रवींद्र माधव साठे

राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोह या संकल्पना गेला काही काळ राष्ट्रीय चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. मुळात राष्ट्रही संकल्पना आपल्यालादेखील गेल्या शंभरेक वर्षांमध्ये परिचित झाली आहे. तिचा सरसकट वापर करताना आपल्याला तिची खोली खरोखरच नीट माहीत असते का? आपल्यात खरोखरच राष्ट्रभावना आहे का?

What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यंदा साजरे होत आहे. या निमित्ताने राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवादाचा सामाजिक आशय आदी विषयांची भारतासंदर्भात या स्तंभातून चर्चा घडवून आणताना मनापासून आनंद होत आहे. ‘राष्ट्र’ हा शब्द मानवी मनाच्या प्रेरणा व भावनांशी जोडला आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयता या मूलत: भावनात्मक संकल्पना आहेत. या संकल्पना व्यावहारिक पातळीवर गेल्या तीन-चारशे वर्षांपूर्वी उदयास आल्या. युरोपमध्ये याचा उगम झाला असे प्रचलित आहे. ‘राष्ट्र’ म्हणजे काय याच्या प्रा. होल कोम, बर्जेस, ब्लंटझुली, गेटेलसारख्या मान्यवरांनी व अनेक इतिहासकारांनी व्याख्या केल्या आहेत. या व्याख्यांमध्ये भिन्नता असली तरी विद्वान मंडळींचे यातील एका मुद्दय़ाबाबत एकमत आहे. ते असे की, राष्ट्र या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही मानवसमूहात एक आत्मीयतेची भावना नेहमी वास करीत असते. म्हणजेच त्या मानवसमूहातील लोक आपापसात एक प्रकारची आपुलकी अनुभवतात आणि त्याच वेळी दुसऱ्या मानवसमूहापासून आपण वेगळे आहोत, असे मानतात.

टोळीजीवनातून सुरुवात

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे आपले जीवन एकाकीपणे तो जगू शकत नाही. त्याला जीवन जगण्यासाठी एका सहकारी लोकसमूहाची आवश्यकता असते. तो अगदी प्राथमिक अवस्थेत होता, तेव्हा त्याला आपल्या संरक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी अगदी थोडय़ा लोकांच्या सहकार्याची गरज भासत होती. म्हणूनच एखाद्या छोटय़ाशा टोळीनेदेखील त्याची ती गरज भागत होती. तो त्या टोळीलाच आपले मोठे कुटुंब समजत असे. अशा टोळय़ांनी जेव्हा आपली भटकंती थांबवून एखाद्या विशिष्ट ठिकाणी स्थिरावून शेती करायला सुरुवात केली तेव्हा तेथील भूमीशी माणसाचे आपुलकीचे नाते जुळले. राष्ट्रीयत्वाच्या भावनेची तेव्हापासूनच बाल्यावस्था सुरू झाली असे स्थूलमानाने म्हणता येईल. कालांतराने जसजशी मानवी संस्कृती विकसित होत गेली तसतशा माणसाच्या गरजा वाढत गेल्या आणि त्या गरजांची पूर्ती करण्याकरिता आणखी मोठय़ा सहकारी समूहाची गरज भासू लागली. त्यांतून अनेक टोळया एकत्र आल्या. त्यांच्या आपापसांतल्या सहकार्यामुळे आत्मीयतेने जोडलेल्या आणखी मोठय़ा समूहाची निर्मिती झाली. संस्कृतीच्या विकासाबरोबरच शारीरिक गरजांप्रमाणेच बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक अशा गरजा भागवणारे लोकही त्या समूहाचे अनिवार्य घटक बनत गेले. युरोपमध्ये विकसित झालेल्या राष्ट्रभावनेचा विकास मात्र रोचक आहे.

