|| माधव गाडगीळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सायलेंट व्हॅली’ वाचवण्यासाठी अभ्यास करून, लोकांपर्यंत तो पोहोचवून आणि आंदोलनांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरून पर्यावरणवादी चळवळींना वस्तुपाठ घालून देणारे वनस्पतीशास्त्रज्ञ व लेखक एम. के. प्रसाद यांचे निधन १७ जानेवारीस झाले. ‘माधव गाडगीळ आयोग’  म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या ‘पश्चिम घाट परिसंस्था तज्ज्ञ समिती’च्या प्रमुखांचे प्रसाद यांच्याशी सुहृदाचे नाते होते, त्यांनी सांगितलेल्या या आठवणी…  

सुदैवाने मला आयुष्यात चार उमद्या स्फूर्तिदायी व्यक्तींचा सहवास लाभला. पहिले माझ्या वडिलांचे मित्र पक्षीशास्त्रज्ञ सलीम अली, दुसरे माझे हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक उत्क्रांतीशास्त्रज्ञ  एडवर्ड विल्सन, तिसरे भारतातल्या पर्यावरणवादी चळवळीचे अध्वर्यू एम के प्रसाद आणि चौथे चिपको आंदोलनाचे प्रणेते सर्वोदयवादी चंडीप्रसाद भट्ट. यांच्यातले माझ्याहून ४६ वर्षांनी ज्येष्ठ सलीम अली मी ४४ वर्षांचा असतानाच कालवश  झाले. एडवर्ड विल्सन गेल्याच आठवड्यात आणि आता परवा एम के प्रसाद पडद्याआड गेले आहेत.  झुंजार प्रसादांनी  १९७३ साली अगदी एकट्याने, पण पूर्ण निग्रहाने सायलेंट व्हॅली वाचवण्याची चळवळ हाती घेतली. तेव्हापासून मी त्यांची ख्याती ऐकली होती. त्यानंतर सहा वर्षांनी १९७९ साली मी त्यांना प्रथम भेटलो आणि लक्षात आले की हा एक इतरांहून आगळावेगळा शास्त्रज्ञ आहे. सामान्य लोकांपर्यंत शास्त्रीय ज्ञान पोहोचवून त्या ज्ञानाच्या आधारे त्यांना समाजहितकारक कामाकडे प्रवृत्त करणे हा त्यांचा एकमेव ध्यास होता. प्रसादांचा घट्ट आग्रह होता की सामान्य लोकांनी डोळे उघडे ठेवून सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना आव्हान दिले पाहिजे-   मग त्या सनातनी  पंडितांच्या स्त्री-शूद्रांना तुच्छतेने वागवण्याच्या  अंधश्रद्धा असोत की विकृत विकासवासनेने पीडित आधुनिक पंडितांच्या, ‘आर्थिक विकासासाठी पर्यावरणाची सर्व प्रकारची हानी सोसलीच पाहिजे’ अशा धर्तीच्या अंधश्रद्धा असोत. 

पेरियार नदीच्या मुखाजवळच्या निसर्गरम्य वाय्पीन बेटावर एके काळी अस्पृश्य लेखल्या जाणाऱ्या ईळवा समाजात प्रसादांचा जन्म  झाला. खारफुटीची वनराजी आणि पाणपक्ष्यांचा गजबजाट यांनी  समृद्ध अशा या बेटाचा रासायनिक प्रदूषणाने जो विध्वंस केला होता तो आहात पाहात ते वाढले. नारळाची तसेच नैसर्गिक जंगलातल्या भेरली माडाची ताडी काढणे हा ईळवांचा पारंपरिक व्यवसाय होता. या व्यवसायामुळे त्यांना निसर्गातल्या वनौषधींचे भरपूर ज्ञान होते आणि या ज्ञानामुळे त्यांना समाजात वैद्य म्हणून मानमान्यता होती. याच्या जोडीला बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे सिंधमधून सनातन्यांनी हाकलून दिलेला आयुर्वेदतज्ज्ञ वाग्भट केरळात दाखल झाला. ईळवा समाजाकडून वनऔषधी जाणून घेत त्याने ‘अष्टांगहृदय’सारखे आयुर्वेदिक ग्रंथ रचले. या परंपरेमुळे देशात इतरत्र तथाकथित खालच्या जातीतील लोकांना वज्र्य असलेले संस्कृत भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार ईळवांना देण्यात आला. 

