शान्ता शेळके

माझ्या जुन्या कविता चाळताना, ध्वनिमुद्रित झालेली गीते ऐकताना किंवा संकलनांतून वाचताना त्या त्या कविता आपल्याला कशा सुचल्या, विशिष्ट गीतांच्या ओळी मनात कशा जुळून आल्या ते मला आठवते. मग कधी गंमत वाटते, कधी आश्चर्य वाटते, तर कधी एकूण निर्मितिप्रक्रियेबद्दलचे कुतूहलही मनात जागे होते. कवितेबाबत बोलायचे झाले तर ती कशानेही सुचते. नजरेत भरलेले एखादे दृश्य, एखादे चित्र, वाचनात आलेली गद्यातली वा कवितेतली इंग्रजी-मराठी ओळ, एखादे अवतरण, रस्त्याने जाता जाता सहज कानांवर पडलेले कुणाच्या तरी तोंडचे संदर्भहीन वाक्य, निसर्गाची विशिष्ट रूपकळा आणि तिने मनात जागवलेली भाववृत्ती, अकारण येणारी उदासीनता किंवा दाटून येणारा उल्हास, अनेक वर्षांपूर्वी अनुभवलेल्या सुखाच्या वा दु:खाच्या स्मृती आणि त्यांच्या योगाने अबोध मनात होणारी खोल गूढ चाळवाचाळव यांतले काहीही कविता सुचायला कारणीभूत होते. कधी कधी तर यांपैकी कसलेच कारण नसतानाही मनात एखादी प्रतिमा तरंगत येते, त्याभोवती शब्दांचे मोहळ जमते, कविता भरभर जुळत जाते, तर कधी गाढ झोपेतसुद्धा एखादी ओळ आपली आतल्या आत तयार होऊन बसलेली अवचित आढळते. ‘स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमक मला नच सापडले’ असे कविवर्य िवदा करंदीकर यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे, ते बऱ्याच अंशी खरे आहे. करंदीकरांची ही ओळ कवितानिर्मितीच्या गूढ, अनाकलनीय प्रक्रियेवर प्रकाश टाकणारी आहे. मनाच्या अबोध पातळीवर, नेणिवेत, अतक्र्य रीतीने काही ना काही चलनवलन चालू असते आणि त्यातून कवीच्याही नकळत त्याला कविता सुचते असा याचा अर्थ घेता येईल.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

मी कवितालेखनाला प्रारंभ केल्यानंतर पहिली पाचसहा वर्षे तरी मी कविता ‘करीत’ असायची. याचा अर्थ असा की समकालीन किंवा आधीच्या मान्यवर आणि विशेषत: माझ्या आवडत्या कवींच्या कविता डोळय़ांसमोर ठेवून मी त्याप्रमाणे हुबेहूब कविता लिही. त्या काळी तांबे आणि रविकिरण मंडळातले कवी यांचा दबदबा मराठी कविताक्षेत्रात होता. माधव ज्यूलियन आणि यशवंत हे तर माझ्या फार आवडीचे कवी होते. तेव्हा त्यांनी घालून दिलेल्या वाटांवरूनच माझ्या नवजात कवितेने आपली बाळपावले टाकायला सुरुवात केली असल्यास त्यात काही आश्चर्य नव्हते. मला आठवते, त्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत माझी अमुक एक कविता हुबेहूब माधव ज्यूलियन (किंवा तांबे किंवा यशवंत) यांच्यासारखी साधली आहे असे कुणी म्हटले तर मला फार आनंद आणि अभिमान वाटत असे आणि मग तशा ‘हुबेहूब’ कविता रचण्यात माझे तासन् तास जात असत. अमक्यातमक्यासारखी कविता लिहिणे व तशी कविता साधणे हे कवीला मोठेसे भूषणावह नाही. अनुकरण हे काही प्रमाणात समजण्याजोगे व समर्थनीय असले तरी आपल्या कवितेचा तोंडवळा आपल्यासारखाच हवा. कविता ‘रचायची’ नसते. ती ‘व्हावी’ लागते हे ज्ञान त्या भाबडय़ा आणि भावुक वयात मला नव्हते. म्हणून इतर नामवंतांच्या कविता पुस्तीदाखल समोर ठेवून तशा कविता लिहिण्यात बरेच दिवस गेले. अर्थात याचाही मला उपयोग झाला, नाही असे नाही. रविकिरण मंडळाच्या कवितांचे अनुकरण करताना भाषेवर काही हुकमत आली. निर्दोष व साक्षेपी रचनेचे संस्कार मनावर झाले. व्याकरणशुद्ध कसे लिहावे त्याचा तर वस्तुपाठच जणू मिळाला आणि त्यातूनच पुढे मला माझी स्वत:ची कविता सापडली.

