‘त्यांची’ भारतविद्या : विल्यम जोन्सचा प्राच्यविद्या-कैवार

भारतीय संगीतावरचे प्राचीन ग्रंथ जमवून त्यावर निबंध वाचणारा आणि इतरांना उद्युक्त करणारा पण विल्यम जोन्सच!

प्रदीप आपटे

ज्योतिर्गणिताविषयी शंका ते मनुस्मृतीच्या अध्ययनासाठी शिवाशिवीच्या अटी पाळून संस्कृत आत्मसात करणे, हा विल्यम जोन्सचा प्रवास कसा झाला?

इंग्लंडच्या रॉयल सोसायटीमध्ये अब्राम दि माव्ह्रे यांचा विल्यम जोन्स नावाचा तरतरीत सहकारी होता. निष्णात गणिती होता. वर्तुळाच्या परिघाचे व्यासाशी असणारे गुणोत्तर दर्शविण्यासाठी हे ग्रीक पेरिफेरिआ (परीघ)मधले पहिले अक्षर स्र् वापरण्याची पठडी त्यानेच सुरू केली. त्याचा मुलगाही त्याच्याच नावाचा- विल्यम जोन्स! या धाकटय़ाला भाषा अवगत करण्याचे निसर्ग वरदान होते. लहान वयातच त्याला वेल्श आणि इंग्रजीखेरीज ग्रीक, लॅटिन, फारसी, अरबी आणि हिब्रू या भाषा अवगत होत्या. चोविसाव्या वर्षी डेन्मार्कचा राजा ख्रिश्चेन (सातवा) याच्या विनंतीवरून त्याने केलेले ‘तारिख ए नादिरी’ या फारसीमधल्या नादिरशाहाच्या चरित्राचे फ्रेंच भाषांतर प्रसिद्ध झाले. भारतात येण्याआधी त्याने लिहिलेले फारसीच्या व्याकरणाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. ते वॉरन हेस्टिंग्जकडे पोहोचले होते. वकील होऊन स्वतंत्र बाण्याचा कायदेतज्ज्ञ म्हणून त्याने नाव कमावले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाबद्दल जोन्सची मते सरकारधार्जिणी नव्हती. ‘राज्यव्यवस्थेची तत्त्वे : शेतकरी आणि तज्ज्ञांचा एक संवाद’ या नावाने एक त्याने प्रश्नोतरी-पुस्तिका लिहिली होती. त्यावरून बरेच वादंग आणि कज्जा उद्भवला होता.

त्याची प्राचीन संस्कृतीबद्दलची ओढ आणि आस्था तर जणू वडिलोपार्जित! त्याच्या फारसी ज्ञानामुळे प्राच्यभोक्ता आणि प्राच्यपंडित अशी त्याची ख्याती झाली होती. रॉयल सोसायटीच्या प्रभावामुळे निरनिराळ्या ज्ञानशाखांची त्याला गोडी होती. हिंदुस्तानी परंपरांशी सुसंगत न्याय व प्रशासनाची घडी उभी करायला अशा कुणा उत्साही जाणकार आणि तडफेच्या तज्ज्ञाची वॉरन हेस्टिंगला निकड होती. हा तर तुलनेने कोवळा तरुण. पण कंपनी सरकारच्या वाढत्या राज्याचा मुख्य उपन्यायाधीश म्हणून नेमला गेला. त्याची नेमणूक झाल्यावर बऱ्याच जणांच्या भिवया उंचावल्या गेल्या. हिंदुस्तानात येतानाच त्याने अध्ययन करण्याजोग्या विषयांची यादी बनविली होती : ‘हिंदू आणि मुसलमानांचे कायदे’, ‘प्रथम आणि अंतिम प्रलयासंबंधीच्या परंपरा व धारणा’, ‘हिंदुस्तानचा आधुनिक भूगोल व इतिहास’, ‘आशियाई भागातील अंकगणित व भूमिती’, ‘हिंदुस्तानातील औषधशास्त्र, रसायनशास्त्र, शल्य व शरीरविज्ञान’, ‘आशियाई भागातील काव्य, वाद विवेचनरीती आणि नीतितत्त्वे’, ‘शेकिङ्ग’ अर्थात ३०० चिनी प्रसंगकाव्ये, ‘तिबेट आणि काश्मीर वर्णन’, ‘हिंदुस्तानातील कारागिरी/ शेती/ व्यापार’, ‘मुघलांचे प्रशासन’, ‘मराठेशाहीचे प्रशासन’ इत्यादी सोळा विषय नोंदले आहेत!

