९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैज्ञानिक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश; स्वत:च्या लेखनप्रेरणांची उकल करणारा आणि विज्ञानकथांचे निकष आणि हेतूदेखील सहजपणे समजावून देणारा.. 

साहित्याचा विषय काहीही असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडीचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे. मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान-साहित्याबाबतीत.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

विज्ञान-साहित्य म्हणजे काय? 

वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान-साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान-साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा/कादंबरी मी विज्ञान-साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये.

विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इन्स्टिटय़ूशन आजही ते काम चोखपणे बजावीत असते. 

अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याकडे पाहिले की त्यात विज्ञान-साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञानकथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात. 

विज्ञान-कथालेखकांची ही अवस्था तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? सुदैवाने असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. काही वृत्तपत्रात आठवडय़ाचा एक दिवस पानभर मजकूर विज्ञानाबद्दल असतो. काही नियतकालिकांत देखील विज्ञानविषयक माहिती सापडते. ‘सृष्टीज्ञान’सारख्या नियतकालिकेने तर विज्ञानयुगाची चाहूल खूप आधीपासून ओळखली. 

तरी देखील अद्यापि समाजात विज्ञानाचे पाय रोवलेले नाहीत याची पदोपदी जाणीव होते. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते.  ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही. याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही.

विज्ञानाची शाखा म्हणवून घेऊ इच्छिणाऱ्या विषयाला काही कसोटय़ांवर उत्तीर्ण व्हावे लागते. त्या कसोटय़ा फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यांत तो विषय अनुत्तीर्ण ठरतो. हे अनेक प्रयोगांती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणे देतात यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे याची जाणीव होते. 

सर्वसामान्य माणसांची (अर्थात भारतातील) एक अशी गोड गैरसमजूत आहे की, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते वेदादीकरून पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. जर पुरातन समाज वैज्ञानिक दृष्टय़ा अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडायला पाहिजे. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे, दूरदृष्टी इत्यादींची उदाहरणे पुराणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत; ज्याला आपण गणितीय विज्ञानवाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत. सध्या उपलब्ध पौराणिक वाङ्मयातून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही. 

विज्ञानकथा का लिहाव्यात?

विज्ञानकथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकापर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठय़पुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला ‘कुरूप’, ‘कडू’ म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे.  शाळेत ज्या अनाकर्षक तऱ्हेने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जातात, त्यामुळे विज्ञानाबद्दल सामान्य जनमानसात एक प्रकारची भीती वा अनास्था निर्माण झाली आहे.

काही समीक्षकांच्या मते असा एखादा दृष्टिकोन पुढे ठेवून केलेले लिखाण म्हणजे चांगले साहित्य नव्हे.  मी अशा समीक्षकांना विचारतो की, एका दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्याला आपण साहित्य मानावयास तयार नसाल, तर मग तुलसीदासाचे रामचरित मानस किंवा महाराष्ट्रातील संतवाङ्मय यांना काय म्हणणार आहात? या साहित्याला तुम्ही चांगले साहित्य म्हणणार नसाल, तर चांगल्या साहित्यासाठी तुमचे वेगळे मानदंड कोणते?.. पूर्णपणे निर्हेतुक असे साहित्य असते का? 

विज्ञानकथा आणि वास्तविकता

एच. जी. वेल्स, आर्थर सी क्लार्क, रे ब्रॅडबरी आणि आयझक अ‍ॅसीमॉव्ह यांची नावे विज्ञानकथांच्या संदर्भात घेण्यात येतात. कारण त्यांच्या लिखाणात भविष्यातील वास्तवतेचे द्रष्टेपण होते. एका वैज्ञानिक लेखात १९४५ मध्ये क्लार्क यांनी कल्पना मांडली, की पृथ्वीवर विषुववृत्तावर सुमारे ३८५०० कि. मी. उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणारा कृत्रिम उपग्रह विषुववृत्तावरून पाहताना डोक्यावर स्थिर असेल व त्याचा उपयोग दळणवळणासाठी करता येईल. आज जे ‘माहिती तंत्रज्ञाना’चे अफाट साम्राज्य पसरलेले दिसते, त्यामागे हीच कल्पना आहे. क्लार्कच्या कल्पनेनंतर तर २-३ दशकांत ही कल्पना वास्तविक प्रयोगात रूपांतरित झाली.