माझ्या अनेक कविता अशा आहेत की त्या कशा सुचल्या हे मला सांगता येणार नाही. परंतु काही कविता कशा सुचल्या याचे लख्ख चित्र माझ्या मनात आहे आणि अशाच काही कवितांचे उगम सांगण्याचा या लेखात मी प्रयत्न करणार आहे. एक गोष्ट मात्र खरी की कविता अमुक कारणाने सुचली तरी प्रत्यक्षात त्या मूळ कारणापासून, प्रेरणेपासून ती पार तुटते आणि कवीच्याही ध्यानीमनी नसेल असे आपले एक वेगळे स्वतंत्र रूप ती धारण करते. इतर कवींबाबत मला काही सांगता येणार नाही, परंतु माझा तरी अनुभव असा आहे की, कविता सुचल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत ती आपले नेमके कोणते रूप घेऊन येणार आहे हे मला कळत नाही. म्हणजे माझी कविता लिहून होते तेव्हाच ती मलाही नेमकी दिसते.

एकदा ‘नॅशनल जॉग्रॅफिक’चे जुने अंक मी चाळीत होते. ‘नॅशनल जॉग्रॅफिक’ हे भूगोल विषयाला वाहिलेले एक अत्यंत संपन्न, दर्जेदार, खानदान असे मासिक आहे. यातले लेख तर माहितीपूर्ण असतातच, पण चित्रे केवळ अप्रतिम असतात. अंक चाळताना एक चित्र मी पाहिले. भोवती गडद निळा समुद्र आणि त्यातून वर आलेले हिरव्यागार झाडांवेलींनी झाकलेले एक देखणे चिमुकले बेट असे ते चित्र होते. चित्र बघून मी मंत्रमुग्ध तर झालेच, पण क्षणभर भोवतालचा सारा परिसर मला अदृश्य झाल्यासारखाच वाटला आणि आपण त्या बेटावर प्रत्यक्ष उभ्या आहोत असा मला भास झाला. तो भास इतका खरा होता ! मला भोवती उसळणारा समुद्र दिसत होता. त्याची गाज कानांवर पडत होती. बेटावरील माडापोफळींच्या झावळय़ांची सळसळ ऐकू येत होती आणि खारट वासाचे ओलसर उत्तेजक वारे देहाला वेटाळून निघून जात होते. त्या तंद्रीत मी होते आणि एकाएकी कवितेच्या ओळी मनात जुळून आल्या:

निळा निळा समुद्र आणि बेट पाचुचे मध्ये

तिथेच मी, तिथेच मी : मनात कोणिसे वदे

उभा समोर वृद्ध माड हालवीत झावळी

जळात गाइ अप्सरा उदास धून सावळी..

हा भास काही काळ टिकून लगेच नाहीसा झाला. सगळे चित्र डोळय़ांत उमटले आणि डोळय़ांतच मिटून गेले. तेवढय़ात शिंपला हलवला की त्यातून समुद्राची गाज कानी पडते, हा पाश्चात्य साहित्यातला संकेत मला आठवला. मग कवितेच्या शेवटच्या ओळी अशा तयार झाल्या:

पुराण शिंपल्यामधून गाज तीच ये पुन्हा

तळात खोल जागल्या अनंत जन्मिच्या खुणा

रितेच हात राहिले स्मृती कितीक वेचुनी

निळा निळा समुद्र गूढ मिटुनि जाय लोचनी.

या कवितेला मी ‘समुद्रगंध’ असे नाव दिले.

‘नॅशनल जॉग्रॅफिक’ मासिकातल्या आणखी एका चित्रामुळेही मला कविता सुचलेली आहे. तेही समुद्राचेच चित्र होते. कोणत्याशा समुद्राचा एक प्रचंड किनारा, काठावर माडांची घनदाट राई आणि अलीकडे पसरलेले विस्तीर्ण पांढरेशुभ्र वाळवंट. चित्र सुंदर होतेच. पण चित्राखालची इंग्रजी ओळ अधिक सुंदर होती.

