युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांना अखेर नाक मुठीत धरून युद्धविरामाची घोषणा करावी लागली. हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आडदांडशाहीचा विजय भासला तरी तो तसा नाही. पोरोशेन्को आणि पुतिन या दोघांसाठीही युद्धविराम ही आवश्यकता बनलेली होती. यामुळे युक्रेनमधील संघर्ष लगेच संपुष्टात येईल, असे नाही. याचे कारण पोरोशेन्को यांची युद्धविरामाची घोषणा रशियावादी बंडखोरांनी साफ धुडकावून लावली आहे. तसे होणारच होते. गेल्या सात-आठ दिवसांपासून पोरोशेन्को आपण युद्ध थांबविण्यास तयार असल्याचे संकेत देत होते, परंतु त्याला रशियावादी बंडखोरांनी तेव्हाही हिंग लावला नव्हता. तेव्हाच हा युद्धविराम एकतर्फी असणार आणि रशियावादी बंडखोर तो फेटाळून लावणार हे स्पष्ट झाले होते. या युद्धविरामासाठी युक्रेनने काही अटी घातल्या आहेत. त्यात बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवणे ही एक महत्त्वाची अट आहे. ती मान्य करणे म्हणजे स्वत:च स्वत:ची मान गिलोटिनखाली देण्यासारखे आहे, हे बंडखोरांना पक्के माहीत आहे. युद्धविराम मान्य केला, तर युक्रेन लगेचच साफसफाई मोहीम सुरू करील, अशी त्यांना भीती आहे. या युद्धविरामानंतर देशातील प्रांतिक सरकारांना अधिक अधिकार दिले जातील. त्यासाठी घटनेत दुरुस्ती केली जाईल, अशा आश्वासनांवरही विश्वास ठेवण्यास बंडखोर तयार नाहीत. पण आज ना उद्या त्यांना शस्त्रे खाली ठेवावीच लागणार आहेत. गेल्या फेब्रुवारीत रशियाने क्रायमियाचा घास घेतला. युक्रेनपासून हा प्रांत तोडला. पुतिन यांनी अत्यंत आक्रमकपणे ते राजकारण पार पाडले. मात्र त्यामुळे रशियाला अमेरिका आणि युरोपीयन युनियनने लादलेल्या आर्थिक र्निबधांना सामोरे जावे लागले. ते सहन करण्याची ताकद रशियात आहे, पण त्यालाही काही मर्यादा आहे. आता पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांनी चालविलेल्या कारवायांमुळे रशियावर अधिक कडक आर्थिक र्निबध घालण्यात आले असते, तर रशियाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्याशिवाय राहिले नसते. ब्रसेल्समध्ये नुकत्याच झालेल्या जी-सात शिखर परिषदेत असे नवे र्निबध लादण्याचे सूतोवाच अमेरिकादी देशांनी केले होते. अशा परिस्थितीत पूर्व युक्रेनमधील बंडखोरीला खतपाणी घालून रशियातील कडव्या राष्ट्रवाद्यांच्या अभिनंदनास पुतिन पात्र ठरले असते; परंतु त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा होऊन अखेर त्यांचे स्वत:चेच सिंहासन डळमळू लागले असते. त्यामुळे या संघर्षांतून सन्मानाने माघार घेणे ही पुतिन यांची राजकीय निकड होती. परवा रशियाने युक्रेनचा गॅसपुरवठा बंद केला तो या निकडीतूनच. पुतिन यांनी गॅस बंद करून नाक दाबल्याने पोरोशेन्को यांना तोंड उघडावेच लागले आणि अखेर पुतिन व जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी युद्धविरामाची घोषणा केली. हे करताना पोरोशेन्को यांनी पुतिन यांची कशी मनधरणी केली आणि त्यांना कोणती आश्वासने दिली हे जाहीर झालेले नाही. मात्र गेल्या आठवडय़ात क्यीव्हमधील रशियन दूतावासासमोर झालेल्या निदर्शनांदरम्यान पुतिन यांना ज्यांनी यथेच्छ शिवीगाळ केली त्या आपल्या परराष्ट्रमंत्र्यांची मात्र पोरोशेन्को यांनी उचलबांगडी केली. हे अर्थातच पुतिन यांची नसलेली दाढी कुरवाळण्यासाठी. मात्र ते करून युक्रेनमधील संघर्ष थांबत असेल, तर तो आपलाच विजय असल्याचे पोरोशेन्को जाहीर करू शकतात. त्याच वेळी बंडखोरांना अभय देण्याचे आश्वासन युक्रेनने दिले असल्याने, हा आपलाही विजय असल्याचे पुतिन म्हणू शकतात. पण खरे तर या संघर्षांत पुतिन यांनी गमावले काहीच नाही. उलट क्रायमियाचा घास घेण्यात ते यशस्वी झालेच आणि युक्रेनचे नाक दाबून युरोपीय संघालाही पुतिन यांनी नमविले.