scorecardresearch

संतूर हेच जीवनध्येय

एकेकाळी जम्मू- काश्मीरमधील लोकसंगीतातील संगतीचे वाद्य म्हणून ओळखले जाणारे संतूर हे शिवकुमार यांच्या वडीलांनी त्यांच्या हातात वयाच्या तेराव्या वर्षी ठेवले.

अभिजात संगीताच्या क्षेत्रातील नव्या दमाच्या दमदार कलावंतांसाठी स्वरमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘शागीर्द’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत २०१५मध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि ज्येष्ठ संतूरवादक शिवकुमार शर्मा उपस्थित होते.

एकेकाळी जम्मू- काश्मीरमधील लोकसंगीतातील संगतीचे वाद्य म्हणून ओळखले जाणारे संतूर हे शिवकुमार यांच्या वडीलांनी त्यांच्या हातात वयाच्या तेराव्या वर्षी ठेवले. त्याच काळात उत्तम तबलावादक म्हणून त्यांची ओळख झालेली होती. या नव्या वाद्याची ओळख करून घेता घेता, ते त्याच्या आकंठ प्रेमातच पडले आणि संतूर हेच त्याचे जीवनध्येय झाले.

जम्मू हेच त्यांचे जन्मस्थान. जम्मू- काश्मीरच्या खोऱ्यात शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध् असलेले पंडित उमा दत्त शर्मा हे त्यांचे वडील. वडिलांनी शिवकुमार यांना वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच तबला आणि गायनाचे धडे द्यायला सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकणारे संतूर हे वाद्य शिकण्यासाठी त्यांच्या हातात आले ते वयाच्या तेराव्या वर्षी. लोकसंगीताशी जोडले गेलेले किंबहूना लोकवाद्य म्हणून जम्मूमध्येच प्रसिद्ध् असलेले संतूर हे वाद्य. हे वाद्य आपल्या मुलाने वाजवावे आणि त्याला वेगळी ओळख मिळवून द्यावी ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तोच ध्यास शिवकुमार शर्मा यांनी घेतला आणि ते संतूर वादनात रमले. या वाद्यात काही बदल करत, वादनाची काही तंत्रे विकसित करत त्यांनी त्यावर केवळ हुकूमत मिळवली असे नाही, तर शास्त्रीय संगीताची मैफल संतूर वादनाने रंगवणारे ते पहिले वादक होते. १९५५ मध्ये त्यांनी मुंबईत पहिल्यांदा संतूर वादनाचा जाहीर कार्यक्रम केला. सतार आणि सरोद यांच्या जोडीला संतूर वाद्य नेऊन ठेवण्याचे श्रेय हे त्यांच्याकडे जाते.

प्रत्येक पिढीतील कलाकाराचा संघर्ष हा वेगळा असतो, असे ते म्हणत असत. त्यांचे पुत्र राहुल शर्मा यांनीही संतूर वादनाचा वारसा पुढे नेला, पण त्यांनी फ्युजन संगीतावर अधिक भर दिला. फ्युजनला आपला विरोध कधीच नव्हता, असे म्हणणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे राहुल हे आवडते शिष्य होते. त्यांच्या मते संगीत हे शिकवता येते, ते समजून घेता येते, मात्र संगीतकार होणे हे केवळ शिकून साध्य होत नाही. संगीतरचना करण्याची कला, ती समज उपजत असावी लागते, असे ते म्हणत असत. खुद्द शिवकुमार यांनी प्रसिद्ध् बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरीने चित्रपट संगीतही दिले होते. ‘शिव – हरी’ या नावाने प्रसिद्ध् असलेल्या या जोडगोळीने ‘सिलसिला’, ‘लम्हे’, ‘चांदनी’, ‘डर’ अशा काही चित्रपटांनी संगीत दिले होते. त्याआधी स्वतंत्रपणे शिवकुमार यांनी दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील काही दृष्यांच्या पार्श्वसंगीतासाठी संतूरवादन केले होते. १९६० साली त्यांनी आपला स्वतंत्र अल्बम काढला. त्यांनी संतूर आणि इतर पारंपरिक झ्र् आधुनिक वाद्ये यांच्या एकत्रित वादनाचेही अनेक प्रयोग केले. १९६७ साली त्यांनी हरिप्रसाद चौरसिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा यांच्या साथीने ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम केला. ‘फीलिंग्ज’ आणि ‘माऊंटन’ हेही त्यांचे प्रयोगशील संगीत अल्बमही लोकप्रिय ठरले. शाळा-शाळांमधून शास्त्रीय संगीत हा अभ्यासाचा भाग म्हणून शिकवले गेले पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. या अभ्यासातून सगळेच गायक-वादक घडतील, असे नाही. मात्र शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असणारे कानसेन निर्माण होणेही तितकेच गरजेचे आहे, असे मत त्यांनी एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले होते.

