scorecardresearch

फक्त जर्मनीची नसलेली गोष्ट..

हाराल्ड येनर हे पत्रकार होते आणि बर्लिनच्या कला विद्यापीठात ‘सांस्कृतिक पत्रकारिता’ या विषयाचे अभ्यागत प्राध्यापक आहेत.

करोनाकाळानंतर पर्यटनाला ऊत येणं काय किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनांचं जगणं काय, दोन्ही सारखंच?

अभिजीत ताम्हणे

हाराल्ड येनर हे पत्रकार होते आणि बर्लिनच्या कला विद्यापीठात ‘सांस्कृतिक पत्रकारिता’ या विषयाचे अभ्यागत प्राध्यापक आहेत. त्यांनी मुळात जर्मनमध्ये लिहिलेल्या ‘वूल्फ्सझाइट’ (लांडग्यांचा काळ) याच पुस्तकाचा अनुवाद ‘आफ्टरमाथ’ या नावानं इंग्रजीत आला, त्याची वाहवा होऊ लागली.. कारण हे पुस्तक, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनीचं लोकजीवन कसं होतं, याचं साधार चित्र रेखाटतं. आजवर एकेका शहराच्या युद्धोत्तर लोकजीवनाबद्दल किंवा युद्धोत्तर काळाच्या एखाद्या पैलूवर लिहिलेली पुस्तकं आली. पण हे अख्ख्या जर्मनीबद्दलचं पुस्तक आहे. १९४५ ते १९५५ हा काळ लेखकानं अभ्यासला आहे. अर्थात पुस्तकातली प्रकरणं कालानुक्रमे नाहीत आणि पुस्तकाचा खरा भर १९४८ पर्यंत – म्हणजे जर्मनीचं विभाजन (१९४९) झालं नव्हतं तोपर्यंतच्या काळावर आहे.

प्रकरणं सुरू होतात उद्ध्वस्त शहरांची फेरउभारणी, पडक्या घरांतले लोक, भग्न मनोवस्थेतली जगण्याची धडपड इथपासून. पण हे उदात्तीकरण नाही, हे पहिल्या दोन-तीन पानांतच कळू लागतं. पुढल्या प्रकरणांमध्ये तर खाण्यासाठी, रोजच्या वस्तूंसाठी कसा काळाबाजार चालायचा याची तपशीलवार वर्णनं आहेत. लुटालूट करण्यासाठी लहान मुलांना पाठवलं गेल्याचे तपशीलही यात येतात. हे तपशील मिळवण्यासाठी त्या वेळच्या वृत्तपत्रांचा किंवा नियतकालिकांचा आधार होताच, पण लोकांच्या रोजनिशीतून, स्मृती टिपून ठेवणाऱ्या अनेक पुस्तकांतून आणि काही वेळा तर माहितीच्या दृष्टीनं काही संबंध नसलेल्या पुस्तक वा लेखांवर समीक्षकी ‘क्ष-किरण’ टाकून ते तपशील लेखकानं मिळवले आहेत, असं जाणवत राहातं. जर्मनीचा ताबा असलेल्या फौजांचं वर्तन कसं होतं, याची वर्णनं सर्वच प्रकरणांत येतात. रशियन सैनिकांनी स्त्रियांवर केलेले अत्याचार टिपून ठेवण्यात आले आहेत, तसंच अमेरिकी कोवळे तरुण जर्मनीत सैनिक म्हणून पाठवले गेले त्यांचं आकर्षण जर्मन स्त्रियांना वाटलं, हेही विस्तारानं लिहिण्यात आलं आहे. पण एकंदर जर्मनीतल्या स्त्रियांची स्थिती बदलत होती. हिटलरकाळात ‘माता, गृहिणी’ म्हणूनच हव्या असलेल्या महिला आता शहरं बांधत होत्या, अनेक जणी माजी सैनिक असलेल्या नि जीव वाचल्यानंतर घरीच परतलेल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावत होत्या, मायलेकींच्या एका जोडीनं तर ‘आज इथं तर काही महिन्यांनी तिथं’ असं करत मेंढीपालन आणि शेतीचा व्यवसायही सांभाळला. एका बेरकी बाईनं ‘महिलांसाठी मदत’ म्हणून सुरू केलेला व्यवसाय पुढे ‘सेक्स टॉइज’ धंद्यात स्थिरावला.. याच वेळी पराभूत मनोवस्थेतले पुरुष घर सोडत होते, फिरस्तेगिरी करत होते, काही जण शहरांतून खेडय़ांकडे चालले होते.

