|| प्रदीप रावत

उत्क्रांतीचे कोडे सोडवण्याच्या शास्त्रज्ञांच्या प्रक्रियेमध्ये अनेक नवलाईच्या गोष्टी हाताला लागत गेल्या. एका प्रजातीतून दुसरी उत्क्रांत होण्याच्या लाखो वर्षांच्या काळा‘दरम्यान’चा विशिष्ट प्राणी कसा असेल या विचाराने संशोधकांना बरेच बौद्धिक खाद्य पुरवले.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

पुरातन काळातल्या सागरी जीवाश्मांमधले बदल उत्क्रांतीची उमटलेली पावले दाखवतात हे खरेच, पण त्याहीपेक्षा उत्क्रांतीचे आणखी काही पैलू आणि प्रश्न होते. सागरी जीवाश्मांमुळे त्या खिजवणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करणारी चिन्हेपण मिळतात. त्याबद्दल जीवशास्त्रज्ञ आणि पुराजीव संशोधकांची मती उत्तेजित व्हावी असे आणखी काही या जीवाश्मांमध्ये आढळते. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पक्षी उत्क्रांत झाले का? काही जलचर जीवांत बदल होत भूचर जीव उपजले का? अशा धर्तीची अटकळ जीवशास्त्रज्ञांनी अगोदरच बांधली होती. ही अटकळ योग्य की अयोग्य, याचा निर्णय करायला काही निराळय़ा ठेवणीचा पुरावा पाहिजे. उत्क्रांतीच्या ओघांत दोन तऱ्हांचे बदल असतात. काळाच्या ओघांत जीवांचे आकारमान बदलते. वजन, लांबीसारखी मापे, थोराडपण, सानपण कमी-जास्त होते. याला सूक्ष्मलक्ष्यी बदल किंवा स्थित्यंतरे म्हणतात. उत्क्रांतीच्या कल्पनेला अटीतटीने विरोध करणाऱ्यांनादेखील हे बदल मंजूर आहेत! पण एका प्रकारचा प्राणी किंवा वानसे दुसऱ्या प्रकारातून उद्भवणे याला स्थूललक्ष्यी स्थित्यंतर म्हणतात. विश्वनिर्मात्याने हे स्थूल प्रजाती प्रकार जाणूनबुजून आणि योजनापूर्वक वेगवेगळे आखले आहेत अशी त्यांची ‘आखणी मूलक’ धारणा आहे. त्यामुळे स्थूललक्ष्यी स्थित्यंतराला ते मोठय़ा तिडिकेने विरोध करतात. डार्विनने जेव्हा अशा स्थूललक्ष्यी बदलाची कल्पना सुचविली, तेव्हा त्या कल्पनेचा आधार मानावे असे जीवाश्म उपलब्ध झाले नव्हते. अशा जीवाश्मांना हरविलेले दुवे म्हणतात.

एका प्रजातीची एखादी शाखा दुसऱ्या प्रजातीमध्ये रूपांतरित झाली असेल तर काही ना काही उभय गुणांची वर्दी किंवा हजेरी लाभलेला जीवाश्म आढळला पाहिजे. लक्षात घ्या, आपण पूर्वज शोधत नाही आहोत. तसा मातृपितृभाव दाखवणारा पूर्वज मिळण्याची गरजदेखील नाही. थेट पितरवंशाऐवजी त्याच्या चुलत भावंडाची साक्षदेखील पुरेशी ठरेल. हा ‘दरम्यान’चा जीव कसा असेल? (उदाहरणार्थ आधुनिक सरपटे प्राणी आणि आधुनिक पक्षी घ्या.) अगदी सहज स्फुरणारा विचार म्हणजे तो दोहोंमधली काही ना काही लक्षणांचे मिश्रण असलेला असेल. तो प्रत्यक्षांत समान पूर्वज असण्याची गरज नाही. असा मिश्रलक्षणीपणाचा पुरावा त्याचा ‘दरम्यानपणा’ दर्शवेल आणि त्याचे पर्यवसान निराळय़ा जीवांच्या उद्भवात होते हेही दर्शवू शकेल, कारण आपण संक्रमण दाखविणाऱ्या अवस्थेची पडताळणी करतो आहोत. आपण कुणा विशिष्ट प्रजातीच्या पूर्वजांच्या शोधात नाही! अर्थातच संक्रमण अवस्था दर्शविणारी प्रजाती काळाच्या पटावर कधी आढळते याचीही ‘सांगड-जोड’ बरोबरीने घातलीच पाहिजे.

