कोणत्याही देशाच्या प्रमुखाचे आजारपण हा राष्ट्रचिंतेचा विषय; पण अमेरिकेच्या अध्यक्षांचे आजारपण म्हटले की तो जागतिक चिंतेचा विषय ठरतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत तेच घडले. ‘‘करोना म्हणजे एक साधा फ्लू आहे, तो निघून जाईल, मुखपट्टी वापरण्याची गरजच काय..’’ इत्यादी वक्तव्यांमुळे टीकेचा विषय ठरलेल्या ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक एक महिन्यावर असताना संसर्ग झाला. ट्रम्प यांची ध्येये-धोरणे, त्यांचे वागणे-बोलणे, दावे-प्रतिदावे यावर भाष्य करणाऱ्या माध्यमांनी त्यांच्या करोना संसर्गाचीही गय केलेली नाही.

‘‘अमेरिकेत दोन लाख सात हजार लोकांचे बळी घेणाऱ्या करोना विषाणू साथीबद्दल अनेक महिने बेफिकीर राहिलेल्या आणि साथीचा अंत:काल आता जवळ आला आहे, असे पुन्हा एकदा ठासून सांगितल्यानंतरच्या काही तासांतच अध्यक्षांना करोनाचा संसर्ग झाला,’’ अशी टिप्पणी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने केली आहे.

‘ठेच लागली की शहाणपण येते,’ ही म्हण ट्रम्प यांना गैरलागू, पण ‘सुंभ जळाला, पीळ राहिला,’ ही म्हण मात्र त्यांना लागू होते. संसर्गातून बरे झाल्यानंतरच्या पहिल्याच कार्यक्रमात ट्रम्प यांनी पाच दावे केले. त्यातला पहिलाच दावा- ‘‘करोना विषाणू नाहीसा होत आहे!’’ असा होता. यातील तथ्यांश ‘सीएनएन’च्या प्रतिनिधी तारा सुब्रमणियम यांनी तपासले आणि ‘‘विषाणू नष्ट होणे तर दूर अमेरिकेत सर्वत्र करोनाची साथ तीव्र होत असल्याचे अलीकडच्या आकडेवारीवरून सिद्ध होते,’’ असे दाखवून दिले. गेल्या आठवडय़ातील दहा अमेरिकी राज्यांतील रुग्णवाढ आणि शुक्रवारची ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद यांचे दाखलेही त्यांनी दिले. करोना विषाणू नष्ट होईल किंवा नष्ट होत आहे, हे वक्तव्य ट्रम्प यांनी आजपर्यंत ३४ वेळा केल्याचे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने १६ सप्टेंबरच्या वृत्तात म्हटले होते, म्हणजे त्यांचे ताजे वक्तव्य पस्तीसावे!

साथ सुरू झाल्यापासून ट्रम्प चीनवर आरोप करीत आले आहेत. म्हणून तेथील वर्तमानपत्रे काय म्हणतात, याबद्दल उत्सुकता असते. हाँगकाँगहून प्रकाशित होणाऱ्या ‘साउथ चायना मॉर्निग पोस्ट’ने बातमी देताना तज्ज्ञांची मदत घेतली आहे. त्यात निवडणूक होणार की नाही इथपासून ट्रम्प यांच्या संभाव्य पराभवापर्यंतचे आडाखे बांधले आहेत. हाँगकाँगच्या या वृत्तपत्राने टोक्योतील ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ नाओया ओशिकुबो यांची मते नोंदवली आहेत. ‘ट्रम्प ज्यो बायडेन यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत, त्यामुळे बायडेन कदाचित अध्यक्ष होतीलही,’ असे निरीक्षण नोंदवून ओशिकुबो म्हणतात, ‘‘ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा चीनविरोध त्यांना संसर्ग झाल्यानंतर तीव्र बनल्याचे वृत्त आहे, पण मला ट्रम्प यांची भीती वाटते. संसर्गामुळे तेही कदाचित चीनविरोधात आणखी आक्रमक होतील.’’ शत्रूच्या मित्राच्या काठीने शत्रूला बदडण्याचा प्रयत्न म्हणतात तो हाच.

चीनच्याच ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्राने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. व्हाइट हाऊ सच्या कुंपणाचे गज तोडून करोना विषाणू आत शिरत असल्याचे त्यात दाखवले आहे.. आणि त्याचे शीर्षक आहे- ‘व्हाइट हाऊस एक्स्पोज्ड!’ निवडणुकीआधी ट्रम्प बरे झाले तर त्यांना प्रचारावर लक्ष केंद्रित करता येईल. शिवाय इतरांचा आवाजही ते बंद करू शकतील, असे चिनी निरीक्षकांच्या हवाल्याने ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे. चीन आणि अमेरिकेने परस्पर सहकार्याने करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि औषध संशोधनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते अमेरिकेसाठीही फायद्याचे ठरेल, कारण तो देश अद्याप विषाणूशी लढत आहे, असा चिमटाही संपादकीय लेखात काढला आहे.

ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ मध्ये, ट्रम्प करोनामुक्त झाल्यानंतरच्या ताज्या स्तंभात जोनाथन फ्रीडलँड यांनी, ‘‘करोनाने ट्रम्प आणि ट्रम्पवाद यांचे खरे स्वरूप दाखवले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीतील फोलपणाही उघड केला आहे. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला याची किंमत चुकवावी लागेल,’’ असे भाकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. ‘‘ट्रम्प यांना संसर्ग झाल्याबद्दल तुमच्या मनात सहानुभूतीची भावना निर्माण झाली असेल तर चालू आठवडय़ातील त्यांची वक्तव्ये तुम्हाला त्यांच्या नैतिक अध:पतनाची आणि त्यांच्यामुळे अमेरिकेसह जगाला निर्माण झालेल्या धोक्याची आठवण करून देतील,’’ असा थेट इशाराही या लेखात आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी लोकशाहीवर केलेल्या कथित हल्ल्यांचे आणि त्यांच्या वक्तव्याचे दाखले फ्रीडलँड यांनी दिले आहेत.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई