scorecardresearch

नजरेआडच्या वारशाची कहाणी

आपल्या आठवणी ही फार गमतीशीर गोष्ट असते. एखादी बाब लहानशीच असते, पण तिची सारखी आठवण येत राहाते.

नजरेआडच्या वारशाची कहाणी
ओतूरमध्ये भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांनी फुले दाम्पत्याच्या सहकार्यानं १५० वर्षांपूर्वी सुरू केलेली मुलींची शाळा. छायाचित्र- श्रीरंग भारंगे

श्रद्धा कुंभोजकर

१८ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘स्मारकं आणि वारसास्थळांचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त..

आपल्या आठवणी ही फार गमतीशीर गोष्ट असते. एखादी बाब लहानशीच असते, पण तिची सारखी आठवण येत राहाते. दुसरी एखादी ठळक घडामोड असते, पण आपण तिला मनाच्या खोल कप्प्यात टाकून नजरेआड करतो. कधी एखादी घडलेली गोष्ट आपण चक्क विसरून जातो आणि कधी कधी ‘अगा जे घडलेचि नाही’ त्याची चर्चा करत बसतो. दुसरीकडे आपण जगण्याच्या रहाटगाडग्यात कितीही गुंतलो तरी गतकाळाकडून मिळालेला वारसा आठवणीत जतन करायचे प्रयत्न करतो. ऐतिहासिक घडामोडींच्या स्मृती विसरल्या जाऊ नयेत यासाठी स्मारकं तयार करतो. १८ एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मारकं आणि वारसास्थळांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपला वारसा हा फक्त स्थानिक समाजापुरताच महत्त्वाचा आहे असं नाही, तर जगाच्या पाठीवरच्या सगळय़ा माणसांना या महत्त्वपूर्ण वारशाचे उत्तराधिकारी म्हणून तो समजून घेता यावा यासाठी  जागतिक वारसास्थळांची यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाते. महाराष्ट्रात लोणार, अजिंठा, वेरूळ, घारापुरी आणि मुंबईतील फोर्ट परिसर ही जागतिक वारसास्थळं आहेत.

या वारशाच्या सोबतीनं आपल्याला आपली खास ओळख मिळवून देणाऱ्या अनेक गोष्टींचा वारसा आपल्याला माहीत असतो, पण तो आपल्या वारशाच्या नकाशावर येत नाही. कारण आपली आठवण ही लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अतिस्मृती, स्मृतिक्षय, स्मृतिभ्रंश आणि मिथ्यास्मृतीच्या अवस्थांमध्ये गुंतून पडलेली असते. तर या नजरेआड केलेल्या वारशाची ही कहाणी काही उदाहरणांतून सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

‘उअअं लहिउण उत्ताणिआणणा होन्ति के वि सविसेसम्। रित्ता णमन्ति सुइरं रहट्टघडिअ व कापुरिसा ।।’

..रहाटाच्या गाडग्यात पाणी भरलेलं असतं तोवर त्याचं तोंड वर असतं. ती रिकामी झाली की त्याच्या माना खाली होतात. दुर्जनांचं वर्तन असंच असतं..

हा श्लोक आहे गोदावरीच्या तीरावर दीड-दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या ‘गाहासत्तसई’मधला. यातला रहाटगाडग्याचा उल्लेख लक्षणीय आहे. पर्शिया म्हणजे इराणमधल्या सिंचनव्यवस्थेत उदयाला आलेल्या पाण्याचा उपसा करण्याच्या या तंत्राचा प्राचीन काळी जगभर प्रसार झाला. आपल्या गोदावरीकाठच्या काव्यातही हे दिसतं. पण मानवी श्रमांकडून यांत्रिक श्रमाकडे वाटचाल होण्याच्या प्रवासातला हा अतिशय महत्त्वाचा तांत्रिक उत्क्रांतीचा टप्पा आपण वारसा म्हणून मानतो का? ऐतिहासिक वारशात या रोजच्या रहाटगाडग्याला जागा मिळताना दिसत नाही.

८०० वर्षांपूर्वी केशिराजबास यांनी संपादित केलेला ‘दृष्टांतपाठ’ हा चक्रधरस्वामींच्या तत्त्वज्ञानाचं दर्शन घडवणारा ग्रंथ कासवीचा दृष्टांत मांडतो.

‘कासवी असे: ते थडियेसि वीये: आपण ऐलाडि असे: तीयें पैलाडि असति:’

कासव एका काठावर अंडी घालून त्यापासून दूर जातं, तरीही त्या अंडय़ांचं संगोपन होतं, या निरीक्षणावर आधारित हा दृष्टांत आहे. आपल्याला मिळालेल्या महानुभाव विचारांच्या वारशामध्ये हे निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे. त्याला आपण धार्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक वारशापेक्षा वेगळं महत्त्व देतो का? आज वातावरण बदलातून होणाऱ्या जीवसृष्टीच्या विनाशाबाबत आपण भानावर येत आहोत. खरं तर या वर्षी या स्मारकं आणि वारसास्थळांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतानाचं सूत्रच वारसा आणि वातावरण हे आहे. हा जीवसृष्टीबाबतच्या ज्ञानाचा मध्ययुगीन वारसा आपल्याकडे आहे याची कृतज्ञ जाणीव ठेवण्याची गरज आहे.

