|| डॉ. जयदेव पंचवाघ

मेंदू आणि चेतासंस्था यांचा अभ्यास इसवीसनाच्या ३०० वर्ष आधी करणाऱ्या या वैज्ञानिकाला दूषणं दिली ती धर्ममरतडांनीच..

‘अलेक्झांड्रियाचा खाटीक’ असं नाव दिलेल्या हेरोफिलसबद्दल आज मी सांगणार आहे. हे दुर्दैवी नाव या महान शास्त्रज्ञाला का चिकटलं हे लेखाच्या शेवटी तुम्हाला समजेलच!

शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या यशस्वी शस्त्रक्रियेचा शोध लावण्यासाठी त्या अवयवाची निश्चित रचना आणि कार्य माहीत असणे गरजेचं आहे. मेंदूच्या बाबतीत बघायला गेलो तर हे आणखीनच क्लिष्ट आहे. कवटीच्या गोलाकार बंद पेटीत असलेला हा अवयव संपूर्ण शरीराचाच नियंत्रक आहे.

‘एखाद्या छोटय़ा आकाराच्या पेटीमध्ये अपरिमित माहिती लिहिलेल्या कागदाचा अनेक किलोमीटर लांब रोल मावावा आणि बसावा म्हणून निसर्गाने त्या कागदाचा घट्ट बोळा करून या पेटीत घुसवला आहे. त्यामुळे त्या कागदाला असंख्य घडय़ा आणि घडय़ांच्या मधल्या खाचाखोचा आहेत’ ..अशी साधारण ढोबळ कल्पना करता येईल. या विचित्र घडय़ांच्या मध्ये आपली स्मृतीची, भावनांची, विचारांची, संवेदनांची, हॉर्मोन्सची  अनेक ‘सर्किट’ आहेत. मेंदूच्या तळाला संपूर्ण शरीरावर अधिराज्य असलेली पियुषिका ग्रंथी आहे. ही गुंतागुंत कमी म्हणून की काय, कवटीच्या तळाला नानाविध छिद्रं आहेत. या छिद्रांतून मेंदूतून निघणाऱ्या निरनिराळय़ा नसा आणि रक्तवाहिन्या ये-जा करतात. कवटीच्या तळाला असलेल्या मोठय़ा भोकामधून ब्रेनस्टेम स्पायनल कॉर्ड म्हणून मणक्यामध्ये येते. ही अगदी ढोबळ रचना मांडली. या भागांचं कार्य काय आहे आणि ते कसं चालतं हा तर आणखी पुढचा विषय.

मेंदूची किंवा मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा विचार जरी करायचा असेल तर किती गुंतागुंतीच्या अवयवांशी आपला सामना आहे याची एक ही फक्त झलक आहे. आणि म्हणूनच, ख्रिस्तपूर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात या क्षेत्रात ज्या घटना घडल्या त्या महत्त्वाच्या आहेत. ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांचा इतिहास हा माणसाच्या मानवी शरीररचनेच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत देदीप्यमान असा होता. याचं कारण म्हणजे ख्रिस्त जन्मानंतर पुढची १४०० वर्ष विविध धर्माच्या आणि धर्मगुरूंच्या दबावाखाली हे संशोधन आणि शवविच्छेदन डबा-बंद होतं.

ज्याला शरीररचनाशास्त्राचा जनक मानलं जातं तो हेरोफिलस याच काळातला. भविष्यातील न्युरोसर्जरीसाठी आपल्या संशोधनाने आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेने शरीरशास्त्राचा पाया घातलेली ही एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती.

हेरोफिलसचा जन्म ख्रिस्तपूर्व ३३५ साली ‘कॅल्सिडॉन’ या आजच्या इस्तंबूलपासून अंगदी जवळ असलेल्या गावी झाला. थोडा मोठा झाल्यावर तो अलेक्झांड्रियामध्ये स्थायिक झाला. अत्यंत हुशार आणि बुद्धिमान तरुण डॉक्टर म्हणून त्याची ख्याती होती. अलेक्झांडरच्या जन्मानंतर सुरू झालेल्या उदारमतवादी आणि विज्ञाननिष्ठ काळाची त्याला साथ होती. टॉलेमी या राजाचं त्याला प्रोत्साहन होतं. टॉलेमीने जगातील विविध विषयांवरील दस्तऐवज आणि ज्ञान, विज्ञान व कला याविषयीचे लिखाण मिळवून अलेक्झांड्रियाच्या लायब्ररीत आणलं जावं असे निर्देश दिले होते. जुन्या डुढ्ढाचार्याच्या मताला न जुमानता मानवी शवविच्छेदनाला त्यांनी परवानगी दिली होती.