ई.एम. कार हे एक प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार. त्यांच्या मते ‘‘आधुनिक युरोपात ‘राष्ट्र’ हा शब्द मध्ययुगोत्तर काळात प्रचलित झाला, जेव्हा मानवी स्वभावात मूळ (प्रिमिटिव्ह) भावना तसेच राजनैतिक संघटनांना खतपाणी घालण्यासंबंधीच्या आडाख्यांना मूर्त रूप आलेले होते.’’ (नॅशनलिझम, रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स, न्यूयॉर्क १९४५, पृष्ठ ७)

राष्ट्र संकल्पनेची निर्मिती

इंग्लंड देश स्वत:ला आधुनिक राष्ट्र संकल्पनेचा उद्गाता समजतो. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियनच्या युध्दानंतर ‘राष्ट्र’ ‘राष्ट्रवाद’ आदी विषयांचा प्रारंभ झाला असे काही विद्वानांचे मत. युरोपचा इतिहास बघितला तर राष्ट्रीय भावनेच्या संकल्पनेस मुख्यत्वे दुसऱ्या देशांशी युद्ध खेळताना अधिक बळ मिळाले. हन्टिग्टनच्या मताप्रमाणे युद्धे, राज्य तयार करतात आणि त्यातून राष्ट्रे निर्माण होतात. मायकेल हावर्ड म्हणतो की, ‘‘कोणतेही राष्ट्र खऱ्या अर्थाने युद्धाशिवाय निर्माण होऊ शकत नाही.’’ राष्ट्रीय भाषा, साहित्य, न्यायव्यवस्था, प्रतिनिधी सरकार, विदेशी व्यापार, युद्ध, शांती इ. तत्त्वांनी राष्ट्रीय भावनांना हळूहळू प्रोत्साहन दिले. पुढे औद्योगिक क्रांतीने यांस अधिक गती मिळाली.

रवींद्रनाथ ठाकूर यांनी विदेशात प्रवास केला त्यावेळी ‘राष्ट्र’ ही संकल्पना अन्य ठिकाणी कशी आहे, यावर भाष्य केले आहे. ते लिहितात, ‘पश्चिमेत ‘राष्ट्र’ या संकल्पनेचा झालेला विकास भारतापासून भिन्न आहे. प्राचीन काळी तिथे प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी माणसांचे कबिले संघर्ष  करत फिरत होते. कबिल्याची एक बोली भाषा विकसित झाली. कबिल्याचे नेतृत्व निर्माण झाले. या नेतृत्वाने आपल्या समूहाची राखण करण्यासाठी हळूहळू सेना तयार केली. शांती स्थापनेसाठी काही नियम, कायदे बनविण्यात आले. प्रशासन अस्तित्वात आले. अधिकाधिक लूट करता यावी म्हणून हे कबिले संघटित राहू लागले. अधिकाधिक शक्ती-अधिकाधिक लूट- अधिक उपभोग हे त्यांचे सूत्र राहिले. हे कबिले जिथे-जिथे स्थायिक झाले तिथे कालांतराने त्याची पृथक-पृथक राज्ये होत गेली. एक जात – एक भाषा – एक संप्रदाय हेच, त्यांचे राज्य आणि राष्ट्र यांचा आधार बनत गेले. त्यांची राष्ट्राच्या विकासाची ही कल्पना आहे. (‘‘इतिहास दर्पण’, भाग २, अंक २००८ ‘व्हिजन ऑफ हिस्ट्री’, पृष्ठ ९)