 जलचर ते उभयचर या संक्रमणाचा दाखला देणारा जीवाश्म २००४ साली सापडला. हा मोठा मोलाचा शोध होता. एका प्रजातीचे संक्रमण होत दुसरी प्रजाती उद्भवते ही उत्क्रांती विचाराने केलेली अटकळ आणि भाकिते होती. त्यांची थक्क व्हावे अशी पुरी पडताळणी हा जीवाश्म गवसल्याने झाली. म्हणून हा मोलाचा शोध ठरला. जलचरांमधले पृष्ठवर्गी जीव जमिनीवर वास्तव्याला कसे आले याचा उलगडा झाला. हा उलगडा तिकतालिक रोझाई या पृष्ठवंशी जलचराच्या जीवाश्मामुळे साधला. साधारणपणे ३९० दशलक्ष (म्हणजे ३९ कोटी) वर्षांपर्यंत पृष्ठवर्गात फक्त मत्स्यजाती होत्या. पण त्यानंतरच्या ३० दशलक्ष वर्षांनंतर ज्यांची गणना चतुष्पादांमध्ये करता येईल असे जमिनीवर चालणारे भूचर आढळतात. हे आरंभीचे भूचर अनेक बाबतीत आधुनिक उभयचरांप्रमाणे होते. त्यांची डोकी आणि शरीरे सपाट होती. मान किंवा मानेसारखा अवयव प्रथमच विकसित झालेला होता. त्यांचे पाय आणि कमरेचे अवयव उत्तम विकसित झाले होते. असे असले तरी आरंभाच्या मत्स्य जातींशी त्यांचा जवळचा संबंध आढळत होता. विशेषकरून ज्यांना कल्लेपाळी असलेले (लोब फिन्ड) मासे म्हटले जाते त्या वर्गातील माशांचे ‘पर’ मोठय़ा हाडाचे होते. उथळ तळय़ांत किंवा उथळ वाहत्या झऱ्यात त्या पराचा टेकू घेऊन ते उभे राहायचे. या सुरुवातीच्या चतुष्पादांमध्ये आढळणारी ‘मासासदृश’ लक्षणे म्हणजे खवले, अवयवांची हाडे आणि डोक्यांची हाडे. (पाहा सोबतचे चित्र).

 या चित्रामध्ये वरच्या बाजूला भूचर असलेल्या चतुष्पादाचे चित्र आहे. त्याचे नाव अकांथास्टेगा गुन्नारी. (अकांथा म्हणजे काटेवजा टोकदार, स्टेगा म्हणजे पृष्ठभाग वा छप्पर) हा अदमासे ३६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. चित्राच्या तळाच्या बाजूला चित्र आहे तो युस्थेनोप्टेरॉन (eusthenopteron  ग्रीकमध्ये eu म्हणजे चांगला,  stheno म्हणजे बळकट आणि प्टेरॉन म्हणजे कल्ला किंवा पंख ऊर्फ सुदृढ कल्ल्यांचा). हा अधिक पुरातन म्हणजे ३८५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा. दोन्हीच्या मधोमध आहे तो तिक्तालिक रोसाइ. (कॅनडाच्या ज्या भागामध्ये हा गवसला त्याचे हे तेथील स्थानिक इन्युईट भाषेतले नाव आहे.) त्याचा शब्दश: अर्थ गोडय़ा पाण्यातला थोराड मासा! या शोधाचे श्रेय आहे शिकागो विद्यापीठातल्या नील शुबिन या संशोधकाचे. उपलब्ध पुराव्यांवरून तार्किक कयास आणि अटकळ बांधणे आणि त्याचा पडताळा देणारा पुरावा धुंडाळणे ही अनेक उत्क्रांती वैज्ञानिकांची रूढ शिस्त आणि शिरस्ता आहे. त्याचा हा उत्तम नमुना आहे. शुबिनने लढवलेला तर्क काय होता? त्याची अटकळ होती, की कल्ल्यांपासून निराळय़ा धाटणीचा अवयव उद्भवला. ३९० दशलक्ष वर्षांपूर्वी भूचर पृष्ठवंशी नव्हते आणि सापडत नाहीत आणि ३६० दशलक्ष वर्षांपूर्वी भूचर पृष्ठवंशी सापडतात. मग त्यांच्या दरम्यान संक्रमणकाळातले जीवाश्म ३७५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या थरांमध्ये सापडू शकतील. खेरीज त्यांचा आढळ गोडय़ा पाण्याच्या साठय़ालगतच्या किंवा तळय़ांकाठच्या खडकांमध्ये असला पाहिजे. असे उघडे पडलेले गोडय़ा पाण्यालगतचे पुरातन खडकांचे थर कुठे मिळतील? भूगर्भशास्त्राच्या क्रमिक ठोकताळय़ांचा आधार घेत त्यांनी कॅनडामधल्या आक्र्टिक भागातल्या एलेसमेर बेटांचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. आणि अनेक वर्षांच्या पायपिटीनंतर हा खडकांमध्ये दडलेला पण अळुमाळु डोकावणारा ‘तिक्तालिक’ गवसला.

