भारताने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत गेल्या गुरुवारी १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. करोनाविरोधी लढय़ातला हा आश्वासक टप्पा. जगभरातील माध्यमांनी भारताच्या या यशाची दखल घेतली. पण या मोहिमेतील उणिवांवर बोट ठेवत माध्यमांनी मोहिमेपुढील आव्हानेही अधोरेखित केली आहेत.

‘‘चीनने आतापर्यंत २.२ अब्ज लसमात्रा दिल्या आहेत. आता एकूण लसमात्रांमध्ये चीनपाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. मात्र संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यापासून भारत अजून दूर आहे,’’ याकडे ‘फॉर्च्यून’ नियतकालिकाने लक्ष वेधले आहे. भारताने आतापर्यंत ७१ टक्के नागरिकांना पहिली मात्रा, तर ३१ टक्के नागरिकांना दोन्ही लसमात्रा दिल्या आहेत. अमेरिकेत हे प्रमाण अनुक्रमे ६७ टक्के आणि ५७ टक्के, तर चीनमध्ये ८२ टक्के आणि ७४ टक्के आहे, असे ‘फॉर्च्यून’मधला एक लेख सांगतो. दुसरी लसमात्राधारकांमध्ये भारत पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतात पहिल्या आणि दुसऱ्या लसमात्रेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी दरी का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांमधले वाढवलेले अंतर, हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, हे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. भारतात कोव्हिशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर १२ ते १६ आठवडे (जवळपास तीन ते चार महिने) करण्यात आले आहे. भारताने आता दुसरी लसमात्रा अधिकाधिक पात्रताधारकांना देण्यावर भर दिला आहे. मात्र सध्या दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनाबळींच्या संख्येत घट नोंदविण्यात येत असल्याने दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांकडून चालढकल होण्याची भीतीही या लेखात वर्तविण्यात आली आहे.

मध्यंतरी रुग्णवाढ वेगाने होत असताना अपुऱ्या लसपुरवठय़ामुळे अनेक देशांनी दोन लसमात्रांमधील अंतर वाढविण्याचे धोरण स्वीकारले. मात्र पूर्ण लसवंतांच्या (दोन्ही मात्राधारक) संख्येवर त्याचा विपरीत परिणाम झाला, याकडे लक्ष वेधत लसपुरवठा वाढल्याने भारतात दुसऱ्या मात्राधारकांचीही संख्या वाढेल, अशी आशा ‘यूएस न्यूज’च्या संकेतस्थळावरील लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे चालू वर्षांअखेपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी रोज सुमारे सव्वा कोटी इतके लसीकरण व्हायला हवे, ही बाब ‘बीबीसी’च्या वृत्तलेखात अधोरेखित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी (१७ सप्टेंबर) देशात अडीच कोटी नागरिकांना लसमात्रा मिळाल्या. देशात ऑगस्ट महिन्यात सरासरी दैनंदिन लसीकरण ६० लाख इतके होते. सप्टेंबरमध्ये त्यात वाढ होऊन ते सुमारे ७८.६९ लाख इतके झाले. मात्र ऑक्टोबर महिन्यात सरासरी दैनंदिन लसीकरण ५० लाख इतके घसरले आहे, यावर अनेक माध्यमांनी बोट ठेवले आहे.

भारताला सुरुवातीला लसटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे लसीकरण मोहीम संथगतीने सुरू होती. आता देशाने १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला असला तरी दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी कमी आहेत, याकडे ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने लक्ष वेधले आहे. भारत लसनिर्यातदार ते लसआयातदार बनत असल्याचा वृत्तलेख मध्यंतरी ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये होता. भारताच्या लसमोहिमेच्या यशाबद्दल मात्र या चिनी माध्यमाने भाष्य केल्याचे दिसत नाही.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाताळणीतील सरकारच्या चुकांचा उल्लेख करण्यात आला आहे. सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी करोना हाताळणीत हलगर्जीपणा केला आणि रुग्णवाढ होत असतानाही मोठय़ा प्रचारसभा घेतल्या. देशातील करोनाबळींची अधिकृत संख्या सुमारे साडेचार लाख असली तरी काही तज्ज्ञांच्या मते खरा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याचे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. भारतात सुरुवातीला लसीकरण मोहीम संथगतीने सुरू होती, मात्र एकेकाळी चार लाखांपर्यंत रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या या देशात सध्या दैनंदिन रुग्णसंख्या १५ हजारांपर्यंत घसरली असून, करोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. अनेक देश पुरेशा लशी मिळवताना संघर्ष करत असताना भारताच्या महालसीकरण मोहिमेला देशांतर्गत लसनिर्मात्यांमुळे बळ मिळाल्याचा ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने आवर्जून उल्लेख केला आहे.

भारताची लसीकरण मोहीम १६ जानेवारीला सुरू झाली. सुरुवातीला अनेक राज्यांची लसटंचाईची तक्रार होती. त्या वेळी भारताची लसीकरण मोहीम अडखळत का सुरू आहे, याचे विश्लेषण  ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने केले होते. भारताने १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केल्याची दखल घेतानाच ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दैनंदिन रुग्णसंख्या घटण्याचे यश लसीकरण मोहिमेला जाते, हे स्पष्ट केले. मात्र दुसऱ्या लाटेप्रमाणे पुन्हा रुग्णवाढ होऊ नये, यासाठी दुसऱ्या मात्रेचे लसीकरण वेगाने होण्याची गरज या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.      

संकलन- सुनील कांबळी