जगभर थमान घालणाऱ्या करोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत अमेरिकेत. रुग्णसंख्येत इराणचा  क्रमांक सध्या सहावा लागतो. इराणमध्ये करोनाची रुग्णसंख्या सध्या साठ हजारांपर्यंत असली तरी प्रत्यक्षात ती बरीच मोठी असेल, असा अंदाज काही आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्त करतात. जगभरातील बहुतेक सर्वच देशांचा करोनाविरोधात लढा सुरू आहे. मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर या देशांदरम्यानचा संघर्ष ऐन करोनाच्या संकटात तीव्र झाला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या युद्धखोरीची दखल घेताना या देशांत करोनाविरोधातील लढा मात्र कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली आहे.

‘इराणपुरस्कृत हल्लेखोर इराकमधील अमेरिकी सैन्यावर हल्ले करण्याची योजना आखत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. असा हल्ला केल्यास सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल,’ असा इशारा देत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला याआधीच्या कारवाईची आठवण करून दिली. याबाबत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात अमेरिकी अधिकाऱ्यांसह सत्ताधारी आणि विरोधकांच्या सविस्तर भूमिकांना स्थान देण्यात आले आहे. इराणला चर्चेस भाग पाडण्यासाठी इराणी लष्करावर थेट हल्ले करावेत, असे अमेरिकी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांच्यासह काही अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र कोणतीही कारवाई करण्याआधी काँग्रेसचा सल्ला घ्यावा, अशी भूमिका डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी मांडली. परदेशांत लष्करी कारवाई करताना अमेरिकी कायद्यानुसार काँग्रेसशी सल्लामसलत करण्याच्या नियमाचे पालन करण्यात ट्रम्प यांना अपयश आल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी सुलेमानींवरील हल्ल्याचा दाखला दिला आहे.

करोनाच्या संकटकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यामुळे जागतिक अस्थर्याचा धोका अधोरेखित झाला आहे, याकडे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. ‘अमेरिकेला करोनाचा मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था मोठय़ा घसरणीच्या दिशेने जात आहे. गेल्या आठवडय़ात ६६ लाख अमेरिकी नागरिकांनी बेरोजगारांसाठीच्या लाभाकरिता अर्ज केल्याचे कामगार मंत्रालयाने जाहीर केले. आदल्या आठवडय़ात ही संख्या ३३ लाख होती. आठवडय़ागणिक बेरोजगारांच्या संख्येत वाढ होण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे तीन लाखांहून अधिक रुग्णसंख्या असल्याने आरोग्य व्यवस्था बेजार झाली असताना अमेरिकेला युद्धखोरी परवडणारी नाही,’ असा सूर या लेखात उमटला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वाधिक गरज असलेल्या भागांसाठी सुमारे दहा हजार व्हेंटिलेटर्स राखून ठेवल्याचा दावा केला. मात्र तो पोकळ असल्याचे या लेखात सोदाहरण दाखवून देण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक व्यापार संघटनेने नुकतेच संयुक्त निवेदन जारी केले. व्यापार आणि वाहतूक र्निबधामुळे जगभरात अन्नटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. कमी उत्पन्न असलेल्या, अन्नतुटवडा असलेल्या देशांना कोणत्याही संकटाचा मोठा फटका बसतो. काही देशांनी आपापल्या अन्नधान्य निर्यातीवर आधीच निर्बंध घातले आहेत. मात्र या देशांनी जागतिक अन्नपुरवठा साखळी विस्कळीत होईल अशी पावले उचलू नयेत, असे या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेचे निर्बंध हा इराणवरील दबावतंत्राचा भाग आहे. मात्र सद्य:स्थितीत इराणच्या करोनाबळींची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा पाचपटीने अधिक असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. अशा वेळी अमेरिकी र्निबधामुळेच वैद्यकीय साधनांची आयात करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना फटका कसा बसला, याचा तपशील या लेखात आहे. अमेरिकेच्या इराणवरील र्निबधांबाबत ‘द गार्डियन’मध्ये तेहरानचे महापौर पिरौझ हनाची यांचा लेख आहे. अमेरिकी र्निबधामुळे इराणच्या करोना-लढय़ावर कसा दुष्परिणाम होत आहे, याबाबतचे विवेचन त्यात आहे. फक्त अमेरिकी कंपन्या आणि तेथील उद्योजकच नव्हे, तर इतर देशांनाही इराणशी व्यापार करण्यास मनाई करण्यात येते. वैद्यकीय साधने, उपकरणांच्या आयातीवरील र्निबधांमुळे इराणमध्ये करोनाबळींची संख्या वाढत आहे. या र्निबधाचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. मात्र करोनाची महासाथ कायम ठेवणे अमेरिकेच्या हिताचे आहे का, असा सवालही पिरौझ यांनी या लेखात केला आहे.

‘इराणवरील निर्बंध हा मानवतेविरुद्धचा गुन्हा’, अशा शीर्षकाचे वृत्त ‘तेहरान टाइम्स’मध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन वर्षांपूर्वी इराणसोबच्या अणुकरारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यापासून उभय देशांदरम्यान संघर्ष तीव्र झाला. अमेरिकेने इराणच्या कासीम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर हा संघर्ष युद्धाच्या उंबरठय़ावर आला.  ‘बीबीसी’सह सर्व बडय़ा माध्यमांनी या परिस्थितीचे सखोल विश्लेषण केले आहे. करोनाविरोधातील लढय़ाला युद्धखोरीच्या विषाणूने डंख मारू नये, असा सूर माध्यमांमध्ये आहे.

(संकलन : सुनील कांबळी)