प्रदीप आपटे pradeepapte1687@gmail.com

डार्विनच्या तत्कालीन नव्या लिखाणापासून ते ग्रीक, लॅटिन, अरबी, फारसी ग्रंथांपर्यंत सारे वाचणाऱ्या मॅक्समुल्लर यांचे संस्कृतप्रेम सकारण होते..

Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनी नावाचे राष्ट्र अस्तित्वातच नव्हते. जर्मन भाषा बोलणारे अनेक छोटेमोठे भूभाग होते. पण ते एका राजवटीखाली नव्हते. छोटी संस्थाने म्हणावी अशा अनेक राजांच्या हुकमतीखाली हे जर्मनभाषक राजकीयदृष्टय़ा विखुरलेले होते. फ्रान्स, इंग्लंड,  डेन्मार्क आदींची राजवट राजेशाही असली तरी त्या भूभागांतील समाजांत आधुनिक अर्थाचे राष्ट्रीयत्व आकारू लागले होते. ते भाषा, वांशिक/ धार्मिक/ सांस्कृतिक ठेवण यांभोवती विणले गेलेले होते. त्या राजवटींना व्यापारी संधी आणि अनुषंगाने उचंबळलेल्या राजकीय सत्तेचा वसाहती सोस लागला होता. भारताबद्दल असणाऱ्या कुतूहलावर त्याची छाया होती. या जर्मनभाषक भूभागांमध्ये जर्मन भाषेचा अभिमान होता. विद्याव्यासंगात त्या भाषेचा, तेथील विद्यापीठांचा दबदबा उदयाला आला होता. परंतु जर्मनभाषक भूभागांना इतर भूभागांसारखे राष्ट्रीय छत्र नव्हते. राष्ट्र म्हणून राजकीय ओळख नव्हती. राजकीय ठसा नव्हता. अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिख लिस्ट याचे ‘आर्थिक राष्ट्रवाद’ नावाचे प्रतिपादन यामुळेच उपजले होते. जर्मनभाषकांमध्ये भारताबद्दल असलेल्या कुतूहलाची पायवाट ना पुरेशी धार्मिक होती, ना आर्थिक, ना राजकीय! ती बव्हंशी अंकुरली आणि फोफावली विद्वानांमुळे. त्या वेळी जर्मन विद्वानांमध्ये निर्भर स्वातंत्र्यवादी व आदर्शवादी विचाराने भारलेले वातावरण होते.

कोलब्रुक आणि विल्किन्सने केलेली संस्कृत वाङ्मयाची इंग्रजी भाषांतरे वाचून अनेक जर्मन विचारवंत आणि साहित्यिकांची बुद्धी चेतावली. त्यातील मोठी नावे म्हणजे वोल्फगांग गोएथ् (ऊर्फ गटे), ष्लेगेल आणि हुम्बोल्ट! शाकुंतलाचे भाषांतर वाचून गोएथ् आनंदाने वेडावला होता. शेक्सपीअरची १७ नाटके भाषांतरित करणारा ष्लेगेल ते वाचून अचंबित झाला होता. ‘अनेक-विद्याप्रवीण’ म्हणून ख्यातनाम असलेल्या हुम्बोल्टसारख्या विद्वानाने ‘महाभारतातील एक आख्यान’ म्हणून भगवद्गीतेवर निबंध लिहिला. तो वाचून भारतातील तत्त्वज्ञान, कला यांसारख्या पैलूंवर आपल्या ज्ञानकोशात लिहिणे हेगेलसारख्या तत्त्वज्ञाला भाग पडले!

