दिल्लीवाला

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ‘पेगॅसस’चं भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आल्यामुळं या वेळीही विरोधक राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालतात की काय, असं वाटू लागलं होतं. गेल्या वर्षी शेतकरी आंदोलन पेटलेलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांशी केंद्राच्या ११ बैठका झाल्या होत्या आणि केंद्रानं घोंगडं भिजत ठेवलं होतं. विरोधकही संतापलेले होते, ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात गेलेच नाहीत. सोनिया गांधींपासून सगळे संसदेच्या बाहेर महात्मा गांधींच्या पुतळय़ाशेजारी केंद्र सरकारचा निषेध करत होते. या वेळी अभिभाषणासाठी राष्ट्रपती उभे राहताच विरोधाचा सूर निघाला होता. पण राष्ट्रपतींनी शांत राहण्याचं आवाहन केल्यावर सभागृह शांत झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं हे बहुधा अखेरचं अभिभाषण होतं, आता भाजप कोणाला उमेदवारी देणार याबद्दल विरोधकांमध्ये कुतूहल आहे. पुन्हा अनुसूचित जातीतील उमेदवार द्यायचा असेल, तर कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा विचार केला जाऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या फेरबदलात त्यांचा राजीनामा घेतला गेला. पण राज्यपालपद देऊन मान राखला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही तर पुरेशा संख्याबळाची वानवा होईल. पर्याय म्हणून एखादा दक्षिणेकडील उमेदवार द्यायचा; मग, भाजपविरोधी दाक्षिणात्य पक्षही पाठिंबा देतील; असंही गणित आखलं जाऊ शकतं असं म्हणतात.पण हे होईल तेव्हा होईल. सध्या विरोधी पक्षीय राष्ट्रपतींच्या आवाहनानुसार शांत राहाताहेत.

 यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी वाहवा मिळवलेली आहे. कारण सभागृहात कामकाज शांतपणे होतंय. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि नायडू या दोघांनीही विरोधकांचं कौतुक केलंय. या अधिवेशनाचा पूर्वार्ध येत्या शुक्रवारी संपेल. तोपर्यत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व अर्थसंकल्पावर चर्चा पूर्ण होईल. दोन्ही विषयांवर विरोधात भाषणं होतात, पण विरोधक प्रस्तावांना समर्थन देतात. त्यामुळे सभागृह सुरळीत चालवण्यात अडचण येणार नव्हतीच. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राज्यसभेने इतक्या तहकुबी पाहिल्या की विनातहकूब सभागृहात चर्चा होतेय हे पाहून बिर्ला आणि नायडूंचा ऊर भरून आल्यास नवल नाही!

खरगेंचं शिक्कामोर्तब

राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे भलतेच फॉर्मात होते. विरोधी पक्षनेते झाल्यापासून पहिल्यांदाच ते इतके आक्रमक झालेले दिसले. त्यांनी विरोधी पक्षांत आणि काँग्रेसच्या सदस्यांनाही ‘बॉस’ कोण आहे, हे दाखवून दिले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर खरगे १५-२० मिनिटे बोलले असतील, तेवढय़ात उपसभापती हरिवंश हे त्यांना थांबवत, ‘तुमचा बोलण्याचा वेळ संपला. तुमच्या पक्षासाठी नियोजित वेळ दिला आहे, तुम्हीच बोलत राहिलात तर पक्षातील इतर सदस्यांना वेळ कमी मिळेल,’ असं म्हणाले. खरगेंचा पारा चढला. ते संतापून म्हणाले, ‘माझ्या पक्षाचा वेळ मी ठरवेन. तुम्ही नाही!’.. या वाक्यासरशी खरगेंनी विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब करून टाकलं. पूर्वी गुलाम नबी आझाद हे पद सांभाळत असत. त्यांचा स्वभाव मवाळ. त्यांना शेरो-शायरी अधिक प्रिय. खरगे खमके आहेत, कुणालाही ठणकावून सांगायला कमी करत नाहीत. रामदास आठवले खरगेंच्या मुद्दय़ांवर अधूनमधून टिप्पणी करत होते. खरगे आठवलेंवर इतके वैतागले, ‘आठवले, तुम्ही सारखे सारखे मध्ये बोलू नका, खाली बसा.’ खर्जातला आवाज काढल्यावर आठवलेंनाही पुन्हा बोलण्याचं धाडस झालं नाही! खरगे बोलत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात होते. त्यामुळे खरगेंच्या मुद्दय़ाला भाजपचे सदस्य- अगदी मंत्रीदेखील- तावातावाने आक्षेप घेत होते. अनुसूचित जातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये डावलले जात असल्याचा आरोप खरगेंनी करताच, केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी उठून उभे राहिले आणि त्यांनी अनुसूचित जातींसंदर्भात एक विशिष्ट शब्दप्रयोग केला. तो ऐकल्यावर खरगे इतके संतापले, ‘अरे, अनुसूचित जाती म्हणजे ‘शेडय़ूल्ड कास्ट’ म्हणतात. कोणता शब्द वापरायचा हेदेखील कळत नाही तुम्हाला?’.. धारवाडचे जोशी गप्प झाले! खरगेंनी आपल्या भाषणात सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा वापर करून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. या आकडेवारीवर आक्षेप घेता येत नसल्यानं सत्ताधारी सदस्यांची कोंडी झाली, त्यात मोदी पहिल्या बाकावर बसलेले! खरगेंनी भाषणाच्या सुरुवातीला संत महात्मा बसवेश्वरांचे बोल म्हणून दाखवले आणि त्याचा अर्थ स्पष्ट केला. ‘पैसेवाले मंदिर बांधू शकतात, माझे गाठोडे रिकामे आहे; मग मी कसे मंदिर बांधणार? माझे दोन पाय हाच पाया आहे, माझे शरीर-हृदय हेच देवालय आहे, माझे शिर हाच कळस आहे.. निव्वळ दगडांनी मंदिर बांधता येत नाही. अंत:करण चांगलं असावं लागतं, आत्मा शुद्ध असावा लागतो, सगळय़ांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असावी लागते..’ खरगेंचं एक तास पाच मिनिटांचं भाषण संपल्यावर मोदी सभागृहातून निघून गेले. त्याच दिवशी लोकसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. पण तिकडं मोदी फिरकले नाहीत!