त्याच्या अगोदर हिंदुस्तानी समाज व संस्कृतीबद्दल आदरपूर्वक जिज्ञासा बाळगणारे काही युरोपीय होते. उदाहरणार्थ, जोन्सला न्यूटनच्या कामगिरीचा मोठा अभिमान होता. ‘‘न्यूटनचे लिखाण प्राचीन अथेन्समध्ये गौरवास्पदपणे वाचले गेले असते पण वाराणसी काश्मीरमधले कितीसे पंडित न्यूटनचे लेखन वाचून उमगू शकतील?’’ अशी त्याची धारणा होती.. पण त्या धारणेला तडा दिला तो त्याचा मित्र राऊबेन बरो या गणितज्ञाने! त्याने ‘हिंदुस्तानामध्ये द्विपदी-सिद्धांत पूर्णपणे ज्ञात होता,’ असे विवेचन करणारा निबंधच लिहिला. एवढेच नव्हे तर ग्रहणाची गणिते करताना वाराणसीचे ब्राह्मण न्यूटनप्रमाणेच ‘श्रेढी पद्धती’ (सीरीज मेथड) सर्रास वापरतात असेही ठासून सांगितले. सम्युएल डेव्हिस या त्याच्या वेल्श मित्राने त्याला वाराणसीतील मानमहालची तारांगण वेधशाळा दाखविली. सूर्यसिद्धांताचे भाषांतर करण्याचा आग्रह धरणारादेखील डेव्हिसच!

जोन्सपुढे हे ‘सूर्यसिद्धांत’ प्रकरण पुन्हा उपजले. त्याची मूळ आणि कूळ कथा अशी : १७६९ साली ल जेंति हा फ्रेंच ज्योतिर्गणित अभ्यासक शुक्राचे गतिस्थित्यंतर अभ्यासण्यासाठी पुदुच्चेरीला येऊन राहिला होता. त्याने हिंदुस्तानी ज्योतिर्गणिताच्या रीती सविस्तरपणे लिहिल्या. त्याचे अध्ययन वाचून ज्यां सिल्व्हें बैई (१७३६-९३) याने हिंदुस्तानी आणि युरोपीय पद्धतींचे तौलनिक अध्ययन करून जाहीर केले की ‘ग्रीक ज्योतर्गणित पौर्वात्य ज्योतिर्गणितावरून बेतलेले आहे’. अनेक इंग्रज संशोधक आणि स्वत: जोन्स या ‘भारतवादी’ धारणेच्या बाजूचे नव्हते. परंतु ही धारणा असणाऱ्या संशोधकांच्या लिखाणाला आणि संशोधनाला कालांतराने जोन्सला भारतामध्येच पुनश्च सामोरे जावे लागले. जॉन प्लेफेअर या एडिंबरोच्या गणिती प्राध्यापकाने प्रतिपादन केले की, या गणितातल्या काही गणनरीती ग्रीकांना बिलकूल माहीतदेखील नाहीत! त्याने उपस्थित केलेले सहा प्रश्न आणि त्याच्या टिपणांमुळे सूर्यसिद्धांताचे संपूर्ण भाषांतर करण्यासाठी विद्वान उद्युक्त झाले. या विद्वान मित्रांच्या आणि अन्य अध्ययनकर्त्यांमुळे जोन्सचे भलतेच लक्षणीय मतपरिवर्तन झाले!

जोन्सचे वडील इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे चळवळे कार्यकर्ते होते. ही ‘रॉयल’ सोसायटी १६६० साली स्थापन झाली. त्याचा अनुनय करीत १६६६ साली फ्रेंच अकादेमी रोयाल सर्विसची स्थापना झाली. अठराव्या शतकात एकापाठोपाठ एक राजाश्रयी मंडळी स्थापत्या गेल्या. उदा. बर्लिन १७०१, उप्पसाला १७१०, सेंट पीटसबर्ग १७२४, कोपनहेगन १७४३. फ्रान्समध्ये तर ओर्लिआन्स तुलूज बुर्दो दिजाँ इ. प्रांतवार राजाश्रयी मंडळी उभ्या राहिल्या! ही मंडळी विद्यापीठांपेक्षा निराळी होती. विद्यापीठांच्या घडणीवर चर्चच्या प्रभुत्वाचे ओझे आणि सावली असे. या मंडळींमध्ये कुणाही जिज्ञासू, धडपडे, चौकस यांची दाद लागणे अधिक सुलभ असे. जगभरचे ज्ञान, शोध आणि तांत्रिक युक्त्याप्रयुक्त्या यांचे संकलन या मंडळीतर्फे केले जाई. महिना-दोन महिन्यांनी सदस्यांची सभा भरे. मंडळीमधली संमती वा दाद मोलाची मानली जाई. सदस्यत्व मिळणे हा विद्यापीठ प्राध्यापकापेक्षा मोठा सन्मान समजला जाई! अशी सोसायटी हिंदुस्तानात बंगालमध्ये स्थापण्यात जोन्सने पुढाकार घेणे अगदीच स्वाभाविक होते. त्याच्या जिज्ञासेला मिळालेली ही मोठी पर्वणी होती. त्याची धुरा त्याने मोठय़ा नेटाने माणसांचे एकेक नमुने सांभाळत पार पाडली. त्याचा उत्साह, व्यासंग, कल्पकता यांच्या प्रभावाने त्याच प्रकृतीचे अनेक जिज्ञासू आणि अध्ययनशील पाईक निर्माण झाले. त्याच्या स्फूर्तीने संशोधनात खेचले गेले. त्याची कल्पनाशक्ती, ग्रहणशक्ती अपार होती. भागलपूरमधून त्याला हिमालयाचे जवळून दर्शन झाले. त्या पर्वतांची उंची जगातत्या इतर पर्वतराजींपेक्षा जास्त आहे असे प्रतिपादन जोन्सनेच केले होते. त्यातूनच सर्वात उंच एव्हरेस्ट शिखराच्या शोधाचे बीज रोवले गेले. भारतीय संगीतावरचे प्राचीन ग्रंथ जमवून त्यावर निबंध वाचणारा आणि इतरांना उद्युक्त करणारा पण विल्यम जोन्सच! अनेक वनस्पती संकलक संशोधक त्याच्या प्रेरणेने संशोधन कामाला लागले. अनोळखी लिपी वाचणारे व्याकरण लिहिणारे, भाषांचा अभ्यास करणारे, शब्दकोशकार यांचा मेळा मंडळीभोवती भरला. व्यक्तीला विचार सुचणे आणि त्या विचाराची संस्था उभी राहणे यात महदंतर आहे. महास्फोटानंतर अनेक स्वतंत्र तेजगोल पैदासले जावे तसे या ‘मंडळी’तून संशोधक पुढे आले.

