत्मा एक आहे. पंथ अनेक असले तरी त्यांचे उद्दिष्ट समान आहे, त्यासाठी आवश्यक गुणसंपदेचा विचार एक आहे. आसेतुहिमाचल ही एक कर्मभूमी आहे अशी भावना सहस्रावधी वर्षे जनमानसात एका सहज स्वाभाविक अनुभवाच्या रूपाने अस्तित्वात आहे. आपल्या संतांनी, महापुरुषांनी, विद्वानांनी साहित्य, तीर्थयात्रा, मेळे, प्रवचने, कीर्तने इत्यादी माध्यमांतून त्या अनुभूतीला सांस्कृतिक चेतनेचे रूप दिले आहे. आद्य शंकराचार्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार आदींनी या चेतनेस जागविले.

विन्सेंट स्मिथ हे एक ब्रिटिश इतिहासकार होते. त्यांचा भारताबद्दलचा गाढा अभ्यास होता आणि मुख्य म्हणजे ते आपल्या पुराव्यांशी अतिशय प्रामाणिक होते. त्यांनी आपल्या ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हटले आहे- ‘‘भारतात अनेक प्रकारची विविधता असली तरी इथे एक मौलिक एकात्मता आहे आणि भारतीयांनी अशी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती विकसित केली आहे आणि ती जगात अन्यत्र कोठेही सापडणार नाही.’’

वेदकाळापासून इथे एक एकात्म राष्ट्रजीवन सुरू आहे. मात्र त्यावर समुचित भारतीयांची निष्ठा असावयास हवी तर ते राष्ट्रीयतेस अधिक पोषक ठरेल.

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.

ravisathe64 @gmail. com