scorecardresearch

राष्ट्रभाव : भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीच!

येथील आध्यात्मिक विचारांत द्वैतवादी आणि अद्वैतवादी आदी अनेक पंथ आहेत. जोन्स स्टॅन्ले हे एक अमेरिकन मिशनरी होते. त्यांनी ‘द रोल ऑफ ख्राईस्ट’ हे पुस्तक लिहिले आहे.

इथे राहणाऱ्या प्रत्येकास उपासना स्वातंत्र्य आहेच, परंतु त्याचबरोबर त्याच्या मनात राष्ट्रीय एकात्मता असणे अपेक्षित आहे. 

रवींद्र माधव साठे

भारतीय संस्कृतीची स्वीकार व समन्वयाची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. या संस्कृतीने द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत, ईश्वरी तत्त्व सगुण आहे, ते निर्गुण आहे, देव आहे, देव नाही (चार्वाक, बुद्ध), वेद हे अर्थहीन आहेत (कौत्स निरुक्त), बौद्ध व जैन मते अशी सर्व प्रकारची उलटसुलट व काही परस्परविरोधी मते सामावून घेतली आहेत.      

येथील आध्यात्मिक विचारांत द्वैतवादी आणि अद्वैतवादी आदी अनेक पंथ आहेत. जोन्स स्टॅन्ले हे एक अमेरिकन मिशनरी होते. त्यांनी ‘द रोल ऑफ ख्राईस्ट’ हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात की ‘‘हिंदूस्तानात उपासनेच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत, परंतु तरीही प्रत्येक व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणते. कोणी भूत-प्रेत-पिशाच्चला मानतात तर कोणी दगड – वृक्षाची पूजा करतात, तर काही जण गंगेच्या किनारी बसून आत्मा- परमात्मा- परब्रह्माची चर्चा करतात. तरीही सर्व जण स्वत:ला ‘हिंदू’ म्हणवतात.’’ यानंतर स्टॅन्ले यांनी ख्रिस्ती पाद्र्यांना सावध केले आहे. ‘हिंदूत्वाच्या या ऑक्टोपसपासून सावधान राहा, नाही तर आपल्या येसूूलाही ते व्यापून टाकेल.’ स्टॅन्लेचा उद्देश वेगळा होता. हिंदूंची कोणासही एकरूप करून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याचे योग्य स्वरूप व आकलन न झाल्याने त्याने विकृत उदाहरण दिले. परंतु त्यांनी हिंदूत्वास ऑक्टोपसची दिलेली उपमा एका अर्थाने खरी आहे कारण कोणत्याही गोष्टीस आत्मसात करणे ही हिंदूंची प्रारंभापासून परंपरा राहिली आहे. हिंदू हा शब्द जातीवाचक नाही आणि संप्रदायवाचकही नाही. अनादी काळापासून या समाजाने अनेक संप्रदायांना जन्म दिला आहे, अनेक संप्रदायांना सामावून घेतले आहे, त्याचे नाव हिंदू आहे.

‘हिंदू’ या शब्दाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत कोणताही वैचारिक गोंधळ नाही. हिंदूत्व आणि भारतीयत्व हे समानार्थी शब्द आहेत असे खुद्द स्व. बाळासाहेब देवरस यांनी म्हटले होते. अर्थात भारत किंवा भारतीय या शब्दाची कितीही ओढाताण केली तरी त्यातून ‘हिंदू’शिवाय शेवटी कोणताच अर्थ निघत नाही. घटनाकारांनीसुद्धा संविधानात भारतीय शब्दाऐवजी ‘हिंदू कोड बिल’ असा शब्दप्रयोग केला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

दुसरा मुद्दा असा की, हिंदूंमध्ये धर्माविषयी कोणताही मागासलेपणा नाही. भारतात विविध प्रकारचे संप्रदाय आहेत आणि ३३ कोटी देवांचा इथे निवास आहे. त्यामुळे यांत आणखी एक अल्ला आणि येसूची भर पडली तर काहीच फरक पडणार नाही. हिंदूत्व कोणताही ‘वाद’ नाही. ‘‘हिंदूत्व ही एक जीवनपद्धती आहे. तो एका विशिष्ट स्वरूपाचा विचार नाही. ती एक वाटचाल आहे. स्थिर अवस्था नाही. एक प्रक्रिया आहे. सत्याचे ठरावीक दर्शन नाही. एक विकसित परंपरा आहे,’’ असे सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या ‘दि फिलॉसॉफी ऑफ हिंदूइजम’ (१९२६) या पुस्तकात हिंदूंचे वर्णन केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हिंदूत्व ही जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन केले आहे.