हिटलरच्या अमलाखाली जाऊन ज्यूंचे हाल करणारे लोक ‘सरळ’ कसे झाले, हे लेखकासाठी कोडं नाही. तो प्रश्न लेखकानं एका प्रकरणात जरा वेगळय़ा प्रकारे जरूर हाताळला आहे, पण त्याचं उत्तर अख्ख्या पुस्तकभर निरनिराळं सापडत राहातं. त्यादृष्टीनं महत्त्वाचे ठरतात ती या विषयाशी असंबद्ध भासणारी प्रकरणं- जिथं नाचाबद्दल, खाण्याबद्दल लिहिलंय. ‘जीव जगवावा लागतोच. चांगलं जगणं ही गरज असते माणसाची,’ असं काहीसं – राजकारणाला महत्त्वच न देणारं- उत्तर तिथं मिळतं. तर दुसरीकडे, जर्मन हे मूलत: आज्ञाधारक कसे, याची उदाहरणं येतात. अमेरिकन, रशियन, ब्रिटिश अशा दोस्त राष्ट्रांच्या फौजांशी या पराभूत जर्मन नागरिकांनी कधी फार टक्कर वगैरे दिली नाही. एकतर ते जीव जगवण्यात गर्क होते म्हणून आणि दुसरं- त्यांनी पराभवानंतरची ‘व्यवस्था’ स्वीकारण्याची, नव्या आज्ञापालनाची मानसिक तयारी केली होती म्हणूनही.

हे पराभूत जर्मन, अमेरिकी सैनिकांचा ताफा काही शहरांत आला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या सैनिकांनी फेकलेल्या सिगारेटी वा चॉकलेटे झेलत होते. इतका कसा फरक पडला, हा प्रश्न सोडवणं एकटय़ाचं काम नाही, हे लेखकाला मान्य असल्याची कबुली पुस्तकातून मिळते. आज्ञापालनाच्या जर्मन ‘गुणा’चं एक उदाहरण मात्र लक्षात राहील असं आहे. पन्नासहून अधिक जर्मन सैनिकांना दहापंधरा रशियन सैनिक जर्मनीहून रशियाला चालत घेऊन गेले.. ‘ठरवलं असतं सगळय़ांनी, तर पळून जाऊ शकले असते जर्मन सैनिक. पण मुकाटय़ानं ते चालत राहिले’. अशी वर्णनं करताना अर्थातच लेखकानं स्थळांची नावं, अनेक ठिकाणी व्यक्तींची नावं, सारं काही साधार लिहिलं आहे. पण त्या तपशिलांमध्ये वाचकांनी गुरफटू नये, हे बरं. तसं केल्यास ‘ते जर्मन होते आणि तेव्हा ते असे वागले इतकंच’ असा तुटलेपणा येण्याची शक्यता अधिक. पुस्तकाची ‘गोष्ट’ अखेर अख्ख्या मानवजातीची आहे. अवघ्या ७५ वर्षांपूर्वी असं घडत होतं, माणसं अशी वागत होती. जेते आणि पराजित अशी विभागणी सरळ दिसत होती आणि यापैकी जे पराजित होते त्यांनी स्वत:ला सावरण्यासाठी नाना उचापती केल्या कारण ते माणूस होते.. ही या पुस्तकाची गोष्ट. लेखकानं स्वत:ची मतं बेमालूमपणे मजकुराच्या रचनेमध्ये (म्हणजे तपशील तथ्यपूर्णच ठेवून, पण यानंतर हेच का सांगायचं याचे निर्णय स्वत:कडे राखून) मिसळली आहेत असं जाणवेलही. पण ती मतं डोईजड होत नाहीत. मजकुराशी खरोखरच एकजीव होतात आणि लेखकाला पडलेले प्रश्न वाचकालाही भिडू लागतात. अमेरिकनांनी मोजक्याच वास्तू बर्लिन वा अन्य शहरांत बांधून दिल्या पण त्यांतूनही अमेरिकी ‘खुलेपणा’चा कसा प्रचार केला, त्या तुलनेत रशियन कसे कमी पडले, हे सांगण्याचा लेखकाचा बाज मतप्रदर्शनाचा नसून तपशील पुरवण्याचाच आहे.

