नाशिक येथे ३ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंत एरंडे यांनी काही वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित सारांश. या मुलाखतीमधील त्यांची विज्ञान, भाषा, साहित्य, लेखन अशा अनेक विषयांमधली मुशाफिरी आजही तितकीच समयोचित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोखंदळ मराठी वाचकांना प्रा. नारळीकर यांच्या विज्ञान कथा, कादंबऱ्या यांचा परिचय आहेच. त्यांनी मराठीतून विज्ञान कथा लिहिल्या आणि विज्ञान साहित्याला मराठी साहित्यामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी त्याबद्दल साहित्य संमेलनात आवर्जून उल्लेखही केला. समीक्षकांनाही या लेखनाची दखल घ्यावी लागली. त्यामुळे इतर लेखकही विज्ञान साहित्य लिहू लागले. जयंतराव, एक प्रश्न असा पडतो की विज्ञान संशोधनात मग्न असूनही तुम्ही विज्ञान कथा लिहिता त्यामागे उद्देश काय?

– संशोधन करताना विज्ञानाचे नवे नवे पैलू डोळ्यांसमोर येतात. पण सामान्य माणसाला असं वाटतं, की विज्ञान हे आपल्या समजण्यापलीकडे आहे. त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही. ते जाणण्याचा आपण काही प्रयत्न करायला नको असे सामान्य आणि सुशिक्षित यांनासुद्धा वाटते. पण मला असं जाणवतं, की काही विषय आपण सुशिक्षित माणसांसमोर मांडावेत. म्हणून मी विज्ञान कथा लिहायला लागलो. काही लोक मला विचारतात, की तुमचे छंद काय आहेत? करमणूक कोणती आहे? तर विज्ञान कथा लिहिणे हासुद्धा माझा विरंगुळा आहे. 

सुरुवातीच्या प्रास्ताविकात डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितलं, की तुमच्यात एक विज्ञान शिक्षक आहे आणि तो तुम्हाला विज्ञान कथा लिहिण्याची प्रेरणा देत असावा. मग विज्ञानाची भीती घालवण्यासाठी तुम्ही विज्ञान कथा लिहिता का?

– लोकांना असं वाटतं, की विज्ञान हा विषय जटिल आहे, आपल्याला समजणार नाही. तर तो विषय समजावा म्हणून गोष्टीरूपाने सांगितला तर तो जास्त सोपा करून सांगता येईल, समजू शकेल म्हणून हा प्रयत्न करत असतो.

असा एक सार्वत्रिक समज आहे की इंग्रजी भाषेशिवाय विज्ञान शिकता येत नाही. उच्च विज्ञानाच्या बाबतीत ते खरेही असेल. परंतु शालेय, माध्यमिक शिक्षणाबाबत आपण विचार केला तर भाषा कोणती असावी?

– मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. माझं शिक्षण उत्तरेत, बनारसमध्ये झालं. हिंदूू विद्यापीठात. अर्थात तिथे जी शाळा होती तिथं माध्यम होतं हिंदूी. आसपास सगळी मुलं हिंदूीच बोलायची. त्यामुळे आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या भावाला हिंदूी बोलायचा छान सराव झाला. त्या वेळी आम्ही दहावीपर्यंत विज्ञान हिंदूीतूनच शिकलो. इंग्रजीतून नाही. चौथीपासून इंग्रजी एक वेगळी भाषा म्हणून शिकवली गेली. माझा अनुभव असा आहे, की ज्या भाषेतून आपण विचार करतो किंवा इतर लोकांशी बोलतो त्या बोलीभाषेतून विज्ञान समजणं सोपं जातं. आता आपण महाराष्ट्राचा किंवा मराठीचा विचार केला तर एखाद्या मराठी बोलणाऱ्या मुलाला तुम्ही जर लहानपणी इंग्रजीतून विज्ञान शिकवायला सुरुवात केली तर प्रथम त्याला इंग्रजी भाषा, इंग्रजी वाक्य पाठ करावे लागते. पण त्याचा मराठीत अर्थ असेल तो त्याला समजतो की नाही ही शंकाच आहे. आपलं पाठय़पुस्तक माहितीनं इतकं भरलेलं असतं, की त्या मुलाला विचार करायला वेळच नसतो. त्यामुळे तो इंग्रजीतून ते वाक्य पाठ करतो आणि जसंच्या तसं उतरवतो. विज्ञान त्याच्या डोक्यात जात नाही. असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मराठी किंवा मातृभाषेतून जर विज्ञान शिकवलं तर ते जास्त उत्तमपणे त्याला समजू शकेल. विज्ञान हा पाठांतराचा विषय नाही, समजण्याचा विषय आहे. म्हणून माझा आग्रह मातृभाषेचा आहे.

आपण आता ज्या विज्ञान कथा लिहिता त्यात अंतरिक्ष, कॉम्प्युटर इत्यादी विषय असतात. या कथा लिहिताना तुम्हाला कधी पारिभाषिक शब्दांची अडचण भासली का? कारण आता जे पारिभाषिक शब्द आहेत ते काही विश्वकोशातले आहेत किंवा काही शासनाच्या पारिभाषिक कोशातले आहेत. काही शब्द इंग्रजीइतकेच अनाकलनीय आहेत. त्याविषयी आपले काय मत आहे?

