गीतेच्या ध्यानाचे काही श्लोक प्रसिद्ध आहेत. उपनिषदे ते संतजन यांना गोवंशात ठेवणारा श्लोक विशेष लक्षवेधी आहे. सर्व उपनिषदे ही एखाद्या गायीसारखी आहेत. तिचे पालन करणारा आणि दोहन करणारा गोपालनंदन म्हणजे श्रीकृष्ण आहे. त्याचा सखा आणि गीतेचा श्रोता अर्जुन म्हणजे वासरू. गीतेतील ज्ञानामृत म्हणजे दूध. तर सद्बुद्धी राखणारे लोक त्या दुधाचे सेवन करणारे आहेत. गीता आणि गाईचा संबंध गीताईच्या रूपाने विनोबांनी आणखी पुढे नेल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबांच्या आहारशास्त्रात ताकाला अत्यंत महत्त्व होते. ताक हा रोग चिकित्सेमध्ये अत्यंत प्रभावी घटक आहे असे ते मानत. गोडसर ताक हा असंख्य व्याधींवरचा प्रभावी उपाय आहे हे जाणून त्यांनी ‘तक्रं तारकम्’ हे सूत्रही रचले होते. विरजण, दही, ताक, लोणी आणि शेवटी तूप हे सर्व टप्पे त्यांना महत्त्वाचे वाटत. दूध ते तूप व्हाया ताक हा प्रवास गीता ते गीताई या प्रवासालाही लागू होतो. परंपरेने गोमातेच्या माध्यमातून गीतेचे स्तवन केले. विनोबांनी थेटपणे तसे केले नसले तरी गीताई म्हणजे रुचकर, सुपाच्या, औषधी असे ताक आहे असे कुणी त्यांना सांगितले असते तर विनोबांनी हरकत घेतली नसती.

या दधिमंथनातून ताकासोबत लोणी बाजूला काढले आणि विशेष साधना करणाऱ्यांना हे जड लोणी दिले. स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, गीताईशी निगडित कोश वाङ्मय यांचे कोणतेही ओझे त्यांनी सामान्य जनांवर टाकले नाही. गीता प्रवचने आणि गीताई हे दोन सुलभ आणि सखोल ग्रंथ त्यांनी सश्रद्ध लोकांच्या हाती सोपवले आणि उरलेले वाङ्मय साधकांसाठी असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

या ग्रंथांमधील उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणून सर्वत्र साम्य आहे याची उमज पडली की साम्ययोग साधला. गीताईच्या प्रस्थान त्रयीचा अभ्यास करायचा म्हणजे आचरण करायचे. केवळ ग्रंथवाचन नव्हे. खुद्द विनोबांनी गीताईसाठी मोठीच तपश्चर्या केली. गीतेच्या सोप्या रूपाची मागणी त्यांच्या आईने साधारणपणे १९१६ च्या मागेपुढे केली. तेव्हाच विनोबांचा गीताईचा विचार निश्चित झाला होता का, या प्रश्नाचे उत्तर देणे फारच कठीण आहे.

गीताई प्रत्यक्षात आली ती १९३२ मधे. म्हणजे रुक्मिणीबाईंच्या मृत्यूनंतर जवळपास १५-१६ वर्षांनी. ही एक तपश्चर्याच होती. या काळात विनोबांनी गीता शिकवली. तिच्यावर प्रवचने दिली. गीतेशी संबंधित एवढेच काम त्यांनी केले असावे. अर्थात अन्य पूरक अध्ययन आणि आश्रमातील व्रतांचे पालन या गोष्टीही होत्या. या पूर्वतयारीच्या जोरावर गीता प्रवचने आणि गीताई हे उच्च कोटीचे ग्रंथ जवळपास एकाच वेळी साकारले.

पुढे जवळपास ४२ वर्षे ते गीता आणि विष्णुसहस्रनामाच्या सान्निध्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होते. हा कालखंड सांगितला तो केव्हा तरी लक्षात घेतला पाहिजे. एरवी गीतेचा आणि त्यांचा संबंध तर्कातीत होता. श्रद्धा, व्यासंग, आचरण आणि सत्संगती या चार खांबांवर गीताई उभी आहे. आपला भार विनोबांनी हलका केला आहे. त्यामुळे गीताईमधील कोणताही श्लोक घेतला की तो सोपा वाटतो. प्रदीर्घ मंथनातून आकाराला आलेली गीताई त्यामुळेच आश्वस्त करते.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog of song meditation verse famous ysh
First published on: 31-03-2022 at 00:02 IST