याच ईळवा समाजात नारायण गुरू हे आपल्या जोतिबा फुले यांच्यासारखे  समाजसुधारक जन्मले. त्यांनी ईळवांनी केवळ आयुर्वेदापुरते संस्कृत वाचायचे हा निर्बंध झुगारून दिला, संस्कृत धर्मग्रंथांचा अभ्यास करून जातीव्यवस्था नाकारणारी, सर्व वर्णांच्या लोकांना खुली अशी ईश्वरभक्ती प्रचारात आणली. नारायण गुरूंचे अनुयायी बुद्धिवादी व समतावादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे प्रभावी लेखक व वक्ते अय्यप्पन, हेही एम. के.  प्रसादांच्या वाय्पीन बेटावरच जन्मले.  या अय्यपन यांनी सर्व जातीच्या लोकांनी एकत्र जेवण्याची मिश्र भोजनाची चळवळ सुरू केली. प्रसादांचे काका कृष्ण सीरी हे पण एक सुप्रसिद्ध वैद्य होते.  ते या मिश्रभोजनात सहभागी झाले. हे सगळे लहान वयात बघत प्रसाद वाढले. प्रसादांनीही वैद्य बनावे अशी त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा होती. पण त्यांनी वनस्पतिशास्त्रज्ञ  बनण्याचे ठरवले आणि त्या शास्त्रात एम.एस्सी. पदवी संपादक करून जन्मभर अध्यापनाच्या व्यवसायात पडले. आधी महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर कोळिकोड विद्यापीठाचे प्र-उपकुलगुरू असा त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कारकीर्दीचा आलेख राहिला.

आरंभी आपले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे या ऊर्मीतून प्रसाद विज्ञान विषयावरील सामान्य लोकांसाठीच्या लेखनाकडे वळले. याच उद्दिष्टानुसार १९६२ साली ‘केरळ शास्त्र साहित्य परिषदे’ची स्थापना केली गेली होती. त्या उद्दिष्टानुसार प्रसाद त्यांच्या ‘शास्त्रगती’, ‘वयुरेका’ या मासिकांत मुबलक लेखन करू लागले.  पण ते स्वतंत्र बुद्धीचे विचारवंत होते आणि केवळ विज्ञान विषय लोकांपर्यंत पोहोचवावा एवढेच मर्यादित उद्दिष्ट त्यांना रुचले नाही.  तेव्हा १९७१ साली त्यांनी केरळ शास्त्र साहित्य परिषदेद्वारे एर्नाकुलम जिल्ह्याच्या प्रदूषण प्रश्नांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांना आमंत्रित करून एक परिसंवाद आयोजित केला. अशा रीतीने शास्त्र साहित्य परिषद लोकांना विज्ञानविषयक माहिती देण्याच्या उद्दिष्टाच्या पुढे जाऊन,  समाजाच्या जिव्हाळ्याच्या समस्यांवर विज्ञान काय प्रकाश टाकते हेही चर्चेत आणू लागली. याला आकर्षित होऊन परिषदेला मोठ्या प्रमाणावर नवे सदस्य जोडून घेऊ लागले. मग परिषदेने चाळियार नदीचे प्रदूषण व सायलेंट व्हॅली प्रकल्पाचा साकल्याने विचार करत काळजीपूर्वक अभ्यासाच्या आधारावर पुस्तके प्रकाशित केली. १९७८ सालच्या सायलेंट व्हॅलीबद्दलच्या पुस्तकाच्या लेखनात परिसर शास्त्रज्ञ प्रसाद, ऊर्जा व्यवस्थापनतज्ज्ञ दामोदरन, अर्थशास्त्रज्ञ कन्नन व कृषीतज्ज्ञ श्यामसुंदर या सगळ्यांनी भाग घेतला होता. हे पुस्तक वाचून मी फार प्रभावित झालो.

तेव्हा संधी मिळताक्षणी १९७९ ऑक्टोबरमध्ये प्रसादांनी व मी सायलेंट व्हॅलीच्या सफरीवर पूर्ण दिवस बरोबर राहून आमच्या पुढच्या ४२ वर्षांच्या घट्ट मैत्रीची मुहूर्तमेढ रोवली. आमची पुढची भेट झाली फेब्रुवारी १९८० मध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या वार्षिक संमेलनाच्या व त्यासोबत त्रिशुवेपेरूर देवालयाच्या भव्य पटांगणात आयोजित केलेल्या सायलेंट व्हॅली विषयावरच्या आम आदमीच्या लोकसभेच्या निमित्ताने. या सभेत जी जोशात चर्चा झाली ती मी कधीच विसरणार नाही. आमच्या दोघांच्या आवडी-निवडी अनेक बाबतीत अगदी एकासारख्या एक होत्या. आम्ही दोघांनी जन्मभरात कधी कंठलंगोट बांधून गळा आवळून घेतला नाही किंवा पायात पॉलिश करून चकाकणारे चामडी बूट घातले नाहीत. त्रिशुवेपेरूरच्या मुक्कामात सगळे नेते आणि सामान्य सदस्य जमिनीवर चटया टाकून झोपलो, त्यात मी प्रसादांशेजारी पहुडलो होतो.