मार्टिन हायडेग्गर हा जर्मन तत्त्वज्ञ कृतिशील नाझीसमर्थक होता. त्याला नंतर पश्चात्ताप झाला म्हणा किंवा काहीही, पण युद्धानंतर तो माफीबिफी मागण्याच्या फंदात न पडता पुन्हा जणू काही घडलंच नाही अशा थाटात शिकवू लागला. त्याचा समाचार हे पुस्तक घेत नाही. पण त्या प्रवृत्तीबद्दल लेखक अन्य तपशील देतो. जर्मनांनी त्या काही वर्षांत तरी, ज्यू समाजाची माफी मागितली नाही वा समाज म्हणून दिलगिरी व्यक्त केली नाही. उलट सर्वसामान्य जर्मनांनी हिटलरी संहाराला दिलेल्या पाठिंब्याचा थेट उल्लेख न करता ‘मधल्या काळात समाज जणू नशेच्या आहारी गेला होता, ताळतंत्र हरवून बसला होता’ असं म्हणणं त्या काळच्या टीकाकारांनीही पसंत केलं.  युद्धात जो संहार झाला, ज्या आगळिका घडल्या त्यांच्याबद्दलची जाहीर ‘कन्फेशनं’ जर्मन पाद्रीमंडळींनी काढली, पण तिथेही सारा सूचक शब्दांचा मामलाच कसा होता, हे लेखक विस्तारानं सांगतो. हाना आरेण्ट हिला ही अळीमिळी खटकली ती कशी, हेही सांगतो. मात्र, कदाचित ‘सारं विसरून’ जगण्याच्या प्रयत्नातला तो एक भाग असावा, असा सूचक निष्कर्ष लेखकही वाचकापर्यंत पोहोचवतोच. इथे भारतीयांना गांधीहत्येपासून अनेक प्रसंग आठवू शकतात, पण असो.

या पुस्तकातून दिसणाऱ्या मानवी वर्तनाचा संबंध आजच्या काळाशी धडधडीतपणे जाणवेल, तो करोनाकाळानंतरच्या ‘रिव्हेन्ज ट्रॅव्हल’ किंवा सूडसहलींतून! आपण इतके दिवस घरी होतो म्हणून आता मोठय़ा सहलीला जायचं, असा प्रकार जगभरचे (ज्यांची कमाई हरपली नाही, ते) लोक करताहेत. या पुस्तकातल्या ‘डान्स’ आणि ‘नाइटलाइफ’ च्या वर्णनांशी त्याचं फारच साम्य जाणवतं. माणसांना जणू संकटातून बाहेर पडल्याचं समाधान पुरेसं नसतं, त्यांना स्वत:चा नि:श्वास स्वत:च ऐकायचा असतो! जर्मनीच्या गोष्टीऐवजी माणसांची गोष्ट म्हणून वाचण्यासारखं हे पुस्तक आहे.

abhijit.tamhane@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Something german coronation period tourism world war ii university cultural journalism ysh

ताज्या बातम्या