हिंदू हा सगळय़ा धर्माचा संघ आहे (पार्लमेंट ऑफ रिलिजन्स). इस्लाम, ख्रिस्ती, यहुदी हे सगळे पंथ किंवा संप्रदाय आहेत आणि त्यात मार्क्‍सवादाचीही भर पडली आहे. एक ग्रंथ, एक प्रेषित, एक उपासना पद्धती असे मानणारे हे सर्व संप्रदाय आहेत. हिंदू नावाचा कोणताही संप्रदाय नाही तर हिंदूंचे अनेक संप्रदाय आहेत.

हिंदूंच्या मनात अन्य संप्रदायांसाठी नेहमीच समादराची भावना राहिली आहे. येथील मुसलमान कुराण वाचू शकतात. मशिदीत जाऊ शकतात. धार्मिक नेता म्हणून पैगंबराचे स्मरण करू शकतात. तसेच ख्रिस्ती बांधव बायबलचे पठण करू शकतात. गिरिजाघरात जाऊ शकतात. इथे सर्वाना उपासना स्वातंत्र्य आहे, परंतु हे राष्ट्र एक आहे, हे राष्ट्र माझे आहे आणि आपले पूर्वज एक आहेत आणि जे-जे राष्ट्रीय आहे त्यास आपले आहे हे म्हणताना कोणास संकोच वाटण्याची आवश्यकता नाही. एक संस्कृती म्हणतो तेव्हा हे अभिप्रेत आहे. यांत कोणत्याही प्रकारचे एकारलेपण उद्भवत नाही. 

अमेरिकेत आज राहणाऱ्यांनी समजा असे म्हटले की, ‘‘मी राष्ट्रीय आहे, परंतु जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन आणि लिंकन यांना अशासाठी मानणार नाही कारण ते मुसलमान वा हिंदू नाहीत, तर ते म्हणणाऱ्यांना तेथील राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार राहात नाही. पंथ म्हणून इस्लाम, शैव, वैष्णव तुम्ही कोणी पण असाल, परंतु अमेरिकेत राष्ट्रीय म्हणून ज्यांना राहायचे असेल तर तेथील राष्ट्रीय मानिबदू, अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, राज्यघटना, तेथील राष्ट्रीय ग्रंथांना मानावे लागते. जो असे मानणार नाही त्याला अमेरिकत राष्ट्रीय होण्याचा अधिकार उरत नाही. फ्रान्समध्येही ‘द गॉल’ यांना तेथील यच्चयावत नागरिकांनी आपला पूर्वज मानावे ही अपेक्षा फ्रान्स सरकारने व्यक्त केली आहे. जे अमेरिकेत नियम लागू आहेत, जे फ्रान्समध्ये आहे तीच अपेक्षा भारतातील सर्व धर्मीय नागरिकांकडून आहे, यात गैर काहीच नाही.

आणखी एक मुद्दा असा की, रिलिजन (पंथ) आणि राष्ट्रीयता या वेगळय़ा गोष्टी आहेत. रिलिजन म्हणजे मनुष्य आणि त्याच्या निर्मात्यामधील संबंधाचे नाव आहे (रिलिजन इज रिलेशनशिप बिटवीन अ मॅन अ‍ॅण्ड हिज मेकर). मनुष्य बनवणाऱ्यास कोणी अल्ला, ईसा मसीहा, कोणी जव्होवा किंवा स्वर्गात राहणारा पिता म्हणेल, कोणत्याही नावाने संबोधित करेल, परंतु रिलिजन म्हणजे मनुष्यप्राणी आणि ईश्वर यामधील संबंधांचे नाव आहे. रिलिजन ही सर्वार्थाने व्यक्तिगत बाब आहे. आपल्या देशात सर्वाचा रिलिजन एक झाला पाहिजे असे आपण कधी मानले नाही. कारण ते अशास्त्रीय आहे. रिलिजन व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यामधील संबंध आहे तर प्रवृत्ती, रुची, प्रकृती, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक स्तराच्या विभिन्नतेमुळे, व्यक्ती-व्यक्तीत भिन्नता असल्यामुळे सर्वाचा रिलिजन एक होऊ शकणार नाही, असे हिंदू चिंतन म्हणते. त्यामुळे आमच्या देशात सर्वासाठी एक ग्रंथ, एक धर्मगुरू, एक उपासना पद्धती, एक अल्ला आणि एक द्वंद्वात्मकता मानली गेली नाही.

