|| डॉ. योगेश शौचे

गेल्या काही वर्षांत जैवतंत्रज्ञान हे क्षेत्र अफाट वेगानं विकसित झालं आहे. वेगवेगळय़ा आजारांचं निदान, त्यावरील उपचारपद्धती, औषधनिर्मिती, लसनिर्मिती केली जात आहे. करोना काळात तर जैवतंत्रज्ञान क्षेत्राने घेतलेली झेप तर अभूतपूर्व अशीच आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनापासून उत्पादन निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मनुष्यबळ आणि मोठी आर्थिक गुंतवणूक समाविष्ट असते. पुणे आता लसनिर्मितीचे जागतिक केंद्र झाले आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख..

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. अलिकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणूनही पुण्याची ख्याती जगात आहे. पण जैवतंत्रज्ञानाचे केंद्र आणि लसनिर्मितीची जागतिक राजधानी म्हणून असलेले पुण्याचे महत्त्व फारच कमी लोकांना माहिती असेल. अर्थात ही ओळख तशी नवी नाही. कारण त्याचा पाया स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच रचला गेला होता. १९व्या शतकात प्लेगने पुण्यात थैमान घातलेले असताना लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारकडे या रोगावर संशोधन करण्यासाठी एक प्रयोगशाळा सुरू करण्याची सूचना केली होती. ती मान्य करून भारतातली सूक्ष्मजीवशास्त्रावर संशोधन करणारी पहिली प्रयोगशाळा इम्पिरिकल बॅक्टेरिओलॉजिकल लॅबोरेटरी पुण्यात स्थापन झाली. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याची प्रगतीची तिथूनच सुरुवात झाली असे म्हणता येईल. १८९० मध्ये पुण्यात स्थापन झालेली ही प्रयोगशाळा नंतर १८९५ मध्ये मुकटेश्वरला हलवली गेली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५७मध्ये देशाला प्रतिजैविक निर्मितीत स्वयंपूर्ण करण्याच्या या हेतूने पुण्याजवळच्या पिंपरी इथं हिंदूस्थान अँटिबायोटिक्सची स्थापना झाली. ही देशातल्या जैवतंत्रज्ञानाची सुरुवात होती. सर्वप्रथम पेनिसिलीनचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर सटरेपटोमासीन , जेमटामायसीन अशा इतर प्रतिजैविकांची निर्मितीही सुरू झाली. त्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी होऊन ती सामान्य जनतेला वाजवी दरात मिळू लागली. उत्पादनाबरोबरच या संस्थेत नव्या प्रतिजैविकाच्या शोधावर तिरुमल्लाचर यांच्यासारख्या प्रतिभावंत शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनाची नोंद तेव्हाही जागातिक पातळीवर घेतली गेली. हिंदूस्थान अँटिबायोटिक्सच्या स्थापनेमुळेच औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याच्या विकासाला सुरुवात झाली. हिंदूस्थान अँटिबायोटिक्सपाठोपाठ इतरही अनेक औद्योगिक आस्थापने पिंपरी-चिंचवडमध्ये आली. तेव्हा ओसाड असलेला हा परिसर कारखान्यांनी गजबजून गेला. त्या काळात लोक कामाला इथं येत असले, तरी बहुसंख्यांनी राहण्यासाठी पुण्यालाच पसंती दिली. त्यामुळे औद्योगिक विकास पिंपरी-चिंचवड परिसरात झाला, तर शहर म्हणून पुण्याची वाढ झाली. दुसरीकडे मणिभाई देसाइनी वाघोलीला जनावरांच्या लशींच्या निर्मितीसाठी भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनचे अद्ययावत केंद्र उभारले. तिथे पशुधनातील अनेक रोगांवर लशी बनवल्या जात. त्याचा शेतकऱ्यांना खूप उपयोग झाला. काळाच्या ओघात वेगवेगळय़ा कारणामुळे आज या संस्था कार्यरत नसल्या, तरीही त्यांनी घातलेल्या पायावर पुण्यात जैवतंत्रज्ञान क्षेत्राने चांगलीच झेप घेतली.