वारसा आणि स्मारकं ही नेहमी सुखद आठवणींचीच असतात असं नाही. आधुनिक भारतानं अनुभवलेला साम्राज्यवाद हा संसाधनांच्या चोरीचा भीषण प्रकार आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजाला विळखा घालून बसलेली जातिव्यवस्था हादेखील संसाधनांच्या चोरीचा भीषण प्रकार आहे. दोनही प्रकारांत माणसांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे श्रम, त्यांची उत्पादनं आणि त्यांची प्रतिष्ठा हिरावली जाते. साम्राज्यवादाच्या वारशाला मुरड घालून सुंदर दिशा देणारी दोन स्मारकस्थळं यानिमित्त आठवता येतील.

भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील या सत्यशोधक विचारवंतानं फुले दाम्पत्याच्या सहकार्यानं ओतूरमध्ये १५० वर्षांपूर्वी सुरू केलेली मुलींची शाळा आजही ३५० विद्यार्थिनी आणि शिक्षकांसोबत वाटचाल करत आहे, असं श्रीकांत ढेरंगे या कार्यकर्त्यांनं नुकतंच दाखवून दिलंय. जातीय विषमता आणि पितृसत्तेच्या संकटातून तग धरायची तर शिक्षणाला पर्याय नाही हे ओळखून स्त्रिया आणि सामाजिक उतरंडीच्या तळाकडच्या माणसांसाठी अशा अनेक शाळा सत्यशोधकांनी सुरू केल्या होत्या. या संकटातून तग धरायची तर एका वेळी एकाच शोषणकारी व्यवस्थेचा सामना करता येईल, हे जाणून त्यांनी जातिव्यवस्थेसोबत आमनेसामने लढण्याचा आणि साम्राज्यवादी शासकांकडून शक्य तितक्या सुविधा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. जातपितृसत्तेचा शोषणकारी वारसा नाकारून सगळय़ा माणसांसाठी शिक्षणाची दारं मोकळी करणारी ही शाळा आपल्या वारसास्थळांच्या यादीत यायला हवी.

 दुसरं सुंदर स्मारकस्थळ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत. मुंबईचा पावसाळा सहन होत नसल्यामुळे जून ते ऑगस्टदरम्यान मुंबई प्रांताच्या गव्हर्नरला घर आणि कार्यालयीन वापरासाठी १५० वर्षांपूर्वी ही इमारत बांधली गेली. तिच्या पायामध्ये साम्राज्यवादी कृतघ्नतेची एक खूण आहे. भारतीयांनी केलेला स्वयंपाक भटारखान्यातून मुख्य इमारतीत आणण्यासाठी या इमारतीत एक भुयार आहे. गव्हर्नरच्या घरी होणाऱ्या मेजवान्यांमध्ये वापरली जाणारी उंची भांडी ठेवण्यासाठी एक भक्कम दार आणि भक्कम कुलूप असणारी बंदिस्त खोली इमारतीच्या तळात भुयाराच्या एका टोकाला आहे. त्यांची राखण करणाऱ्या बटलरबाबासाठी जिन्याखाली फक्त एक कट्टा आहे. दिवसभर साहेबाची सेवा करून त्यानं रात्री त्या तळघरातल्या कोठडीशेजारी अंग पसरावं अशी व्यवस्था होती. अशा अमानुष आणि मानवी प्रतिष्ठेला पायदळी तुडवणाऱ्या वारशाच्या पायावर स्वतंत्र भारतानं काय केलं? तर विद्यापीठ घडवलं. पंडित नेहरूंनी १९५६ मध्ये विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र विभागाची पायाभरणी केली. आणि आज या विद्यापीठातून ज्यांच्या कुटुंबात कधी कुणी पदवीधर झालं नाही अशा पहिल्या पिढीची लाखो मुलं आणि मुली दरवर्षी शिकतात. साम्राज्यवादी शोषणाच्या स्मृतींना  नजरेआड न करता, आणि तरीही त्यांच्याच पायावर शिक्षण आणि समतेचा वारसा निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत असं वाटतं.

तर वारसा आणि स्मारकस्थळं ही आपापल्या काळाला सुसंगत अशा पद्धतीनं घडवणं हे मोलाचं काम आहे. हजार, दोन हजार किंवा पाच हजार वर्षांपूर्वी काही भव्यदिव्य गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या, कधी आपल्यावर अन्याय झाले, कधी आपण इतरांवर अन्याय केले. असा संमिश्र वारसा जगातल्या प्रत्येक समाजाला मिळत असतो. त्याच्याकडे पूर्वगौरवाच्या किंवा सुडाच्या भावनेनं न पाहता डोळसपणे पाहायला हवं. फक्त निवडक पात्रांचा आणि मोजक्याच क्षेत्रांचा विचार करण्यात न अडकता आपल्याला मिळालेल्या वेगवेगळय़ा प्रकारच्या वारशाचं स्वरूप आपण जाणून घ्यायला हवं. या वारशामध्ये जगाच्या पाठीवरच्या वेगवेगळय़ा माणसांनी दिलेलं योगदान आपण कृतज्ञतेनं मान्य करायला हवं. आणि वारसा कसाही असो, त्याला दिशा देण्याचं कर्तृत्व हे आपणच स्वीकारून निभावायला हवं.

shraddhakumbhojkar@gmail.com  

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-04-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या