|| अरुणा अन्तरकर

‘आवाज कुणाचा?’ या प्रश्नाला महाराष्ट्राच नाही, तर उभा देश एकमुखानं काय उत्तर देईल हे सांगण्याची गरजच नाही!

या आवाजाचा प्रवास ‘हमारे दिल से न जाना’ यासारख्या गीतांपासून स्वरगंगेच्या काठानं हळुवारपणे सुरू झाला. बघता बघता हा आवाज हिंदी चित्रपट संगीताच्या प्रवाहात अशा ताकदीनं उतरला की सगळा दर्जा त्यानंच व्यापून टाकला. ‘ज्योति कलश छलके’च्या आलापांमधून त्यानं गगनचुंबी लाटांचं दर्शन रसिकांना घडवलं. हळूहळू या संगीतसागरातले कठीण भोवरे भेदून, खडकपाषाणांना अलवार कुरवाळत सहजपणे विहार करण्याची किमया या आवाजानं साध्य केली. तिथून पुढे ‘शराबी मेरा नाम हो गया’सारखी खतरनाक वळणवाकणंही त्यानं लीलया पार केली. या झंझावाती प्रवाहातले सगळे काठ, घाट, प्रलय आणि वादळं यांच्यावर हुकूमत गाजवत हा आवाज ‘लुकाछुपी बहुत हुई, सामने आ जाना’च्या हळुवार, कातर किनाऱ्यावर विसावला.

त्या अलौकिक स्वराच्या ऐंशी वर्षांच्या विलक्षण प्रवासाचा, त्यातल्या प्रत्येक टप्प्याचा मागोवा आतुरतेनं, मंत्रमुग्धपणे घेत राहिले. काळाच्या ओघात चित्रपट संगीतात सतत बदल होत होते. त्या बदलांनुसार कात टाकत लताचा आवाज पुढे जात राहिला. कधी थक्क होत, पण बहुश: तृप्त होत मी या आवाजाच्या ओढ लावणाऱ्या प्रवाहाबरोबर वाहत राहिले.

माझ्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं आणि मीही पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू लागले, तेव्हा लता मंगेशकर नावाच्या आवाजाचा मला जणू नव्यानंच परिचय होऊ  लागला. त्याच्या गगनचुंबी यशामागे फक्त गोड गळाच नव्हे,

तर एक मनस्वी, खंबीर आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व आहे याची जाणीव होऊ  लागली. या व्यक्तिमत्त्वाकडे आपल्या हक्कासाठी लढण्याचा कडवेपणा आहे. विजय मिळेपर्यंत झुंजण्याची चिकाटी आहे. विजय मिळवताना वाईटपणा पत्करावा लागला तरी चालेल, पण प्रतिमा जपण्याच्या नादात मुखवटा पांघरायचा नाही; अशी निर्भयता आणि निर्भीडताही आहे. आपण जे करतोय ते योग्य आहे याबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. हे तिच्यातल्या कणखर स्त्रीत्वाचे पैलू लक्षात येत गेले.

आणि म्हणूनच एस. डी. बर्मन किंवा मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गजांशी मतभेद झाले तेव्हा बराच काळ अबोला आणि असहकार स्वीकारावा लागला तरीही लता डगमगली नाही. समर्थनाचा किंवा समझोत्याचा एकही शब्द न उच्चारता ती त्यांच्याविना काम करत राहिली. अखेर सरशी तिचीच झाली. प्रत्येकी वेळी इतरांना माघार घ्यावी लागली.

पुरुषप्रधान संस्कृतीचं सर्वोच्च टोक म्हणावं अशा चित्रपट व्यवसायात हे यश अविश्वसनीय होतं. मोठमोठय़ा नाविकांना श्रेयनामावलीतल्या क्रमापासून ते मानधनाच्या रकमेपर्यंत दुय्यम स्थान स्वीकारावं लागलं होतं. पण पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात मात्र लता पाच तुल्यबळ गायक (रफी, मुकेश, तलत महमूद, किशोरकुमार, मन्ना डे) आणि डझनभर संगीत दिग्दर्शक यांच्यावर हुकमत गाजवत होती.

चित्रपटात नायकांच्या पिढय़ा बदलल्या, तसतशी महागायकांची संस्थानं खालसा झाली. ऋषी कपूर, कुमार गौरव याच्यापासून शाहरूख- आमीर- सलमानपर्यंत नवनवे नायक उदयाला आले, तसतसे त्यांच्यासाठी शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, उदित नारायण यांच्यासारखे नवनवे गायकही दाखल झाले. याच नायकांच्या टीनएज नायिका काजोल, राणी मुखर्जी वगैरे मात्र लताच्याच आवाजात गात राहिल्या.. हीसुद्धा फार विलक्षण कामगिरी आहे.