हिंदुस्तानाबद्दल उपजलेल्या औत्सुक्याच्या लाटेचा एक धिप्पाड आविष्कार म्हणजे प्रा. मॅक्सम्युल्लर. जन्म डिसेंबर १८२३. त्याला संगीत आणि काव्याची फार आवड आणि ओढ होती. पण लाइपझिश विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या धडपडीमध्ये तो गणित, आधुनिक भाषा आणि विज्ञानाचा विद्यार्थी होऊन बसला. विसाव्या वर्षी त्याने स्पिनोझाच्या नीतिविचारावर प्रबंध लिहिला. दरम्यान त्याने ग्रीक, लॅटिन, अरबी, फारसी आणि संस्कृत भाषांत प्रावीण्य मिळवले. १८४४ साली बर्लिनमध्ये तो फ्राइडरिख शेलिंगच्या सहवासात आला. हा हेगेलचा खोली-सोबती तत्त्वज्ञ मित्र! पण हेगेलच्या वाढत्या प्रभावाने झाकोळला गेला. त्या काळात त्याने शेलिंगसाठी उपनिषदांचे भाषांतर केले. फ्रान्झ बोप या तज्ज्ञासह तो संस्कृत भाषेचे सखोल अध्ययन करीत राहिला. भाषेचा इतिहास आणि धर्माचा इतिहास यांची समांतरी सांगड त्याला बोपमुळे उमगू लागली. त्याच काळामध्ये त्याने ‘हितोपदेश’ या नीतीकथा संग्रहाचे भाषांतर केले. तेथून तो १८४५ साली पॅरिसला दाखल झाला. युजिन बुनरे या फ्रेंच संस्कृत पंडिताबरोबर संस्कृतचे आणखी सखोल अध्ययन करू लागला. बुनरेच्या प्रोत्साहनामुळे ऋग्वेदाचे भाषांतर करण्याची उमेद मिळाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या संग्रहातील ऋग्वेदाची संहिता ऑक्सफर्ड विद्यापीठात उपलब्ध होती. इंडो-युरोपीय भाषासमूहाचे अध्ययन करण्याचे विल्यम जोन्सप्रणीत वारे ऑक्सफर्डमध्ये चांगलेच मूळ धरून होते. ख्रिस्तेतर आणि ख्रिस्तपूर्व धर्मकल्पनांचे अध्ययन करायचे तर ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथांचे अध्ययन आणि परिशीलन करणे अगत्याचे आहे असा त्याचा ग्रह व आग्रह होता. ईस्ट इंडिया कंपनीला त्याने ही आग्रही गळ घातली. सायणाचार्याच्या  ऋग्वेद प्रतीचे त्याने सटीक संपादन आणि भाषांतर केले.

त्याने केलेल्या अनुवादांची सटीक ‘प्रवचनां’ची आणि व्याख्यानांची यादी फार मोठी आहे. त्याच्या काळात घडलेल्या अनेक वादविवादांत त्याचा लक्षणीय सहभाग आहे. प्राचीन धर्माची त्यांच्या इतिहासाची पारख करून त्याने धर्माचे चार गट सुचविले. त्याच जोडीने डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताबद्दल त्याने वाद घातले. उदा. माणसांच्या भाषा ही प्राण्यांच्या ध्वनिभाषेतून उत्क्रांत झाल्या का किंवा होऊ  शकतात का? इंडो युरोपीय लोक विशेषकरून वैदिक आणि अवेस्ताकालीन इराणी लोक स्वत:चा उल्लेख आर्य म्हणून करतात. त्याअगोदरचे इंडो-युरोपीय स्वत:ला कोणत्या नावाने संबोधत हे माहीत नव्हते आणि नाही. कालांतराने या आर्यकल्पनेवर अनेक वांशिक आणि सांस्कृतिक पुटे चढली. त्याच्या अनेक धारणा मोठय़ा संमिश्र आणि गुंतागुंतीच्या आहेत. त्याने कांटच्या क्रिटिक ऑफ प्युअर रीझनचे नव्याने भाषांतर केले आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये तो म्हणतो ‘अवघ्या आर्यन विश्वाचा व्याप एका पुलाने जोडलेला आहे. त्याचा प्रारंभीचा हुंकार वेदांमध्ये आहे तर त्याची अंतिम परिणती कांटच्या समीक्षेत आहे.’  सगळ्या धर्मामध्ये सुधारकी परिवर्तन होते आणि होत राहाते. तसे होणे गरजेचे आणि अटळ आहे. जसे ख्रिश्चन धर्माचे झाले. हिंदू धर्माचेही होईल. परंपरेने जीर्ण झालेला वठलेला आताचा हिंदू धर्माचा वृक्ष कोसळेल आणि बदलेल.’ -अशी त्याची आशा होती आणि त्या बदलाची क्षमता ब्राह्मो समाज पंथात आहे अशी त्याची धारणा होती. हिंदुस्तानात आधुनिक पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार झाला तर हे स्थित्यंतर आपसुखे स्वगतीने होईल आणि त्याची परिणती अधिक श्लाघ्य असेल. ते ख्रिस्ती धर्मोपदेशकी प्रयत्नांपेक्षा श्रेयस्कर ठरतील. भारतात आकाराला येणारे ख्रिस्तधर्माचे रूप आपल्या एकोणिसाव्या शतकातल्या ख्रिस्ती धर्मापेक्षा फार निराळे असेल, असेही त्याने म्हटले आहे.

