जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना पाकिस्तानात मात्र समाजमन ढवळून निघते. निमित्त असते ते ‘औरत मार्च’चे. आपल्या हक्कांसाठी पाकिस्तानच्या विविध शहरांतून महिला घराबाहेर पडतात आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला आव्हान देतात. यंदा कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, क्वेट्टा आदी शहरांत महिलांनी मोर्चा काढला. कट्टरवाद्यांनी यंदा मोर्चाच्या आयोजकांना धमकावलेही होते. पण त्याची भीती न बाळगता मोर्चा निघालाच. आंतरराष्ट्रीय माध्यमांचे या मोर्चावर बारीक लक्ष होते. त्यामुळे मोर्चाआधीच माध्यमांनी त्यावर भाष्य केल्याचे पाहावयास मिळते.

कौटुंबिक हिंसाचार आणि छळाविरोधात २०१८ मध्ये कराची येथे आंतरराष्ट्रीय महिलादिनी काही महिलांनी निदर्शने केली आणि ‘औरत मार्च’ची सुरुवात झाली. कौटुंबिक हिंसाचार, प्रतिष्ठेच्या नावाखाली तरुणींची हत्या, मॉडेल कंदील बलोचची हत्या आदींमुळे त्या मोर्चास पूरक पाश्र्वभूमी तयार झाली होती. पाकिस्तानात प्रतिष्ठेच्या नावाखाली दर वर्षी सुमारे हजारभर महिलांची हत्या केली जाते. महिलांच्या या मोर्चाची पाश्र्वभूमी आणि सद्य:स्थितीबाबत तपशीलवार माहिती देणारा लेख ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावर आहे.

यंदाच्या ‘औरत मार्च’चा जाहीरनामा गुरुवारी लाहोरमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा जाहीरनामा ‘खुदमुख्म्तारी’ अर्थात महिला स्वातंत्र्यावर केंद्रित आहे. महागाईनियंत्रण, कामगारांना ४० हजार रु. किमान वेतन, आदी मागण्यांचाही त्यात समावेश आहे. या जाहीरनाम्यासह मोर्चाचे वृत्त ‘डॉन’सह मुख्य प्रवाहातील पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. ‘पाकिस्तानातील औरत मार्च क्रांतिकारी का आहे?’ अशा आशयाचा लेख दीड महिन्यांपूर्वीच ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झाला होता. मात्र, ‘आक्षेपार्ह’ फलकांविना महिलांनी हा मोर्चा काढावा, असा सूर पाकिस्तानातील काही माध्यमांत उमटला. माहिरा खानसारख्या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीने मोर्चाला पाठिंबा दिला. परंतु तिनेही ‘प्रक्षोभक फलकबाजी टाळावी,’ असे ट्वीट केले होते. वृत्तवाहिन्यांचे नियमन करणाऱ्या पाकिस्तानच्या ‘पेमरा’ संस्थेने मोर्चासंबंधी ‘अश्लील आणि अयोग्य दृश्ये’ प्रसारित करू नयेत, अशी आगाऊ सूचना वाहिन्यांना केली. तर या मोर्चावरील र्निबधाची मागणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी फेटाळली. ‘औरत मार्च’मुळे पाकिस्तानी समाजमनाची झालेली दुभंगावस्था काही माध्यमांनी सोदाहरण अधोरेखित केली आहे.

कल्पक, वैशिष्टय़पूर्ण मजकूर असलेले फलक हे या मोर्चाचे वैशिष्टय़ मानले जाते. गेल्या वर्षीच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तरुणी, महिलांनी ‘मेरा जिस्म, मेरी मर्जी’ असा मजकूर असलेले फलक झळकावले होते. त्यावर कट्टरवाद्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या मोर्चेकऱ्यांना धमकावणाऱ्या एका मौलवीचे दृक्मुद्रण समाजमाध्यमांवर पसरले. ‘अपना खाना खुद गरम कर लो’, ‘अपना मोजा खुद ढूंढ लो’ असे फलक मोर्चेकऱ्यांनी याआधीच्या मोर्चात झळकावले होते. या फलकांवरून पाकिस्तानात मोठे वादळ उठले होते. त्याचा वेध घेणारा लेख ‘द डिप्लोमॅट’मध्ये आहे.

‘औरत मार्च’मधील फलकांवरील मजकुराची परिणामकारकता अधोरेखित करणारा लेख कांदबरीकार मोहम्मद हनीफ यांनी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला आहे. ‘हाऊ डू आय नो व्हेअर युवर सॉक्स आर?’ शीर्षकाच्या या लेखातून महिलांच्या बंडाची तीव्रता लक्षात येते. लैंगिक छळापासून मुक्तता ते मालमत्तेवर समान हक्कापर्यंतच्या मागण्यांचा समावेश ‘औरत मार्च’च्या जाहिरनाम्यात आहे. मात्र, या मागण्यांपेक्षा पुरुषांना अधिक चिंता आहे ती फलकांवरील मजकुराची. हाती मार्कर, कुंचले घेऊन स्त्री-पुरुष असमानतेकडे लक्ष वेधणारे फलक तयार करणाऱ्या तरुणी, महिला या पाकिस्तानातील कट्टरवाद्यांची डोकेदुखी ठरल्या आहेत. कट्टर पुरुषांनी या फलकांचा इतका धसका घेतला आहे की, ते आता महिलांनी करावयाच्या गोष्टींचीही यादी करू लागले आहेत, असे या लेखात म्हटले आहे.

महिलांच्या हक्कांबाबत आवाज उठविणाऱ्या या फलकांचे या मोहिमेत मोठे योगदान आहे. महिलांच्या हक्कांबाबत कामाच्या ठिकाणी, न्यायालयात आणि संसदेत चालणारी चर्चा या फलकांनी थेट स्वयंपाकघरात आणि शयनगृहात नेली आहे. तुम्ही मालमत्तेत समान वाटा, कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव याबाबत बोलू शकता; पण तुमचे जेवण स्वत: गरम करा, असे बजावण्याची तुमची हिंमत कशी होते, असा या पुरुषांचा सूर असतो. ‘ महिलांना समानतेची वागणूक देत असल्याचे दाखविण्यासाठी दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचाही दाखला दिला जातो. मात्र, भुत्तो यांची २००७ मध्ये हत्या झाली, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षाही झाली नाही, याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जाते, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

(संकलन : सुनील कांबळी)