याहून माफक स्तरावरचे माझे वैयक्तिक उदाहरण नमूद करतो. १९७६ मध्ये मी एक गोष्ट लिहिली होती (धूमकेतू), ज्यात पृथ्वीशी एका धूमकेतूची टक्कर होण्याची संभावना चर्चिली होती. वर्षभरात होणाऱ्या टकरीतून पृथ्वीला व पृथ्वीवासीयांना कसे वाचवायचे? जागतिक स्तरावर वैज्ञानिक एकत्र येऊन धूमकेतूवर अण्वस्त्र धाडायची कल्पना साकार करतात. हे अण्वस्त्र एका अंतराळयानातून धूमकेतूजवळ धाडले जाते व तेथे त्यातून अणुस्फोट घडवून आणला जातो. स्फोटामुळे धूमकेतूला धक्का बसून त्याची दिशा बदलते आणि पृथ्वीवरचे अरिष्ट टळते. त्यानंतर सुमारे १२-१३ वर्षांनी नासापुढे असा प्रश्न आला होता, की जर एखाद्या लघुग्रहांची किंवा धूमकेतूची टक्कर पुढे संभवत असेल तर त्या अरिष्टापासून पृथ्वीचे रक्षण कसे करावे? तेव्हा नासातील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांनी सुचवलेला उपाय वरील गोष्टीत वापरल्याबरहुकूम होता. इतकेच नव्हे तर काही वर्षांतच अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘स्पेसवॉच’ नावाचा प्रकल्प चालू केला, ज्यात सौरमालेतील छोटय़ा मोठय़ा वस्तूंची (अशनी, लघुग्रह, धूमकेतू आदी) निरीक्षणे घेऊन त्यांच्या कक्षा ठरवण्यात येतात. उद्देश हा, की जर त्यापैकी एखादी वस्तू पुढेमागे केव्हा तरी पृथ्वीवर आपटणार असेल, तर त्या संकटाचे निवारण वेळीच करायला वरील मार्ग अवलंबिता येईल.

‘उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात?’

 या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला विज्ञानकथेच्या दर्जाचे भान ठेवले पाहिजे. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्टय़ा नसतात. उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा त्यात उतरतील. 

उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची पण माहिती देणारे असते. अर्थात हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोहोचला की ठरवेलच.

माझ्या लेखी विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधावर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी. आज असे अनेक वैज्ञानिक विषय आहेत. स्टेम सेल संशोधन, उपग्रहांतून टेहळणी, क्लोनिंग, अणुइंधनाचा वापर/ गैरवापर इत्यादी. त्यांचा समाजाशी घनिष्ठ संबंध असतो. भविष्यातील चित्रे रेखाटताना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध करू शकतो. मी १९७५-७७ दरम्यान ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट लिहिली होती. त्या गोष्टीत गर्भाचे लिंग ठरवता येण्याची क्षमता मिळाली, तर काय गोंधळ उडेल याचे वर्णन केले होते. गर्भलिंग निदानामुळे तशीच परिस्थिती उद्भवलेली आपण पाहतो. गर्भ कन्येचा असल्यास तो पाडण्याचे क्रूर काम होऊ नये म्हणून कायदा करावा लागला.

आता थोडक्यात निकृष्ट दर्जाच्या विज्ञानकथा कशा असतात ते पाहू. पुष्कळ विज्ञानकथांत विज्ञानाचे मूळ नियम कारण न देता हवे तसे बदलण्यात येतात. याच कारणास्तव मला ‘स्टार वॉर्स’सारख्या फिल्म्सना विज्ञानकथाधारित म्हणावेसे वाटत नाही. त्यातील अंतराळयाने, विचित्र जीवजंतू, महाभयंकर शस्त्रास्त्रे यांचा मुलामा काढला, तर राहते ती सामान्य ‘वेस्टर्न’ फिल्म!

काही निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा असतात. अशा कथा खरोखर विज्ञानकथावृक्षाला मारकच म्हटल्या पाहिजेत. कारण त्या वाचताना विज्ञान एक अनाकलनीय पण भीतीदायक विषय आहे, असे वाचकाला वाटते. वास्तवातल्या जगात संहारक शस्त्रास्त्रे आहेत. त्यांच्यापासून मानवतेला असलेला धोका स्पष्ट करणारी उत्तम विज्ञानकथा असू शकते. तशा अनेक कथा-कादंबऱ्या आहेत; पण अशांच्या कथानकात तर्कशून्य भीतीला वाव नसतो. तसेच काही भुताखेतांच्या भयकथात अंधविश्वासांना खतपाणी घातले जाते. 