हिंदू आणि अन्य ख्रिस्तेतर धर्माबद्दल तो आदरपूर्वक आस्थेने बोलत असे. त्याच्या अशा धारणांमुळे पारंपरिक ख्रिस्ती अनुयायांमध्ये त्याचा फार तिटकारा होता. इतका की, त्याची ऑक्सफर्डात बोडेन प्राध्यापक म्हणून नेमणूक होऊ  शकली नाही! कारण सर्व रोमन कॅथोलिक चर्चने त्याच्या लिखाणाविरुद्ध ख्रिस्तद्वेषी म्हणून रान उठविले. अनेक तत्कालीन विद्वानांनी केलेली त्याची शिफारस पार दुर्लक्षिली गेली. त्याच्या तुलनेने विद्वत्तेत अगदीच ठेंगणा वाटणाऱ्या मोनियर विल्यम्सची तिथे वर्णी लागली. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज ही मुळात ख्रिस्ती धर्माची पाठशाळा आणि विद्यालये! तिथे अन्य धर्मीयांचा छळ होणे, त्यांना वाळीत टाकल्यागत वागवणे हे सरसहा आणि नित्याचे होते. मॅक्सम्युल्लर त्यामुळे वारंवार उद्विग्न होऊन ऑक्सफर्ड सोडण्याचा विचार करत असे पण त्याचे हितचिंतक विद्वान आणि समर्थक त्याला परावृत्त करीत राहिले.

अनेक भारतीय विद्वान त्याचे मित्र होते. त्यातले सर्वात लक्षणीय विद्वान म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचे ‘आक्र्टिक होम इन वेदाज्’ हे पुस्तक वाचून मॅक्सम्युल्लरने त्यांचे फार आदरयुक्त कौतुक केले. टिळकांना राजद्रोह खटल्यात १८८७ साली तुरुंगात टाकल्यावर अशा विद्वानास शिक्षा करणे गैर व असभ्य असल्याची टीका करून त्यांच्या सुटकेची मागणी मॅक्सम्युल्लरने केली होती. मॅक्सम्युल्लर मरण पावल्यावर ६ नोव्हेंबर १९०० रोजी टिळकांनी त्यांच्या मृत्यूनिमित्ते लिहिलेला अग्रलेख आहे.   

१८८२ साली ‘हिंदुस्तानाकडून आपण (म्हणजे इंग्लंडने) काय शिकावे’ या शीर्षकाची त्याने सात व्याख्याने केम्ब्रिजमध्ये दिली. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे हिंदुस्तानात धाडण्यापूर्वी केम्ब्रिजात प्रशिक्षण होत असे. त्या आयसीएस निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेली ही व्याख्याने मुळातून वाचावी अशी. वानगीदाखल त्यातले निवडक उतारे पाहू – ‘आयसीएस परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की त्यांनी संस्कृत भाषेच्या अभ्यासाला वाहून घ्यावे. त्यावर हे विद्यार्थी मला विचारतात की ‘संस्कृत भाषा शिकून काय फायदा होणार? शाकुंतल, मनुस्मृती, हितोपदेश अशा ग्रंथांचा अनुवाद इंग्रजीत आहेच की!’.. ‘संस्कृतमध्ये शिकण्यास योग्य असे नवे काहीच नाही. आणि जर काही ज्ञान त्यात असेल तरी ते शिकण्याची फिकीर आम्ही का करावी?’.. संस्कृत साहित्याचा जर मन लावून अभ्यास केला तर ते साहित्य किती उत्तम आहे व ते साहित्य आम्हाला जे शिकवू शकते ते आपल्याला ग्रीक साहित्यातून कधी शिकता येणार नाही, हे उमगेल.’

बौद्ध त्रिपिटक ग्रंथातील तिबेटी अनुवादात एक नीतिकथा मिळते. दोन स्त्रिया आपणच बालकाची खरी आई आहोत असा हक्क सांगतात. अशीच ज्यूंचा राजा सुलेमान याच्या न्यायाची कथा आहे. त्यांनी दिलेल्या निर्णयांची तुलना केली तर ‘या बौद्धकथेत माणसाच्या स्वभावाचा केलेला सखोल अभ्यास दिसतो राजा सुलेमानपेक्षा बौद्ध कथेत जास्त हुशारी आणि विवेक दिसतो.’‘तुम्ही मला विचाराल की या आकाशातळी मानवी बुद्धीचा प्रकर्ष कुठे झाला असेल? तर तो भारतात असेच मी सांगेन.. आपण युरोपातील लोक फक्त ग्रीस व रोमन तत्त्वज्ञानांच्या अभ्यासातच वाढतो. परंतु ज्याला आपले पृथ्वीवरील जीवन धन्य करायचे आहे.. किंवा ज्याला शाश्वत शांतता हवी असेल त्याला भारतीय तत्त्वज्ञानाकडेच वळावे लागेल.’

त्याने संपादित आणि अनुवादित केलेले ‘सेक्रेड बुक्स ऑफ ईस्ट’ या पुस्तकाचे ५० खंड त्याच्या अफाट अध्ययन क्षमतेची, विद्वत्तेची पुरेशी साक्ष आहेत. याखेरीज त्याचे अनेक संशोधनपर वैचारिक लिखाण आहे. हिंदुस्तानात पाऊल न ठेवलेल्या आणि ऑक्सफर्डमध्ये तुलनेने वाळीत पडलेल्या या जर्मन विद्वानाचे वर्णन करताना टिळकांच्या मृत्युलेखाचे शीर्षक आठवावे ‘स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते’.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.