तैवान आणि अमेरिका यांच्यातील ‘आर्थिक भागीदारी संवादा’ची दुसरी फेरी गेल्या आठवडय़ात पार पडत असताना, तैवानविषयक बातम्या- विश्लेषणांना अमेरिकी माध्यमांत अधिक स्थान मिळाले. ‘चीन तैवानवर आक्रमण करण्याच्या मन:स्थितीत आहे.’ हा अमेरिकेच्या चीनविषयक आर्थिक- सामरिक तज्ज्ञगटाचा (रिव्ह्यू कमिशनचा) निष्कर्ष तैवान आणि आसपासच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे वृत्त ‘यूएस न्यूज’ने दिले; तर ‘अमेरिकेने आता युद्धाची तयारी केलीच पाहिजे’, असे मत ‘सीआयए’ या अमेरिकी गुप्तचर संस्थेचे वरिष्ठ निवृत्त अधिकारी डेव्हिड साव्ह यांनी ‘द हिल’ या वॉशिंग्टनकेंद्री वृत्तपत्रातील स्तंभलेखात मांडले! त्यांच्या या मतातून चीन-तैवान संबंधांतील भीतीदायक बिघाड अधोरेखित होतो.

‘तैवानच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड करणार नाही आणि अमेरिकेने कोणत्याही भ्रमात राहू नये,’ हा चीनचा इशाराही धोक्याची घंटा वाजवतो. कारण चीन-तैवान तणाव उद्रेकाच्या टोकावर पोहोचला आहे. तैवान हे बेट आपलाच भाग असल्याचा दावा चीन करीत आला असला तरी दोन्ही देशांतील संबंध गेल्या सात दशकांत आताएवढे ताणले गेले नव्हते. तैवान प्रश्नावर चीनच अमेरिकेविरोधात युद्धाची तयारी करीत आहे, हे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’तील त्याच्या प्रचंड गुंतवणुकीतून स्पष्ट होते. म्हणून त्याला रोखण्यासाठी अमेरिकेने प्रशांत महासागरात आपली लष्करी जमवाजमव वेगाने करावी आणि युद्धाच्या वेळी लष्करी तळांचा वापर करण्यासाठी आशियातील आपल्या मित्रांबरोबरचे संबंध आणखी मजबूत करावेत. त्याचबरोबर तैवानने खरेदी केलेली लष्करी सामग्री त्याच्याकडे तातडीने पोहोचती करावी, असा सल्ला ‘द हिल’मधील स्तंभलेखात आहे. तर विविध देशांच्या परराष्ट्र धोरणांचे विश्लेषण करणाऱ्या ‘वॉर ऑन द रॉक्स’ या संकेतस्थळाने तैवान प्रश्नावर जपानच्या बदलेल्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. ‘तैवानबाबत जपानची रणनीती नाटय़पूर्णरीत्या बदलत आहे. एके काळी अमेरिकेच्या तैवानसमर्थक सुरांत सूर मिसळण्यास नाखूश असलेले जपानी मुत्सद्दी आता लोकशाही देश म्हणून तैवानच्या संरक्षणाची इच्छा तीव्रतेने व्यक्त करतात. तैवानच्या कथित सार्वभौमत्वाला पाठिंबा देण्यास आणि लष्करी कारवाईत सामील होण्यासही ते इच्छुक असल्याचे संकेत मिळतात’, असे निरीक्षणही या विश्लेषणात रायन अ‍ॅश्ले यांनी नोंदवले आहे. 

‘निप्पॉन’ या जपानी संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या मॉम्मा रिरा या युद्धनीती विश्लेषकांच्या लेखात चीनच्या तैवानवरील संभाव्य आक्रमणास खुद्द तैवान, अमेरिका आणि जपान कशा प्रकारे तोंड देईल, याचा वेध घेण्यात आला आहे. ‘अमेरिका-चीन संबंध संघर्षमय असताना आणि तैवानचे राजकीय-लष्करी महत्त्व वाढत असताना, तैवानवरील चिनी आक्रमणापासून अमेरिका अलिप्त राहण्याची शक्यता नाही. जरी चीन सध्या तीव्र जोखमीचा जुगार खेळण्याची शक्यता नसली, तरी असे संकट कसे समोर येईल याचा विचार करणे महत्त्वाचे आहे,’ असे या लेखात म्हटले आहे. 

अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी चीन-तैवान तणाव कशा प्रकार हाताळावा यावर ‘द टेनेसिएन’मधील लेखात राजकीय विश्लेषक सिहान साहिन यांनी अमेरिकेला ‘एक चीन धोरणा’चे (वन चायना पॉलिसी) स्मरण करून दिले आहे. ‘एक चीन धोरणानुसार अमेरिकेने तैवान हा चीनचाच भाग असल्याचे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कोणत्याही बळाचा वापर केला जाऊ नये, हे मान्य केले आहे, परंतु त्याच वेळी तैवानचे संरक्षण आणि त्याला शस्त्रास्त्रविक्री करण्यासही अमेरिका वचनबद्ध आहे. त्यामुळे ‘हे प्रकरण अमेरिकी नागरिकांवर उलटण्याआधीच बायडेन यांनी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज’ हा  लेख व्यक्त करतो. 

‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील वृत्तांतात तैवान-चीन-हाँगकाँग संबंधांवर अभ्यासकांच्या हवाल्याने प्रकाश टाकला आहे. नेवाडा विद्यापीठातील विश्लेषक ऑस्टिन वाँग यांनी चीनच्या विश्वासार्हतेचा मुद्दा उपस्थित करताना हाँगकाँगमधील चीनच्या कारवाईचे उदाहरण दिले आहे. ‘पूर्वी अनेक तैवानी नागरिक ‘एक देश, दोन राजकीय प्रणाली’बद्दल सकारात्मक होते, कारण चीनने हाँगकाँगमधील लोकांचे दैनंदिन जीवन सामान्य राहील, असे वचन दिले होते, परंतु हाँगकाँगमधील परिस्थिती याउलट आहे’, असे वाँग यांनी म्हटले आहे. ‘मुद्दा विश्वासाचा आहे, जर तैवानी लोकांचा चीनवर विश्वास नसेल तर चीनने दिलेली सर्व आश्वासने किंवा वचने निर्थक ठरतात,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

यावर ‘अमेरिकेने त्यांची लोकशाहीची व्याख्या आमच्यावर लादू नये’, असे प्रत्युत्तर चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी थेटपणे नव्हे, पण हंगेरीच्या परराष्ट्र व वाणिज्यमंत्र्यांशी बोलताना दिले.  त्या वृत्ताला, हाँगकाँगहून निघणाऱ्या ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने प्रसिद्धी दिली आहे!

 संकलन : सिद्धार्थ ताराबाई