इथे आम्ही म्हणतो की, जितक्या रुची, प्रवृत्ती आहेत तितके मार्गही आहेत. इथे उपासना पद्धतीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. सगळय़ांचे गंतव्य स्थान एक असूनही दिशा वेगवेगळय़ा असू शकतात. शिवमहिम्न स्तोत्रात याचं वर्णन करणारा श्लोक आहे.

रुचीनां वैचित्र्या दृजुकुटिल नाना पथजुषां ।

नृणामेको गम्य त्वमसी पयसामर्णव इव ।।

भारतीय संस्कृतीची ही विशेषता आहे की तिने सर्वाना सामावून घेतले आहे.  यांत येथील मुसलमान आणि ख्रिश्चनांचाही समावेश आहे. जहांगीर आणि शाहजहानच्या काळात रामायण, महाभारत, अथर्ववेद, योग वशिष्ठ आदी हिंदूंच्या ग्रंथांचे फारसी भाषेत अनुवाद करण्यात आले होते. पुढे औरंगजेबास वाटले की हे ग्रंथ वाचून मुसलमानांचे हिंदूकरण होते आहे आणि त्याने त्याचा मोठा भाऊ दारा शुकोह हा अर्धा हिंदू आहे असा संशय घेऊन त्यांस ठार मारले. या देशात मुसलमान नावाने विभिन्न जाती आल्या होत्या आणि त्यांचे हिंदूकरण होऊ लागले होते, याचे विवरण प्रत्यक्ष कार्ल मार्क्‍सने दिले आहे. १२ जुलै १८५३ रोजी लंडनहून लिहिलेल्या पत्रांत मार्क्‍स म्हणतो की, ‘‘अरब, तुर्क, मुघल लोकांनी हिंदूस्थान पादाक्रांत केला असला तरी शीघ्र त्यांचे हिंदूकरण झाले आहे. इतिहासाचा हा सनातन नियम आहे की विजेत्यांना नेहमी पराभूत राष्ट्राच्या श्रेष्ठ संस्कृतीपुढे नमावे लागते. त्यांनी पुढे याकरिता रोमन साम्राज्याचे उदाहरण दिले आहे. तो लिहितो, जेरुसलेमवर रोमन साम्राज्याने विजय मिळवला होता. रोमन विजेता होते, परंतु पराभूत लोकांची संस्कृती श्रेष्ठ होती त्यामुळे सांस्कृतिक दृष्टीने जेरुसलेमने रोमन लोकांवर विजय मिळवला आणि रोमन लोकांना जेरुसलेमच्या ख्रिश्चन लोकांची संस्कृती स्वीकारावी लागली.’ भारतात ही प्रक्रिया चालू होती, परंतु पुढे ब्रिटिशांची राजवट, त्यांची ‘फोडा व झोडा’ ही नीती, मुस्लीम समाजातील धर्माधता व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय पक्षांचे अल्पसंख्याकांच्या मतपेढीचे राजकारण यामुळे यांत खंड पडला.

‘इथे केवळ भारतीय संस्कृतीच’ असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा असा अर्थ अभिप्रेत असतो की, इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस उपासना स्वातंत्र्य आहे, विकास करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यांच्या मनात भारतीय राष्ट्राच्या प्रति एकात्मतेचा भाव असणेही तितकेच महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे. हे खरे आहे की, मध्यंतरीच्या काळात आपल्या समाजव्यवस्थेत दोष निर्माण झाले व समाजातील काही घटकांवर अन्याय झाला हे मान्य करावे लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये सातत्याने बदल होत जातात आणि त्यामुळे कालमानानुसार समाज बदलतो, परंतु ही प्रथा नवव्या शतकानंतर संपुष्टात आली, हे आपल्या देशाचे दुर्दैव होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सवर्णाच्या हृदयशून्यतेमुळे वैदिक धर्म सोडला याची वेदना आहेच. स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर, महात्मा फुले, महात्मा गांधी व अनेक समाजसुधारकांनी समाजातील कालबाह्य रूढींना सोडून देण्याचे आवाहन केले होते. त्या कालबाह्य रूढींना हिंदू समाजाने त्या वेळी पूर्णपणे सोडून दिले असते तर आज अधिक योग्य चित्र दिसले असते.

ravisathe64@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rastrabhav indian culture hindu culture worship freedom national unity ysh