आज पुण्यातल्या जैवतंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांची व्याप्ती सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात आहे. त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्या सगळय़ाची माहिती इथं देणं शक्य नाही. केवळ काही उदाहरणादाखल काहींची माहिती देता येईल. यात लसनिर्मिती सर्वात प्रमुख आहे. लस म्हटलं, की पहिलं उल्लेख डॉ. सायरस पूनावाला यांनी स्थापन केलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचा होणं स्वाभाविक आहे. १९६७ मध्ये फक्त धनुर्वाताच्या (टिटेनस) लसीच्या उत्पादनाने सुरुवात केलेली सीरम आज वेगवेगळय़ा लशी आणि इतर अनेक वैद्यकीय उत्पादने बनवते. या कंपनीकडून वर्षांला लसीच्या एकूण १५० कोटी मात्रा तयार केल्या जातात. असं म्हटलं जातं, की जगातल्या प्रत्येक तिसऱ्या मुलाला दिलेली लस ही सीरमनं तयार केलेली असते. करोना काळात तर सीरम इन्स्टिटय़ूटकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. कोविशिल्ड ही लस सीरमनं केवळ देशालाच नाही, तर जगभरातील देशांना पुरवली. याच कंपनीकडून लवकरच कोव्होवॅक्स ही अजून एक लस बाजारात येणार आहे. अतिशय अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या संस्थेत तीन हजारांपेक्षा जास्त लोक काम करतात. केवळ या एका कंपनीची उलाढाल पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. तसंच भारतात तयार झालेल्या कोव्हॅक्सिन या दुसऱ्या लशीचं उत्पादनही आता पुण्यातच होणार आहे. भारत बायोटेककडून पुण्यात कारखाना उभारण्यात आला आहे. हिंदूस्थान अँटिबायोटिक्सही करोनावरील लस उत्पादन करण्यासाठी सज्ज आहे.

लशींप्रमाणेच रोगनिदानही महत्त्वाचे आहे. करोनानं भारतात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच करोनाच्या निदानासाठी संपूर्ण स्वदेशी बनावटीचे उत्पादन पुण्यातल्याच माय लॅब या संस्थेनं बाजारात आणले. आज देशभरात हे उत्पादन वापरलं जातं. नुकतेच त्यांनी घरच्या घरी आपणच निदान करू शकण्यासाठीचे उत्पादन बाजारात आणलं आहे. आता ही कंपनी लसनिर्मितीमध्येही उतरणार आहे. जीनपॅथ लॅब या कंपनीनेही करोना निदानासाठीच्या सुधारित पद्धती विकसित केल्या आहेत. मानवी जीनोमचा क्रम निर्धारित करून त्यावरून आरोग्य, भविष्यात कर्करोग, मधुमेह असे आजार होऊ शकतील का, याचा जैवमाहितीशास्त्राच्या आधारे अंदाज बांधण्यामध्येही ही संस्था अग्रेसर आहे. याशिवाय हृदयरोग, मेंदू, मूत्रिपडाचे आजार, कर्करोग यांसारख्या घातक आजारांवर औषधे शोधून ती बाजारात आणण्याचे काम लुपीन, जिनोव्हा, एमक्युअर अशा कंपन्यांमध्ये चालते. जिनोव्हा आता करोना प्रतिबंधात्मक लस बाजारात आणणार आहे. सीरम, एमक्युअर या पुण्यात स्थापन झालेल्या कंपन्या आता आंतरराष्ट्रीय झाल्या आहेत.

आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रोबायोटिक्स दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. माणसांबरोबरच, पशुधन, कुक्कुटपालन या क्षेत्रातही त्याचा वापर वाढत आहे. अशी निर्मिती करणारा देशातला एक अग्रगण्य उद्योग हायटेक बायोसायन्सेस पुण्यातच आहे. प्रोबायोटिक्सबरोबरच अनेक घातक आणि खर्चिक रासायनिक प्रक्रियांसाठी जैविक पर्याय वापरून त्या पर्यावरणपूरक आणि कमी खर्चाच्या करण्यावरील संशोधन इथं होतं. आरोग्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंधन. उसाची मळी किंवा पिकांची धाटे यापासून अल्कोहोल (बायो इथेनॉल) तयार करण्यात पुण्यातली प्राज ही कंपनी प्रसिद्ध आहे. जगातल्या बायो इथेनॉलचे आठ टक्के उत्पादन प्राजच्या तंत्राने होते. या शिवाय सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठीही प्राज जगभर सल्ला देत असते. पुणेकरांसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे जनावरे, प्राणी आणि माणसांच्या आरोग्यासाठी जीवाणू वापरून उपचार शोधणाऱ्या जगप्रसिद्ध क्रिसचेन हानसेंन या कंपनीने भारतात प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुण्याचीच निवड केली आहे.