या पार्श्वभूमीवर इतर गायिकांचे आवाज बंद करण्याचा ऊर्फमंगेशकर मक्तेदारीचा आरोप लतावर व्हावा याचं आश्चर्य वाटतं. नामवंतांशी तिचे मतभेद झाले तेव्हा तिच्या जागी दुसऱ्या गायिका येणार हे तिला कळलं नसेल का? ते कळत असूनही आपल्या मताला चिकटून राहत त्याची किंमत तिनं मोजली याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

तिच्याशी काडीमात्र मतभेद नसतानाही रोशन एकामागून एक कितीतरी चित्रपटांमध्ये सुमन कल्याणपूरला गाणी देत राहिले. आणि तेसुद्धा मीनाकुमारी नि नूतन यांच्यासारख्या चमकत्या सिताऱ्यांसाठी. सुधा मल्होत्रालाही रोशननी बरीच आणि बऱ्यापैकी दर्जेदार गाणी दिली. कल्याणजी-आनंदजीदेखील सातत्यानं नव्या गायिकांना संधी देत राहिले. परंतु या तिघांपैकी एकाशीही लतानं कधी असहकार पुकारला नाही. ओ. पी. नय्यरनं तर कधीच तिला बोलावलं नाही. पण उभ्या आयुष्यात तिनं चुकूनही त्याच्याबद्दल अनादराची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याचा आवाका, ताकद आणि तिच्याशी स्पर्धा करू शकेल अशी धमक ती जाणून होती आणि त्याचा मानही राखून होती.

संगीतकारच का, बी. आर. चोप्रांसारखे बडे निर्माते केवळ मानधन परवडत नाही म्हणून तिला बोलावत नव्हते. पण त्यांचाही तिनं कधी राग केला नाही.

धाकदपटशानं दुसऱ्यांचे आवाज बंद करणाऱ्यांची व्यक्तिमत्त्वं असुरक्षित आणि भयभीत असतात. लताच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिला असुरक्षित वाटावं असं काहीच नव्हतं. कारकीर्दीच्या एका टप्प्यात ती एक-दीड वर्ष बरीच आजारी होती. त्या काळात ती अर्थातच अजिबात गाऊ  शकत नव्हती. पण ती बरी होताच निर्माते आपणहून तिच्याकडे आले. गायनात एवढा मोठा खंड पडल्यामुळे तिला स्वत:बद्दल खात्री नव्हती; पण संगीतकारांना होती. चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांनाही होती.

तिच्यावर मक्तेदारीचे आरोप करणारे आपापले रतीबाचे रकाने किंवा मासिकं चालावीत म्हणून हा खटाटोप करत होते. मात्र, याच लतानं अकरावं फिल्मफेअर अ‍ॅवार्ड स्वीकारताना या पुरस्काराबाबत निवृत्ती घोषित केली तेव्हा तिचे हे टीकाकार तिच्या उमदेपणाचं कौतुक करायला पुढे आले नाहीत. तिचं कौतुक करायला एकच कलाकार अनपेक्षितपणे पुढे आली : मीनाकुमारी! लताप्रमाणेच शालेय शिक्षणाचा गंध नसूनही व्यासंगाच्या बळावर व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनवणारी, स्वतंत्र बुद्धीची स्वयंभू महानायिका!

आपल्या चित्रपट प्रवासातली आवडती साथीदार म्हणून लताचा उल्लेख करत मीनाकुमारीनं म्हटलं, ‘लताचा हा निर्णय उमदा तर आहेच; पण ज्या रीतीनं तिनं तो जाहीर केला आहे ते त्यापेक्षाही शानदार आहे. या पुरस्काराच्या रास्त हक्कदारांना तो इथून पुढे दिला जावा, असं म्हणून तिनं पुरस्काराचा आणि इतर कलाकारांचा मान राखला आहे, त्यांची आत्मप्रतिष्ठा जपली आहे. एखाद्या बादशहानं आपल्या वारसदारांसाठी वाट मोकळी करून द्यावी तसं हे अजोड औदार्य आहे.

लताचं कर्तृत्व पाश्र्वगायनापुरतं सीमित राहिलं नाही. अफाट वाचन, प्रखर देशप्रेम, मराठी भाषेवरचं प्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यातून तिनं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातली.. आपल्या परीनं ते अधिक समृद्ध बनवलं. मराठी प्राचीन आणि अर्वाचीन साहित्यातल्या उत्तमोत्तम काव्यकृती तिनं आपल्या गुणी संगीतकार भावाच्या (हृदयनाथ) मदतीनं प्रकाशात आणल्या, मराठी घराघरांत पोहोचवल्या.

लताची स्त्रीच्या अस्मितेबद्दलची जाणीव किती प्रखर होती हे सांगणं हा तिचा खरा गौरव होईल. सुलोचनाबाईंनी मला सांगितलेली ही हकीकत आहे. फार पूर्वी- म्हणजे लताच्या वडिलांच्या निधनानंतर या दोघी कोल्हापुरात एका चित्रपटात एकत्र काम करत होत्या. त्या काळात युनिटमधला एक धटिंगण सुलोचनाबाईंचा पिच्छा पुरवत होता. ताई विलक्षण घाबरलेल्या होत्या. एकदा बोलण्याच्या ओघात त्या ही गोष्ट लतापाशी बोलून गेल्या. लतानं थेट त्या प्रेमवीराला गाठलं आणि असं काही फैलावर घेतलं, की दुसऱ्या दिवसापासून तो सुलोचनाबाईंपासून चार हात दूरच राहू लागला.

लिहिण्याची जागा संपेल, पण लताबद्दलच्या गोष्टी संपणार नाहीत. तिच्या गाण्यांइतक्याच या गोष्टीही आवडीनं ऐकल्या जातील यात शंका नाही. कारण ती केवळ प्रतिभाशाली गायिका नव्हती, तर आयुष्य सुरेलपणानं कसं जगावं याचा उमज पडलेली महानायिकासुद्धा होती.