शास्त्रीय संगीताची जाण नसणाऱ्यालाही त्या सुरांची सहज मोहिनी पडावी, असे पंडित शिवकुमार शर्मा यांचे वादन होते. संतूरला अभिजात संगीताच्या क्षेत्रात मान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च मानासह ‘संगीत नाटक अकादमी अवॉर्ड’ अशा अनेक देशोदेशींच्या सन्मान आणि पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

परिचय

 • पंडित शिवकुमार शर्मा यांचा जम्मूमध्ये  १३ जानेवारी १९३८ ला जन्म.
 • वयाच्या १३ व्या वर्षी संतूर वादनाला सुरुवात.
 • १९५५ साली मुंबईत पहिल्यांदा शास्त्रीय संगीत कार्यक्रमात संतूर वादन
 • १९६० साली पहिला स्वतंत्र अल्बम
 • १९६७ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काब्रा यांच्याबरोबर ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम
 • १९८० मध्ये ‘शिव – हरी’ संगीतकार जोडी म्हणून ‘सिलसिला’ चित्रपटाला संगीत आणि १९८९ मध्ये ‘चांदनी’ चित्रपटाला संगीत
 • १९८५ मध्ये संयुक्त राज्य बाल्टिमोरचे मानद नागरिकत्व प्रदान
 • १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • १९९१ मध्ये पद्मश्री किताब देऊन सन्मान
 • २००१ मध्ये पद्मविभूषण हा सर्वोच्च किताब देऊन सन्मान
 • २००२ मध्ये ‘जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज : माय लाईफ इन म्युझिक’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

आ  द  रां  ज  ली

संतूरवादक व ज्येष्ठ संगीतकार,पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहचले आहे, तिथे संतूर पोहचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री

पं. शिवकुमार शर्मा हे संगीत क्षेत्रात हिमालयासमान व्यक्तिमत्त्व होते. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. संतूर या वाद्याला त्यांनी प्रस्थापित केले आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी जगभरात हे वाद्य पोहोचवले. पं. भीमसेन जोशी यांचे आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे घनिष्ट संबंध होते. ५० च्या दशकात जम्मूमध्ये असताना ते तबलावादन करायचे आणि या काळातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाला तबला साथ केली होती.

– श्रीनिवास जोशी,   पं. भीमसेन जोशीे यांचे पुत्र आणि शिष्य

पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आपण एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. कलाकार म्हणून ते समृद्ध होतेच परंतु, एक विचारवंत, आपुलकी जपणारी व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी संतूरवादनात स्वत:च शैली निर्माण केली.

– राहुल देशपांडे, प्रसिद्ध गायक

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला. त्यानुसार बुधवारी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

पं. शिवकुमार शर्मा हे संगीत क्षेत्रातील भीष्माचार्य होते. संतूर या वाद्यावर त्यांनी अखंड प्रेम केले आणि त्याला ओळख निर्माण करून दिली. त्यांचा मृदू स्वभाव आणि आपुलकीचे शब्द मनाला प्रसन्न करणारे असायचे. 

– पं. अतुलकुमार उपाध्ये, ज्येष्ठ व्हायोलिन वादक

पं. शिवकुमार शर्मा हे केवळ संतूरवादक नव्हते. तर, संगीतातील जाणकार व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख होती. काश्मीरच्या लोकसंगीतामध्ये साथीला म्हणून वापरल्या जाणाऱ्या संतूर या वाद्याला त्यांनी जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिली. 

– डॉ. जब्बार पटेल, चित्रपट दिग्दर्शक

औरंगाबाद येथील माझ्यासारख्या मुलाला पंडितजींकडे संतूर शिकण्याचे भाग्य लाभले. त्यांनी मुलासारखे माझ्यावर प्रेम केले. मी स्वरमंडलवर संतूर निर्मितीच्या केलेल्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले होते. ‘श्रीनगरच्या निर्मात्याचा पत्ता देतो तेथून संतूर घे’ असे त्यांनी मला सांगितले. त्यांच्याबरोबर काही मैफिलींमध्ये वादन करण्याची लाभलेली संधी हा माझ्या आयुष्यातील मोठा बहुमान आहे, अशीच माझी भावना आहे. चित्रपटामध्ये वादन करण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिले. पंडितजींच्या निधनामुळे पोरका झाल्याची भावना आहे.

– दिलीप काळे, पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य

संतूर या वाद्याचा शास्त्रीय संगीतामध्ये जन्म पंडितजींमुळे झाला. १९९३ पासून मी त्यांच्या वादनाला साथसंगत करतो आहे. ते स्वत: तबलावादक होते. त्यामुळे त्यांचा लयीचा अभ्यास वेगळा होता. वाद्याला साजेल असे सुरांचे आणि लयीचे वेगळे काम त्यांनी केले. 