अंतराळयुगातल्या अंधविश्वासांना खतपाणी घालणाऱ्याही काही कथा असतात. ‘बर्मुडा त्रिकोण’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात अनाकलनीय असे काही घडत नाही, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे; तरी इथे काहीतरी गूढ शक्ती आहे किंवा इथे परकीय जीव पृथ्वीवर ढवळाढवळ करण्यासाठी लपून बसले आहेत, अशा कथानकांचा सुळसुळाट दिसतो. त्यात भर पडते उडत्या तबकडय़ांची. अशा यानातून परकीय जीव येऊन पृथीवर लहानमोठी संकटे आणतात ही भावना, कुठलाही पुरावा नसताना, जनमानसात घर करून राहिली आहे. तिला दुजोरा देण्याचे काम अशा विज्ञानकथा करतात.

शेवटी आणखी एक मुद्दा! एखादी विज्ञानकथा व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल. अश्या स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. (ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीतही मी असेच परीक्षण करेन. जरी साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ऐतिहासिक कादंबरी म्हणून तिला कमी लेखले पाहिजे.) थोडक्यात, आपण जेव्हा विज्ञानसाहित्याचे मूल्यमापन करतो, तेव्हा ज्या विज्ञानावर ते आधारलेले आहे ते पण तपासले पाहिजे.

मी विज्ञानकथा लिहिण्यापूर्वी मराठीमध्ये विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत. अगदी १९१५ मध्ये ‘मनोरंजन’ मासिकात श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची विज्ञानकथा प्रकाशित झाली होती. त्यानंतर त्या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकात बरेच विज्ञानकथाकार तयार झाले. काहींनी स्वत:चे साहित्य निर्माण केले, तर काहींनी भाषांतरे केली होती. द.पां. खांबेटे, नारायण धारप, भा.रा. भागवत ही काही यातील नावे आहेत.  

विज्ञानकथा लिहिण्यास मी का प्रवृत्त झालो? 

मला असे वाटते, मी खगोलशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सत्य काय आहे आणि कथा-कादंबऱ्यांमध्ये काय सांगितले जाते, याची मला जाणीव आहे. पृथ्वीवरचे आपले अस्तित्व ध्यानात घेतले, तर हे समजते की, माणूस इवलासा आहे आणि त्याभोवतीचे विश्व अफाट आहे.  हे सारे विश्व समजून घेणे तसे खूप अवघड आहे. ‘‘आपण समजतो, त्यापेक्षा हे विश्व अधिक गूढ आहे.  इतकेच काय आम्ही समजू शकू, त्यापेक्षाही ते अधिक गूढ आहे.’’ असे जे.बी.एस. हॉल्डेन म्हणतो. 

जे स्वत: शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानकथा लिहितात, त्यांना एक फायदा मात्र नेहमी होतो. एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाविषयी त्यांना जे वाटते, ते आपल्या कथेमध्ये अधिक प्रभावीपणे सांगू शकतात. असे करण्याची मुभा त्यांना या विषयासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध करताना नसते. शोधनिबंधात तथ्यांवर भर दिला जातो व अटकळींना दुय्यम स्थान असते. 

मी विज्ञानकथा का लिहितो?  दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून. सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा म्हणून. विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी. 

काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझ्या कथेतील पात्रे खूपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते- असे मला सुचवायचे आहे. आज शुद्ध समजले जाणारे बरेच शब्द कधीकाळी बाहेरूनच आले होते, हे विसरून चालणार नाही. 

इंग्रजी भाषा विज्ञानाची भाषा म्हणून मान्यता पावलेली भाषा आहे.  जगभर ती वापरली जाते आणि म्हणून टी.व्ही., टेलीफोन, फॅक्स, रडार, रॉकेट हे इंग्रजी शब्द कथांमधून वापरले जाणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी भाषांतर देऊ शकतील. पण सामान्य वाचक जर अशा शब्दांना स्वीकारू इच्छित असेल, तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी? 

काही जण विचारतात, ‘‘तुम्हांला विज्ञानकथा लिहायला वेळ कसा मिळतो?’’ विचारणाऱ्याचा सूर असा असतो की, ‘संशोधनाचे काम सोडून तुम्ही हे काय करीत आहात?’ माझे त्यांना सांगणे आहे की, विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा आहे.  (जयंत नारळीकर यांचे चित्र : निलेश जाधव)