युरो फुटबॉल स्पर्धेतील इटली आणि इंग्लंड यांच्यातील अटीतटीच्या अंतिम सामन्याला गुंडगिरीचे आणि वर्णद्वेषी हुल्लडबाजीचे गालबोट लागले. इंग्लंडसाठी गेल्या ५५ वर्षांतील हा पहिलाच प्रतिष्ठेचा अंतिम सामना होता. त्यामुळे त्याचे अंतिम फेरीत पोहोचणे हेच जणू विजय संपादण्यासारखे होते. परंतु अंतिम सामन्यात पहिल्यापासून इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी हुल्लडबाजी केली. नंतर संघातील कृष्णवर्षीय खेळाडू पेनल्टी शूट-आऊटमध्ये गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांना वर्णद्वेषी शिवीगाळ केली गेली. अनेक ठिकाणी कृष्णवर्णीयांवर हल्ले झाले. युरोपीय माध्यमांनी या प्रकाराच्या अनुषंगाने इंग्लंडचे वाभाडे काढले आहेत. त्यातून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, राजपुत्र विल्यम व त्यांची पत्नी केट हेही सुटलेले नाहीत.

‘इंग्लिश फुटबॉलमधील सर्वाधिक अंधारी रात्र’ अशी टीका इटलीच्या ‘ल स्टॅम्पा (द प्रेस)’ या सुमारे दीडशे वर्षे जुन्या वर्तमानपत्राने अग्रलेखात केली आहे. त्याचे शीर्षकच, ‘नो फेअर प्ले, वी आर इंग्लिश’ असे उपरोधिक आहे. पराभवानंतर कसे व्यक्त व्हावे हे इंग्लंडवासीयांना शिकवलेले नाही, हेच कृष्णवर्णीय खेळाडूंविरुद्धच्या ऑनलाइन वर्णद्वेषातून दिसले, असे भाष्यही त्यात आहे. या वर्तमानपत्राने ब्रिटिश राजघराण्याच्या वर्तणुकीवरही बोट ठेवले आहे. राजपुत्र विल्यम, त्यांची पत्नी केट या शाही दाम्पत्याचा सामना संपल्यानंतरचा शोक असा होता की जणू ते एखाद्याच्या अंत्यसंस्काराला आले होते. त्यांनी नैराश्याने एकमेकांना आलिंगन दिले. त्यांचे हे वर्तन त्यांच्या डोळ्यांसमोर एखाद्याचा हृदयद्रावक मृत्यू व्हावा, असे होते. त्यांना याचेही भान नव्हते की, ते एक फुटबॉल सामना पाहात होते. राणीने अशी चूक कधीच केली नसती, अशी पुस्तीही या लेखात जोडण्यात आली आहे.

‘लिबरेशन’ या फ्रेंच वृत्तपत्राने हुल्लडबाजीचा संबंध ब्रिटनच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाशी (ब्रेग्झिट) जोडताना, ‘चमत्कार घडला असता आणि इंग्लंड विजयी झाला असता तर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना त्याची सांगड ब्रेग्झिटशी घालण्याचा मार्ग सापडला असता,’ अशी टीका केली आहे. राजपुत्र विल्यम, इंग्लिश फुटबॉल असोसिएशन आणि ब्रिटिश पंतप्रधानांनी केलेला वर्णद्वेषी घटनांचा निषेध पुरेसा नाही, असे स्पष्ट करताना- ‘जॉन्सन यांनी तर आतापर्यंत अशा असहिष्णू वातावरणाची जाणीवपूर्वक गय केली, पण आता हे पुरे झाले,’ असेही या वृत्तपत्राने सुनावले आहे. इंग्लिश फुटबॉलमध्ये असा वर्णद्वेष पूर्वीपासून आहे. परंतु गेल्या पाच वर्षांत ब्रेग्झिटच्या निमित्ताने तो आणखी वरच्या पातळीवर पोहोचला, अशी खंत या वृत्तपत्राने व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणा, आदरातिथ्य भाव आणि सभ्यता हे इंग्लिश गुण कुठे गेले, असा प्रश्न या वृत्तपत्राच्या अग्रलेखात विचारला आहे.

कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सामाजिक, राजकीय वक्रतेवर प्रहार करणाऱ्या इंग्लडच्या ‘द गार्डियन’ने- ‘वर्णद्वेषी घटनांना ब्रिटिश सरकारही जबाबदार आहे,’ अशी टीका करताना, ‘पंतप्रधान जॉन्सन आणि गृहमंत्री प्रीती पटेल यांनीच विक्षिप्त प्रकारांची वाट मोकळी केली,’ असा ठपका ठेवला आहे. जॉन्सन यांनी अशा ओंगळवाण्या प्रकारांना पायबंद घालण्याऐवजी मदतच केली. वर्णद्वेषी लोकांच्या वर्तणुकीला सरकारी पाठबळ मिळाल्याने त्यांनी इंग्लंडच्या पराभवानंतर आपला पुढील कार्यभाग साधला, अशा शब्दांत ‘गार्डियन’ने आसूड ओढले आहेत.

एका अप्रतिम स्पर्धेचा कटू शेवट झाला, अशी खंत व्यक्त करीत स्वित्र्झलडमधील सर्वात जुन्या आणि निष्पक्ष ‘टागस-अन्झायगर (डेली इंडिकेटर)’ या जर्मन भाषेतील वृत्तपत्राने- फुटबॉलमध्ये वर्णद्वेषाच्या घटना आणखी किती काळ घडत राहणार, असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनांनी आपल्याला पुन्हा एकदा केवळ ब्रिटिशांच्याच नव्हे, तर एकंदर मानवजातीच्या इतिहासातून शिकण्याच्या क्षमतेवर शंका घेण्यास अगतिक केले आहे. जीवघेण्या धमक्या, द्वेषमूलक मजकूर ही फुटबॉलची परंपरा नाही, अशी खंतही या वृत्तपत्राने व्यक्त केली आहे.

पेनल्टी किकवर गोल करता आला नाही म्हणून कृष्णवर्णीय खेळाडूंना जसे इंग्लंडमधील काहींनी लक्ष्य केले, तसे अनेकांनी त्यांना पाठिंबा देताना त्यांच्यावर प्रेमाचा वर्षांवही केला. या प्रेमवर्षांवाने त्यांच्यावरील वर्णद्वेषी टीका-टिप्पण्यांनाही सडेतोड उत्तर मिळाले आहे, अशा शब्दांत ब्रिटिश फुटबॉल चाहत्यांच्या दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न ‘द न्यू यॉर्क टाइम्स’चे क्रीडा प्रतिनिधी रॉरी स्मिथ यांनी केला आहे. तर अंतिम सामन्यातील भयानक दृश्ये इंग्लंडच्या भूतकाळाची विस्मयकारक आठवण करून देणारी आहेत, असे ब्रिटनच्या ‘मिरर’ने सुनावले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)