– विजय घाटे, प्रसिद्ध तबलावादक

सकारात्मक उर्जेचा सूर

– पं. सतीश व्यास

काश्मीरच्या निसर्गातील सौंदर्य आणि निर्मळता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होती. त्याचबरोबर समर्पित होण्याची वृत्तीही. त्यांच्या संतूरचा झंकार प्रत्येकवेळी तृप्त करणारा होता. पंडित शिवकुमार शर्मा या नावाबरोबरच नजरेसमोर उभी राहणारी प्रसन्न मुद्रा आणि कानात गुंजारव करणारे तरल सूर भारतीय शास्त्रीय संगीताची जेमतेम तोंडओळख असलेल्या श्रोत्यांनाही जगण्याची उमेद देणारे, शांत करणारे.. तेथे आम्हा शिष्यांची अवस्था काय सांगावी?

संगीताशी पूर्णपणे तादात्म्य पावलेले माझे गुरुजी पंडित शिवकुमार शर्मा यांनी संगीत ही अनुभूती आहे हे संस्कार आम्हा शिष्यांवर जसे केले, तसे ते श्रोत्यांवरही केले. उमटणारा प्रत्येक सूर कानात, मनात आयुष्यभर साठवून ठेवावा असा. आजूबाजूच्या कोलाहलात शांत करणारा. त्यांचे वादन ऐकण्याबरोबरच रागाशी, त्यातील स्वरांशी एकरूप झालेली त्यांची भावमुद्रा पाहणे हा सोहळा असे. पुण्यात ओशो यांच्या आश्रमात त्यांची मैफल होती. मी त्यावेळी तानपुऱ्याची साथ करत होतो, तर उस्ताद झाकीर हुसेन तबल्याची. गुरुजींनी जोगकंस राग घेतला होता. गुरुजींनी वादन पूर्ण केले त्यावेळी कुणालाही टाळी वाजवण्याचे काय तर हुंकार देण्याचेही भान राहिले नव्हते. गुरुजी आणि श्रोते पूर्णपणे सुरांशी एकरूप झाले होते. गुरुजी शांतपणे तेथून उठले. श्रोतेही तृप्त होऊन तेथून बाहेर पडत होते. त्या मैफलीने मला खूप काही शिकवले. जगभरातून अनेक नवे श्रोते भारतीय शास्त्रीय संगीताशी जोडले गेले ते गुरुजींचे संतूर ऐकून.

 मुळात भारतीय शास्त्रीय संगीताचा भाग नसलेले संतूर हे वाद्य. मात्र आज शास्त्रीय संगीतापासून वेगळे करता येऊ नये इतके त्याचे घट्ट नाते निर्माण झाले आहे. सूफी संगीतातील हे वाद्य भारतीय शास्त्रीय संगीताच्या चौकटीत रुजवणे तसे सोपे नव्हते. गुरुजींनी त्यांच्या सतराव्या वर्षी हाती संतूर घेतला. त्यांचे वडील पंडित उमादत्त शर्मा हे त्यांचे पहिले गुरू. ते शास्त्रीय गायक, बडे रामदासजी यांचे शिष्य. त्यांच्याकडून तबला वादन आणि गायनाचे धडे गिरवत असताना पं. उमादत्तजींनी गुरुजींच्या हाती संतूर ठेवला. त्या क्षणापासून हा अलौकिक प्रवास सुरू झाला. एखादे वाद्य घेऊन त्यावर शास्त्रीय संगीत वाजवणे इतके ते वरवरचे, सोपे नव्हते. शततंत्री वीणा ही संतूरची मूळ ओळख. म्हणजेच शंभर तारा असलेले हे वाद्य. परंतु भारतीय शास्त्रीय संगीतातील तीन सप्तके, प्रत्येक सूर सामावून घेण्यासाठी त्यांनी वाद्याच्या रचनेतही काही बदल केले. आलापातील कोणताही सूर निसटू नये, त्याची अखंडता टिकून राहावी अशी वाद्यरचना त्यांनी केली. सहजपणे या वाद्याचा स्वीकार शास्त्रीय संगीत जगतात झाला नाही. त्यावेळी मुंबईत स्थायिक झालेल्या गुरुजींनी पुन्हा जम्मूतही परतावे लागले होते, हे आज अविश्वसनीय वाटावे असे आहे. संयमाची, नवे काही सतत करण्याची आणि त्याचवेळी नव्याला स्वीकारण्याची शिकवण गुरुजींच्या सान्निध्यात नकळतपणे मिळत गेली.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Santoor goal of life folk music companionship sivakumar tabla instrument life goal ysh