 The sad lonely majestic beautiful seashores… ती ओळ कुठल्या इंग्रजी कवितेतली आहे की काय, मला माहीत नाही. पण त्या चित्राने, विशेषत: त्या ओळीने मला अगदी झपाटून टाकले. दोनतीन दिवस तीच एक ओळ मी सारखी गुणगुणत होते आणि मग एके दिवशी तो विस्तीर्ण समुद्रकिनारा समुद्राचा न राहता अचानक माझ्या मनाचाच किनारा बनला. त्या मन:स्थितीत मी पुढील कविता लिहिली :

सुंदर, उदास, एकाकी किनारे मनाचे

पुढे अपार सागर अंतहीन

ज्याचा ठाव लागत नाही,

अलीकडे माडांच्या झावळय़ांची मंद सळसळ

जी अंत:स्थ गूज सांगत नाही..

मूळ चित्रात माणसाचे काही चिन्ह नव्हते आणि मला मात्र तिथे कुणाचे तरी अस्तित्व सारखे जाणवत होते. माझ्या मनाच्या सुंदर, उदास, एकाकी किनाऱ्यावर कोण वावरत असेल? कदाचित माझेच ते पाठमोरे रूप असेल का?..मग कवितेच्या अखेरच्या ओळी अशा तयार झाल्या :

आणि एक आकृती, पाठमोरी पुढे पुढे जाणारी,

क्षणभरही मागे वळून न पाहणारी

तो चेहरा कुणाचा असेल?

काय दिलं कवितेनं ..

काय दिलं कवितेनं..

काहीच दिलं नाही कवितेनं

उलट बरंच काही घेतलं माझ्यातलं

बरंच काही देऊन

गाणं दिलं, आधी गुणगुणणं दिलं

छंद दिले, मुक्तछंद दिले

मग एक दिवस

प्रेम विरह आणि हुरहुर दिली

रडणं दिलं, उगाचचं हसणं दिलं

कडकडीत ऊन घामाच्या धारा

संध्याकाळ कातरवेळचा पाऊस

पावसाची पहिली जाणीव दिली

समुद्र दिला, किनारा दिला

लाटांवर हलणारी बोट

बोटीवरलं वाट पाहणं दिलं

नंतर रस्त्यांवरली निर्थक वर्दळ

रात्री अपरात्रीचे रिकामे रस्ते

त्यावरलं उगाचच चालणं दिलं

दिशाहीन निरंतर जागरणं, बिछान्यातली तळमळ

हळूहळू डोळय़ादेखतची पहाट दिली

पुढे निर्थक दिवस निर्हेतुक बसून राहाणं

त्यानंतर दारू, नशा, गडबड, गोंधळ

हँगओव्हर्स दिले हार्ट अ‍ॅटॅक वाटणारे

लगेच अ‍ॅसिडिटी, झिंटॅग-पॅनफॉर्टी

काल कागद दिला कोरा

आज न सुचणं दिलं

थांबून राहिलेला पांढराशुभ्र काळ

कागदावर पेन ठेवताना

अनिश्चिततेचा बिंदू बिंदूतून उमटलेला

उत्स्फूर्त शब्द वाक्य होता होता

झरझर वाहणारा झरा दिला

प्रसिद्धी, गर्दी, एकांत दिला गर्दीतला

ताल भवतालासह आकलन दिलं

दिलं राजकीय सामाजिक भान

लगेच भीती दिली

पाठलाग मागोमाग दहशत घाबरणं

गप्प होण्याआधीचं बोलणं दिलं

चिडचिड स्वत:वरली, जगावरला राग

अखेर जोखीम दिली लिहिण्याची

लिहिलेलं फाडण्याची हतबलता

अपरिहार्यता दिली

दिसेल ते पाहण्याची, पाहात राहण्याची

आज़ादी दिली, स्वातंत्र्य दिलं

पारतंत्र्य दिलं, आंधळं होण्याचं

दिलं बरंच काही दिलं पण

काढूनही घेतलं हळूहळू एकेक

आणि आज बोथट झालेल्या संवेदनेला

कविता म्हणते लिही आता लिही

    — सौमित्र