जगातील ३८ देशांत करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. साहजिकच ओमायक्रॉनने आंतरराष्ट्रीय माध्यमांतील जागा, वेळ व्यापल्याचे दिसते. आधीच अनेक करोनालाटांचा सामना करणाऱ्या देशांमध्ये ओमायक्रॉनमुळे नवी लाट येण्याची भीती व्यक्त होऊ लागली असून, त्याचा वेध घेतानाच माध्यमांनी करोना हाताळणीतील दोषांवरही बोट ठेवले आहे.

‘दोन वर्षांनंतरही करोना नियंत्रणात आणण्यात आपल्याला यश आलेले नाही, हे ओमायक्रॉनमुळे स्पष्ट झाले. जागतिक संघटित, सुनियोजित कृतीनेच करोनावर नियंत्रण आणणे शक्य आहे,’ असे निरीक्षण नोंदवणारा लेख ‘द गार्डियन’मध्ये आहे. ‘करोनामुळे जगभरात लाखोंचा मृत्यू झाला. या आजाराने आपली सर्वाची जीवनशैलीच बदलली, पण अनेक जागतिक नेते आपल्या देशापलीकडे पाहण्यास तयार नाहीत. ते संकुचित दृष्टिकोन बाळगून करोनासमाप्तीच्या वाटेवर असल्याच्या थाटात वावरत होते. ते आगीशी खेळत असून, आपण मोठय़ा परिश्रमाने पादाक्रांत केलेले प्रगतीचे शिखर धोक्यात आणत आहेत,’ अशी कठोर टिप्पणी या लेखात करण्यात आली आहे. ‘जागतिक दृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या अभावामुळे करोनाकाळ लांबत आहे. नेते मोठमोठी भाषणे करतात, पण सर्वसमावेशक, योग्य लसवाटप धोरणाबाबत कृती मात्र दिसत नाही,’’ असे नमूद करत श्रीमंत देशांनी गरजू देशांना पुरेसा लसपुरवठा करण्याची गरज या लेखात अधोरेखित करण्यात आली आहे.

ओमायक्रॉनने अमेरिकेतही शिरकाव केला आहे. तिथे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर लसमागणी वाढली, याकडे ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये दररोज दहा लाख नागरिकांचे लसीकरण होत होते. आता सुमारे १५ लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यात वर्धक मात्रा आणि पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे आजार नियंत्रण व प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने या लेखात नमूद करण्यात आले आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा लशीसाठी झुंबड उडत होती. लस घेण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. आताही लसमागणीमुळे अमेरिकेच्या लसीकरण मोहिमेवर ताण असल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्रे वाढवून मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची घोषणा अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी केल्याने आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाचा नवा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉनची रुग्णाला पुनर्बाधित करण्याची क्षमता डेल्टाच्या तुलनेत अधिक असल्याचे संशोधकांचे मत आहे. डेल्टाने दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्या लाटेची सुरुवात केली होती. आता तिथे ओमायक्रॉनमुळे चौथी करोनालाट सुरू झाली आहे. अर्थात हा विषाणू तिथे डेल्टाची जागा घेऊन रुग्णसंख्या वाढविण्याची भीती तिथल्या ‘द स्टार’च्या वृत्तलेखात वर्तविण्यात आली आहे.

सध्याच्या करोना प्रतिबंधक लशी ओमायक्रॉनवर परिणामकारक ठरतील की नाही, याबाबत सर्वत्र जोरदार चर्चा झडत आहेत. चीनने एक पाऊल पुढे टाकत ओमायक्रॉनवर लस आणि चाचण्यांबाबतच्या संशोधनावर कसा भर दिला आहे, याचा लेखाजोखा ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने मांडला आहे. ‘ओमायक्रॉन प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी चिनी कंपन्यांमध्ये संशोधन सुरू आहे. या लशीचा वापर होईल का, कधी होईल, हे सांगता येत नाही. सध्याच्या लशी ओमायक्रॉनवर परिणामकारक नाहीत, असे स्पष्ट झाल्यानंतरच नव्या लशींचा वापर करू. मात्र, अन्य उत्परिवर्तित विषाणूंप्रमाणे ओमायक्रॉन प्रतिबंधासाठी तत्परतेने लसनिर्मितीचे पाऊल उचलण्यात आले,’ असे ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’च्या लेखात म्हटले आहे. करोनाच्या पहिल्या उत्परिवर्तनापासूनच चीनकडे लशीसाठीची तंत्रज्ञानविषयक तयारी आहे. करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रतिबंधासाठी लवकरात लवकर लसनिर्मिती करण्यावर चीनचा भर असतो, असे या लेखात सोदाहरण स्पष्ट करण्यात आले आहे.

ओमायक्रॉनचे जगभर सावट आहे. बिटा ते गामा आणि डेल्टा ते ओमायक्रॉनपर्यंतच्या उत्परिवर्तित विषाणूंमुळे अनेक सणोत्सवांवर विरजण पडले. आता ओमायक्रॉनचा नाताळ सणावर काय परिणाम होईल, याचा वेध ‘बीबीसी’सह बहुतांश आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतला आहे. अनेक देशांत नाताळ पाटर्य़ा रद्द करण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉनमुळे अनेक देशांनी हवाई प्रवास निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना परदेश दौरे रद्द करावे लागले आहेत. त्याचा वेध घेतानाच निर्बंधांमुळे हवाई क्षेत्राला कसा फटका बसला, याचे विश्लेषण माध्यमांनी केले आहे.

संकलन- सुनील कांबळी