डॉ. आंबेडकरांनीही राष्ट्रभावना कशी निर्माण झाली, याचे संशोधनाच्या आधारावर आपल्या साहित्यातून विवेचन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘प्राचीन काळी शेतीचा शोध लागला नव्हता. त्यामुळे लोक टोळीने राहात होते. शिकार व पशुपालन हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. त्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या स्थानी त्यांना जावे लागत असे. त्यामुळे कोणत्याही एका भूप्रदेशासंबंधी लोकांना आत्मीयता नव्हती. फक्त स्वत:च्या टोळीविषयी (ट्रायबलिझमची) भावना होती. त्यानंतर शेतीचा शोध लागला. त्यामुळे एका जागी राहणे त्यांना क्रमप्राप्त झाले. ज्या ठिकाणी त्यांना राहावे लागले त्या भूमीविषयी प्रेम निर्माण झाले. त्यांतून प्रादेशिकता निर्माण झाली आणि अशा प्रकारे ट्रायबलिझम आणि प्रादेशिकत्व या दोहोंचा समन्वय होऊन राष्ट्रीयत्व निर्माण झाले. यासाठी त्यांनी उदाहरणेही दिली आहेत. ३०० वर्षांपूर्वी इंग्लंड आणि फ्रान्स देशांत जे राजे झाले, त्यांना प्रारंभी ‘किंग ऑफ इंग्लिश’, ‘किंग ऑफ फ्रेंच’ असे संबोधण्यात येई. पुढच्या काळात ‘किंग ऑफ इंग्लंड’ किंवा ‘किंग ऑफ फ्रान्स’ असे लोक म्हणू लागले. सध्याची तेथील राष्ट्र छोटी-छोटी आहेत आणि वयाने अगदी लहान आहेत. विशेष करून ती प्रतिक्रियात्मक भावनेतून उदयास आली आहेत. कुठे पोपविरुद्ध तर कुठे ऑस्ट्रियन किंवा फ्रेंच साम्राज्यवादाच्या विरोधात प्रतिक्रिया, अशा प्रकारे विरोधाच्या स्वरूपात तेथील राष्ट्रीयत्व निर्माण झाले आहे.’’

रेनेसाँची पार्श्वभूमी

वस्तुत: पाश्चिमात्य युरोपीय जगात या प्रकारची राष्ट्रवादाची प्रणाली विकसित होण्याला तेथील ऐतिहासिक परिस्थिती कारणीभूत झाली होती. आधुनिक युरोपचा इतिहास मध्ययुगांनंतरच्या प्रबोधनाच्या व विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या (रेनेसाँ) पर्वापासून सुरू होतो. रेनेसाँमुळे मानवी प्रज्ञा मुक्त होऊ लागली. मानवी व्यक्तिमत्त्वाची महत्ता नव्याने जाणवू लागली. मानव-केंद्री जाणिवेतून ‘कॉनक्वेस्ट वेस्ट ऑफ नेचर’ हा विचार अस्तित्वात आला. त्यातून वैज्ञानिक क्रांती व इहवादी जीवननिष्ठा निर्माण झाली. त्यामुळे धर्म कल्पनेचा- धर्मवर्चस्वाचा प्रभाव कमी होऊ लागला. पोपच्या अनियंत्रित सत्तेला शह देण्याची प्रवृत्ती विविध प्रदेशांतील राजसत्ताधीशांच्या मनांत बळावली. सार्वभौम राज्यांची कल्पना साकार होऊ लागली. या प्रक्रियेची दोन-तीन प्रमुख सूत्रे होती. सरंजामशाही व पोपशाही यांना विरोध, प्रादेशिक अस्मितेतून राज्यांना समकक्ष अशा राष्ट्रकल्पनेचा विकास व या दोन्हींतून इहवादी राष्ट्र-राज्य कल्पनेचा उदय ही सूत्रे होत. या सर्व विकास प्रक्रियेचा मुख्य मूलाधार ‘विरोध’ व ‘संघष’ हा होता.

एका बाजूला छोटे जमीनदार, सरंजामदार व पोपशाही व दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात भिन्न-भिन्न प्रादेशिक राजसत्ता, पोपशाहीला धार्मिक क्षेत्रात आव्हान देणारे सुधारक प्रॉटेस्टंट चर्च व औद्योगिक क्रांतीतून उदयाला येत चाललेला भांडवलदार, उद्योजक, व्यापारी वर्ग यांच्या संघर्षांतून ‘इहवादी राष्ट्र-राज्य’ ही संकल्पना युरोपात विकसित झाली. प्रॉटेस्टंट चर्चमुळे प्रादेशिक राजसत्तेला धार्मिक समर्थन व भांडवलदार वर्गामुळे आर्थिक पाठबळ मिळाले. सामान्य जनतेची भावनिक गुंतवणूक होण्यासाठी प्रादेशिकतेचा आधार दिला गेला व पोपशाहीच्या विरोधात धर्मनिरपेक्ष (इहवादी) राष्ट्र-राज्याच्या सार्वभौमत्वाची कल्पना जन्माला आली.

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत. ravisathe64@gmail.com