धडकी भरलीय..

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरलीय असं म्हणतात. काही नेत्यांना वाटू लागलंय की, प्रचार ऑनलाइन करावा. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या पट्टय़ात धुकं, पाऊस, हवामान खराब, कशाला ते हेलिकॉप्टरनं जायचं. ल्युटन्स दिल्लीला कितीही शिव्या घातल्या तरी हीच दिल्ली सुरक्षित. इथं बसून प्रचार करू या असं कोणा नेत्याचं ठरलंय म्हणतात. तसंही केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर सभांवरील बंदी अजून उठवलेली नाही. सुंठीवाचून खोकला गेला.. शेतकरी नेते राकेश टिकैत अजून तरी भाजपच्या हाताला लागलेले नाहीत. ते तर म्हणताहेत, भाजपविरोधात प्रचार करणार. परवा प्रेस क्लबमध्ये शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या क्लबातून टिकैत म्हणाले की, ‘भाजपला शिक्षा करा!’ पक्षी बसायचा आणि फांदी तुटायची, हा प्रकार नको म्हणून कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी लगबगीनं जाहीर केलं की, निवडणूक होईपर्यंत थांबा, हमीभावावर समिती बनवतो..!

भाजपच्या नेत्यांना उत्तर प्रदेशची निवडणूक जड जाणार याचा अंदाज आलेला दिसतोय. गेल्या वेळेइतकी ही निवडणूक सोपी नसल्याचं नेते खासगीत तरी बोलून दाखवाहेत. ‘आमच्यात आणि समाजवादी पक्षात जुंपलीय, लढत जोरदार होणार!’, असं हे नेते सांगत होते.

कधी कमी, कधी जास्त

काळा पैसा आणि बनावट नोटाचं भूत अजूनही केंद्राला सोडायला तयार नाही. विरोधक प्रश्न विचारून हैराण करतात आणि मंत्र्यांना काही तरी करून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागते. खरगेंच्या अप्रतिम भाषणामुळे बनावट नोटांचा विषय प्रसारमाध्यमांत थोडा मागं पडला; पण या मुद्दय़ावर केंद्र सरकारची कोंडी झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत, ते संसदेत गृह मंत्रालयाचा किल्ला लढवण्याची जबाबदारी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यावर सोपवून गेलेत. शहांना तीन सहकारी आहेत, त्यातील दोघांनी खुद्द गृह मंत्रालयाला अडचणीत आणलेलं आहे. अजयकुमार मिश्रा ऊर्फ टेनी. लखीमपूर हत्याकांडापासून शहांनाच टेनींना सांभाळावं लागतंय, त्यांच्याकडे गृह मंत्रालय कसं सोपवणार? दुसरे आहेत, निशिथ प्रामाणिक. त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रामाणिकपणावर विरोधक शंका घेत असतात. तेही उपयुक्त नाहीत. राहिले फक्त नित्यानंद राय. बिहारमध्ये भाजपच्या सत्तेचं स्वप्न बघत होते, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरले असते. कदाचित मुख्यमंत्री बनलेही असते. सध्या संसदेत नित्यानंद राय किल्ला लढवत आहेत. नोटबंदीनंतर बनावट नोटा वाढल्या की कमी झाल्या, असं ‘सप’चे सुखराम यादव यांनी विचारलं. राय म्हणाले, ‘कधी वाढतात, कधी कमी होतात. प्रमाण स्थिर नसतं’.. सुखराम यादवांनी पुन्हा विचारलं, ‘मंत्रिमहोदय, बनावट नोटा आहेत तरी किती? नेमका आकडा तुम्ही सांगितला नाहीत’. मंत्रिमहोदयांनी जप्त केलेल्या नोटांची वेगवेगळी आकडेवारी दिली. जास्त बनावट नोटा सापडल्या म्हणजे अधिकाधिक कडक कारवाई केली गेली. त्यामुळे बनावट नोटांचं प्रमाण कधी जास्त असतं, कधी कमी.. वेगवेगळय़ा प्रश्नावर मंत्र्यांचं उत्तर एकच होतं. साहजिकच ते.. नोटाबंदीवर खरं उत्तर दिलं तर पद जायची भीती!