– मराठी भाषा किती शुद्ध असावी याबद्दल वाद असू शकेल. आपण जो पारिभाषिक शब्दांचा प्रश्न काढलात, तो वैज्ञानिक साहित्याच्या बाबतीत जास्त जाणवतो लोकांना. कारण विज्ञानाची परिभाषा नवीन आहे. ते शब्द रुळतील की नाही असं वाटतं. मी थोडंसं विज्ञानाच्या बाहेरचा प्रश्न विचारतो. इथं माधव गडकरी आहेत, गोिवद तळवलकर आहेत, त्यांनी सांगावं की ते सकाळी उठल्यावर घरी वृत्तपत्रं आली का असं विचारतात की पेपर आला का असे विचारतात? (हंशा)  प्रश्न असा आहे की आपल्या बोलण्यात काही शब्द इतके रुळले आहेत की ते परभाषेतले असले तरी मराठीने सामावून घेतले आहेत. भाषा अशा तऱ्हेने समृद्ध होत असते. ती अशुद्ध होत नाही. विज्ञानाच्या माध्यमातूनही असे शब्द नव्याने मराठीत येतील. मुद्दाम अट्टहासाने जटिल, नवीन शब्द बनवणे प्रत्येक वेळेला योग्य नाही. काही शब्द जरूर बनवावेत, पण अट्टहास नको.

म्हणजे एका इंग्रजी शब्दासाठी अनेक मराठी शब्द झाले तरी चालतील. त्यातला जो रुळेल तोच स्वीकारावा असं तुम्हाला वाटतं?

– सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट.

मग वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज का असावी? जर सर्व सुविधा मिळत असतील, आपलं आयुष्य अगदी यथास्थित उत्तम चालत असेल तर कशासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन?

– आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तर आपण योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकतो. काही वेळेला असं होतं की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला नाही तर काही निर्णय आपण दूर ढकलतो. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर, जर आपण काही काम सुरू करायचं ठरवलं आणि लक्षात आलं की आज अमावस्या किंवा शनिवार आहे तर ते काम पुढे ढकलतो आणि त्या कामाला उशीर होतो. मी हे लहानसं उदाहरण दिलं. कधी कधी मोठी कामं रेंगाळतात. सध्या आपण जी प्रगती करत आहोत ती अधिक वेगाने करणे शक्य आहे. पण त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे.

परिषदेच्या सुरुवातीपासून सांगितलं गेलं की आपण मराठीपण हरवतो आहोत. मराठीपण जपलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

 मला वैज्ञानिक परिभाषेतून उत्तर द्यायचं झालं तर कठीण आहे. पण आपण मराठीत विचार केला तर मराठीपण जपलं असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या भाषेवर हिंदूीची किंवा इंग्रजीची जरी छाप असली, तरी जर तुम्ही विचार मराठीत केला तरी ते मराठीपण आहे असं मी समजतो. मला स्वप्नं मराठीत पडतात. (हंशा) मराठीपण म्हणजे मराठी साहित्य, विविध प्रकारे वेगवेगळी मराठी आपण ऐकली आहे, त्या मराठीची आपल्या एकंदर मन:पटलावर एक छाप उमटलेली असते. ती कुठे ना कुठे दिसून येते. ती कशी दिसेल ते सांगता येत नाही. पण ती असते.

गणित तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगता. या पार्श्वभूमीचं दडपण आपल्या मुलींच्या संगोपनावर येतं का? त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला पाहिजे असं वाटतं का?  हुशारीचं एक दडपण तुमच्यावर किंवा मुलींवर येतं का?

– नाही. एक उदाहरण देतो. आम्हाला जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा एकाने पत्र लिहिलं की तुमची मुलगी पाढे म्हणत जन्माला आली असेल! (हंशा) तर तसं काही झालं नाही. टँ.हँ करतच तिचा जन्म झाला. (हंशा) तिला पाढे शिकायला जेवढा वेळ लागला, जेवढा त्रास झाला तेवढाच तुमच्या मुलांनाही झाला असेल. (हंशा) सुदैवाने मी असं म्हणेन की माझ्या मुलींनी अभ्यासात चांगले गुण मिळवले आणि त्यासाठी आम्हाला काहीही प्रयत्न करावे लागले नाहीत.

आम्हाला प्रयत्न करावे लागतात. (हंशा)

– त्या संदर्भात मला सांगावंसं वाटतं की, काही पालक मी बघितले आहेत की ते मुलांपेक्षा स्वत: त्यांची जास्त काळजी घेतात. मुलांनी प्रथम क्रमांक मिळवावा असा त्यांचा आग्रह असतो. ते फार चिंता करतात. मुलाला जवळ बसवायचं, त्याचा अभ्यास घ्यायचा, क्लासला पाठवायचं.. मला एक प्रसंग आठवतो. रेसचा घोडा धावत असतो, जॉकी जिवापाड मेहनत घेत असतो. घोडय़ाला काही वाटत नाही की आपण रेस जिंकावी. पण जॉकीला वाटत असतं की रेस जिंकावी. (प्रचंड टाळय़ा आणि हंशा) मला हे पालक त्या जॉकीसारखे  वाटतात. मुलांनी अभ्यास करावा, त्यांच्यामध्ये जिद्द असावी एवढं पालकांनी बघावं. त्याहून जास्त लगाम लावून पळवू नये. (हंशा)

(ही मुलाखत १५ ऑगस्ट १९८९ रोजी पहिल्या जागतिक मराठी परिषदेतील ‘मराठा गडी यशाचा धनी’ या कार्यक्रमात घेतली गेली .                erandejayant@gmail.com)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President for akhil bharitya sahitya sammelan jayant narlikar interview zws
First published on: 02-12-2021 at 01:56 IST