हेरोफिलस आणि त्याचा तरुण सहकारी ईरॅझिस्ट्रेटस या दोघांनी या काळात शेकडो शवविच्छेदनं केली. त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा योग्य फायदा घेऊन विज्ञानाधिष्ठित विचार रुजवण्यासाठी ही शवविच्छेदनं पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांनाही आमंत्रित केलं. असं म्हणलं जातं की, अलेक्झांड्रियाच्या चौकामध्येसुद्धा ही शवविच्छेदनं केली जायची.

या आधीच्या काळात इजिप्तशियन लोकांनी आणि अगदी अरिस्टॉटलसारख्या विचारवंतांनीसुद्धा मेंदू या अवयवाला फारसं महत्त्व नसतं आणि हृदय हाच महत्त्वाचा अवयव आहे असं ठासून सांगितलं होतं. हेरोफिलसनं मात्र त्याच्या शवविच्छेदनांवरून आणि प्राण्यांवरील प्रयोगांवरून सिद्ध केलं की मानवी विचार, भावना, संवेदना यांचं कार्य करणारा मेंदू हाच महत्त्वाचा अवयव आहे. नसा, रक्तवाहिन्या आणि स्नायूंचे ‘टेंडन’(हाडाशी जुळणारा भाग) यांच्यात फरक असतो हे त्यानं सिद्ध केलं. हालचाल करण्यासाठी मेंदूतून निर्माण होणारे संदेश हे नसांच्या म्हणजेच ‘नर्व्ह’च्या माध्यमातून स्नायूंपर्यंत पोहोचवले जातात हे त्यांनी जाणलं. संवेदनांचं (अ‍ॅस्थेटिक) आकलन हे नसांद्वारेच होतं हेही सिद्ध केलं. नसा आणि रक्तवाहिन्या या एकमेकांपासून वेगळय़ा असतात हे आज अगदी बाळबोध वाटणारं संशोधन त्यानंच केलं. नसांमधून ‘दिव्य-हवा’ म्हणजेच ‘न्यूमा’ वाहतो आणि नसा पोकळ असतात असं विधान अरिस्टॉटलनं केलं होतं. नसा या पोकळ नसून ‘मज्जा’ या पदार्थाने भरलेल्या असतात हे हेरोफिलसनं सिद्ध केलं.

हृदयातून रक्त निघून रक्तवाहिन्यांद्वारे विविध ठिकाणी पोहोचवलं जातं आणि परत हृदयाकडे आणलं जातं आणि हे रक्त नंतर फुप्फुसांमधूनसुद्धा फिरून हृदयात परत येतं हेही या दोघांनी सिद्ध केलं. हेरोफिलसने मेंदूकडून सुरू होणाऱ्या डोळय़ाच्या नसा व नसांची रचना तपशीलवार नमूद केली. डोळय़ाच्या रचनेचाही अत्यंत खोल अभ्यास त्यांनी केला. डोळय़ात नैसर्गिक भिंग असतं हे त्याला कळालं होतं. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या भागातून निघणाऱ्या सात नसांच्या जोडय़ा असतात हे त्यांनी नमूद केलं आहे. यापैकी एक एक जोडी हे ऐकणं, पाहणं, डोळय़ांची हालचाल करणं, जिभेची हालचाल करणं अशी कार्य करतात हे त्याला माहीत होतं (आज आपल्याला माहीत आहे की, अशा प्रकारच्या नसांच्या बारा जोडय़ा असतात).

मेंदूमध्ये पाण्याने भरलेल्या पोकळय़ा असतात आणि त्या पोकळय़ांची रचना ही विशिष्ट पद्धतीची असते हे त्यांनी विशद केलं. यापैकी सर्वात तळाशी असणाऱ्या पोकळीमध्ये, ज्याला आज आपण ‘फोर्थ व्हेंट्रिकल’ म्हणतो तेथे मनुष्याचा आत्मा असतो असं तो मानत होता. या पोकळीमध्ये मेंदूवर पिसाच्या लेखणीच्या टोकाप्रमाणे रचना असलेला भाग असतो. त्याला त्याने ‘कॅलॅमस स्क्रिप्टोरियस’ (कॅलॅमस- लिहिण्यासाठी वापरात येणाऱ्या जाड पिसाचे टोक; स्क्रिप्टोरियस- लेखणी) असं नाव दिलं. या कॅलॅमस स्क्रिप्टोरियसपाशी आत्मा असतो असं तो म्हणतो.

मेंदूकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या एकत्र येऊन  उलटय़ा इंग्रजी ‘टी’ अक्षराप्रमाणे ()जे ठिकाण असतं त्याला त्याने ‘टॉरक्युला’ असं नाव दिलं (त्या काळी द्राक्षाचा रस काढण्यासाठी हे यंत्र वापरलं जायचं ‘वाइन प्रेस’ त्याला ‘टॉरक्युला’ म्हणायचे). सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत शास्त्रीय नाव देण्याचा प्रघात त्यांनी पाडला. या अर्थाने तो लोकविज्ञान चळवळीचा आद्य कार्यकर्ताच होता असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. ‘कॅलॅमस स्क्रिप्टोरियस’ आणि ‘टॉरक्युलार हेरोफिलाय’ ही नावं आजही आम्ही न्युरोसर्जरीत वापरतो.

समाजाच्या चार पावलं पुढे असणाऱ्या लोकांना जसा त्रास सहन करावा लागतो त्याप्रमाणे हेरोफिलस व ईरॅझिस्ट्रेटस या दोघांनाही बदनामी सहन करावी लागली.. पण नशिबाने त्यांच्या मृत्यूनंतर. ज्युलियस सीझरने केलेल्या आक्रमणात अलेक्झांड्रियातील लायब्ररीचा बराचसा भाग आणि हेरोफिलसचं काही लिखाण जळून गेलं. ग्रीकांवर रोमन लोकांनी आधिपत्य प्रस्थापित केल्यावर आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म प्रस्थापित झाल्यानंतर धर्म-गुंडांनी या दोघांवर आरोप करून शवविच्छेदन, वैद्यकीय संशोधन आणि विज्ञानाधिष्ठित विचारसरणीवर बंदी आणण्यासाठी याचा वापर केला. मानवी शरीराबद्दलचं ज्ञान अशा रीतीने समाजाला कळालं तर यांचं दुकान कसं चालू राहणार? आपल्याशी न पटणाऱ्या लोकांना समाजात अपमानित करून सत्य लपवणं हे अनादी काळापासून सत्तापिपासू धर्म-गुंड आणि सत्ता-गुंड यांचे उद्योग आहेत.

हेरोफिलस  आणि ईरॅझिस्ट्रेटस या दोघांनी जिवंत माणसांची शवविच्छेदनं केली असा आरोप त्यांच्या मृत्यूनंतर तीनशे वर्षांनी करण्यात आला. हे दोघं शास्त्रज्ञ नसून खाटीक (बुचर्स ऑफ अलेक्झांड्रिया) होते असंही म्हटलं गेलं. मात्र काही ज्यू आणि इतर लोकांनी या दोघांच्या लिखाणाचं भाषांतर करून ठेवल्यामुळे हा आरोप बिनबुडाचा असावा असंच आज मानलं जातं.

प्राण्यांना बेशुद्ध करून श्वास आणि हृदय चालू असताना शवविच्छेदनं मात्र निश्चित केली गेली होती आणि आजही शास्त्रीय संशोधनात ती केली जातात. इसवीसन २०० मध्ये गॅलनच्या मृत्यूनंतर ग्रीक वैद्यकशास्त्रातला हा सुवर्णकाळ संपुष्टात आला. प्रयोग थांबले. शवविच्छेदनावर बंदी आली. समाजावर धर्ममरतडांची जरब आणि  अधिसत्ता सुरू झाली. धर्म आणि सत्ता गुंडांचा सुवर्णकाळ आणि विज्ञानाची काळी रात्र सुरू झाली.

सोळाव्या शतकात ‘व्हसॅलिस’नं शवविच्छेदन पुन्हा सुरू करेपर्यंत पहाट झालीच नाही.

हेरोफिलसचं लिखाण जरी अलेक्झांड्रियाच्या त्या दुर्दैवी आगीत जळून गेलं असलं तरी बरंचसं शिल्लकही राहिलं. समाजावर सत्ता गाजवण्यासाठी धर्माचा उपयोग करणाऱ्या प्रवृत्तींनी ते पुढे गाडूनही टाकलं.

तरीदेखील, मेंदू आणि एकूणच मज्जासंस्थेच्या शस्त्रक्रियांवर आजही  हेरोफिलसच्या अद्भुत लिखाणाचा पगडा कायम आहे.

लेखक चेतासंस्था शल्यविशारद आहेत. brainandspinesurgery60@gmail .com