शेतीशी संबंधित जैवतंत्रज्ञान विषयक उत्पादनं विकसित करणाऱ्या तर अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था पुण्यात आहेत. टिश्यू कल्चर पद्धतीने रोपं तयार करणं, जैविक खाते, कीटकनाशकं, तणनाशकाची निर्मिती हे व्यवसाय प्रामुख्याने केले जातात. जैवमाहितीशास्त्र या विषयांमध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठाबरोबरच राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, पुणे) इथंही संशोधन केले जाते. परम संगणकांमुळे प्रतिष्ठा मिळालेल्या सीडॅकमध्येही जैवमाहितीशास्त्राचा स्वतंत्र विभाग आहे. या क्षेत्रात काम करणारे अनेक उद्योगही पुण्यात आहेत. पर्सिस्टंट , टाटा कन्सल्टन्सीसारख्या प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये जैवमाहितीशास्त्राच्या शाखा आहेत. संपूर्णपणे या विषयातच काम करणारे काही उद्योग आता उदयाला आले आहेत. या उद्योगांममुळे प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीपेक्षा किती तरी जास्त अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होत असते. कारण या उद्योगांना लागणारी इतर सामग्री पुरवणारे उद्योगही त्याबरोबरीनं उभे राहतात, वाढतात. या सर्व उद्योगांत काम करणाऱ्या मनुष्यबळाला अन्य सेवासुविधा पुरवण्यासाठी त्या क्षेत्रातल्या लोकांना रोजगार मिळतो.

कुठल्याही क्षेत्राची वाढ होण्यासाठी उद्योगांना पूरक मनुष्यबळाची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक असतो. त्या दृष्टीने शैक्षणिक संस्थाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्या आघाडीवरही पुण्याचा विकास योग्य पद्धतीनं झाला. १९७१ मध्ये आताच्या गरवारे महाविद्यालयानं दूरदृष्टीनं राज्यातला पहिला सूक्ष्मजीवशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे अनेक उत्कृष्ट विद्यार्थी उद्योग आणि संशोधन संस्थांना मिळाले. विद्यार्थ्यांनाही या संस्थेतील अनुभवी संशोधकांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. पुढे १९८५ मध्ये जेव्हा केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने देशभरात जैवतंत्रज्ञानाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करायचं ठरवले, तेव्हा पहिल्या चार विद्यापीठांमध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठाचा समावेश होता. पुणे विद्यापीठाशिवाय अनेक महाविद्यालये, खासगी विद्यापीठांमध्ये जैवतंत्रज्ञानाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जात आहेत. जैवतंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या जैवमाहितीशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही पुणे विद्यापीठात २००२ मध्ये सर्वात प्रथम सुरू झाला. याला संशोधनाची जोड देण्यासाठी जैवतंत्रज्ञानाशी संबधित संशोधन करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या संस्था पुण्यात आहेत. राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, आघरकर संशोधन संस्था, आयसर, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही त्यातली प्रमुख नावे. करोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिनच्या निर्मितीमध्ये राष्ट्रीय विषाणू संस्थेचा मोठा वाटा होता हे नमूद करणे आवश्यक आहे. अशा संस्थांमधून शिकलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या नव्या कल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे व्हेंचर सेंटर हे नवउद्यमींचे इन्क्युबेशन सेंटर पुण्यातच आहे. नवउद्योजकांच्या नवउद्यमी आज जगभरात उद्योग विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जैवतंत्रज्ञानसंबंधित नवउद्यमी ही व्हेंचर सेंटरची प्रमुख ओळख आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जैवतंत्रज्ञानातील प्रगतीला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या आर्थिक साहाय्याने राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र आणि आयसरने मिळून पुणे बायोक्लस्टरची स्थापना केली. संशोधन आणि उद्योजकांना अद्ययावत सोयीसुविधा, तज्ज्ञ सल्लागार एकाच जागी मिळावेत अशी या मागची भूमिका आहे. या अंतर्गत अनेक सुविधा संशोधकांना उपलब्ध होणार आहेत.

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या मते पूर्वेचे ऑक्सफर्ड, डेट्रॉइटबरोबरच आता पूर्वेचे बोस्टन म्हणून पुण्याची ओळख होत आहे. इतकं महत्त्व पुण्याने आजवर निर्माण केले आहे. करोना काळात लशी आणि निदान यात पुण्यातील संस्थांच्या योगदानामुळे ही ओळख आणखी दृढ झाली आहे. भविष्यात ती आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.

(लेखक राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रात मानद वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)