परंतु हे फक्त हौशी खटाटोप करण्यात तो गुंतला होता असे नव्हे! न्यायाधीश म्हणून जबाबदारी निभावताना त्याला आपल्याला संस्कृत आणि अरबी भाषेवर प्रभुत्व पाहिजे याची बोचरी जाण सतावत होती. दिवसातले काही तास तो या अध्ययनासाठी राखून ठेवत असे. मनुस्मृतीचे न्यायपद्धतीतले महत्त्व लक्षात आल्यावर त्याने भलतीच उचल खाल्ली. इतरांची भाषांतरे आणि व्याकरण ग्रंथ एवढय़ाने भागत नाही. आपण स्वत:च संस्कृत भाषा मूळ संस्कृत भाषापंडिताकरवी शिकण्याचा त्याने निर्धार केला. पण संस्कृतपंडितांवर कर्मठ शिवाशीव नियम आणि ‘पारंपरिक योग्यते’खेरीज ज्ञान देण्यास मनाई लागू होती! अखेरीस कृष्णनगरच्या शिवचंद्र या स्थानिक महाराजांच्या रदबदलीने रामलोचन नावाचा वैद्य जोन्सला संस्कृत शिकवायला सशर्त राजी झाला. अशा ‘परकी मांसभक्षक भ्रष्टा’ला संस्कृत शिकविण्यासाठी त्याने प्रथम नकार दिला. दरमाहे शंभर रुपये कबूल केले तरी! त्याने शर्ती घातल्या त्या : वर्णधर्म कटाक्षाने पाळला जाईल. त्याच्या अध्ययन अध्यापनासाठी स्वतंत्र इमारतीमध्ये शुभ्र संगमरवरी फरशीची खोली असावी. अध्ययन काळाच्या अगोदर ती गंगाजलाने धुवावी. विल्यम जोन्सने अध्ययनासाठी येताना काही न खाता न पिता रिकाम्या पोटाने उपाशीच यावे. फारच आर्जव केले तर एक कप चहा पिण्याची सवलत त्याला मिळत असे! एवढे असूनही जोन्सची आणि त्याची तार जुळली. जोन्स त्याचा उल्लेख मोठय़ा आदराने करतो. एवढेच नव्हे त्याने रामलोचन याला कोलकात्यात येण्याची गळ घातली. कोलकात्यामध्ये राहून मनुस्मृती ऊर्फ ‘मानवधर्मशास्त्रा’चे शब्दश: आकलन आणि भाषांतर त्याच्या मदतीने स्वत:ने केले! १७८६ साली त्याच्या न्यायालयात एक कज्जा आला. गंगा विसेन नावाच्या एका क्षत्रियाने मुन्नूलाल नावाचा एक लहानगा शूद्र जातीतला मुलगा दास म्हणून खरेदी केला होता. त्या मुलावर लळा असल्याने स्वत:ची जमीन त्या मुलाच्या नावे केली. दरबारी पंडितांमध्ये अशा हस्तांतराच्या वैधतेबाबत मतभेद झाले. अखेरीस त्या वादाचा निवाडा जोन्सच्या पुढय़ात आला. जोन्सने त्या पंडितांना स्वत:चे भाषांतर ऐकवले आणि एका संतवचनाचादेखील आधार देऊन असे हस्तांतर वैध असल्याचा निर्णय त्यांच्या गळी उतरवला!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Orientalism of william jones hindu astronomy william jones believe zws