या सगळ्या लोकांना जागृत करण्याच्या व विषयाचा सर्व बाजूने शास्त्रीय ऊहापोह करण्याच्या प्रयत्नातून इंदिरा गांधी यांनी १९८३ साली  सायलेंट व्हॅली प्रकल्पाचे परिशीलन करण्यासाठी जी समिती नेमली, त्याचा मी एक सदस्य होतो आणि त्यासंदर्भात आम्ही पुन्हा एकत्र विचारविनिमय व काम केले. नंतर १९८६ साली जी देशव्यापी साक्षरता मोहीम सुरू झाली त्यात प्रसाद यांनी मोठा सक्रिय भाग घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एर्नाकुलम जिल्हा हा देशातला पहिलाच पूर्ण साक्षर जिल्हा बनू शकला. या नवसाक्षरांना समाजोपयोगी कामात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी १९९१ साली पंचायत पातळीवर नैसर्गिक व मानवी संसाधनांचे मोजमाप व  नोंदणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाचे फलित म्हणून १९९५-९६ साली केरळातील सर्व पंचायतींना सहभागी करून घेणारा लोक नियोजनाचा कार्यक्रम राबवला गेला. या सगळ्या कार्यक्रमांच्यात  मी मला शक्य तितका सहभागी झालो. विशेषत: लोकनियोजनाच्या कार्यक्रमातून खूप काही शिकलो व २०१०-११ च्या आमच्या पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या कामात हा आदर्श डोळ्यापुढे ठेवला. पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या  कामात प्रसादांनी आम्हाला खूपच मदत केली.

त्याचा एक भाग म्हणून कोका-कोला कंपनीला प्रभावी विरोध करून ग्रामपंचायतीचा सदस्यांच्या जीवनाच्या,  आरोग्याच्या व उपजीविकेच्या आड येणारे प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार ज्या बहादुरांनी प्रस्थापित केला त्या प्लाचीमडाला  मला घेऊन गेले. उच्च न्यायालयाचा व केरळच्या विधिमंडळाचा पाठिंबा असूनही इथल्या नागरिकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आम्ही गेलो तेव्हा रस्त्याच्या कडेला मंडप टाकून त्यांनी आपला विरोध चालू ठेवला होता. दुपारच्या बारा वाजताच्या उन्हात रस्त्यावरचे डांबर अचाट तापलेले होते. परंतु तशा डांबरावरही अनेक जण अनवाणी पायाने बिनधास्त चालत होते. विचार आला की हे खरे भूमातेशी जोडलेले लोक आहेत!  प्रसाद हेही असेच जमिनीशी जुळलेले, जमिनीवर पाय घट्ट रोवून ठाम उभे राहणारे क्रियाशील अभ्यासक!

त्यानंतर सरकारने हा पश्चिम घाटविषयक अहवाल लोकांकडे पोहोचू नये म्हणून शिकस्त केली, त्याला तोंड देत प्रसादांनी केरळ शास्त्र साहित्य परिषदेतर्फे अहवालाचा मल्याळम अनुवाद करून तो लोकांपर्यंत पोहोचवला. या अहवालाच्या पाठपुराव्यात ते मला सतत मदत करत राहिले.

आमच्या दोघांच्या कुटुंबाच्या पातळीवरही आमचे पहिल्यापासूनच घनिष्ठ संबंध राहिले. मला केरळाच्या टापीओका व माशांचा रस्सा या पाककृतीचा आस्वाद घेण्याची जबरदस्त इच्छा होती.  पण कुठल्याही हॉटेलात किंवा अतिथीगृहात हे मिळू शकत नव्हते. तेव्हा प्रसादांनी मुद्दाम त्यांच्या वाय्पीन बेटावरच्या भावाच्या घरी नेले; तिथे मी टापीओका-माशाचा रस्सा मनापासून ओरपला.

अलीकडे प्रसाद यांची प्रकृती खालावली होती, परंतु त्यातही ते उत्साहाने बोलत राहिले. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी मला फोन केला आणि माझ्या ‘वेस्टर्न घाटस् : अ लव्ह स्टोरी’ या पुस्तकाचा मल्याळम अनुवादही सिद्ध झाला आहे. लवकरच प्रकाशित होईल असे मी सांगितल्यावर ते जोरात म्हणाले की मग त्याच्या वितरण समारंभाला मीच अध्यक्ष राहीन.

त्यांच्या मृत्यूमुळे केरळ, भारत आणि जग एका सच्च्या कर्तबगार पर्यावरणवाद्याला  मुकले आहे.

madhav. gadgil@gmail. com

लेखासोबतच्या छायाचित्रात लेखक व डॉ. प्रसाद एर्नाकुलमच्या तन्नीरमोक्कम बंधाऱ्याजवळ, २ फेब्रुवारी २०२० रोजी. (सौजन्य : मल्याळम् मनोरमा)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silent valley active practitioner western ghats ecosystem expert committee by chemical pollution widow akp
First published on: 23-01-2022 at 00:17 IST