 त्याच्या कल्ले, खवले, पर यांवरून तो जलचर मासा आहे हे दिसतेच. पण त्याच वेळी त्याची काही लक्षणे उभयचराची आहेत हेही दिसून येते. त्याचे डोके एक तर सालामँडरप्रमाणे सपाट होते. डोळे आणि नाकपुडय़ा हे दोन्ही कवटीच्या दोन्ही बाजूंना नव्हते. त्याऐवजी ते वरच्या बाजूला होते. या शरीररचनेवरून तो उथळ पाण्यात राहणारा, पाण्याबाहेर डोकावणारा वा डोके वर काढणारा आणि कदाचित हवेतसुद्धा श्वास घेऊ शकणारा असावा असे सूचित होत होते. आरंभीच्या उभयचरांमध्ये असते तशी त्याला मान होती. माशांना तर मान नसते. त्यांची कवटी थेट खांद्यांना सांधिलेली असते. दोन अत्यंत महत्त्वाचे अवयवभूत गुणधर्म तिक्तालिकात विकसित झाले होते. ते गुणधर्म त्याच्या भावी वंशजांना जमिनीवर आक्रमण करण्याकरिता उपयोगी होते. एक तर त्याच्या बरगडय़ा दणकट होत्या. फुप्फुसात हवा भरणे त्यामुळे शक्य होते. तसेच कल्ल्यांमधून हवेचा उपसा करणे शक्य होते. कारण त्याला दोन्ही प्रकारच्या श्वसनक्रिया शक्य होत्या. पाळीसारखे ‘पर’ असलेल्या माशांमध्ये खूप हाडे होती पण लहान होती. तिक्तालिकाच्या अवयवांमध्ये हाडे थोडी होती पण थोराड आणि दणकट होती. या हाडांच्या संख्या आणि रचना याचा वारसा सगळय़ा इतर वंशजांना मिळाला आहे. अगदी आपल्यासहित! उथळ पाण्यात सरपटणे, पाण्याबाहेर डोकावणे, हवेत श्वासोच्छ्वास करणे, त्याच बळावर उभे राहणे यासाठीचे अनुकूलपण तिक्तालिकाच्या बदलत्या शरीररचनेने साध्य झाले. पण सुरुवातीच्या चतुष्पादांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांसोबतच डोक्याची आणि काही अन्य अवयवांची काही हाडे, खवले ही मत्स्यसदृश लक्षणे पण हजर होती. शुबिनच्या कयासात फक्त काळाचा अदमास नव्हता. त्याला हेदेखील सुचले, की अशा संक्रमणी ऊर्फ ‘दरम्यान’च्या काळात ‘न आढळलेल्या दुव्यांचे’ ठिकाण कुठे असणार? ते समुद्रात नसणार तर गोडय़ा पाण्याच्या भूमीलगतच्या थरात असणार! कारण उत्तर काळातले कल्लेपाळीदार मासे आणि आरंभकालीन उभयचर हे दोन्ही गोडय़ा पाण्यात वसाहत करणारे होते. यावरून आणखी काही तर्क आणि कयास बांधता येतात. तिक्तालिकाचे वंशज पुढे काय करू शकले, काय करू धजले याबद्दलच्या सुसंगत अटकळी बांधणे आणि त्यादेखील पडताळत राहणे हेही त्यामुळे शक्य झाले. उदा. नेवटी किंवा नेवटय़ांसारखा प्राणी (मडस्किपर) भक्षकांना हुलकावण्या देणे किंवा त्या काळाबरोबरीने किंवा अगोदर उपजलेल्या महाकीटकांना मटकाविणे हे शक्य होण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या संभवक्षमतेच्या अर्थाने तिक्तालिकमध्ये दिसून येते. कालांतराने हे क्षमता पावलेले तगले, वाढले आणि धिमेपणे बदलत राहिले! ही वैज्ञानिक कयास पद्धतीची देणगी!

लेखक माजी खासदार आणि ‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

 pradiprawat55@gmail.com