रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे ९० हजार सैनिक तैनात केल्यामुळे युक्रेनच्या रक्षकाची भूमिका निभावणारा अमेरिका आणि त्याचा कथित तहहयात शत्रू रशिया यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला. तो कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक झाली. तिचे फलित काय, या प्रश्नाचा सर्वांगाने वेध घेण्याचा जागतिक माध्यमांचा प्रयत्न दिसतो.

बायडेन-पुतीन बैठक ही बायडेन प्रशासनासाठी सर्वांत मोठी चाचणी असल्याच्या टिप्पण्या अमेरिकी माध्यमांनी केल्या आहेत. बायडेन यांनी रशियाला दिलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांच्या इशाऱ्याचे वृत्त प्रसिद्ध करताना ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने पुतीन-बायडेन बैठक ही युरोपातील स्थैर्य, अमेरिकी वर्चस्वाबद्दलची विश्वासार्हता आणि पुतीन यांच्या कुरापतींपासून वाचवण्यासाठी अमेरिकेने आश्वस्त केलेल्या युक्रेनच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची चाचणी होती, असे म्हटले आहे. तर ‘सीएनबीसी’ या वाहिनीनेही तज्ज्ञांच्या हवाल्याने असेच भाष्य करताना रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.    

अमेरिकेच्या इशाऱ्याचा रशियावरील परिणामांचा वेध युक्रेनमधील माध्यमांनी घेतला आहे. बायडेन यांच्याशी चर्चेनंतर पुतीन आपल्या धोरण वर्तणुकीत बदल करतील, अशी अपेक्षा करणे म्हणजे भाबडेपणा. पुतीन त्यांना जे हवे आहे, तेच ते करतील, असे भाकीत मायकेल बॉट्ससर्किव्ह या पत्रकाराने ‘लिगा’ या युक्रेनियन वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना केले. पुतीन यांचे मुख्य उद्दिष्ट अमेरिकेला धमकावणे आणि युक्रेन रशियाच्याच प्रभावाखाली राहील, ‘नाटो’मध्ये सामील होणार नाही, याची हमी मिळवणे, हे आहे, असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. तर पुतीन यांना ‘माथेफिरू’ आणि बायडेन यांना त्याचा डॉक्टर अर्थात ‘मानसोपचारतज्ज्ञ’ अशी उपमा देणारा राजकीय तज्ज्ञ इगोर इदमन यांचा लेख ‘गोर्डोनुआ’ या युक्रेनियन वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केला आहे. आक्रमक रुग्णाला कसे शांत करायचे हे डॉक्टर बायडेन यांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टरला भेटल्यावर हिंसक माथेफिरू (पुतीन) काही काळासाठी शांत झाला आहे, असा उपहास इदमन यांनी केला आहे.

युरोपातल्या माध्यमांनी अमेरिका-चीन तणावाच्या दृष्टिकोनातून या बैठकीचे विश्लेषण केले आहे. रशिया आणि चीन यानिमित्ताने आणखी जवळ यावेत, असे बायडेन यांना वाटत नसल्याचे ‘ल् स्तॅम्पा’ या इटलीतील वृत्तपत्रातील लेखात राजकीय भाष्यकार ल्युसिओ काराचिओलो यांनी केले आहे. युक्रेनच्या पाठीशी उभे राहून रशियाला चीनच्या निकट आणण्याचा हा सौदा किती किफायशीर ठरू शकतो, असा प्रश्न अमेरिकेलाच आता सतावू लागला आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. युक्रेन प्रश्नावर बायडेन जे काही करतील त्याचे परिणाम चीन आणि तैवानवरसुद्धा होतील, असा इशारा ‘डेर टॅगेसपीगेल’ या जर्मन वृत्तपत्राने दिला आहे. युक्रेनला जबरदस्तीने आपल्या नियंत्रणाखाली आणण्याची तुलनेने कमकुवत असलेल्या रशियाची कृती अमेरिकेने सहन केल्यास आपणही तैवान ताब्यात घेऊ शकतो, असे चीनला वाटू शकते, अशी भीतीही या वृत्तपत्राने व्यक्त केली आहे.

रशियन माध्यमांतील निरीक्षणे मात्र संमिश्र आहेत. संभाव्य तणाववाढ टळली, असे निरीक्षण अंतोन लॅव्हरोव्ह या विश्लेषकाने ‘इझ्वेशिया’ या वृत्तपत्रात नोंदवले आहे. बायडेन-पुतीन चर्चेत कोणतेही महत्त्वाचे निर्णय झाले नाहीत, पण द्विपक्षीय संबंधांची सद्य:स्थिती पाहता अशी बैठक अत्यंत उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात मुत्सद्दी जेवढा काळ गप्प राहतील, तेवढाच धोका वाढतो आणि मग त्यांच्याऐवजी बंदुकाच बोलू लागतात, असे सूचक विधानही लॅव्हरोव्ह यांनी केले आहे.

पहिल्या फेरीत पुतीन यांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष रशियन राजकारणी लिओनिद गॉझमन यांनी ‘एको ऑफ मॉस्को’ या संकेतस्थळावरील लेखात काढला आहे.

पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर बायडेन यांनी आपल्या युरोपीय मित्रदेशांशी संवाद साधल्याच्या वृत्तांकडे लक्ष वेधत, ‘‘आमचे अध्यक्ष कोणाशी संवाद साधू शकतील, बेलारूसचे लुकाशेन्को की व्हेनेझुएलाचे मादुरो? पुतीन या पृथ्वीवर एकटेच आहेत’’ अशा शब्दांत गॉझमन यांनी टीका केली आहे.

ब्रिटनमधील ‘द टाइम्स’ने अमेरिकेच्या इशाऱ्याच्या परिणामकारकतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यापैकी काही भार अपरिहार्यपणे पाश्चात्त्य अर्थव्यवस्थांवर पडेल. त्यामुळे संघर्ष दीर्घकाळ शीतपेटीत राहणे सर्वांच्याच हिताचे आहे, असेही ‘द टाइम्स’च्या लेखात म्हटले आहे. 

          संकलन : सिद्धार्थ ताराबाई